प्रासंगिक- असेन मी नसेन मी

असेन मी नसेन मी


अनेकवेळा आणीबाणीची परिस्थिती आणि संयमाधीष्टीत निर्णयक्षमतेचा लागणारा कस यामुळे प्रसारमाध्यमात काम करताना अत्यंत सजगता बाळगावी लागते. इलेक्ट्रॉनिक माध्यमात बातमी लवकरात लवकर तर प्रसारित करावी लागतेच पण तसं करत असतानाच ती अचुक असणे नितांत गरजेचं असतं. मात्र प्रत्यक्षात काम करत असताना अचूकते बाबत शंभर टक्के खातरजमा करण्या इतका वेळ बऱ्याचदा हाताशी नसतो. अश्या प्रसंगी, काहीसा नशिबावर हवाला ठेऊन, इंग्लिश मध्ये ज्याला आपण 'कॅलक्यूलेटेड रिस्क' (calculated risk)म्हणतो, ती घ्यावी लागते.
मुंबईत दूरदर्शनच्या वृत्तविभागात वृत्तसंपदानाची जबाबदारी निभावत असताना ६ जून २००२ हा दिवस माझ्यासमोर अशीच आव्हानात्मक परिस्थिती ठाकुन गेला.
त्या दिवशी रोजच्या प्रमाणे साडेनऊ च्या बातमीपत्राची जुळवाजुळव सुरू होती. वृत्तसंस्था, वार्ताहर, प्रतिनिधी आदीं कडून मिळणाऱ्या बातम्यांची निवड, उपलब्ध चित्रफिती, आयत्यावेळी उपलब्ध होऊ शकणाऱ्या चित्रफिती यांचा क्रम निश्चित करून त्या संपादनासाठी पाठवणे, ताज्या घडामोडींचा पाठपुरावा असे संध्याकाळी सात आणि रात्री ९.३० वाजताच्या बातमीपत्रासाठीचे कामकाज साधारण दुपारी ३ वाजेपासून सुरू होत असे. 
पुढे भाषांतर, वार्ताहरांनी दिलेल्या बातम्या तपासणे, प्रसारण सुरू होण्याआधी पर्यंत आणि सुरू झाल्या नंतरही बातम्यांचा प्राधान्यक्रम ठरवीत राहणे आणि शेवटी ठळक बातम्या असा सर्वसामान्य दिनक्रम असतो. बातमीपत्र लाईव्ह असल्याने योग्य फेरबदल अथवा अगदी शेवटच्या क्षणी येणाऱ्या बातमीचाही समावेश करणं आवश्यक असते.


