स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक

 

निरंजनी स्वर-माणिक 

 



{माणिक ताईंच्या जयंती दिनी माझी माहिती सेवेतली सहकारी सोनल तुपे हिने आवर्जून या लेखाची लिंक वंदना ताईंना पाठवली. वंदना ताईंनी कार्यक्रमाच्या गडबडीत असताना ही लेख वाचून त्वरित तिला अभिप्राय कळवला आणि तिने तो मला पाठवला. माणिक वर्मा यांच्या या कलाकार कन्येनं दिलेला अभिप्राय ही माझ्यासाठी मोलाची पावती आहे.  सोनल आणि वंदना ताईंचा मी आभारी आहे.

https://saprenitin.blogspot.com/2024/04/blog-post.html

[16/05, 8:40 pm] Sonal Tupe: नमस्कार मॅडम, योगायोग बघा.. गेले दोन दिवस तुमच्याशी बोलते आहे आणि आज हा मेसेज माझ्याकडे आला...आमचे दूरदर्शन केंद्र दिल्लीचे उपसंचालक श्री नितीन सप्रे सर हे लेखन करत असतात आणि आज त्यांनी लिहिलेला हा लेख त्यांच्या ब्लॉगवर प्रसिद्ध केला... मला असं वाटलं आपल्यासोबत share करावा....☺️

[16/05, 10:14 pm] Vandana Gupte: मी आत्ता पुण्याला आईच्या कार्यक्रमासाठी आले होते .

[16/05, 10:39 pm] Sonal Tupe: Ohh☺️... मॅडम जमलं तर नक्की तुमची प्रतिक्रिया कळवा...मी पाठवेन आमच्या सरांना...


[16/05, 11:58 pm] Vandana Gupte: येवढ्या सुरेख लेखाबद्दल मी पामर काय लिहिणार ? तिचा सगळा जीवन पट, तिची मूर्ती, तिचा स्वभाव, तीच राहणीमान, तीच संगीत विश्व सगळच इतक्या समर्पक शब्दात वर्णन केलय . तुम्हाला खूप खूप धन्यवाद.👍 अशा आईच्या पोटी जन्म घेतला हे आमचं भाग्य.🙏

[17/05, 12:03 am] Sonal Tupe: मी आमच्या सरांना नक्की कळवते मॅडम तुमची प्रतिक्रिया😊... खरंच भाग्यवान आहात मॅडम तुम्ही♥️🙏}


महिना आठवत नाही पण १९९२ साला मधली ही गोष्ट. आकाशवाणी भोपाळ सोडून मी आकाशवाणी मुंबईत रुजू झालो होतो. त्या दिवशी सकाळी साडे नऊच्या सुमारास मी मुंबईतल्या नव्या आमदार निवास समोरच्या आकाशवाणी भवनात प्रवेश केला की अलीबाबाच्या गुहेत? असा प्रश्न मला पडला. तिळा तिळा दार उघड न म्हणता अलीबाबाची अफाट संपत्ती असलेली गुहा उघडावी किंवा अल्लादिनचा जादूचा दिवा न घासताही जीन प्रकट व्हावा तशी माझी स्थिती झाली. आत शिरताच सहज म्हणून डावीकडच्या अतिथी कक्षाकडे मान फिरवली. तिथे अगदी सामान्य वेशभूषेत बसलेल्या एका व्यक्ती वर नजर स्थिरावली. त्यांना कुठेतरी पाहिल्या सारखं वाटलं म्हणून मी ही तिथे गेलो. वयाच्या साधारण सहा सात वर्षां पासून आजवर सतत ऐकून मनावर मुद्रित झालेली, अनंता अंत नको पाहू, अमृताहूनी गोड, त्या सावळ्या तनुचे, क्षणभर उघड नयन देवा, नका विचारू देव कसा, घन निळा लडिवाळा, कबिराचे विणतो शेले कौसल्येचा राम, विजय पताका श्रीरामाची, अनृतची गोपाला, खरा तो प्रेमा, चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा, हसले मनी चांदणे…अशी कित्येक गाणी एकाएक  मनात फेर धरू लागली. क्षणार्धात ओळख पटली. भक्तिभावानं ओथंबलेले शुभंकर माणिक स्वर पहाटेच घराघरात पोहचवून त्याकाळी नित्य नेमाने आकाशवाणी अनेक घरांत पावित्र्य संमार्जित करीत असे. माझ्या श्रुती नेहमी साठी ताज्यातवान्या ठेवण्यात ते तुषार फार महत्त्वपूर्ण आहेत.


ज्या आकाशवाणीमुळे त्या गाण्यांची ओळख झाली होती, तीच आकाशवाणी; ज्या गायिकेची ती होती तिची आणि माझी ओळख करून देत होती. तुमची गाणी आम्हा सर्वांना अगदी मोहून टाकतात आणि ती कशी अवीट असल्याचं माझ्या सारखा तिशीच्या आतला कुणीतरी सांगतो आहे म्हटल्यावर माणिक वर्मा यांनी काहीश्या आश्चर्यानं माझ्याकडे पाहिलं. मी त्यांची गाणी अजूनही ऐकतो का? असा अत्यंत साहजिक प्रश्न त्यांनी विचारला. त्याला होकारार्थी उत्तर देऊन त्यांच गाणं ऐकणं ही आजही आणि पुढेही आमच्यासाठी कशी पर्वणी आहे असं सांगताच, “आता कसलं माझं गाणं? पूर्वीच्या रियाजाच्या पुण्याईवर गाते” असं माझ्या सारख्या अत्यंत सामान्य श्रोत्याला त्यांच्या सारख्या सिद्धकंठ गायिकेनी ज्या अगदी सहजभावानं सांगितलं त्यामुळे त्यांचा व्यक्तिमत्त्वा मधला आजवर नुसताच ऐकून असलेला वादातीत साधेपणा मला प्रत्यक्ष अनुभवता आला. माझ्या मनावर तो अधिकच बिंबून गेला. अवघ्या महाराष्ट्रानं ज्यांच्या गाण्यावर बालगंधर्व यांच्या गायकी वर केलेल्या प्रेमाच्या तोडीस तोड प्रेम केलं अश्या महान गायिकेची ही निरलसता मला अवाक् करून गेली. त्यांच्या गायना इतकीच ती अभिजात वाटली. खरतर त्यांच गाणं आणि जगणं दोन्ही ही किती नैसर्गिक साधेपणानं नटलेलं आहे याची त्या पहिल्या भेटीतच प्रकर्षानं जाणीव झाली. माणिक ताईंच व्यक्तिमत्त्व म्हणजे कलात्मकता, रूप आणि स्वभाव यांचा त्रिभूज प्रदेश होता असं म्हणता येईल. Divinity in simplicity हे त्यांच्या गायनाचं आणि जीवनाचंही अंगीभूत तत्व होतं. म्हणूनच त्यांचं गाणं ऐकताना गाभाऱ्यात साजूक तुपात भिजवलेल्या फुलवातीचं चांदीचं निरांजन आणि मूर्तीच्या पायाशी वाहिलेली मोगऱ्याची दळदार ताजी फुलं असं चित्र कायम मन:चक्षु समोर येतं. कला सेवाच नाही तर गृह सेवाही मेहनतीनं आणि मनापासून करण्यावर त्यांचा भर असायचा. संगीत मैफिल गाजवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या धडपडी प्रमाणेच घरी आलेल्या कौटुंबिक पाहुण्यांसाठी आणि दिग्गज कलाकारांसाठी भोजन मैफिल रंगविण्यासाठी ही त्या कधी ही कमी पडत नव्हत्या असं ही माझ्या वाचनात आलं.


बहुविध संगीत प्रकार त्यांच्या गळ्यातून अगदी लीलया फुलून येत. एकत्र कुटुंबातील विविध वृत्ती प्रवृत्तीची माणसं एखादी सुगृहिणी जशी त्याच्या त्याच्या कलानं घेत सांभाळते, तद्वतच माणिक ताईंनी, बृहद संगीत परिवारातील शास्त्रीय, उपशास्त्रीय, भावगीत, नाट्यगीत, चित्रपटगीत अश्या विभिन्न प्रवृत्तीच्या सदस्यांचा सांभाळ मोठ्या खुबीनं केला. शास्त्रीय संगीत गाताना त्या जशा स्वरांच्या बरोबरीनं स्वरार्थ गात तसच भाव संगीत गाताना शब्दा प्रमाणेच शब्दार्थ  गाऊन त्या उत्कृष्ट भाव निर्मिती करू शकत. शास्त्रीय संगीताची मैफिल ज्या ताकदीनं सिद्ध करीत तितक्याच कौशल्यानं त्या चित्रपट गीत, नाट्यगीत, भावगीत, भक्तीगीत सादर करीत. त्यांचा स्वर जणू माधुर्य, भक्ती, आर्जव, वात्सल्य आणि आर्तता यांनी अवगुंठीत झाला होता. त्यांचं गाणं आणि वागणं इतकं अभिजात होतं की पूर्वी वधु परीक्षेच्या वेळी जर गाणं म्हणण्यास सांगितलं आणि मुलीनं त्यांचं गाणं गायलं तर तिला सालस असल्याचं प्रमाणपत्र आपसूक मिळत असे असा किस्सा मी ऐकला आहे.
शास्त्रीय संगीतातील अन्य एक विदुषी किशोरी अमोणकर या त्यांना गुरू स्थानी मानत असत. एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं आहे की माणिक वर्मा यांचं गाणं म्हणजे सत्विकतेची पराकोटी होती. कुठलाही आटापिटा न करता, कसरत न करता त्यांच्या गाण्यात भाव सहजतेनं प्रकट होतो आणि म्हणूनच ते दैवी, प्रासादिक होऊन जातं. रागदारी संगीतात सरगम कशाला? त्या अक्षरांनी स्वर तुटका होतो अशी मांडणी करणाऱ्या आणि म्हणूनच स्वतःच्या गायनात सरगम गाणं शक्यतो टाळणाऱ्या किशोरी ताईंनी, ज्याला All  time great म्हणतो तसं माणिक ताईंच ‘सावळाच रंग तुझा ‘हे गीत ऐकल्या नंतर, शब्दा मध्ये ही सूर असल्याच आपणाला जाणवलं असंही प्रांजळपणे सांगितलं. माणिक ताईंच चित्रपटातलं गीत ऐकून आपणाला ही सिनेमात गाण्याची इच्छा झाली असं पार्श्वगायिका आशा भोसले एका कार्यक्रमात बोलल्या होत्या. माणिक ताईंच्या गायकीची थोरवी यातून स्पष्ट होते.
अमृताहूनी गोड नाम तुझे देवा हे कालातीत गीत न ऐकलेला मराठी संगीतप्रेमी सापडणं अशक्य आहे. मात्र या गीताची संगीत रचना अगदी साधी, बाळबोध आहे, त्यात ध्वनिमुद्रिका काढण्या सारखं काही नाही असा त्यावेळी लोकोपवाद होता. माणिक वर्मा यांना पन्नास वर्ष साथ करणारे आणि अमृताहुनी गोड या गीताची चाल बांधणारे बाळ माटे यांची ही संगीत रचना. बाळासाहेब माटे हे गोविंदराव टेंबे यांचे शिष्य. ते संगीतकारही होते. वीणा भक्तिगीत मंडळ स्थापन करून त्यांनी महाराष्ट्रात महिला भजनी मंडळाची मुहूर्तमेढ रोवली. या गीताचं आणि समस्त संगीत रसिकांचं नशीब बलवत्तर म्हणूनच लोकोपवादा कडे माणिक ताईंनी दुर्लक्ष करून 'अमृताहूनी गोड' आपल्या आवाजात रेकॉर्ड केलं. या गीतानी घडवलेला लोकप्रियतेचा  इतिहास आज आपणा सर्वांच्या नजरे समोर आहे. आधी उल्लेख आल्याप्रमाणे किशोरी ताईंनाही अत्यंत भावलेलं सुधीर फडके यांनी बांधलेलं सावळाच रंग तुझा या अवीट गीताला रसिक मुकले असते कारण एच एम व्ही कंपनीच्या लोकांनी आवाजाचा पीच कमी हे कारण  देत ध्वनिमुद्रित करायला नकार दिला होता. शेवटी बाबूजी यांनी या गीतावर दोन महिने मेहनत घेतली असून माणिक ताई हे गाणं बसवल्या प्रमाणे उत्तम गात आहेत असं सांगून जेव्हा आग्रही मध्यस्ती  केली तेव्हा कुठे गीत ध्वनिमुद्रित केल्या गेलं. हे गीत अत्यंत लोकप्रिय ठरलं आणि त्यानी माणिक वर्मा यांना संगीत प्रेमींच्या घरा घरातच नाही तर मना मनात स्थान मिळवून दिलं हा इतिहास ही सर्वांच्या समोर आहे.
माणिक ताईंच्या आई वडील दोघांनाही संगीताची आवड होती. आई तर गायिकाच होती. त्यांना शिकवणी देण्यासाठी बशीर खान जेव्हा घरी येत तेव्हा छोटी माणिक  तिथे जाऊन बसत असे. तिच्या सुदैवानं त्या काळी १२ वर्षां खालील छोट्या मुला मुलीं साठी ध्रुव सिनेमातली भैरवी गाऊन दाखवण्याची एक स्पर्धा पुण्यात आयोजित केली होती. त्यावेळी ध्वनिमुद्रिका नसल्यामुळे पुस्तक वाचून आणि आठ वेळा सिनेमा बघून माणिकनं ती भैरवी आत्मसात केली. अर्थातच त्या प्रथम पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. ही घटना त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीची नांदी ठरली आणि त्यांच्या गाण्याची विजय पताका संगीत अंबरी कायमची झळकली. पुढे भारत गायन समाजातल्या अप्पासाहेब भोपे यांच्याकडे सूर गिरवण्यास  सुरवात झाली. सूरेलपणा आणि स्वरस्थानं ह्या बाबी कुठल्याही संगीताचा गाभाच