प्रासंगिक - तुझा सूर की अर्णव अमृताचा

तुझा सूर की अर्णव अमृताचा पितृछाया हरपली. लक्ष्मीची पाठ फिरली. कुटुंबाची जबाबदारी अंगावर येऊन पडली. कुटुंबियांना काही कमी पडू नये म्हणून पोर वयातच काम सुरू करावं लागलं. मुंबई उपनगरातील मालाड रेल्वे स्टेशन पासून दूर असलेल्या कामाच्या ठिकाणी टांग्यानं न जाता स्वत:च्या टांगांनी जाऊन, त्या वाचलेल्या पैशातून ही मुलगी भाजी घेत असे. चरितार्थासाठी पै पै वाचवणारी, बहुतेक, मूळ हेमा हर्डीकर(मूळ हर्डीकर हे आडनाव पुढे कधीतरी रूढ आडनावात परिवर्तित झाले असं माझ्या वाचनात आलं. या संदर्भात कुणाला अधिक माहिती असल्यास कृपया द्यावी) ही पोरसवदा मुलगी आपल्या स्वर हेमानी अवघी चराचर सृष्टी अभिषिक्त करेल, अशी कल्पना स्वप्नात देखील कुणी केली नसेल. पण हे वास्तव ठरलं. साक्षात सरस्वतीनं या मुलीचा कंठात वास करून स्वरालाप केला. स्वर-लक्ष्मी प्रसन्न होतीच नंतर धन-लक्ष्मीही कृपावंत झाली. वसुधातळी स्वर-मौक्तिकांची असीम दौलत उधळून देणारी ही दैवीगुणी मुलगी या लोकी लता मंगेशकर म्हणून ओळखली गेली. नामा आधी आणि नंतर लागणारी विशेषणं, पदव्या, पुरस्कार जितके अधिक, तितकी ती व्यक्ती मोठी अशी एक सर्वसाध...