स्मृतीबनातून - थकले रे, घेता विकत शाम

थकले रे, घेता विकत शाम गदिमा(गजानन दिगंबर माडगुळकर) आणि बाबूजी(सुधीर फडके) म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पटलावरची नक्षीदार वेलबुट्टीच. आपल्या अभिजात शब्द सूरांनी या जोडगोळीने मराठी कला जीवन दर्जेदार आणि समृद्ध केलं. गदिमा शब्दप्रभू तर बाबूजी, शब्दार्थ सूरावटीत बांधून गळ्यातून उतरविण्यात वाकबदार. या दोघांना सिद्धी प्राप्त कलाकार म्हटलं तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. मराठी चित्रपट संगीत, भाव संगीत, लोक संगीत, भक्ती संगीत अश्या सर्वच दालनांतून त्यांनी समर्थ संचार करून श्रोत्यांना नेहमीच उच्च अभिरुचीचा नजराणा सादर केला. राजा परांजपे या चित्र महर्षींच्या अभिनयासह दिग्दर्शनाचा परीस स्पर्श शब्दप्रभू गदिमा आणि स्वरयोगी सुधीर फडके अशी तिहायी झाली की सोनसळी चित्रकृती घडणारच. मराठी चित्रपट 'जगाच्या पाठीवर' ही अशीच वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती. १९६० साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. बाबूजींनी ह्या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. बाबूजींच्या स्वरसाजात गदिमांची शब्दकळा एखाद्या घरंदाज पुरंध्री प्रमाणे खुलून दिसली. जगाच्या पाठीवर ती गाजली. चित्रपटातलं एकूण एक गीत, ही ...