६ जून २००२ हा दिवसही साडेनऊ च्या बातम्या सुरू होऊन, संपण्या पूर्वीच्या काही क्षण आधी पर्यंत, सर्वसामान्य असाच होता. रात्री दहा वाजता बातमीपत्र संपताच घरी परतण्यासाठी वृत्त विभागातील सर्वांचीच लगबग असते. त्या दिवशी मात्र बातमीपत्र संपण्यापूर्वी पाच मिनिटे आधी, साधारण ९.५५ च्या सुमारास, वृत्त विभागातील फोन खणखणला. पलीकडच्या व्यक्तीने, बहुदा आकाशवाणी मुंबईवरून वृत्तनिवेदन करणाऱ्या सविता कुरतडकर किंवा अंजली आमडेकर यांनी, विख्यात मराठी कवयित्री, लेखक, पत्रकार शांताबाई शेळके निवर्तल्याचे समजते आहे, मात्र खात्री करून घ्यावी लागेल असे सूतोवाच केले. प्रतिक्षिप्त क्रियेने घड्याळ बघितले. ९.५७ झाले होते. बातमीपत्र संपायला अवघी तीन मिनिटे बाकी होती. या बातमीचा समावेश अत्यावश्यकच होता. पण संपूर्ण खातरजमा न करता ती देणे दुःसाहस ठरलं असत आणि खात्री करून घेण्यासाठी अवधी फक्त तीन मिनिटेच होता. शांताबाई पुण्याच्या के. इ. एम. रुग्णालयात दाखल असल्याचं कळलं. योगायोगाने तिथे आकाशवाणी पुण्याचा माझा मित्र शेखर नगरकर होता त्याच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्याने दुजोरा दिला मात्र शंभर टक्के खात्रीशीर माहिती त्याच्याकडे नव्हती. एव्हाना बातमीपत्राच्या शेवटच्या भागात दिल्या जाणाऱ्या क्रीडा विषयक बातम्या संपवून वृत्तनिवेदिका अंजली पाठारे हवामान वृत्तावर आलेल्या...….९.५८…..आता फक्त  शेवटच्या ठळक बातम्यात फेरबदल करून संपूर्ण महाराष्ट्राला ही महत्त्वाची बातमी पोहोचवणे शक्य होते. मात्र अजूनही अधिकृत पुष्टी होत नव्हती. शांताबाईंच्या निकटच्या स्नेही कवयित्री डॉक्टर अरुणा ढेरे यांच्याकडून निश्चित स्थिती कळू शकेल असे लक्षात आले सुदैवाने अरुणाताईंचा नंबर होता. साहित्य रसिकांच्या दुर्दैवाने बातमी खरी ठरली... दहा वाजत आले होते. 'कवयित्री शांताबाई शेळके यांचे निधन' एव्हढे शब्दच मोठ्या आकारात कागदावर खरडले आणि वायूवेगाने लाईव्ह स्टुडिओत शिरलो.... वृत्तनिवेदिकेचे लक्ष कागदाकडे वेधले….. तो पर्यंत 'पुन्हा आपली भेट सकाळी साडे आठ वाजता' हेही वाचून झाले होते.... पण मी लाईव्ह स्टुडिओत प्रवेश करून कागदाकडे सतत लक्ष वेधत असल्यानं आणि वृत्तनिवेदिकाही अनुभवी असल्यानं, तिने प्रसंग योग्य रीतीने निभावत 'मात्र तत्पूर्वी एक महत्वाची बातमी अशी जोड लावत 'नमस्कार' उच्चारण्यापूर्वी शांताबाईंच्या निधनाची बातमी वाचली. दूरदर्शन वृत्त विभागाच्या इतिहासात बातमीपत्र संपल्यानंतरही फ्लॅश न्युज देण्याचा कदाचित हा पहिलाच आणि आजवरचा अखेरचा प्रसंग असावा. बातमी महत्वाची होती आणि जर ती साडेनऊच्या बातम्यात प्रसारित केली गेली नसती तर दूरदर्शन सहयाद्री वर ही बातमी दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता द्यावी लागली असती. तो पर्यंत बराच उशीर होऊन गेला असता. 
हा सर्व खटाटोप यशस्वी झाल्याचं एकीकडे समाधान मनाला स्पर्शू पाहत असतानाच, बातमी मिळवून ती साहित्य रसिकां पर्यंत पोहचविण्यात गुंतलेल्या मनाला दुसरीकडे महाराष्ट्र एका प्रतिभासंपन्न कवयित्रीला मुकल्याची सल मात्र लागली होती. शांताबाईंच्या अनेक कवितांच्या, गीतांच्या आठवणींनी मनात गर्दी केली होती आणि कंठ दाटून आला होता.

असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे

हवेत ऊन भोवती, सुवास धुंद दाटले
तसेच काहिसे मनी, तुला बघून वाटले
तृणांत फुलापाखरू तसे बसेल गीत हे

स्वयें मनात जागते, न सूर ताल मागते
अबोल राहुनी स्वतः अबोध सर्व सांगते
उन्हें जळांत हालती तिथे दिसेल गीत हे

कुणास काय ठाउके, कसे कुठे उद्या असू
निळ्या नभांत रेखिली, नकोस भावना पुसू
तुझ्या मनीच राहिले, तुला कळेल गीत हे

  • शांता ज. शेळके
  • कविता ऐकण्यासाठी क्लिक करा






टिप्पण्या

  1. नितीनजी, खूपच धावपळ झाली असणार , हे मी समजतो, आजच्या खासगी वृत्त वाहिनीच्या स्पर्धेत दूरदर्शन अजूनही टिकून आहे आणि विश्वासार्ह बातम्या देत आहे , हे केवळ आपल्यासारख्यांमुळेच , धन्यवाद . संदीप आडनाईक, कोल्हापूर

    उत्तर द्याहटवा
  2. उत्तम कामगिरी, नितीन. म्हणूनच आता पुन्हा एकदा नव्या पार्श्वभूमीवर दूरदर्शनकडं वाटचाल सुरु झाली. नवे संकेत. शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा
  3. बातमी साठी तळमळीने उस्तवार करून ताजी आणि जनमानसावर प्रभाव टाकणारी माहितीअखंडितपणे पोंहचविण्या उर्मी असणारा सप्रे हा एखादाच असतो . सरकारी माध्यमांना तो तारून नेतो

    उत्तर द्याहटवा
  4. नितीन ,ग्रेट
    आपल्या दूरदर्शनची हिच खरी ओळख आहे .

