प्रासंगिक - चंद्रयान-२ आणि नेतृत्व

प्रासंगिक - इस्रो आणि नेतृत्व

चंद्रयान-२ ही भारताची महत्वाकांक्षी मोहीम अपेक्षित संपूर्ण यश प्राप्त करू शकली नाही हे जरी वास्तव असलं तरी तज्ञांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यावर भारताची ही मोहिम सपशेल अपयशी झाली असे म्हणता येणार नाही. या मोहिमे अंतर्गत पाठवण्यात आलेल्या यानाचे ऑर्बिटर, लँडर (विक्रम) आणि रोव्हर(प्रज्ञान) असे प्रमुख तीन भाग होते. अखेरच्या टप्प्यात लँडर विक्रमचा संपर्क, शेवटचे काही क्षण राहिले असताना तुटला आणि अपेक्षित चंद्रावतरण साध्य झाले नाही. मात्र त्या नंतरही अद्याप ऑर्बिटर संपर्कात असल्याने अलगद चंद्रावतरण (सॉफ्ट लँडिंग) होऊ शकलं नसल तरी मोहिमेची अन्य बरीच उद्दिष्टे पूर्ण होणार आहेत. समाजाच्या विभिन्न स्तरातून, माध्यमातून पुर्णतः नकारात्मक सूर उमटलेला नाही. देशवासियांनी, देशाच्या नेतृत्वाने इस्रोच्या पाठीशी भक्कम पणे उभं राहण्याची भूमिका घेतली आणि हर न मानत नव्यानं प्रयत्न सुरू ठेवून चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचं स्वप्न पूर्णत्वास नेलं.


भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने(ISRO) यापूर्वीही काही अपयशी प्रसंग अनुभवले आहेत आणि हताश न होता पुढच्या प्रयत्नात यश खेचून आणले आहे.
माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या कार्यक्रमाच कव्हरेज कारण्यासाठी गेलो असतांना त्यांनी पुण्यात सांगितलेला वरिष्ठांच्या पाठबळाचा अनुभव या ठिकाणी मला  उद्धृत करावासा वाटतो. आदर्श नेतृत्व कस असत याचा वस्तुपाठच घालून दिला अस म्हणता येईल.


डॉक्टर कलामांनी सांगितलं की ते १९७९ साली सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल (एस एल व्ही - ३) मोहिमेचे मिशन डायरेक्टर होते. सॅटेलाईट ऑर्बिट मध्ये पाठवणे ही त्यांची मुख्य जबाबदारी होती. अनेकांनी सुमारे दहा वर्षे या प्रकल्पावर काम केलं होतं. डॉक्टर कलाम श्रीहरिकोटा येथील लाँचपॅडवर दाखल झाले. सर्वत्र सज्जता होती. उलट-गणना (काउन्टडाउन) सुरू होती…  टी-5 मिनिटं…..टी-4 मिनिटं…….3….2….1...टी -४० सेकंद, आणि संगणकावर लाँच थांबवा अशी आज्ञा आली. परिस्थिती कठीण होती. कलमांच्या मागे सहा तज्ज्ञ बसले होते. त्यांनीही सांगितलं कुठेतरी गडबड आहे...कुठेतरी  इंधन गळती आहे. मग त्यांनी आकडेमोड केली. डेटा तपासला आणि सांगितलं की हरकत नाही पुरेसा इंधन आहे. आता अखेरचा निर्णय डॉक्टर कलमांना घ्यायचा होता. कलामांनी संगणकाची आज्ञावली न मानता सॅटेलाईट लौंचिंगचा निर्णय घेतला….आणि क्षणातच सॅटेलाईट ऑर्बिटमध्ये स्थापित होण्याऐवजी बंगालच्या उपसागरात बुडाला. यशाची चव अनेकदा चाखलेल्या कालामांसाठी  हे अपयश नवीन होत. ते अतिशय खिन्न होते. तेव्हढ्यात तिथे प्रथितयश शास्त्रज्ञ, इस्रो चे अध्यक्ष कालामांचे तेंव्हाचे बॉस प्रोफेसर सतीश धवन ! अतिशय थकलेल्या आणि खिन्नतावस्थेत असलेल्या कलमांना ते म्हणाले, " बाहेर माध्यम प्रतिनिधी वाट पहात असून आपण पत्रकार परिषदेला गेलं पाहिजे." पत्रकार परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय माध्यम प्रतिनिधींना सामोरे जात धवन म्हणाले," आम्ही आज अपयशी झालो आहोत." या अपयशाची जबाबदारी प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून खरंतर कलाम यांचा कडे जात होती पण धवन यांनी ती स्वतःवर घेतली. माध्यम कर्मींकडून झालेली सर्व टीका स्वीकारली आणि सांगितलं, "माझी टीम उत्कृष्ट आहे. ती पुढच्या वर्षी नक्कीच सफल होईल."  आणि त्यांनी दिलेल्या शब्दा प्रमाणे १८ जुलै १९८० ला मोहीम फत्ते झाली. यावेळी मात्र प्रोफेसर धवन यांनी कलमांना पत्रकार परिषदेला सामोरं जायला सांगितलं. मनाचा केवढा हा मोठेपणा! टीमच अपयश स्वतः कडे तर सुयश मात्र टीमचं!
चंद्रायन-२ च अपयश हे भारत देशवासियांनी आपलं मानल आहे. पुढच्या प्रयत्नात इस्रो यशस्वी होवो हीच सदिच्छा! देश इस्रो शात्रज्ञांच निश्चितच अभिनंदन करेल.




नितीन सप्रे
nitinnsapre@gmail. com
९८६९३७५४२२

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक