प्रासंगिक-आत्म षटकम्
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता
https://youtu.be/93Z4tzJF3OA
इथे ज्या स्तोत्रा विषयी उहापोह करतो आहोत त्याची रचना थोर हिंदू तत्त्ववेत्ते पुज्यपाद श्रीमद् आदि शंकराचार्य यांनी केली आहे. अद्वैत वादाची मांडणी करणार हे स्तोत्र आत्म षटकम् किंवा निर्वाण षटकम् म्हणून ओळखले जाते. हे स्तोत्र इ.स. ७८८- ८२० च्या सुमारास लिहिलं गेलं.
अशी आख्यायिका आहे की आदी शंकराचार्य सात आठ वर्षांचे असताना गुरुप्राप्ती साठी नर्मदा काठी भ्रमंती करत होते. त्यावेळी त्यांची गाठ स्वामी गोविंदपद म्हणून कुणा द्रष्ट्या पुरुषाशी पडली. त्यांनी "तू कोण आहेस" अशी विचारणा केली तेव्हा छोट्या शंकरांनी स्वामींना श्लोकबद्ध उत्तर दिलं. स्वामींनी लहान शंकरांना शिष्य म्हणून स्वीकारलं. हीच सहा श्लोकी आत्म षटकम् म्हणून ओळखली जाते. असाही एक प्रवाद आहे की श्रीमद शंकराचार्यांनी आपल्या निर्वाणसमयी ह्या स्तोत्राचे पठन केल्यामुळे त्याला निर्वाण षटकम् असेही संबोधले जाते.
मनोबुद्ध्यहङ्कार चित्तानि नाहं
न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे ।
न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥१॥
मी मन, बुद्धी किंवा अहंकार नाही,
मी कान,जीभ,नाक,किंवा डोळे आदी ज्ञानेंद्रियही नाही.
मी आकाश नाही किंवा पृथ्वी नाही, अग्नि किंवा वायुही नाही,
मी सदैव शुद्ध आनंदित चैतन्य आहे; मी शिव आहे, मी शिव आहे.
न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुः
न वा सप्तधातुः न वा पञ्चकोशः ।
न वाक्पाणिपादं न चोपस्थपायु
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥२॥
मी जीवनावश्यक श्वास नाही, पंच वायू (प्राण, अपान, उदान, व्यान आणि समान) नाही.
मी शरीरातील सात धातू (त्वचा, मांस, पेशी,रक्त,मेद,अस्थी आणि मज्जा) किंवा शरीरातील पाच आवरणे ( अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय)देखील नाही,
मी वाणी नाही, किंवा हात, पाय, जननेंद्रिय अथवा उत्सर्जना साठीचे अवयव ही नाही,
मी सदैव शुद्ध आनंदी चैतन्य आहे; मी शिव आहे, मी शिव आहे.
न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ
मदो नैव मे नैव मात्सर्यभावः ।
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥३॥
मला द्वेष किंवा आसक्ती नाही, लोभ किंवा मोह नाही,
माझ्यात अभिमान किंवा मत्सर ही नाही.
मी धर्म (नीतिमत्ता), अर्थ (संपत्ती), काम (कामना) आणि मोक्ष (मुक्ती) या जीवनाच्या चार पुरुषार्थांच्या सीमेत बद्ध नाही.
मी सदैव शुद्ध आनंदी चैतन्य आहे; मी शिव आहे, मी शिव आहे,
न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं
न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥४॥
मी पाप-पुण्य, सुख-दु:ख या कल्पनांच्या पार आहे
मला कोणतेही पवित्र मंत्र, तीर्थस्थान, शास्त्र किंवा आहुती यांचं बंधन नाही,
मी भोजन(भोग्य वस्तू), भोगानुभव नाही, अथवा भोगणारा,अनुभवणारा ही नाही,
मी सदैव शुद्ध आनंदी चैतन्य आहे; मी शिव आहे, मी शिव आहे.
मला असं वाटतं की तिसऱ्या आणि विशेषतः चौथ्या श्लोकात जगद्गुरू शंकराचार्य यांनी सदैव जीवभावात वावरणाऱ्या सर्वांनाच स्व-रुपाची ओळख करून देण्यासाठी 'मी' कोण नाही हे आधी मनावर ठसवलं आहे. राग, लोभ, मद, मोह, मत्सर, पाप, पुण्य,सुख,दुःख,मंत्र,शास्त्र हे सर्व मायारुपी आभास आहेत हे समजावून सांगताना, कुणालाही सहज समजेल असं रूपक योजल आहे आणि ते म्हणजे भोजन. गरीब - श्रीमंत, उच्च - नीच, शिक्षित - अशिक्षित, आस्तिक - नास्तिक अशा सर्वच घटकांना भोजन ही संकल्पना सुपरिचित असते म्हणुुनच अश्या सार्वत्रिक रुपकाच्या माध्यमातून आचार्य समजावतात की मी 'भोजनं' म्हणजेच भोग्य वस्तू, 'भोज्यं' म्हणजेच भोगानुभव आणि 'भोक्ता' म्हणजेच उपभोग घेणारा ही नाही.
न मृत्युर्न शङ्का न मे जातिभेदः
पिता नैव मे नैव माता न जन्मः ।
न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यं
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥५॥
मी, न मृत्यू किंवा मृत्यू भयाने ग्रासलेला आहे, तसेच जाती भेदाच्या जोखडानी जखडलेला नाही,
मला ना आई-वडील, ना जन्म आहे,
मला सखे सोयरे, गुरू किंवा शिष्य ही नाहीत.
मी सदैव शुद्ध आनंदी चैतन्य आहे; मी शिव आहे, मी शिव आहे.
जीवरूप अथवा जगतरुपी माया यालाच सत्य समजणाऱ्या आपल्या सारख्यांना, जगतभाव हा निव्वळ आभासी मायाविष्कार आहे हे समजावण्यासाठी इथवर, मी कोण नाही हे सांगण्यावर आचार्यांनी भर दिला आहे आणि, मग मी आहे तरी कोण? या बद्दल ते उत्कंठा निर्माण करत आले आहेत. असत्य काय हे पूर्णपणे बिंबावल्यानंतरच खऱ्या आत्मरूपाची ओळख करून घेण्यासाठीची पात्रता निर्माण होईल अशी त्यांची धारणा असणार आणि म्हणूनच या षटकाराच्या शेवटच्या श्लोकात आचार्य निजरुपाचा आविष्कार घडवतात.
अहं निर्विकल्पो निराकाररूपो
विभुत्वाच्च सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् ।
न चासङ्गतं नैव मुक्तिर्न मेयः
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥६॥
मी भेदाभेद विरहित निराकार आहे,
मी सर्व गोष्टींत अंतर्निहित आहे; म्हणूनच सर्वव्यापी आहे आणि सर्व इंद्रियांची प्रेरणा आहे.
मी कशाशीही संबद्ध नाही, किंवा कशातुनही मुक्त होत नाही,
मी सदैव शुद्ध आनंदी चैतन्य आहे; मी शिव आहे, मी शिव आहे.
या मंत्राची मूलभूत संकल्पनाच अशी आहे की मी बद्ध नसून मुक्त आहे. मी आणि शिव अस द्वैत नसून मी शिवस्वरूपच, अद्वैत आहे.
अवघड विषय तुम्ही किती छान उलगडून दाखवला आहे सर
उत्तर द्याहटवा