स्मृतीबनातून - थकले रे, घेता विकत शाम

 थकले रे, घेता विकत शाम 


गदिमा(गजानन दिगंबर माडगुळकर) आणि बाबूजी(सुधीर फडके) म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पटलावरची नक्षीदार वेलबुट्टीच. आपल्या अभिजात शब्द सूरांनी या जोडगोळीने मराठी कला जीवन दर्जेदार आणि समृद्ध केलं. गदिमा शब्दप्रभू तर बाबूजी, शब्दार्थ सूरावटीत बांधून गळ्यातून उतरविण्यात वाकबदार. या दोघांना सिद्धी प्राप्त कलाकार म्हटलं तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. मराठी चित्रपट संगीत, भाव संगीत, लोक संगीत, भक्ती संगीत अश्या सर्वच दालनांतून त्यांनी समर्थ संचार करून श्रोत्यांना नेहमीच उच्च अभिरुचीचा नजराणा सादर केला. 

राजा परांजपे या चित्र महर्षींच्या अभिनयासह दिग्दर्शनाचा परीस स्पर्श शब्दप्रभू गदिमा आणि स्वरयोगी सुधीर फडके अशी तिहायी झाली की सोनसळी चित्रकृती घडणारच. मराठी चित्रपट 'जगाच्या पाठीवर' ही अशीच वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती. १९६० साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. बाबूजींनी ह्या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. बाबूजींच्या स्वरसाजात गदिमांची शब्दकळा एखाद्या घरंदाज पुरंध्री प्रमाणे खुलून दिसली. जगाच्या पाठीवर ती गाजली. चित्रपटातलं एकूण एक गीत, ही श्रोत्यांसाठी परमानंदाची पर्वणीच ठरली. विशेष म्हणजे ह्या गाजलेल्या चित्रपटातली सर्व गाणी त्याकाळीच नाही तर आज साठ वर्षे उलटली तरी विस्मरणात गेली नाहीत.   

लोकांच्या ओठावर आहेत. ही सर्वच गाणी काव्य, संगीतरचना आणि गायन या निकषांवर उत्कृष्ट ठरणारी असली तरी 'थकले रे नंदलाला' आणि 'बाई मी विकत घेतला शाम' या दोन गीतांच्या काव्य स्फूर्ती कडे विशेष दृष्टिक्षेप टाकला तर कवीचं थोरपण सहज समजून येतं. बाबूजींची रचनाकारी आणि आशाताईं सह गायकी यामुळे तर कपिलाषष्ठीचा योग जुळून आला.


मुळात या दोन्ही गीतांची प्रेरणा गदिमांना मिळाली ती भक्तीमार्गी दार्शनिक शब्द रचनाकार सूरदास यांच्या 'अब मैं नाच्यो बहुत गोपाल' आणि संत मीराबाई यांच्या 'मैने लिनो गोविंद मोल, माई री मैने लिनो गोविंद मोल' या दार्शनिक काव्यातून. चित्रपटांसाठी प्रसंगाधारीत गीत रचना करावी लागते. गदिमां सारखा प्रतिभा संपन्न गीतकार त्यातही साहित्यिक मूल्य आणि दार्शनिकता कशी पुरेपूर जोपासू शकतो याचं उत्तम उदाहरण 'बाई मी विकत घेतला शाम' आणि 'थकले रे नंदलाला' ही दोन गाणी आहेत. 


'अब मैं नाच्यो बहुत गोपाल ,

काम क्रोध को पहरि चोलना ,

कंठ विषयन  की माल ,

अब मैं नाच्यो बहुत गोपाल। 


महामोह के नूपुर बाज़त ,

निंदा सबद रसाल ,

भरम  भयो ,मन भयो पखावज़,

चलत असंगति चाल ,

अब मैं नाच्यो बहुत गोपाल। 


तृष्णा  नाद करत घट भीतर ,

नाना विधि दै ताल ,

माया को कटि फैंटा बांध्यो ,

लोभ तिलक दियो  भाल ,

अब मैं नाच्यो बहुत गोपाल। 


कोटिक कला काछी  बिखराई ,

जल थल सुधि नहीं काल ,

सूरदास की सबै अविद्या ,

दूर करो नन्द लाल ,

अब मैं नाच्यो बहुत गोपाल।'

