प्रासंगिक : डॉ. नारळीकर - खगोलशास्त्री विज्ञान साहित्यिक
डॉ. नारळीकर - खगोलशास्त्री विज्ञान साहित्यिक
बहुतेक १९८० सालचा मार्च-एप्रिल महिना असावा. आमच्या नववीच्या शालेय परीक्षा आटोपल्या होत्या आणि निकालाची वाट पाहत होतो. शाळेला सुटी होती. पण अवांतर उद्योगांसाठी अधून मधून सायकलवरून शाळेत चक्कर व्हायची. एक दिवस नागपूर इथल्या रवी नगर मधल्या आमच्या सी.पी.अँड बेरार शाळे शेजारच्या, राज्य विज्ञान संस्थेत, डॉक्टर जयंत नारळीकरांचं व्याख्यान असल्याची बातमी कळली. त्याकाळी माध्यमांचा सुळसुळाट नव्हता. नागपूरला तर दूरदर्शनचे कार्यक्रमही त्यावेळी दिसत नसल्यानं त्या माध्यमा बद्दलही मोठं अप्रूप होतं. पुस्तकं, वृत्तपत्र आणि नियतकालिकात छापून येणारी छायाचित्रं हीच काय ती दृकसृष्टी. एखादा महत्वाचा कार्यक्रम, क्रिकेट सामना किंवा अतिमहत्वाच्या व्यक्तीला पाहायचं असेल तर कार्यक्रमाला स्वतः उपस्थित राहणं अन्यथा कधीतरी चित्रपट बघायला गेल्यावर चित्रपट गृहात मुख्य शो पूर्वी दाखवल्या जाणाऱ्या फिल्म्स डिव्हीजन च्या समाचार चित्र /न्युज रील पाहणे, असे मोजके पर्यायच उपलब्ध असत. त्यामुळे नारळीकर यांच्या सारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शास्त्रज्ञाला आणि प्रतिथयश साहित्यिकाला समोरासमोर पाहण्याची संधी हुकवण शक्यच नव्हतं.
व्याख्यानाच्या दिवशी मी आणि माझे एक दोन मित्र वेळे आधी कार्यक्रम स्थळी पोहोचलो. राज्य विज्ञान संस्थेचे वरिष्ठ अधिकारी, विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि बराचसा श्रोतृवृंदही टाय, सुट, बुट अश्या वेशात उपस्थित होता. आम्ही काहीसे बुजुन गेलो होतो. मात्र नारळीकरांना प्रत्यक्ष पाहायला मिळणार म्हणून खिंड लढवत होतो. अखेरीस ती वेळ आली. नारळीकरांची गाडी संस्थेच्या मुख्यद्वारा समोर उभी झाली. गाडी भोवती एकच गलका झाला. या गदारोळात त्यांना नीटसं पाहता येणार नाही म्हणून आम्ही हिरमुसले झालो. पण पदरी निराशा आली नाही. कारण प्रमुख पाहुणा म्हटलं की सूट, टाय अश्या औपचारिक पेहराव असणार, ह्या रूढ समजुतीला संपूर्ण छेद देत डॉक्टर नारळीकर पायजमा सदृश विजार, सुती कापडाचा पातळ शर्ट आणि बहुदा चपला अश्या सामान्य वेशात असल्याने गर्दीतही ते वेगळे चटकन उठून दिसले. औपचारिकता पूर्ण झाल्यावर ते बोलायला उभे राहिले आणि पहिल्याच वाक्यात शिक्षण, शास्त्र आणि व्यवहार यामधील विसंगती वर, त्यांच्या स्थाई स्वभावा नुसार अत्यंत मृदुपणे पण मार्मिक भाष्य केले. "नागपूरच्या महाप्रचंड उन्हाळ्यात आपण सर्व भौतिक शास्त्राचे विद्यार्थी, प्राध्यापक वातावरणाला अजिबात पूरक नसलेल्या पेहरावात कसे काय वावरू शकता?" असं आश्चर्य त्यांनी व्यक्त केलं. मला आठवतं, व्यासपीठावर बसलेल्या आणि सभागृहातील समस्त मान्यवरांच्या चेहेऱ्यावर काहीसा खजिलपणाचा भाव पसरला होता. माझ्या मनात मात्र प्रथमच पहात असलेल्या डॉक्टर नारळीकर यांच्या बाबतचा आदर अधिकच दुणावला.
पुढे नोकरी निमित्त आकाशवाणी भोपाळ, मुंबई असा प्रवास करत 1992 साली मी पुणे आकाशवाणीत रुजू झालो. गावात पार असतो तसा आकाशवाणीतला 'ड्युटी रूम' हा विभाग. बहुतांश काळ या विभागातच कार्यरत असलो तरी मधेच काही दिवस मराठी भाषण विभागात माझी बदली झाली आणि माझ्याकडे अनेक नव्या संधी चालून आल्या.