    उत्तर द्याहटवा
  5. किती ही खाजगी वाहिन्यांचे जाळे पसरले तरी दूरदर्शनच्या बातम्यांना तोड नाहो ...दिलीप जाधव

    उत्तर द्याहटवा
  6. पत्रकारीतेच्या क्षेत्रातला आणखी एक खराखुरा अनुभव.. एखादी बातमी आपल्यापर्यंत पोहोचण्याआधी, ती खरी असल्याची खातरजमा करण्यासाठी पडद्यामागची मंडळी इतके कष्टं घेत असतात, खरं तर घेऊ शकतात, हा आजच्या "सर्वात आधी" च्या बिनडोक स्पर्धेची सवय झालेल्या प्रेक्षकांसाठी धक्काच असणार.. या जबाबदार पत्रकारितेची खूप गरज आहे आज...

    उत्तर द्याहटवा
  7. नितीन, आकाशवाणीसारख्या सरकारी माध्यमात तुझ्यासारखे लोक असल्यानेच या माध्यमाचे महत्व तेव्हा वाढीस लागले. आकाशवाणीच्या बातम्या म्हणजे कन्फर्म असणारच, हे समीकरण होते.

    उत्तर द्याहटवा
  8. यातुन लवकरात लवकर व विश्वसनीय बातम्या आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्याची आपली तळमळ दिसून येते 👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  9. ग्रेट अनुभव. अशा वेळीच आपल्या सर्वांचाच कस लागतो. खूप दडपण येते, धावपळही होते. पण या सर्वांतून एखादी चांगली किंवा वाईट बातमी आपण कन्फर्म मिळवून वाचक/ प्रेक्षक यांच्यापर्यंत पोहोचवतो तेव्हा समाधान वाटते. त्या धावपळीचे, मेहनतीचे ख-या अर्थाने चीज होते.

    उत्तर द्याहटवा
  10. नितिन... त्यावेळची तुझी मनस्थिती नक्कीच समजू शकते. खूप छान शब्दबद्ध केला आहेस अनुभव.
    शांता शेळके माझ्या आवडत्या कवयित्री !! त्यांच्या निधनाची बातमी ऐकून फार वाईट वाटलं होतं.

    उत्तर द्याहटवा
  11. नितीनजी, तुमची कामावरील निष्ठा माहीत होतीच पण या दुःखद प्रसंगीही तुम्ही कौशल्यचा प्रत्यय दिलात हे पाहून कौतुक वाटते. सरकारी क्षेत्रात तुमच्यासारखेही लोक आहेत याचे नेहमीच खूप समाधान वाटत आले आहे. शेवटी दिलेल्या कवितेतून हेही सिद्ध होते की जर वेळ मिळाला असता तर तुम्ही बातम्यातून कशी श्रद्धांजली दिली असती. 👍🌸🙏

    उत्तर द्याहटवा
  12. नीतिनजी खूप चांगले प्रसंगावधान, तुमचे व वृत्तनिवेदिकेचे सुद्धा. आपले लिखाण देखील उत्कंठावर्धक. वाचनानंद मिळाला.

    उत्तर द्याहटवा
  13. नितीन जी,एक जबाबदार आणि आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा तर या तुमच्या लेखाद्वारे आमच्यापर्यंत पोहोचलीच पण तुमचं मराठी साहित्यावरचं नितांत प्रेम आणि कवयित्री शांताबाई शेळके यांच्या बद्दलचा आदर यांची प्रचिती आली.आकाशवाणी आणि दूरदर्शन क्षेत्रात विश्वासार्हता जपणारे तुमच्यासारखे अधिकारी आहेत तोपर्यंत या माध्यमांचं स्थान अबाधित राहील
    अप्रतिम लेख .

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक