प्रासंगिक - एरी मैं तो प्रेम दिवानी

एरी मैं तो प्रेम दिवानी प्रास्ताविक वाणी जयराम यांच्या गौरवार्थ रचलेली शब्दांजली, पुरस्कारांची घोषणा होऊन उणेपुरे दहा दिवस उलटायच्या आत श्रद्धांजलीत रुपांतरीत करावी लागेल असं स्वप्नात हि कधी आलं नसतं मात्र नियती पुढे कुणाचं काही चालत नाही हेच खरं. अनेकदा अनेकांना, आयुष्य भर प्रयत्न करूनही असाध्य राहणारी गोष्ट, कुणा एखाद्याला अगदी पोर वयात साध्य होते. विधात्या कडून गोड गळ्याची देणगी प्राप्त झालेली तामिळनाडूतल्या वेल्लोरची मुलगी कलैवाणी, अवघ्या पाचव्या सहाव्या वर्षीच शास्त्रीय संगीतातल्या रागदारीतला भेद जाणू लागते आणि वयाच्या आठव्या वर्षी तत्कालीन आकाशवाणी मद्रास केंद्रावरून तिचं गायन प्रसारित ही होतं. हे सगळं अकल्लपित, अचंबित करणारं असलं तरी सत्य आहे. या मुलीच्या बारशाच्या दिवशीच ज्योतिषानं पुढे ती मोठी गायिका होईल असं भविष्य कथन केलं होत. त्याला साजेसं नाव ठेवावं असही वडिलांना सुचवलं होतं. म्हणून या मुलीचं नाव कलैवाणी म्हणजे कलावती, बुद्धीमती 'मां सरस्वती' ठेवण्यात आलं. घरी त्याचं लघुरूप वाणी झालं. निव्वळ गायन, संगीतच नाही तर पेंटिगचा ही व्यासंग असलेल्या कलैवाणीनं आकाशवाणी पास...