नागपुरात ज्या डॉक्टर नारळीकरांना, फक्त प्रत्यक्ष पाहण्यासाठी मी बऱ्याच खटपटी केल्या होत्या, त्यांच्याशी निकट भेटीची, संवादाची पर्वणी पंधरा सोळा वर्षांनंतर माझ्याकडे, विनासायास आणि कोणतंही विशेष कर्तृत्व न गाजवता, चालून आली. माझ्या आठवणी प्रमाणे त्यावेळी थोरांशी गप्पा अश्या काहीश्या नावाचा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होत असे. विभिन्न क्षेत्रातील मान्यवरांना विविध विषयांवर बोलते करून त्यांचा जीवनपट या कार्यक्रमातून उलगडला जात असे. यातील एक भाग डॉक्टर नारळीकर यांच्यावर नियोजित होता. माझे वरिष्ठ अरविंद गोविलकर यांनी सर्व नियोजन केले होते. नारळीकर ध्वनीमुद्रणासाठी आकाशवाणी केंद्रात येणार होते. त्यांच्या बरोबर चहापान आणि अनौपचारिक गप्पांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. निर्मिती सहायक म्हणून ध्वनिमुद्रणाची जबाबदारी माझी होती. सुमारे तासभर तरी ध्वनिमुद्रण सुरू होते. हिंदी माध्यमातून पालिकेच्या शाळेत झालेले शिक्षण, भाजी बाजारातला हिशेब, आयुका (Inter-University Centre for Astronomy and Astrophysics,IUCAA) च्या उभारणीतले योगदान अश्या कितीतरी गोष्टीं विषयी मी त्यांच्या कडून थेट ऐकत होतो. या संपूर्ण कालावधीत मनावर पुन्हा ठसला तो त्यांचा निरलस साधेपणा. एका आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शास्त्रज्ञा बरोबर वावरताना, बोलताना क्वचित काही सुचवताना, मनावर कसलेच दडपण न येता सहजता येऊन काम उत्तम होण्याचे सर्व श्रेय डॉक्टर नारळीकर यांनाच होते. अजून एक बाब मनात रुजली ती म्हणजे नारळीकरांची सहज सुंदर ओघवती मराठी भाषा. या संपूर्ण ध्वनिमुद्रणाच्या काळात त्यांनी चुकूनही, विना अट्टाहास, एकही इंग्रजी शब्द उच्चारला नाही. अगदी विज्ञानाच्या पारिभाषिक शब्दांचा अपवादही न करता.
डॉ. नारळीकरांना विज्ञान शाखेचा वारसा गणितज्ञ वडील विष्णू वासुदेव यांच्या कडून तर कला शाखेचा वारसा संस्कृत विदुषी आई सुमती विष्णू यांच्या कडून प्राप्त झाला. नभांगणा बरोबरच साहित्याच्या प्रांगणात ही त्यांच्या सहज संचारचे हेच मर्म असावे.
'कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी' साठी डॉ. नारळीकर विश्वभर ओळखले जातात. खगोलशास्त्र सामान्य जनांपर्यंत पोहोचविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. 'यक्षांची देणगी' या त्यांच्या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. वयाच्या अवघ्या सव्विसाव्या वर्षी ते पद्मभूषण(PADMA BHUSHAN) पुरस्काराचे मानकरी ठरले. 2004 साली त्यांना पद्मविभूषणने(PADMA VIBHUSHAN) सन्मानीत करण्यात आले. 2010 मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण(MAHARASHTRA BHUSHAN) पुरस्काराने गौरवण्यात आलं.1996 मध्ये युनेस्कोचा(UNESCO) मानाचा कलिंग पुरस्कार(KALING AWARD) त्यांना प्राप्त झाला. 2014 मध्ये जयंत नारळीकर यांच्या ‘चार महानगरातले माझे विश्व’ या आत्मचरित्राला साहित्य अकादमी(SAHITYA ACADAMY) पुरस्कार मिळाला. नाशिक इथे नियोजित परंतु कोरोना आपत्तीमुळे लांबणीवर पडलेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली.
जयंत नारळीकर हे अतिशय मृदुभाषी आणि सामान्यतः सौम्य प्रकृतीचे. पण एखाद्या चुकीच्या गोष्टीला चूक म्हणायला आणि ती योग्य ठिकाणी अत्यंत परखड पणे मांडतांना ते अजिबात बोटचेपी भूमिका घेत नाहीत. एका मुलाखती दरम्यान नारळीकरांनी सांगितल होत की त्यांचे गुरू फ्रेड हॉईल (Fred Hoyle) आणि स्टीफन हॉकिंग (Stephen Hawking) यांच्यात काही विवाद उत्पन्न झाला होता. बीबीसीनं (BBC) काढलेल्या एका फिल्म मध्ये याबाबत उल्लेख आहे. मात्र त्या फिल्म मध्ये नारळीकरांच्या मते काहीशी चुकीची, संपूर्णतः एकतर्फी मांडणी झाली आहे. ती फिल्म करत असताना बीबीसी(BBC) नी त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी तो उल्लेख कसा असावा हे सांगितल मात्र तरीही ती फिल्म हॉकिंग यांच्या प्रसिद्धी वलया मुळे म्हणा किंवा अन्य काही कारणां मुळे हॉकिंग यांचं मत उचलून धरणारीच, एकतर्फी केली गेली असं नारळीकर सांगतात आणि अजूनही बोध घेऊन त्यात काही बदल करायचे असल्यास आपण अधिक माहिती द्यायला तयार असल्याची पुष्टीही ते या मुलाखतीत जोडतात. विशेष बाब अशी आहे की हे सर्व कथन ते बीबीसीलाच दिलेल्या मुलाखतीत सांगण्याचे धारिष्ट्य दाखवतात आणि बीबीसी ही हे वक्तव्य न वगळता मुलाखत प्रसारित करते.
अन्य एका ठिकाणी ते असही सांगतात की शनी मंगळ या ग्रहां संदर्भातले आपण करून घेतलेले ग्रह हे ग्रीक संस्कृतीतून आपल्याकडे आले आहेत. वेदांमध्ये फलाज्योतीषाचा उल्लेखही नाही. या गोष्टी बऱ्याच नंतरच्या काळात आल्या हा आयातीत अंधविश्वास (Imported Superstition) असल्याचं परखड प्रतिपादन त्यांनी केलेलं आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक कमावल्या नंतर खगोलशास्त्र संशोधन आणि ते लोकाभिमुख करण्यासाठी 1972 साली ते भारतात परतले. सुरवातीला त्यांनी मुंबईत टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागप्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारली. पुढे 1988 साली ते पुण्यातल्या आयुका संस्थेचे संचालक झाले.
भारताला म्हणजेच मातृभूमीला कर्मभूमी बनविण्या संदर्भातली त्यांची भावना ही "जगदनुभव-योगे बनुनी । मी तव अधिक शक्त उद्धरणी । मी….
गुण-सुमनें मी वेचियली या भावें । की तिने सुगंधा घ्यावें जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा" याच धाटणीची असल्याचं त्यांच्या कृतीतून, उक्तीतून जेव्हा जाणवत, तेव्हा तर या अथांग विद्वत्ता प्रचुर शास्त्रज्ञाची उंची, धवल हिमगिरीच्या उत्तुंगते प्रमाणेच भासते आणि आपल्या मनी, पाहिन पूजिन ठेविन माथा अशी भावना उत्पन्न होते.
नितीन सप्रे
8851540881
अप्रतिम लेख 👏👏👏👏👏नारळीकरांचे कौतुक करावे तितके कमी आहे
उत्तर द्याहटवाडॉ. जयंत नारळीकर यांना आमच्या संस्थेने म्हणजेच महाराष्ट्र सेवा संघ ने साहित्यिक पुरस्कार दिला होता. त्यासाठी कार्यक्रम पत्रिका बनविण्याचे काम माझ्याकडे होतं. त्यांच्या विषयी, आयुका तसेच त्यांच्या साहित्याविषयी अभ्यास करावा लागला होता. पण वरील स्फुटात नवी माहिती मिळाली. धन्यवाद!!
उत्तर द्याहटवा👌👌👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवामी 1978 साली मराठी विज्ञान परिषदेने आयोजित केलेले डाॅ.नारळीकरांचे खगोलशास्त्रावरील व्याख्यान मुलुंड काॅलेजऑफ काॅमर्समध्ये पहिल्या बाकावर बसून ऐकले आहे. तेव्हा त्यांच्या साधेपणाने व अस्खलित मराठीतून विज्ञानविषय समजावून सांगण्याच्या शैलीने प्रभावित झाले होते. आपला निरलस साधेपणा शब्द आवडला, अगदी समर्पक आहे! ते भारतीय आहेत व मराठी आहेत याचा मला प्रचंड अभिमान आहे! डाॅ.नारळीकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक खूप शुभेच्छा !!
उत्तर द्याहटवासुरेख उतरलाय लेख!
उत्तर द्याहटवाखूप सुंदर प्रेरणादायी लेख. डाॅ. ना उत्तम आरोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
उत्तर द्याहटवाआदरणीय डॉ. जयंत नारळीकर यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो.
उत्तर द्याहटवामी पुणे केंद्रात कार्यरत असताना वीणा जोशी यांनी त्यांना मुलाखतीसाठी बोलविले होते.तेव्हा त्यांच्याशी दोन शब्द बोलता आले हे माझं सदभाग्य.
नारळीकर सर म्हणजे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. माहीम सार्वजनिक वाचनालयातर्फे घेतल्या गेलेल्या विज्ञान कथा लेखन स्पर्धेत 2021 साली माझ्या कथेला तिसरे पारितोषिक मिळाले आणि बक्षीस समारंभ नारळीकर सर आणि डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते कोविड मुळे आभासी पद्धतीने करण्यात आला त्याची आठवण आज जागृत झाली. सप्रे साहेब लेख सुंदर आहे, धन्यवाद
उत्तर द्याहटवापुन्हा वाचलं. विविध विषयात माननीय असणाऱ्या श्री. जयंत नारळीकर यांच्या बद्दलचा आदर आणखीनच वाढला. आज त्यांनी वैकुंठगमन केलं, त्यांना विनम्र श्रद्धांजली !
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर आठवण; आम्हा सर्वांसाठी परत शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
उत्तर द्याहटवा