कामना, क्रोध रुपी पेहेराव करून, गळ्यात विषय, वासनेची माळ धारण करून या भौतिक जगाच्या रंगमंचावर करत असलेला नाच आता खूप झाला. मोह, आसक्ती रुपी घूंगरांचा अव्याहत नाद सुरू आहे. त्यामुळे निंदानालस्ती यातच रसाळता वाटू लागली.  दोन्ही बाजूंनी वाजवल्या जाणाऱ्या पखावजा सारखी मनाची द्विधा, भ्रमित अवस्था झाली आहे. अंतरंगात उत्पन्न विविध लालसा, वासनांचा नाद ताल धरून आहे. कमरेला मायेचा फेटा, भाळी लोभ तिलक अशा विषयासक्ततेत गरफटून घेतलं आहे. जल, थल, काल या सर्वात कोटी कला, म्हणजेच अनेक जन्म घेऊन झाले तरी मोह पाशातून काही सुटका होत नाही. कळत नकळत भौतिक जगात जे जे काही केलं ते ते सर्व स्मरणातही नाही. आता हे सर्व अज्ञान, हे नंदलाला, दूर कर. सूरदासजींची ही मूळ रचना त्यांच्या जीवन संध्या समयीची आहे. जीवन जगत असताना माणूस बहुतांश वेळ प्रवृत्ती मार्गावरच मार्गक्रमणा करत राहतो. काम, क्रोध, माया, मोह अश्या सर्व अविद्यांच्या अमला खाली नाच नाचून थकलेल्या जीवाला निवृत्तीच्या मार्ग दाखव. जन्म-मृत्यू च्या गिरक्या घेत सुरू असलेला नाच आता पर्यंत खूप नाचून झाला. आता तुझ्या चरणी वास द्यावा. अश्या आशयाच्या सूरदासजींच्या मूळ ब्रज बोली मधल्या पदावर आधारित 'जगाच्या पाठीवर'चं 'नाच नाचुनी अति मी दमले, थकले रे नंदलाला' हे गीत महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी असं बिरूद यथार्थपणे मिरविणाऱ्या गदिमांच्या लेखणीतून असं काही झरलं आहे की, या गाण्या मागची प्रेरणा सूरदासजींच पद आहे हे माहीत नसेल तर हेच मूळ काव्य असावं असं वाटून जाईल. माडगूळकर लिहितात…



'नाच नाचुनी अति मी दमले

थकले रे नंदलाला'

या भौतिक जगात प्रवृत्तीच्या आहारी जाऊन, जन्म मरण असा येरझाऱ्यांचा नाच नाचून आता नुसतं दमायलाच नाही तर हा नाच सातत्याने अव्याहत सुरू असल्यामुळे आता थकायलाही झालं आहे.

(तात्कालिक श्रमान दमायला होतं तर दीर्घकाळ करीत आलेल्या श्रमामुळे थकायला होतं.)

'निलाजरेपण कटीस नेसले, निसुगपणाचा शेला

आत्मस्तुतीचे कुंडल कानी, गर्व जडविला भाला

उपभोगाच्या शतकमलांची, कंठी घातली माला'

व्यावहारिक जगणं साधारणतः कसं होत जातं त्याचं वर्णन करताना गदिमा लिहितात की कटी भोवती वस्त्र आहे पण ते कशाच आहे? तर ते निलाजारेपणाचं आहे. आळशीपणा, कोडगेपणाचं उत्तरीय आहे(निसुगपणाचा शेला). कानात आत्मस्तुतीची कुंडलं रुळत आहे. मस्तक गर्व जडीत आहे. 

आणि गळ्यात अती उपभोगाची(उपभोगाच्या शतकमलांची) माळ आहे.

'विषयवासना वाजे वीणा, अतृप्ती दे ताला

अनय, अनीती नुपूर पायी, कुसंगती करताला

लोभ प्रलोभन नाणी फेकी, मजवर आला गेला'

अतृप्तीच्या तालावर विषय वासनेचं वीणा वादन सुरू आहे. पायात अन्याय, अनिती, कपटीपणाचे(अनय) घुंगरू आहेत आणि कुसंगती हाताशी आहे. हे सर्व कमी म्हणून की काय येता जाता जो तो अधिक लोभ, प्रलोभन दाखवीत आहे.

'स्वतःभोवती घेता गिरक्या, अंधपणा की आला

तालाचा मज तोल कळेना, सादही गोठून गेला

अंधारी मी उभी आंधळी, जीव जीवना भ्याला'

स्वतः भोवती गिरक्या घेतल्या की डोळ्या समोर अंधारी येते, तद्वतच आत्मकेंद्री जीवनयापन करणाऱ्या मानवाचं होतं.  खरंतर जो सांभाळला जातो त्यालाच तोल म्हणतात. पण तालाचा तोल कळेनासा झाला आहे. साहजिकच संवेदनाही गोठल्या आहेत. एकूणच अंधारात आंधळत्व आल्यानं जीव जीवनालाच घाबरला आहे.


ऐकण्या साठी क्लिक करा - थकले रे नंदलाला


गदिमांच्या प्रतिभेचा असाच उत्कृष्ट आविष्कार संत मीराबाईंच्या 'मैने गोविंद लीनो मोल' या गीतात ही दिसून येतो. भक्ती आणि समर्पण तसच प्रेमाची महती मनावर ठसावणाऱ्या भजनावर हे गीत आधारित आहे.

