स्मृतीबनातून - सहृदय सुषमाजी



सहृदय सुषमाजी

भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री(Minister of External Affairs) श्रीमती सुषमा स्वराज(Sushama Swaraj) यांच्या अकाली निधनामुळे देश एका संवेदनशील, तत्पर आणि कणखर लोकनेत्रीला मुकला. त्यांनी आपल्या जीवनकाळात केंद्रीय मंत्री म्हणून सांसदीय कार्य मंत्री, आरोग्यमंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्रीभारतीय जनता पार्टी हरियाणाच्या प्रदेशाध्यक्ष, आमदार, हरियाणा सरकार मध्ये मंत्री आणि अखेरीस परराष्ट्र व्यवहार मंत्री अशी विभिन्न पदे भूषवली. दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री (Chief Minister) होण्याचा मानही त्यांना मिळाला. गरीमापूर्ण शालीन व्यक्तिमत्व, कर्तव्यदक्षता, उत्तम वक्तृत्व आणि कुशल संसदपटू अशी सुषमा स्वराज यांची मुख्यत्वे ओळख होती. राजकीय करकीर्दी मध्ये जबाबदारीच्या कुठल्याही पदावर काम करत असताना त्यांनी आपल्या कर्तृत्वाने अत्यंत सहजपणे वावरत, सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवला. सत्ता पदे भूषविताना त्यांनी प्रसंगी कणखरपणा दाखवला तरी शालीनता हाच त्यांच्या व्यक्तित्वाचा गाभा होता. बहुदा यामुळेच परराष्ट्र व्यवहार मंत्रालय अधिक लोकाभिमुख झाले ते त्यांच्याच काळात. श्रीमती स्वराज यांची मी अनुभवलेली राजस आठवण ………………

वाजपेयी मंत्रीमंडळात (Vajpayee Cabinet) त्या माहिती आणि प्रसारण मंत्री होत्या. मी मुंबई दूरदर्शनच्या वृत्त विभागात संपादक म्हणून कार्यरत होतो. त्या दिवशी (१८ फेब्रुवारी, २००१, इंटरनेट सहकार्याने) आंतरराष्ट्रीय नौदलाच्या सागरी कवायतींसाठी (इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू) तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीं आणि तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्यासह बरीच खास मंडळी मुंबईत होती. एकूणच कार्यक्रमांच्या कव्हरेज साठी बाहेर आणि वृत्तसंपादनासाठी वृत्त विभागात खूपच धावपळ सुरू होती. माझ्याकडे दुपार नंतरची दोन्ही बाजूंची जबाबदारी होती

काही निकडीच्या व्यक्तिगत कमासाठी मी पत्नी समवेत सकाळीच घराबाहेर पडलो होतो. त्यावेळेस माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा पदभार श्रीमती स्वराज यांच्याकडे होता आणि राजशिष्टाचार(procotol) विभागाकडून त्यांच्या मुंबई दौऱ्याचा फॅक्स आमच्याकडे आला होता. मंत्रीमहोदयांचा कार्यक्रम कव्हर करणेही आवश्यक होते. तितक्यात कार्यालयातून मला फोन आला. (नोकियाचा वॉकी टॉकी सारखा दिसणारा हँडसेट असायचे त्यावेळी) माझ्या वरिष्ठांनी मला पश्चिम उपनगरात विमानतळाजवळच्या पंचतारांकित हॉटेल मधला  कार्यक्रमही कव्हर करता येईल का अशी विचारणा केली. माध्यमातल्या नोकरीच चलनशास्त्र(dynamics) निराळच असतं. तिथे काळवेळ, रजा या सारख्या गोष्टींकडे अन्य सेवेतल्या प्रमाणे बघुन चालत नाही. आकस्मिकतेसाठी सदैव तयार असावं लागतं. तरच प्रभावीपणे काम करता येतं असा माझा अनुभव आहे. त्यामुळे अर्थातच मी होय हे त्यांना अपेक्षित उत्तर दिलं. व्यक्तिगत कार्यक्रमाचं फेरनियोजन केलं. पत्नीला टॅक्सीने घरी जायला सांगितले आणि कॅमेरामन सह दादरला मला घ्यायला आलेल्या सरकारी वाहनाने मी कव्हरेज साठी रवाना झालो. 

