स्मृतीबनातून-ब्रेकिंग न्यूज
पत्रकारितेच्या क्षेत्रात 'सर्वप्रथम' आणि 'अचूक' वृत्त देण्यास अनन्य साधारण महत्व आहे. मात्र बरेचदा 'सर्वप्रथम' च्या मोह जाळ्यात अडकल्यामुळे 'अचूकता' हातून निसटते आणि बिकट परिस्थिती उद्भवते. मुळातच तो क्रम 'सर्वप्रथम' आणि 'अचूक' असा असण्याऐवजी 'अचूक' आणि 'सर्वप्रथम' असा आहे. तो तसाच असायलाही हवा. या क्रमात गल्लत झाली आणि बातमी देताना चौकसपणा कमी पडून प्रथमदर्शनी घडामोडीं वरच विसंबून राहिल्यास कसा घात होऊ शकतो याचा अनुभव बहुतेक सर्व इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी महाराष्ट्र विधानसभेच्या 2004 साली झालेल्या निवडणुक निकालांनातरच्या राजकीय घडामोडींच्या वेळी घेतला.
मी त्यावेळी दूरदर्शनच्या वृत्त विभागात संपादक होतो. विधान सभा निवडणुक जाहीर झाली होती. प्रत्यक्षात परिस्थिती बरेचदा वेगळेच चित्र दाखवणारी असली तरी निवडणूक म्हणजे लोकशाहीच्या पवित्र मंदिरातला सर्वात मोठा आणि आवश्यक असा उत्सव. तर अश्या या काळात जनादेश हा विशेष कार्यक्रम करीत होतो. तसच निवडणुकी दरम्यान प्रत्यक्ष फील्ड वर जाऊन सह्याद्री आणि डी डी न्युज साठी वार्तांकनही करीत होतो. पत्रकारिते साठी आवश्यक चौकासपणामुळे, घटनांचा अन्वयार्थ लावण्याची सवय आणि बोलण्या व्यतिरिक्त मोबाईल फोन वापरण्याच्या काहीश्या अकौशल्यामुळे, दूरदर्शन सह्याद्री वहिनीच्या वृत्त विभागावर सर्वाधिक विश्वासार्हतेची मोहर अधिक ठळक करण्याची संधी मला मिळाली.
१३ ऑक्टोबर २००४ रोजी ११व्या विधानसभे साठी मतदान झालं आणि १७ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर झाले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस च्या आघाडीचे सरकार स्थापन होणार आणि काँग्रेसला दोन जागा कमी असूनही मुख्यमंत्रीपद आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद असा फॉर्म्युला ठरला होता. कोणाच्या गळ्यात माळ पडते याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. राष्ट्रवादीकडून अजित पवार, छगन भुजबळ अश्या नावांची चर्चा होती. मी अनेक नेत्यांशी संवाद साधून संभाव्य नावांपैकी कुणीही नाहीत अशी बातमी तर मिळवली मात्र उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड होणार हे गुलदस्त्यातच होत. साधारण दुपारी दोनच्या सुमारास ह्या वरचा पडदा उठला आणि अनपेक्षितपणे आर. आर. उर्फ आबा पाटील ह्यांच नाव जाहीर झालं.
काँग्रेस पक्षाने निवडणूक सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवून विजय मिळवला असल्याने मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याच नावाची घोषणा होणार हे निश्चितच मानले जात होते मात्र काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक संपून नेत्याच्या नावाची औपचारिक घोषणा काही होत नव्हती. संध्याकाळी पांच वाजता डी डी न्युज वर लाईव्ह देत असताना मीही सुशीलकुमार शिंदे यांचेच नाव पुढे असल्याचे सांगितले मात्र मिळवलेली माहिती आणि त्याच्या अन्वयावर आधारित, एक पुस्ती जोडली की, राष्ट्रवादी काँग्रेस कडून उपमुख्यमंत्री पदासाठी जसे अनपेक्षित नाव पुढे आले तसंच काँग्रेस कडूनही येण्याची शक्यता आहे कारण त्यावेळी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत विलासराव देशमुख यांनी सुशीलकुमार शिंदे यांना मागे टाकल्याचे संकेत मला मिळाले होते. सहा वाजले तरी सस्पेन्स कायम होता. साडे सहा झाले… साहजिकच वाहिन्यांच्या प्रतिनिधींचा धीर सुटू लागला कारण सात वाजताचा प्राईम टाइम आणि नव्या मुख्यमंत्रांचे नाव सर्वप्रथम आपल्याच वाहिनीवरून जाहीर करण्यासाठीची जीवघेणी चढाओढ.
