स्मृतीबनातून -सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नांची नुरवी"

"सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नांची नुरवी" श्रीगजाननाला भारतीय संस्कृतीत अनन्य साधारण महत्व आहे. तो गणपती आहे म्हणजेच गणांचा, आपणा सर्वांचा तो अधिपती आहे. बहुदा म्हणूनच त्याला आद्य पूजेचा मानही मिळाला आहे. अलीकडे परिस्थिती काहीशी बदललेली असली, तरी साधारण साठ, सत्तरच्या दशकात जन्मलेल्या बहुतेकांना अक्षर ओळख ही, त्याचेच स्मरण करून झालेली आहे. आपल्यात तो इतका सामावलेला आहे की एखाद्या गोष्टीची, कार्याची सुरवात करण्याला त्या गोष्टीचा श्रीगणेशा करणे अशी संज्ञाच मिळाली आहे. गणेशाला बुद्धी, युद्ध, कला यांची देवता मानण्यात येत. पूर्वी घराघरांतून होणारी गणेश पूजा काही विशिष्ठ हेतूंनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक उत्सवात रूपांतरीत केली आणि आज तर गणेश उत्सवाने प्रांत, राज्य, देश अश्या सीमा पार केल्या आहेत आणि तो लोकप्रियतेच्या कळसावर आहे. भाद्रपदातील गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशी पर्यंत महाराष्ट्रात आणि आता इतरत्र ही हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जातो. आता त्या गणरायांच्या आगमनाचे वेध सर्वांनाच लागले आहेत. गणपती ही देवता सुख कारक, दुःख विनाशक, विघ्न ह...