स्मृतीबनातून -सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नांची नुरवी"
"सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नांची नुरवी"
गणपती ही देवता सुख कारक, दुःख विनाशक, विघ्न हरणारी अशी मानली गेली आहे. गणेशोत्सवा मुळे भक्त मंडळींचा भक्तिभाव मोठया उत्साही, उत्सवी भावनेतून प्रकट होताना दिसतो. गणेश पूजनाचं अविभाज्य अंग म्हणजे आरती. समर्थ रामदास स्वामी कृत सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी...ही आरती माहित नसलेली व्यक्ती मोठ्या प्रयासानेच कदाचित सापडू शकते. गणपतीच्या लौकिक रुपाचं अत्यंतिक अलौकिक गेय वर्णन समर्थांनी केलेलं आहे. मराठी माणसाच्या गेल्या कित्येक पिढ्या ही आरती म्हणत आली आहे आणि पुढील पिढ्याही ही आरती म्हणत राहणार. या आरतीच माहात्म्य एवढं की गणपतीच नव्हे तर अन्य कुठलाही पूजाविधी या आरती शिवाय संपन्न होत नाही. असं जरी असलं तरी ही आरती म्हणत असताना अनेकदा शब्दोच्चार, शब्दार्थ दुर्लक्षित होत असल्याचं चित्र दिसतं. आगामी काळात, ही लोकप्रिय आरती भक्तिभावा बरोबरच बुद्धीभावानेही आकळून आळवली जावी या साठी हा लेखन प्रपंच.
अगदी बालपणा पासून ही आरती कानावर पडत आली तशी ती म्हटली गेली. पुढे जेव्हा थोडी समज आली, थोडाफार चिकित्सकपणा वाढला तेव्हा पहिल्या कडव्याच्या पहिल्या दोन ओळी जश्या म्हटल्या जातात त्या थोड्याशा खटकू लागल्या. सर्व सामान्यतः आरती म्हणताना सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची, इथे विराम घेतला जातो पण मनात असं आलं की यामुळे अर्थाचा अनर्थ तर होत नाही? सुखकर्ता दुखहर्ता ही वार्ता विघ्नांची कशी होऊ शकेल? तो तर सुखकर्ता आहे, दुःखहर्ता आहे, तो तर विघ्नांची वार्ता उरुच देत नाही. असाच अर्थ अभिप्रेत आहे, मग काही तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की आरती म्हणताना, लिहिताना हा विराम 'नुरवी' शब्दा नंतर घेतला तर अर्थ अधिक नीट लागतो. हा विराम म्हणताना, लिहिताना नुरवी या शब्दा नंतरच समर्थ स्वामी रामदासांनी योजला असावा आणि कालौघात त्याची जागा बदलली असावी. समर्थांचा भक्तिभाव, प्रतिभा सामर्थ्य आणि शब्द प्रभुत्वाचा विचार करता त्यांच्या कडून अशी रचना होणं अशक्य आहे हे तर निर्विवाद आहे. हा जो गणपती आहे तो सुखकर्ता आहे. दुःख हरणारा आहे. तो विघ्नांची वार्ता उरू देत नाही. प्रेम पुरवतो आणि कृपा करतो हाच आशय आहे. अर्थात जिथे जिथे ही छापील आरती बघितली तिथे तिथे ती
"सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची|
नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची |"
अशीच छापलेली आढळली. माझ्या समजुती नुसार ती पुढील प्रमाणे असावी.
"सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नांची नुरवी l
पुरवी प्रेम कृपा जयाची I"
या संदर्भात आकाशवाणी मुंबईत कार्यरत असताना ज्येष्ठ कवी, संगीतकार यशवंत देव यांच्याशी ही चर्चा झाली होती आणि त्यांनीही सहमती दर्शवत नुरवी नंतर विराम घेऊनही ती कशी मीटर मध्ये बसते, ते म्हणूनही दाखवलं होतं. तसच अधिक अर्थवाही होत असल्याचं मत ही व्यक्त केलं होत. तरीही भाषा तज्ञ, संगीत तज्ञ, रामदासी संप्रदायातील अधिकारी व्यक्तींच या संदर्भात काही अन्य विवेचन असेल तर त्याच स्वागतच आहे. अन्यथा गणरायांच्या आगमनाच्या या मुहूर्तावर सर्वांनीच ही लोकप्रिय आरती नीट समजून उमजून म्हणण्याचा संकल्प करूया.
या व्यतिरिक्त ही आरती म्हणत असताना दुसऱ्या कडव्यातली तिसरी ओळ शोभतो बरा ऐवजी शोभ तोबरा अशी काही वेळा म्हटली जाते. असाच काहीसा प्रकार तिसऱ्या कडव्याच्या फणिवरबंधना शब्दा बाबतही काही वेळा होतो. लांब उदरावर फणा असलेला नाग बांधलेला आहे असे ते वर्णन आहे मात्र अनेकदा हा शब्द फणिवरवंदना असा म्हटला जातो. आणि काही जण तर चक्क फळीवर ही वंदनेला बसवायला मागे पुढे पाहत नाही. संकष्टी हा शब्द चतुर्थी आणि गणपतीच्या अनुषंगाने येणारा असल्याने कित्येकवेळा संकट समयी पाव अश्या अर्थाने असला तरी संकष्टीला पाव अश्या समजुतीने म्हटला जातो. श्रीगजाननाने प्रसन्न होण्यासाठी संकष्टीचा मुहुर्तच धरावा असं काही नाही. अर्थात संकष्ट हा शब्द जुन्या काळी संकट या अर्थाने वापरला जात असे असं वाचनात आलं आहे. त्यामुळे इथे मतभेदाला वाव आहे, कारण संकट आणि संकष्टी हे समानार्थी शब्द म्हणून दोन्ही बरोबरच अशी काही जण मांडणी करतात. अर्थात इथे संकष्टी या शब्दाचा संकष्टी चतुर्थी शी संबंध नाही हे मात्र लक्षात घेतले पाहिजे.
सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची नुरवी |
पुरवी प्रेम, कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची|
कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥
जय देव, जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥
रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|
चंदनाची उटी , कुमकुम केशरा|
हिरेजडित मुकुट, शोभतो बरा |
रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया|
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥
लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना |
सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना|
दास रामाचा, वाट पाहे सदना|
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना|
जय देव जय देव, जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥
******
नितीन सप्रे
8851540881
nitinnaapre@gmail.com
श्री गणेशाचा आशिर्वाद तुम्हाला आहे यात शंका नाही. त्याशिवाय इतकं सकस लिखाण कसे होणार? लिहीत रहा.
उत्तर द्याहटवागणरायाच्या आरती मधील चुकीचे शब्द उच्चारले जाणार नाहीत , अशी आशा करू या , नितीन , अतिशय सुंदर निरीक्षण ,
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवागणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
You have rendered a yeoman service by drawing pointed attention to the deviations noticed aplenty while performing the Aarti, together with a pious appeal to adhere to the grammar and syntax inherent within, and be parallel to the basics of the original. Much appreciate and salute the discerning mind geared towards the common good!
उत्तर द्याहटवाThank you for your valuable comment.
उत्तर द्याहटवाअप्रतिम लेख 🙏🙏
उत्तर द्याहटवागणपतीची आरती कशी व्यवस्थित म्हटली पाहीजे याचे उपयुक्त मार्गदर्शन मिळाले.भावर्थ समजला
उत्तर द्याहटवाछान
नुरवी ची योग्य जागा प्रथमच कळली. धन्यवाद.
उत्तर द्याहटवा