सहा पंचेचाळीस……….. सहा पन्नास ……..अजूनही नावाचीअधिकृत घोषणा होत नव्हती आणि इतक्यात निवडणूक लढवलेले मात्र पराजित झालेले राज श्रॉफ ( सुशीलकुमार शिंदे यांचे जावई ) आणि काही कार्यकर्ते दोन बोटे उंचावून विजयाची खूण करून, सुशीलकुमार शिंदे जिंदाबाद वगैरे घोषणा देत विधान भवनाच्या पायऱ्यांवरून धावत धावत बाहेरच्या दिशेकडे गेली. चटकन याचा सहज सुलभ अन्वयार्थ लावून सर्व प्रतिनिधींनी आपापल्या न्युज रूमला एसएमएस(SMS) केले. सर्व वाहिन्यांवरून सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री ही बातमी झळकली. अगदी डी डी न्युज आणि सह्याद्री वाहिनीवर त्यावेळी सुरू असलेल्या कार्यक्रमातही. सह्याद्री वाहिनीवर सातचे बातमीपत्र सुरू होण्यास पाच एक मिनिटांचा अवधी होता. मलाही डी डी आणि सह्याद्रीच्या न्युज रूम कडून confirmation का देत नाही म्हणून सारखी विचारणा होत होती. माझ्या डोक्यात मात्र एक शंका तरळली. राज श्रॉफ हे पराभूत झालेले उमेदवार होते आणि त्यामुळे नेता (मुख्यमंत्री) निवडीसाठी सुरू असलेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत त्यांचा सहभाग असू शकत नाही आणि पर्यायाने त्यांच्याकडे असलेली माहिती ही संपूर्णपणे अधिकृत असेलच असे समजणे धोक्याचे होते. बातमी देऊन झाल्यामुळे आता सर्व प्रतिनिधींचे लक्ष गुलाम नबी आझाद यांचा बाईट मिळवण्याकडे होते. पुढे होणारी संभाव्य धावपळ लक्षात घेऊन मी सहाच्या सुमारास एका विश्वसनीय सूत्राला अधिकृत माहीत मिळता क्षणीच मला ती देण्याची विनंती केली होती. कुठल्याही क्षणी गुलाम नबी आझाद, मार्गारेट अल्वा, प्रभा राव, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख आदी नेते मंडळी विधान भवनाच्या पायऱ्यांवर येऊन अधिकृत घोषणा करणार होती वाहिन्यांचे प्रतिनिधी सज्ज होते. माझे लक्ष मात्र होते माझ्या सूत्राकडे.
ठरल्याप्रमाणे ती व्यक्तीही या सर्व नेत्यांबरोबर आली आणि आधीच ठरल्याप्रमाणे मला खूण केली ज्याचा अर्थ होता 'विलासराव देशमुख'. आता माझ्या समोर माझ्या संस्थेच्या विश्वासार्हतेला बुलंद करण्याची संधी होती. आमच्या न्युज रूमला 'विलासराव देशमुख महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री' ही पहिली ठळक बातमी कळवली आणि मला लाइव्ह घेण्याचा संदेश दिला. आता इतर सर्व मंडळी आझाद यांचा बाईट घेण्यासाठी सरसावत होती त्यामुळे तिथे पायऱ्यांवर चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती निर्माण झाली. मी मात्र माझ्या कॅमेरामनला तिथून कॅमेरा काढून बाजूला घेण्यास सांगितले. एका पोलीस शिपायाला माझ्या मागे उभे राहण्याची विनंती करून, लाइव्ह सुरू असताना होत असलेल्या धक्काबुक्कीमुळे, मी कॅमेऱ्यापुढे खाली पडणार नाही याची काळजी घेण्यास सांगीतले. आमच्या न्युज रूम मध्ये सहाजिकच संभ्रमाचे वातावरण असावे. यच्चयावत सर्व वाहिन्या सुशीलकुमार शिंदे यांचे नाव देत असताना फक्त सह्याद्री वहिनीची पहिली ठळक बातमी 'विलासराव देशमुख राज्याचे नवे मुख्यमंत्री' अशी घ्यायला मी त्यांना सांगत होतो. बरोबर सातच्या ठोक्याला बातम्यांचा मोंताज सुरू होऊन मी दिलेली ठळक बातमी आणि पाठोपाठ प्रत्यक्ष घटना स्थळावरून सविस्तर वृत्त सांगणारे माझे लाइव्ह (हॉट स्वीच) प्रसारित झाले. एव्हाना अन्य वाहिन्यांवरूनही आता सुधारित वृत्त प्रसारित होऊ लागले. त्या दिवशी त्या क्षणाला इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम करण्याचा, मी अनुभवलेला थरार व रोमांच कुठल्याही पुरस्कारापेक्षा अधिक सुखावून गेला.
आता असा गोंधळ कसा झाला? नेमकी गल्लत कुठे झाली याचा किस्सा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख पुढे अनेकांना त्यांच्या खास शैलीत सांगत. तो असा……..…………………..
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी विधान भवनात नवनिर्वाचित आमदारांची बैठक सुरू होती. संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास आझाद यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून सुशीलकुमार शिंदे ……..विलासराव देशमुख यांच्या नावाचा प्रस्ताव देतील असे बैठकीत सांगितले. ही बैठक बंद खोलीच्या हवाकशीतून बाहेरून डोकावून काही मंडळी ऐकत होती. सुशीलकुमार शिंदे हे नाव उच्चारल्या क्षणी, पूर्ण वाक्य ऐकण्या आधीच त्यांनी लगेच खाली उड्या मारल्या आणि शिंदे यांच्या नावाच्या घोषणा देत धावत धावत विधान भवना बाहेर गेले. बातमी ब्रेक करण्याच्या दबावाखाली अथवा मोहात पडल्यामुळे अधिक शहानिशा न करताच तिथे उपस्थित सर्व वार्ताहरांनी चपळाईने एसएमएस केले. राज श्रॉफ निवडणूक हरले असल्याने बैठकीत सहभागी असू शकत नाही हा विचार माझ्या मनात आला. म्हणून मी माझ्या सूत्रांकडून सांकेतिक खूण केली जाण्याची दोन मिनिटे वाट पाहिली त्यामुळे सह्याद्री वृत्त विभागाची विश्वासार्हता पुन्हा एकदा अधोरेखित करण्यास माझा हातभार लागला. मी सिकंदर ठरलो.
नितीन सप्रे
8851540881
मस्त किस्सा.. मी भूतकाळात जाऊन आले.. असे आणखी अनुभव वाचायला आवडेल..
उत्तर द्याहटवा