आम्ही पोहोचलो तेव्हा बैठक सुरू होण्याच्याच तयारीत होतीमंत्रीमहोदयांसह चित्रपट सृष्टीतील मान्यवर आतल्या दालनात बसले होते. मी बाहेर वाट पाहायच ठरवलं. तितक्यात त्यांचे स्वीय सहायक बाहेर आले आणि फोनवर पलीकडच्या व्यक्तीला; शत्रुघ्न सिन्हा यांचा नंबर आहे का असे विचारत होते. बहुदा समोरच्या त्या व्यक्ती कडे नंबर नसावा.  ते फोन बंद करून आत जाऊ लागले. योगायोगाने माझ्याकडे नंबर होता. मी त्यांच्याकडे जाऊन तो त्यांना देत असतानाच श्रीमती स्वराजही दालनातून थोड्या बाहेर आल्या. मी लगेचच त्यांना माझा परिचय दिला आणि कव्हरेजसाठी आल्याचे सांगितले. माझ्या अटकळी प्रमाणेच, त्यांनी ती बैठक केवळ आढाव्यासाठी असून कव्हरेजची आवश्यकता नसल्याचे सांगितले आणि आम्ही कसे काय आलो अशी विचारणा केली. आम्हाला दौऱ्याचा कार्यक्रम आल्यामुळे आल्याचे मी त्यांना सांगितले. त्यांनी लगेचच बैठकीच्या कव्हरेजची आवश्यकता नसली तरी तुम्ही आलाच आहात तर एक छोटी मुलाखत द्यायची तयारी दर्शवली आणि "विषय काय?" अशी पृच्छा केली. त्यावेळी फ़ैशन टीव्ही (f TV) बद्दल माध्यमात चर्चा होती. या मुद्द्यावरच आपण भूमिका मांडावी असे मी सुचवले. त्यांनीही लगेच संमती दिली पण घड्याळाकडे बघितल्या नंतर जेवणाची वेळ झाल्याच लक्षात घेऊन त्या म्हणाल्या "बुफे लागलेलाच आहे तुम्ही आधी खाऊन घ्या नंतर मुलाखत करू."  इतकच नाही तर आमच आटोपल्या नंतर, बैठक बराच वेळ चालेल हे लक्षात घेऊन, त्यापूर्वी मुलाखत दिली आणि मला मिस्कील प्रश्न केला की, "तुम्हाला आज ही मुलाखत दाखवायला वेळ(बातमीपत्रात) मिळेल का? आज बरेच जेष्ठ नेते मुंबईत आहेत." मी म्हणालो "मॅडम मुलाखत दिली आहे तेंव्हा वेळ नक्कीच काढणार." यावर त्यानी सांगितलं की, "बघा बतमीपत्राच्या शेवटी शेवटी ठेवा म्हणजे अन्य महत्वाच्या बातम्यांना वेळ मिळेल." दस्तुरखुद्द माहिती आणि प्रसारण मंत्री त्यांच्या मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या विभागाच्या अधिकाऱ्यांना, मुलाखती पूर्वी खाऊन घेण्यास सांगतात, वेळेचा अपव्यय नको म्हणून नियोजित बैठकीच्या आधी अनियोजित मुलाखत देतात आणि स्वतःची मुलाखत बातमीपत्रात शेवटी ठेवायला सांगतात हे सर्व म्हणजे सौजन्याची पराकाष्ठा होती. त्या राजकीय नेत्री, धडाडीच्या मंत्री म्हणून आपणा सर्वांनाच परिचित होत्या.  त्या दिवशी त्यांच्यातल्या सुह्रदयतेशी माझा नव्याने परिचय झाला. खरं म्हणजे मोठेपणाची, वरिष्ठ पदावर असण्याची ही व्यवच्छेदक लक्षणं नाहीत का? आपल्यापैकी कितीजण असा अनुभव दुसऱ्याला देण्याची पात्रता ठेवतात? खरंतर पदसिद्ध असतांना कसं वागावं याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला



नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com

टिप्पण्या

  1. सौजन्य हा अनमोल गुण आहे आणि तो अंगीकार करणे सोपे नाही पण जगताना हा गुण आवश्यक आहे हे आपला लेख वाचून समजले

    उत्तर द्याहटवा
  2. आपली ही सुषमाजींविषयीची आठवण मोलाची आहे .

    उत्तर द्याहटवा
  3. A seasoned, considerate and studious figure in the rough and tumble of politics. Dilip Kakade

    उत्तर द्याहटवा
  4. अशी दुर्मिळ व्यक्तिमत्व आठवणीत असावीच पण आज प्रत्यक्षात सुद्धा असावीत.
    खूप सुंदर लेख.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक