प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान


वसंतवैभव-कैवल्य गान

पावसाळ्यातली अशीच एक संध्याकाळ. पावसाच्या झडी पासून बचाव व्हावा म्हणून सहा-सात वर्षांचा
मुलगा एका इमारतीच्या जिन्यात उभा राहून आपल्याच तंद्रीत गुणगुणत होता. त्याची तंद्री भंग पावली ती, खांद्यावर अचानक थबकलेल्या हाता मुळे. सकृद्दर्शनी अतिसामान्य वाटणारी ही घटना. पण ती संध्याकाळ विशेष होती आणि घटनाही. त्या संध्याकाळी घडलेल्या या घटनेच्या गर्भात अखिल भारतीय कीर्तीचा तेजोमयी गंधर्व घडवणारं बीज होतं...होय तो खांद्यावर थबकलेला हात होता, ग्वाल्हेर घराण्याचे गायक, नागपुरातल्या श्रीराम संगीत विद्यालयाच्या श्री शंकरराव सप्रे यांचा आणि ज्याच्या खांद्यावर तो हात पडला तो खांदा होता भविष्यात अलौकिक प्रतिभेचा, संगीत क्षेत्राला ललामभूत ठरलेल्या स्वराधीश डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा.

त्या संध्याकाळी सप्रे गुरुजींच्या पारखी/तय्यार कानांवर छोट्या वसंताचे गुणगुणणे पडले आणि ते इतके मोहित झाले की ते त्याला वर गायन शाळेत घेऊन गेले आणि नाव-गाव वगैरे विचारणा करत, गाणं कुणी शिकवलं आणि कुठली गाणी येतात म्हणून चौकशी केली. गोड गळ्याच्या आपल्या आई कडून भजनं, नाट्य-गीतं शिकलेल्या वसंतानं मृच्छकटिक नाटकातील 'जन सारे मजला म्हणतील की' हे पद आणि अन्य गाणी म्हणून दाखवली. शंकरराव खुश झाले. ते वसंता सोबत त्याच्या घरी गेले. वसंता नागपुरातल्या सीताबर्डी भागातल्या तेलीपुऱ्यात राहायचा. घरी गेल्यावर त्यांनी हा मुलगा मला द्या अशी वसंताच्या आई कडे मागणी केली. बेताच्या परिस्थिती मुळे फी देणे परवडणार नाही असं आईने म्हणताच…फी चा प्रश्न नाही फक्त मुलगा माझ्या स्वाधीन करा अशी विनंती शंकररावांनी केली. शाळा न सोडण्याची आईची अट आणि गाणे शिकायला पाठवायचे ही शंकररावांची अट मान्य झाली…छोट्या वसंताची तालीम श्रीराम संगीत विद्यालयात सुरू झाली आणि ती लाहोरला असद अली खां यांचा गंडा बांधून सतत सहा महिने मारवा गिरवून मुख्यत्वानं सुफळ संपूर्ण झाली.


श्रीराम संगीत विद्यालयात शिकत असतानाच वसंतराव आणि त्यांचे सहाध्यायी राम चितळकर
(C. Ramchandra) नागपूरात बर्डी वरच्या तत्कालीन बर्डी पिक्चर हाऊस किंवा नंतर जी रिजंट टॉकीज म्हणून ओळखली जात असे तिथे मूक चित्रपटांच्या पार्श्वसंगीता साठी अनुक्रमे तबला आणि हार्मोनियम वाजवायला जात. वसंतरावांच्या मामाची बळवंत संगीत मंडळीत उठबस होती. मामा बरोबर वसंतरावांनी बरीच नाटकं बघितली आणि त्यांचे लक्ष मास्टर दीनानाथांच्या गायकी कडे वेधलं गेलं. मास्टर दीनानाथ यांनी वसंता कडून
'शुरा मी वंदिले', 'जिंकिते जगी ती' आणि 'परावशता पाश दैवी ' ह्या पदांची तालीम स्वतः हुन करून घेतली. आवडीची गायकी शिकण्याचे स्वातंत्र्य  शंकररावांनी वसंताला दिलं होतं. कुठली गायकी शिकायची हा पेच मामानं पुढे सोडवला. मामाची बदली लाहोरला झाली.
तो वसंतरावाना आपल्या बरोबर लाहोरला घेऊन गेला. शाळेत दाखल केलं. शाळेच्या अभ्यास बरोबरच वसंतानं बऱ्याच खां साहेबांची गायकी ऐकली. शाळेतल्या खन्ना नावाच्या मित्रानं रावी नदी पल्याडच्या शहादऱ्यात (जहांगीराची कबर) रहाणाऱ्या फकिरा कडे नेले. हेच ते असद अली खां ज्यांनी विहिरीच्या काठावर बसून वसंतरावां कडून फक्त मारवाच तीन चार महिने घोटून घेतला. तो असा काही गिरवून घेतला की सर्वच रागांचे दर्शन होण्यास मदत झाली. मारवा गळ्यावर नीट चढल्यानंतर उण्यापुऱ्या एकोणीस वर्षांच्या वसंताला ते म्हणाले, 'जा तू आता गवई झालास. एक राग तुला आला; तुला आता सगळं संगीत आलं." पुढे म्हणाले,
'एक साधे तो सब साधा, सब साधे तो कुछ नाही साधे." आणि वसंताचा...वसंतराव…डॉक्टर वसंतराव होण्याचा मार्ग प्रशस्त झाला.



वसंतराव यांच्यावर संगीताचे बहुमुखी संस्कार झाले. त्यांना खऱ्या अर्थाने संगीत तज्ञ म्हणता येईल, कारण संगीत म्हणजे गायन, वादन आणि नर्तन. या तीनही विधांवर त्यांची चांगली पकड होती. इतकेच नव्हे तर ते उत्तम नकलाकारही होते असा उल्लेख माझ्या वाचनात तर आला होताच आणि त्याचा प्रत्यय आला तो
1981 साली तेव्हाच्या नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात वसंतरावांच्या रंगलेल्या अद्वितीय मैफिलीत. त्यांना अगदी जवळून प्रत्यक्ष ऐकता आलं याचं सुख मानावं की मला ऐकता आलेली त्यांची ती एकमेव शास्त्रीय संगीत सभा ठरली याचं दुःख करावं ह्या बाबत माझ्या मनात आजतागायत द्वंद्व सुरू आहे.


चरितार्थ चालावा यासाठी ते मिलिटरी अकाउंट्स मध्ये कारकुनाची नोकरी करत होते यावर चटकन कुणाचाही विश्वास बसणार नाही. पण ते सत्य आहे. मी अस ऐकलंय की वसंतरावांना गुणगुणतांना किंवा रियाझ करतांना कुणीही फारस पाहिलं नाही. सुरवातीला त्यांचं घरही इतकं लहान होत की त्यात तानपुरा ठेवायलाही पुरेशी जागा नव्हती. गत जन्मी रियाझ करून, साक्षात परमेश्वराची अनुभूती देणार गाणं सादर करण्यासाठीच त्यांचा हा जन्म झाला होता बहुदा. त्यांचे व्यक्तिमत्व, प्रतिभा ही चहुमुखी होती. खऱ्या अर्थानं ते पंडित होते.
अनेक घराण्यांच्या गायकीच सत्व त्यांनी आपल्या गळ्यात उतरवून आपली स्वतःची स्वतंत्र गायकी संघर्ष पूर्वक मोठ्या हिकमतीने निर्माण केली, रुजवली आणि अखेरीस गान पंतोजी वर्गातही ती प्रस्थापित करून लोकमान्यता ही मिळवली. त्यामुळेच माझे घराणे माझ्या पासूनच सुरू होत किंवा लोकांना कळावं की मी तालात गातो आहे, म्हणून मी तबलजी साथीला घेतो यासारखी विधानं अन्य कुणीही गायकानं केली असती तर ती निखळ अहंकारोक्तीच म्हटली गेली असती. मात्र वसंतरावांचा वकुबच असा होता की ही वाक्यें त्यांचा मुखी सहज शोभून दिसली, शालीन वाटली.

दुसरीकडे आपण थोर गायक आहोत ह्या अहंकाराचा लवलेश ही स्पर्श होऊ न देता, गानतपस्वी हिराबाई बडोदेकरांचा परदेश दौरा त्यांच्या तबलजीच्या आजारपणामुळे रद्द करावा लागू नये म्हणून, त्यांच्या बरोबर स्वतः तबलजी म्हणून वसंतरावांनी दौरा केला. हिराबाईंकडच्या खाजगी बैठकीत सतरंज्या घालायला देखील त्यांनी कधी कमीपणा मानला नाही. त्याकाळी नावाजलेले गवई वझेबुवा यांच्याशी त्यांचा घनिष्ट परिचय होता. त्यांच्या बरोबर ते पुण्यात तालमीत जात असत. पण दोन अडीच वर्ष वझेबुवांना वसंतरावांचा खवय्या म्हणून परिचय असला तरी त्यांना गवय्या वसंतराव बराच काळ अपरिचित होते. इतका निगर्वीपणा त्यांच्या ठायी होता मात्र त्याचवेळी गायनातील स्वतःच्या निपुणतेबाबत सार्थ स्वाभिमानही होता. कुठल्याशा मैफिलीत त्यांना लघु दृष्टीकोनाच्या कुणी खोचकपणे "तुमचं घराणं कुठलं" असा प्रश्न विचारताच तत्क्षणी, "माझं घराणं माझ्या पासूनच सुरू होत" असं बाणेदार प्रत्युत्तर त्यांनी दिलं होतं. सुरांच्या निर्मळ विश्वात त्यांनी स्पृश्य अस्पृश्य असा भेदभावही कधी केला नाही. ख्याल, ठुमरी ज्या तन्मयतेनं गात त्याच तन्मयतेन उपशास्त्रीय, ललित संगीत, नाट्य संगीतही ते गात असत. चित्रपटासाठी ‘दाटून कंठ येतो’ यासारख्या भारदस्त गीताप्रमाणेच ‘माझ्या कोंबड्याची शान’ या सारखं हलकं फुलकं गीतही त्यांनी गायलं आहे. दर्दीं प्रमाणे गर्दीलाही मोहवेल असं कसब त्यांना लाभलं होतं. नवख्या साथीदारांना सांभाळून घेण्याच दुर्मिळ औदार्य त्यांच्या ठाई होत. सहकलाकारांच्या बाबतही तीच वृत्ती. मेघमल्हार या संगीत नाटकाचे सर्वेसर्वा राम मराठे होते आणि त्यांच्या मित्राच्या भूमिकेत वसंतराव. तालमी दरम्यान रामभाऊंच्या आई आजारी झाल्या आणि त्यांना संगीत दिग्दर्शनासाठी वेळ कमी पडू लागला. तेंव्हा वसंतरावांनी स्वतःची पद स्वतः बसवली मात्र संगीत दिग्दर्शक म्हणून  एकट्या रामभाऊंच नाव देण्याची सूचना वसंतरावांनी सहजपणे करून मनाच्या मोठेपणाचा सहजीच विलक्षण परिचय दिला.

संगीत नाटकांना नवसंजीवनी देणाऱ्या आणि वसंतरावांना सर्वमान्यता मिळण्यास 'कट्यार काळजात घुसली' नाटकाची भूमिका फार मोठी आहे. पंडित अभिषेकी बुवांच्या संगीत नियोजनाला आपल्या बहारदार गायनानं आणि चपखल अभिनयानं वसंतरावांनी या नाटकाच अक्षरशः सोनं केलं.


गंमत म्हणजे खां साहेबांच्या भूमिकेसाठी वसंतराव ही पहिली पसंती नव्हती तर तडजोड होती यावर मात्र आज कुणाचा विश्वास बसणे अवघड आहे. या संदर्भात नाटकाचे निर्माते प्रभाकर पणशीकर यांच्या कडून मी ऐकलेला किस्सा असा…खां साहेबांच्या भूमिकेसाठी सर्वप्रथम त्यावेळचे गायकनट प्रसाद सावकार यांना पणशीकरांनी विचारलं. त्याकाळी अभिनयासाठी मिळणाऱ्या बिदागीच्या बरोबरीनं किंवा त्यापेक्षाही अधिक रक्कम मराठी नाट्यसंगीताच्या ध्वनिमुद्रिकांच्या विक्री मार्फत होत असे. कट्यार मध्ये एकही पद मराठी नसल्याने प्रसाद सावकारांनी हे नाटक नाकारलं. नंतर राम मराठे यांचं नाव पुढे आलं. कितीही मेकअप  केला तरी खां साहेबांच्या भूमिकेला त्यांच व्यक्तिमत्व सुसंगत दिसणार नाही हे लक्षात आल्यानं पुन्हा शोध सुरू झाला. त्यावेळी कुणीतरी पणशीकरांना वसंतराव यांच नाव सुचविलं. त्यांना विचारण्यासाठी पणशीकर पुण्याला गेले मात्र वसंतराव मुंबईत असल्याचं समजल्यानं त्यांनी वसंतरावांची मुंबईत भेट घेतली आणि आपण संगीत नाटक करतो आहोत असे सांगताच वसंतराव त्यांना म्हणाले की, "तुमचा आणि संगीताचा काय संबंध?" त्यावर आपण निर्माता असल्याचा खुलासा पणशीकर यांनी केला आणि संगीत अभिषेकी बुवा करणार असल्याचं सांगत नाटकाची संहिता त्यांच्या कडे दिली. यावर वसंतराव म्हणाले, "बाड ठेऊन जा. वाचतो, आवडले तर उद्या गिरगावात तालमीला येतो आणि आलो नाही तर हे बाड परत घेऊन जाण्याची व्यवस्था करा". समस्त मराठी संगीत नाटक रसिकांचं नशीब बलवत्तर म्हटलं पाहिजे, वसंतराव तालमीला हजर झाले. पुढे काय झाले ते सर्वांना माहीतच आहे. खां साहेबांच्या भूमिकेत वसंतरावांनी असा काही प्राण ओतला की कट्यार आणि वसंतराव द्वैत न राहता अद्वैत होऊन गेले. हे नाटक म्हणजे मराठी संगीत रंगभूमीच्या इतिहासातील विलक्षण अद्भुत योग होता. साधारण चौदा वर्षात या नाटकाचे पाचशे हून अधिक प्रयोग झाले. त्याकाळी काट्यारचा प्रयोग पहिला नाही असा एकही नामवंत गायक वादक कलाकार हिंदुस्तानात नसेल. हिंदी चित्रपट सृष्टीतील पूर्वीचे खलनायक कन्हैयालाल हे तर मुंबईत दादरच्या शिवाजी मंदिरात होणाऱ्या कट्यारच्या प्रत्येक प्रयोगाला तिकीट काढून उपस्थित असत. या नाटकाचे निर्माते प्रभाकर पणशीकर हे त्यांच्यासाठी पहिली खुर्ची राखून ठेवत असत.



डॉ. वसंतराव देशपांडे - तेजोनिधी लोहगोल


या अव्वल शास्त्रीय संगीत गायकाला सर्वसामान्य रसिक मान्यता मिळण्यासाठी कट्यारला निमित्त व्हावं लागलं ही बाब मात्र काळीज चिरते. वसंतराव यांच्या बरोबर काट्यारचे कित्येक प्रयोग केलेल्या श्रीमती फैयाज यांनी ठाण्यात झालेल्या एका कार्यक्रमात सांगितलं की प्रयोगा गणिक गायकीच्या वेगवेगळ्या छटा दाखवत खां साहेबांची पदं वसंतराव सादर करायचे…आजची पदं काल सारखी नसायची अगदी नवीन रूप घेऊन यायची. एवढंच नव्हे तर अनेक स्त्री सुलभ मुरके जे स्त्री असूनही त्यांना कठीण जात असे ते वसंतराव त्यांना साभिनय शिकवत. हे शक्य झालं कारण त्यांनी लच्छू महाराज यांच्याकडे नृत्य कलेचाही अभ्यास केला होता.