असतात. ही दृष्टी आणि तालीम माणिक ताईंना दिली हिराबाई बडोदेकर यांचे ज्येष्ठ बंधू सुरेशबाबु माने यांनी. रागाची बढत किंवा ख्याल विस्ताराच तंत्र हि त्यांच्या कडूनच आत्मसात केलं. हिराबाई, केसरबाई केरकर, अमीर खां, इनायत खान, अजमत हुसेन खान, पंडित जगन्नाथबुवा पुरोहित यांच्या कडून  गायकीची तालीम तसच पंडित रविशंकर, उस्ताद बिस्मिल्ला यांच्या वादनातली वादकीची सौंदर्यस्थळं त्यांनी टिपली. पंडित भोलानाथ भट्ट यांच्या कडूनही त्यांनी काही बंदिशी घेतल्या आणि आपली स्वतंत्र गायन शैली निर्माण केली. ठुमरी गायन प्रकार ही साधारणतः उत्तर भारतीयांची मक्तेदारी. महाराष्ट्रीयन गायिका  ठुमरीला म्हणावा तसा न्याय देऊ शकत नाही असा जो समज त्याकाळी होता तो माणिक ताईंनी आपल्या  ठुमकदार आणि लावण्यवान ठुमरी गायनानं पुसून टाकला.
माणिक ताई शास्त्रीय संगीत शक्यतो मध्य लयीत गात. आपल्या हृदयाचे ठोके ही मध्य लयीत पडतात त्यामुळे ही आपली स्वाभाविक लय आहे असं त्या म्हणत. मैफिलीत सर्व प्रकारचे श्रोते असतात त्यामुळे त्यांना कंटाळवाण होणार नाही याची गाताना काळजी घेतली पाहिजे असं त्यांचं मत होतं. ख्याल गायकी साठी पाऊण तास इतका वेळ पुरेसा असतो त्यापेक्षा अधिक काळ गायलं तर बरीचशी पुनरावृत्तीच घडते त्यामुळे थोडक्यात पण चांगलं गाणं उत्तम असं ही त्यांना वाटत असे. गळ्याच्या जातकुळीला अनुकूल असंच संगीत शिक्षण घ्यावं आणि त्याला शोभेलसं गायला हवं असं त्या स्पष्टपणे सांगत. त्यामुळेच गमक गाताना सुद्धा त्या आक्रमकता टाळून शालीन, लडिवाळ सूरातच मांडणी करत.
जुन्या पिढीच्या या गायिकेनी आकाशवाणीवर दिलेल्या एका मुलाखतीत आता आमच्या वेळी सारखं काही राहिलेलं नाही असा सूर न आळवता, नव्या पिढीच्या कलाकारांना तोंडभरून कौतुकाची दाद दिली हे विशेष. आताची पिढी शास्त्रीय संगीतातलं निव्वळ शास्त्र न मांडता त्याला रंजकतेची जोड देते अशी कौतुकभरी दाद त्यांनी दिली.
फार मोठ्या आजारपणाशी त्यांना उतार आयुष्यात दोन हात करावे लागले. त्यांना मेनेंजिटीस म्हणजेच मेंदुज्वर झाला आणि बराच काळ त्या कोमात होत्या. त्यातच दोन्ही पायांच्या शस्त्रक्रियाही कराव्या लागल्या. 'चरणी तुझिया मज देई वास हरी' या त्यांच्या भक्तिगीताच्या बोलां प्रमाणे त्यांच्या परमेश्वरावर असलेल्या अगाध श्रद्धेच्या जोरावर त्यांनी हे अग्निदिव्य पार केलं असं म्हणावं लागेल.  राणी, वंदना आणि भारती यांच्या सारख्या प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्या, पेशांनं फिजिओ थेरपिस्ट असलेल्या अरुणा या त्यांच्या मुलीनं एका कार्यक्रमात सांगितलेली घटना मोठी विस्मयकारी आहे. माणिक ताईं वरील प्रेमामुळे त्यांना आजारपणात रुग्णालयात अनेक जण भेटायला येत. त्यामुळे अखेरीस कुणालाही न सोडण्याची विनंती कुटुंबीयांना रुग्णालय प्रशासकांना करावी लागली होती  तरीही एक दिवस एक वयस्क व्यक्ती त्यांच्या पर्यंत पोहचली आणि त्यांना भेटून अंगारा लावून, डोक्यावरून हात फिरवून बाहेर पडली. त्यांचं नाव विचारावं म्हणून त्यांच्या पाठोपाठ बाहेर आलेल्या  अरुणा यांना कुणीही दिसलं नाही. पुढे त्या बऱ्या होऊन घरी आल्यावरही एक दिवस वाचन करत असताना अचानक, त्यांच्या घरातही नसताना, वरून एक रुद्राक्ष पुस्तकात पडला. त्यांनी तो प्रसाद समजून अगदी अखेर पर्यंत कंठी धारण केला होता. या घटनांमुळे त्यांच्यावर दैवी शक्ती प्रसन्न होत्या असा विश्वास सश्रद्ध लोक तरी नक्कीच बाळगतील.
रसिकांचं अपार प्रेम, अफाट लोकप्रियता लाभलेल्या आणि संगीत विश्वात निर्विवाद उंची गाठलेल्या या लडिवाळ सूरांच्या गायिकेचे, गदिमा यांनी ज्यांच नामकरण लाडिक वर्मा असं केलं त्यानी आपल्या सरळ, साध्या, सोज्वळ गाण्यानं, वागण्यानं आणि राहणीनं उत्तुंग शिखरावर असलेल्या कलाकारांसाठी आचरणाचा एक मापदंडच निर्माण केला.
शास्त्रीय संगीतातील शास्त्रीयता आणि सुगम संगीतातील; मग ते भावगीत असो, नाट्यगीत असो वा भक्तीगीत, शब्द स्वर लालित्य या दोन्हीवर एकाचवेळी सारखीच पकड असणारे कलाकार तसे विरळेच. अश्याच विरळ्या कलाकारांच्या पंक्तीत  माणिक वर्मा रसिकाग्रणी होत्या. मराठी साहित्यिक, गायिका आणि माणिक ताईंच्या स्नेही योगिनी जोगळेकर यांनी त्यांच्या गायकीच मोजक्या शब्दात समर्पक वर्णन केलं आहे.
‘ही राजस लोभस लडिवाळा वेल्हाळा 
कंठात सूरांच्या लेवून फिरते माळा
खानदानी ख्याल हिच्या घरात खुशाल
सावळ्या तनुला ह्या राधेची भूल
रसबाळे ठुमरी ठुमकत करते संग
अमृतात भिजतो हिच्या कुशीत अभंग’


नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
2803241019
नवी दिल्ली




टिप्पण्या

  1. नितीनजी,
    माणिक नावाच्या हिऱ्याला अतिशय सुबक असे पैलू तुम्ही तुमच्या लिखाणातून पाडलेले आहेत .अतिशय समाधान वाटलं .माणिकताईंचे गाणं खरच साधं सरळ समजायला सोपं असंच होतं .प्रसिद्धीच्या एवढ्या मोठ्या शिखरावर असून सुद्धा त्या अत्यंत साध्या रहात असत.खरा कलाकार कसा असतो हे त्यांच्या गायिकेने सिद्ध केलं होतं. स्वराची ईश्वरी देणगीच त्यांना लाभलेली होती .तुम्ही तुमच्या लेखांमध्ये खूप छानपणे ते सांगितले आहे. तुमची लेखणी जास्तच फुलून आलेली मला जाणविली धन्यवाद...

    उत्तर द्याहटवा
  2. पुन्हा पुन्हा वाचण्यासाठी हा लेख उत्तम आहे.16मे 1920 हा त्यांचा जन्म दिन. आपल्यासाठी ही कीती शुभकारक कारण त्यामुळेच तर आपण हे माणिक मोती वेचू शकतो.
    पुनश्च धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  3. 'निरंजनी स्वर माणिक' हे शीर्षक खरोखर या लेखाचं सर्व सार आहे.अप्रतिम लेख! विदुषी माणिक वर्मा यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन 🙏🌷

    उत्तर द्याहटवा
  4. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा...हे गाणं आजही गोड वाटते. लेख उत्तम लिहिलाय.

    उत्तर द्याहटवा
  5. माणिक वर्मा यांच्या गाण्या इतकाच हा लेख अप्रतिम आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती