स्मृतिबनातून - विकलचंद्र

विकलचंद्र गाण्यातला मी तानसेन नाही पण कानसेन नक्कीच आहे. याचे बरंच मोठे श्रेय माझ्या आईला आणि आकाशवाणीला आहे. नागपूर आकाशवाणी केंद्रावरून सकाळी प्रसारित होणारा अर्चना ह्या भक्तिसंगीताचा कार्यक्रमच माझी आई गेली कित्येक वर्ष नियमितपणे भक्तिभावानं ऐकत आहे. पहाटे लवकर उठून कामांना सुरुवात करतांना चहाचं आधण ठेवणे आणि रेडिओच बटन दाबणे हे तिचे व्यसन आहे…….. हो व्यसनच म्हणावं लागेल. याचा परिणाम असा झाला की सकाळी अंथरुणातून बाहेर येताना कुमारजींचा ' मलयगिरीचा चंदन गंधित धूप' लागलेला असायचा आणि सुमन ताईंची राधिका हरी भजनी रंगलेली असायची. पाठोपाठ माणिकताईं 'क्षणभर उघड नयन' आळवायच्या, आशाबाईंच्या 'प्रभाती सूर नभी रंगती' ' लता दिदींच 'तूच करता आणि करविता शरण तुला भगवंता' काना मनावर बिंबवायच्या, आशालता वाबगावकरांच्या 'रविकिरणांची झारी' बाबूजींच्या 'देहाची तिजोरी' अश्या कित्येक गीतांच्या साथीने शाळेची तयारी होत असे. जस जसे मोठे होत गेलो तसं तशी अशी समृद्ध सकाळ मात्र अभावानेच अनुभवता येऊ लागली. लहानपणीच झालेल्या या सूरसंस्कारां नंतरही, गळ्य...