'गोबिन्द लीनो मोल माई री मैंने गोबिन्द लीनो मोल,


कोई काहे सस्ता कोई कहे मेहंगा,

लीनो तराजू तोल, माई री मैंने गोबिन्द लीनो मोल,


कोई कहे चोरी कोई कहे सानी,

लीनो भजन का ढोल  माई री मैंने गोबिन्द लीनो मोल,


कोई कहे गोरा कोई कहे काला,

लीनो अमोलक मोल  माई री मैंने गोबिन्द लीनो मोल,


मीरा के प्रभु गिरधरनागर,

आवत प्रेम के मोल  माई री मैंने गोबिन्द लीनो मोल'

शब्द, कल्पने चा सुकाळ आणि प्रतिभेचा वरदहस्त लाभलेल्या गदिमांना, 'जगाच्या पाठीवर' चित्रपटासाठी गाणी करताना संत मीराबाईचं हे पद प्रेरणा आणि अशिर्वचन देऊन गेलं. अशा रचना स्फुरायला प्रतिभेला अनुभूतीची जोड आवश्यमभवी असावी लागते. मीरेचा वरदहस्त लाभल्यागत 'मैने गोविंद लीनो मोल' च्या धर्तीवर माडगूळकरांनी लिहिलं 'विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम'आणि तो ही कसा? तर एक कवडी, एक कपर्दिकही खर्ची न घालता. 



'नाही खर्चीली कवडी दमडी, नाही वेचला दाम

विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम'

आता विकत घेतला म्हणजे काही तरी मोल तर चुकवावं लागणारच. मीरेला जेव्हा विचारलं तेव्हा ती उत्तरली 'वो तो आवत प्रेम के मोल'. सततच्या हरिनाम, हरिध्यासानं मीरेनं ते प्रेम कमावलं होतं. परमेश्वराच्या चीरस्मरणाची हीच अभिव्यक्ती गदिमांच्या लेखणीतून उतरली ती 'जन्मभरीच्या श्वासाइतुके, मोजियले हरिनाम' अशा बेजोड कल्पने द्वारे.

'कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी

जन्मभरीच्या श्वासाइतुके, मोजियले हरिनाम'

'कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी

जन्मभरीच्या श्वासाइतुके, मोजियले हरिनाम'

'कोई कहे गोरा कोई कहे काला' यासाठी

गदिमा लिहितात, गुलाम काळा संता घराचा.

'बाळ गुराखी यमुनेवरचा, गुलाम काळा संता घरचा

हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासाचा श्रीराम'

'प्रभू आवत प्रेम के मोल  माई री मैंने गोबिन्द लीनो मोल'.  मीरेच्या सर्वांना निरुत्तर आणि अंतर्मुख करणाऱ्या या उत्तरा साठी गदिमांनी अप्रतिम कल्पकतेचा परिचय देत शब्द योजले…

'जितुके मालक, तितकी नावे, हृदये तितकी याची गावे

कुणी न ओळखी तरीही याला, दीन अनाथ अनाम'


ऐकण्या साठी क्लिक करा - विकत घेतला शाम


अशा रीतीनं संत मीरा आणि सूरदास या दोन भक्तिमार्गी संत सज्जनांच्या पदांवर आधारित दोन निरतिशय निरागस पण आशयघन शब्दशिल्प गदिमांनी लीलया मराठीत उतरवली, तीही चित्रपट गीतं म्हणून. या अभिजात शब्द संपदेला बाबूजींच्या अर्थवाही चालींनी आणि आशा भोसलें सह गायन करून तिला अधिक रूचिर संपन्नता बहाल केली. म्हणूनच या गीतांची साठी उलटून गेल्या नंतरही रसिकांना ही गीतं नवथरपणातल्या खुमारी प्रमाणेच तरतरीत अनुभव देतात. 


नितीन सप्रे

nitinnaapre@gmail.com

8851540881











टिप्पण्या

  1. अतिशय सुंदर लेख व माहिती. प्रत्येक गाण्याची जन्मकथा असते. ती वाचली , समजली की गाणं जास्त आवडतं. धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  2. वा किती मोठं जीवन विषयक तत्वज्ञान या दोन गीतातून गदिमा सांगून गेलेत।नितीनजी तुंम्ही हे अधिक सोपं करून सांगितलं। छान वाटले।धन्यवाद.💐💐

    उत्तर द्याहटवा
  3. अतिशय सुंदर लेख! हा मराठी सिनेमाचा सुवर्ण काळ मानला जातो. आजही ही गाणी ऐकली जातात व रंगमंचावर सर्वात जास्त म्हटली जातात. सुदैवाने मला ही तिन्ही व्यक्तीमत्व जवळून पहायला मिळाली

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक