प्रासंगिक - राष्ट्रसंत तुकडोजी
राष्ट्रसंत तुकडोजी
म्हने देवा मला पाव
देव अशानं भेटायचा नाही रं
देव बाजाराचा भाजीपाला नाही रं'......
अस्सल ग्राम बोली मधल्या या भक्तीगीताशी माझी ओळख नागपूर आकाशवाणीनं करून दिली. मी प्राथमिक शाळेत असताना, 'अर्चना' या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात बरेचवेळा प्रसारित केलं जाणारं हे भजन एकीकडे माझ्या कानावर पडत असतानाच कुठंतरी मनात ही रुजत होतं.
ऐका - मनी नाही भाव म्हणे(click here)
नंतर इयत्ता आठवीत(हे मी आठवीत आठवीतच लिहितो आहे) असताना बालभारती या मराठी विषयाच्या क्रमिक पुस्तकात तुकडोजी महाराजांची एक कविता आम्हाला होती…….
*या झोपडीत माझ्या*
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥
भूमीवरी पडावे, तार्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥
पहारे आणि तिजोर्या, त्यातूनी होती चोर्या
दारास नाही दोर्या, या झोपडीत माझ्या॥३॥
जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भिती नं यावयाला, या झोपडीत माझ्या॥४॥
महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥५॥
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥६॥
पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या॥७॥
आमच्या मराठीच्या शिक्षिका ती अशी काही मनापासून शिकवीत की ही कविता कायम स्वरूपी माझ्या मन:पटलावर अंकित झाली. ३० एप्रिल ही तुकडोजी महाराजांची जयंती आणि ११ ऑक्टोबर हा महापरिनिर्वाण दिन. त्याची जयंती 'ग्राम-जयंती' म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. त्यांच्या एका जयंतीदिनी त्यांचा निस्सीम भक्त असलेल्या माझा एक डॉक्टर मित्र विजय माथने यांनी ती कविता व्हाट्सअप वर पाठवली. तेव्हां पासूनच त्यांच्या कार्याचा अधिक परिचय करून घेत होतो आणि त्यातून मला जे काही उमजलं ते आपणा सर्वांपुढे मांडण्याचा हा प्रयत्न.
माणिक बंडोजी इंगळे उर्फ तुकडोजी महाराजांची ओळख, विसाव्या शतकातले एक थोर संत समाज सुधारक, प्रबोधनकार म्हणून देता येईल. खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार रंजकपणे करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधनाचे मोठे कार्य त्यांनी केलं. विदर्भ ही त्यांची मुख्य कर्मभूमी. मात्र आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे कार्य प्रदेश किंवा राज्याच्या सीमेपुरतं मर्यादित न राखता त्यांनी देशभरात केले. धार्मिक पंथ तसेच अन्य विचारसरणींचा अभ्यास करून भाविकांच्या धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष समस्यांविषयी त्यांनी उहापोह केला. सामाजिक-अध्यात्मची पुनर्मांडणी प्रभावीपणे करून देशाला जागृत तसेच पुनरुज्जीवित करण्याचा त्यांचा संकल्प होता. ते एक उत्तम वक्ता होते तसेच त्यांना संगीताचीही चांगली जाण होती. मराठी आणि हिंदी भाषेतून त्यांनी सुमारे ३००० अभंग/भजनं लिहिली आहेत. ईश्वरभक्ती, सद्गुणांचा उपदेश, सामाजिक जागृती या सारखे विविध विषय त्यांनी आपल्या कीर्तनांतून हाताळले, म्हणूनच त्यांना जनतेने ‘राष्ट्रसंत’ अशी उपाधी देऊन गौरविले. त्यांनी खंजिरी घेऊन भजन करत देशभर हिंडून आध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रबोधन केलं. स्त्रीला अज्ञानात आणि बंधनात ठेवणं कसं अन्यायकारक आहे हे त्यांनी आपल्या खंजिरी भजन आणि प्रवचनांच्या माध्यमातून प्रभावीपणे पटवून दिलं. ईश्वरभक्ती करतानाच दुबळ्यांचीही सेवा करा, असं ते नेहमी सांगत. हिंदी भाषेतल्या त्यांच्या अनेक आशयपूर्ण रचनांपैकी एक रचना सुप्रसिद्ध आहे.
“हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है।
तेरी रंगभूमि यह विश्व भरा, सब खेल में मेल में, तू ही तू है ।।
सागर से उठा बादल बन के, बादल से फुटा जल हो करके ।
फिर नहर बना नदिया गहरी, तेरे भिन्न प्रकार तू एक ही है ।।
चींटी से भी अणु परमाणु बना, सब जीव जगत का रूप लिया ।।”
‘ग्रामगीता’ हा त्यांचा ग्रामविकास विषाया वरचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली विदर्भातल्या अमरावती शहरा जवळ मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली.
कशास काही नियम नुरला।
कोण रोगी कोठे थुंकला?
कोठे जेवला, संसर्गी आला। गोंधळ झाला सर्वत्र।।
त्याने रोगप्रसार झाला।
लागट रोग वाढतच गेला।
बळी घेतले हजारो लोकांला। वाढोनि साथ।।
गाव असो अथवा शहर।
तेथिल बिघडले आचारविचार।
म्हणोनी रोगराईने बेजार।
जाहले सारे जनलोक ।।
व्यक्ति व्हाया आदर्श सम्यक । पाहिजे दिनचर्या सात्विक।
सारे जीवन निरोगी, सुरेख। तरीच होईल गावाचे।।
फार पूर्वी लिहिलेल्या ग्राम गीतेत त्यांनी मांडलेले हे विचार 21व्या शतकातल्या कोरोना महामारीच्या दिवसात ही मार्गदर्शक ठरू शकतात हीच त्यांच्या द्रष्टेपणाची पावती होय.
'छोडो भारत' चळवळीच्या जन उद्रेगात ते सहभागी झाले होते. ब्रिटीश राज्यकर्त्यांच्या अमानुष दडपशाहीचा त्यांनी कडाडून विरोध केला. १९४२ मध्ये त्यांना अटक करण्यात आली आणि नागपूर तसच रायपूर मध्यवर्ती कारागृहात तुरुंगवासही भोगावा लागला. स्वातंत्रोत्तर त्यांनी ग्रामीण पुनर्रचनेवर लक्ष केंद्रित केले. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ स्थापन करून एकात्मिक ग्रामीण विकासासाठी अनेक कार्यक्रम त्यांनी विकसित केले. १९४५ सालचा बंगाल दुष्काळ, १९६२ साल चे भारत-चीन युद्ध किंवा १९६५ साली पाकिस्तानचे आक्रमण यासारख्या राष्ट्रीय आपत्तींच्या समयी अतिशय उपयोगी मदतकार्य त्यांनी केले.
त्यांचे कार्य इतके प्रभावी होते की, भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना 'राष्ट्रसंत' ही पदवी दिली. भारत सरकारने त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ टपाल तिकीट प्रकाशित केले.
*कोणाचेही न रुचो बोल | सखा सोडोनि विठ्ठल ||*
*तूंचि जिवीचा जिव्हाळा | मना लागो तुझा चाळा||*
*मार्गी चालता बोलता | मनी रंगो तुझी कथा ||*
*तुकड्या म्हणे मी उनाड | देवा पूर्वा तुम्ही कोड ||*
ते पंढरपूरच्या वरीला ही जात असल्याचे उल्लेख वाचायला मिळतात. पंढरपूर वारी विषयी ते आपल्या अभंगातून सांगतात.
*वाचे विठ्ठल गाईन | नाचत पंढरी जाईन ||*
*ऐसे आहे माझ्या मनी | लागेन संतांच्या चरणी ||*
*रंग अंतरा | हरुनी देहभाव सारा ||*
*तुकड्या म्हणे होईन दास | देवा पुरवी इतुकी आस||*
आपल्या जीवनाचे कल्याण करायचे असेल तर आपण पंढरपूरची वारी केलीच पाहिजे असा त्यांचा भाव होता..या महान राष्ट्रसंताच्या महान कार्यास नम्र अभिवादन.
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
खूप चांगले लिहिले आहे. साधेपणा म्हणजेच सात्विकता.
उत्तर द्याहटवाKhup Chan lihil ahe kaka
उत्तर द्याहटवाKhup Chan lihil ahe kaka
उत्तर द्याहटवाखूप सुंदर लेख आहेत
उत्तर द्याहटवाखूप सुंदर लेख आहे
उत्तर द्याहटवादिलीप काकडे:
उत्तर द्याहटवानमस्कार, आम्ही सर्व वाचक पाचवीतील आपल्या शिक्षिका, ह्यांच्या ञृणी आहोत, ज्यांच्या समरस व प्रभावी शिकवणीतुन, प्रेरित होऊन आपण राष्ट्र् संत तुकडोजी महाराजांच्या अस्सल मानवतावादी महान कार्याची अगदी जवळून ओळख करुन दिली. अर्थात ह्यात नागपुर आकाशवाणीचा वाटा आहेच.
खुप छान लेख, वाचुन आनंद झाला, जय गुरूदेव
उत्तर द्याहटवासर, नेहमीच्याच लेखांप्रमाणे हाही सुंदर झालाय लेख. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या निवडक भजन व अभंगाची केलेली निवड व त्यांची मांडणी , दिलेली लिंक ही उत्तम आहे.
उत्तर द्याहटवाऔचित्यपूर्ण आणि सोदाहरण माहितीपूर्ण लेख.स्वानुभवाचं लेखाला कोंदण खूप छान.
उत्तर द्याहटवाविनम्र अभिवादन !
वाचलं. खूप भावलं. या झोपडीत माझ्या मुळे बालपण आठवले. अन् द्रष्टेपणाची कमाल आहे, करोनाकाळासाठीची रचना ! 🙏
उत्तर द्याहटवाखुपच छान!
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर शब्दात सांगितलं आहेत आपण.... खूप छान.
उत्तर द्याहटवा