 वसंतराव चतुरस्त्र आणि बहुमुखी प्रतिभेचे धनी होते. त्यांच्या गायकीचं पु. ल. देशपांडे यांनी यथार्थ वर्णन केल आहे . ते म्हणतात "वसंताची गायकी परंपरेच्या पालखीतून संथपणे मिरवीत जाणारी नाही. दऱ्याखोऱ्यातून बेफाम दौडत जाणाऱ्या घोडेस्वारा सारखी त्याच्या गायकीची मूर्ती आहे. भर उन्हाळ्यात पालशबनात अग्निपुष्पे फुलावी तशी ही गायकी. ती फुले पाहायला उन्हाची तिरीप सोसणारी जवानी हवी." अस म्हणतात की नागपुरातल्या ताजुद्दीन बाबांनी वसंतरावांच्या आईला सांगितलं होतं की याच्या पश्चात पन्नास वर्षांनी आपण काय गमावले ते लोकांना कळेल. खरोखरच वसंतरावांना रसिकमान्यता मिळण्यास फार उशीर झाला. पण त्यामुळे त्यांच्यापेक्षा सर्वसामान्य रसिकांच फार मोठं नुकसान झालं. त्यांची भूमिका त्यांनी स्पष्टपणे पु. ल. देशपांडे यांना सांगितली होती, ते म्हणतात "अरे भाई, मान मान क्या बात है! सुरांची दौलत गळ्यात असल्यावर गळ्याबाहेर नाही पडला हार तर बिघडलं कुठे?" असा हा निर्मोही, निरहंकारी, अवलिया गायक! आचार्य अत्रे यांच्या शैलीत सांगायचं तर पुढच्या दहा हजार वर्षात असा गायक होणे नाही. संगीताच्या मांडवात कानसेन म्हणूनही खरंतर मी मिरवू शकत नाही. प्रभाताई अत्रे, वसंतराव यांच्या ध्वनिमुद्रिका ऐकून स्वर, ताल यांची गोडी निर्माण झाली आणि सूरांच्या ह्या दुनियेत शिरकाव तरी झाला. वसंतरावांच व्यक्तिचित्र रेखाटताना आपण कितीतरी कमी पडत असल्याची भावना मनात सतत आहे. ती कमतरता दूर करण्या साठीच की काय अगदी अवचित पणे माझ्या ऐकण्यात आलेली, आपापल्या क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती असलेल्या एका कार्यक्रमाची संपादित AV श्रवणभक्ती साठी वाचकांच्या सुपूर्द करतो. रामकृष्ण बाक्रे यांनी 'गान सरोवरातील ब्रह्म कमळ' अशी सार्थ उपमा दिलेल्या या अवलीयाच्या चिरस्मृतींना वाहिलेली ही विनम्र शब्दांजली.

डॉ. वसंतराव देशपांडे - सुकतातची जागी या



सौजन्य: राहुल देशपांडे, YouTube
            वसंतराव देशपांडे स्मरणिका

https://youtu.be/BhMaIdnBrYE?si=kWUgjAIy9q3E_Lcy....मारू बिहाग 

https://youtu.be/yFAFwSA-nj4?si=UKpusac_kYTb-Gso....बसंत बुखारी




.



नितीन सप्रे,
nitinnsapre@gmail.com
8851540881






टिप्पण्या

  1. Eka asamanya thor vyaktimatvachi uttam adhava.
    Nitin sapre khup khup kautuk.

    उत्तर द्याहटवा
  2. प्रिय नितीन जी खूप छान लिहिले आहे वसंतराव डोळ्यासमोर उभे राहिले एक तर सिनेमा आणि त्यानंतर आपले लिखाण म्हणजे आम्हा रसिकांना ही मोठी मेजवानीच आहे त्यांचे व्यक्तिमत्त्व तुम्ही उलगडून दाखवले त्याबद्दल तुम्हाला विशेष धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  3. ज्याप्रमाणे वसंतरावांचे गाणं कधीही व कुठेही, असंख्य वेळा ऐकावेसे वाटते, तसेच त्यांच्या आठवणींची उजळणी कितीही वेळा केली तरी नाविन्याचा अनुभव येतो. फारच छान लेख आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. वा असा एक शब्दही पूरेसा असला या लेखासाठी तरीही तुम्हाला इतक्या सर्वांग सुंदर लेखनासाठी धन्यवाद दिलेच पाहिजेत अन्यथा वसंतराव त्यांची गायकी त्यांचे जीवनातील प्रसंग आम्हाला कसे कळले असते तुम्ही लिहिता खूप छान प्रासादिक वाटतं तुमचं लिखाण म्हणून ते दरवेळेला वाचावसं वाटतं लिहिते राहा धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  5. माझ्या अत्यंत आवडत्या गायकावरचा हा लेख खूप आवडला !

    उत्तर द्याहटवा
  6. या थोर गायकाची परिचय तुम्हीही तितक्याच समर्थपणे करून दिलाय. धन्यवाद

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक