प्रासंगिक - चाँदनी की ओट से मुस्कुरा गया कोई....

 चाँदनी की ओट से मुस्कुरा गया कोई....


मुकेश चंद माथूर हे हिंदी चित्रपट सृष्टीला विसाव्या शतकाच्या चाळीशीत पडलेले एक सुरेल स्वप्नं होतं. स्वप्नं म्हटलं की त्याचा निद्रावस्थेशी संबंध आला. बंद डोळ्यांनी बघितलेला आविष्कार... पण मुकेश नावाचं हे स्वप्नं चोखंदळ रसिक उघड्या डोळ्यांनी आणि तृप्त कानांनी अक्षरशः जगले आहेत..जगत आहेत आणि जगत राहतील.

चंदेरी दुनियेत प्रवेश करते वेळी मुकेश यांची गायक अभिनेता म्हणून स्थिरावण्याची महत्वाकांक्षा होती पण त्यांचा पहिलाच चित्रपट 'निर्दोष' रसिकांचं  हृदय काबीज करण्यात असफल ठरला. आणखी काही प्रयत्नां नंतर मुकेश यांनी अभिनयाला अलविदा म्हणत पार्श्वगायना वरच लक्ष केंद्रित केलं. मुकेश यांच्यावर त्याकाळचे सुप्रसिद्ध गायक कुंदनलाल सैगल यांचा असीम प्रभाव होता. सैगल यांना ते आपला आदर्श मानीत. पार्श्वगायक म्हणून मुकेश यांनी पहली नजर (१९४५) या चित्रपटासाठी गायलेलं 'दिल जलता है तो जलने दे' हे पाहिलं गाणं तर, सैगल यांनीच गायलं आहे असा समज झाला होता. या गीता मुळे पहली नजर में ही मुकेश यांनी रसिकांच्या हृदयात घर केलं ते कायमच; अगदी 'चंचल शीतल निर्मल कोमल संगीत की देवी सुर सजनी' या त्यांच्या शेवटच्या गाण्यापर्यंत. चित्रपट संगीताच्या वारकऱ्यांनी त्यांना सत्यं शिवम सुंदरम असच मानलं. मात्र योगायोग असा की त्यांच्या पहिल्या आणि शेवटच्या अश्या दोन्ही गीतांनी, विशेष प्रयत्नांती प्रदर्शित चित्रपटात स्थान राखलं अशी वदंता आहे.

मुकेश यांच्या आवाजात थेट काळजाला हात घालू शकणारं एक अद्भुत रसायन होत. फार पूर्वी आगगाडी ओढणाऱ्या वाफेच्या इंजिनाच्या शिट्टीत, थंडीच्या दिवसात, जी 'सिसकी' अनुभवता यायची ना; त्याची अनुभूती त्यांच्या आवाजातून, स्वरातून होते. मृदगंधाचा दरवळ असलेला किंचित आर्द्र सूर मुकेश यांच्या गळ्यात परमेश्वराने पेरला होता बहुदा. त्या सूरात सच्चेपणा, निरलसता जाणवते, म्हणूनच रसिकांनी त्याला स्वर्गीय अशी उपमा देऊ केली. संगीतकार अनिल विश्वास यांनी मुकेशच्या आवाजाचं गोल्डन व्हॉईस असं नामकरण केलं होतं.तर खैय्याम यांना त्याच्या आवाजात जादुई आकर्षण जाणवत असे. मात्र काहींच्या लेखी हा आवाज रडका, सर्दी झालेला वगैरे आहे. असो, ज्याची त्याची आकलन शक्ती. गायक म्हणून त्यांच्या गळ्याच्या काही मर्यादा जरूर होत्या ही गोष्ट मान्य करावी लागेल पण लयकारी आणि भावुक प्रस्तुतीच्या अतिरिक्त मिश्रणानी मुकेशजींनी त्या खुपेनाश्या करून टाकल्या.



मुकेश यांनी बहुविध प्रकारची गाणी गायली असली तरी अंतर मनातील वेदनेचा आविष्कार घडवणारी गाणी मुकेश यांना अधिक प्रिय होती.  काळजाचं पाणी करणारी एक विराणी गाण्यासाठी जर अन्य दहा गाण्यांवर पाणी सोडावं लागणार असेल तरीही त्यासाठी ते अनुकूल असायचे. 

अभिनयाचा अनुभव फारसा उत्साहवर्धक न ठरल्याने मुकेश यांनी ठरवलं की दुय्यम दर्जाचा अभिनेता होण्यापेक्षा अव्वल दर्जाचा गायक व्हावं आणि पुढे पार्श्वगायनावर सर्व लक्ष केंद्रित केलं. सुरवातीला असलेला सैगल यांच्या सावलीतला वावर कमी करत स्वतःची शैली घडवली आणि लोकप्रियता मिळवली. या कामी दिलीपकुमार यांचा चेहेरा, मजरूह सुलतानपूरी यांचे शब्द आणि नौशाद यांचं संगीत असा त्रिवेणी संगम असलेल्या अंदाज (१९४९) या चित्रपटाने मोलाची भूमिका बजावली. यातली ' तू कहे अगर जीवनभर ', ' झूम झूम के नाचो आज ' ही गाणी  तर बरीच गाजलीही मात्र यानंतर माझ्या माहिती प्रमाणे मजरूह, मुकेश आणि नौशाद अस त्रिकुट पुन्हा जमल ते 'साथी'(१९६८) मध्ये आणि रसिकांना 'मेरा प्यार भी तू है' सारख्या अवीट गीताचा नजराणा देऊन गेलं.

मुकेश यांनी मोती लाल, दिलीपकुमार, राजेंद्र कुमार,भारतभूषण, मनोज कुमार, फिरोज खान, धर्मेंद्र, शशी कपूर, जितेंद्र, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन अश्या बहुतेक सर्व आघाडीच्या अभिनेत्याना आपला आवाज दिला.  जेव्हा त्यांनी शंकर - जयकिसान यांच्या निर्देशनात शैलेंद्र आणि हसरत जयपुरी यांची गीतं राजकपूर यांच्या साठी आपल्या सूरांनी मढवली तेव्हा पासून खरं पाहता मुकेश युग अवतरले. यांच्या 1949 साली आलेल्या बरसात या चित्रपटा पासून मुकेश यांच्या विरह व्याकूळ मधुर स्वरांची बरसात रसिकांना चिंब भिजवू लागली.


मेरे टूटे हुए दिल से, छलिया (१९६०), दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा, संगम (१९६४), दुनिया बनाने वाले, तीसरी कसम (१९६६), किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, अनाड़ी (१९५९), आवारा हूं, आवारा (१९५१), जाने कहां गए वो दिन, मेरा नाम जोकर (१९७०), मै आशिक हूं बहारों का, आशिक (१९६२) अश्या कितीतरी मुकेश पर्वातल्या गीतांची जंत्री देता येईल मात्र चंदनसा बदन, मेरा प्यार भी तू है, आँसू भरी हैं, मुझे तुम से कुछ भी ना चाहिये,  चल अकेला चल अकेला, कोई जब तुम्हारा हृदय तोड दे, कहीं दूर जब दीन ढल जायें, जाने कहां गये वो दिन ही गाणी खऱ्या मुकेश भक्क्तांसाठी जिवलग असणारच. 

शब्द, अर्थ, आशय, लय, ताल, चाल अशी बहुविध अंगांची लावण्यपूर्ण गीतं मुकेश यांनी गायली असली तरी या सर्व रत्न संचयातून एकच माणिक निवडण्याची जीवघेणी थट्टा जर का कुणी मांडली, तर मला असं वाटतं, 'झुमती चली हवा, याद आ गया कोई' हीच लकेर माझ्या ओठावर रुळेल. काव्य, शास्त्र, संगीत यांची कदाचित केवळ तोंडदेखली ओळख असलेल्या वयापासूनच हे गीत माझ्या मनात रुंजी घालत आलं आहे. अगदी प्राथमिक शाळेत असल्या पासून, दूरवरून जरी 'झूमती चली हवा' कानात शिरली तरी, लगेच घरातल्या रेडिओवर ती संचारावी यासाठी कोण आटापिटा मी केलेला आहे. शैलेंद्र यांचे शब्द, उत्कटतेशी नातं सांगणारा; उत्तररात्री आणि पहाटफुटी पूर्वी गायला जाणाऱ्या राग सोहोनीची, एस. एन.त्रिपाठी यांनी केलेली निवड, दादऱ्याचा  सहा मात्रांचा ठेका आणि मुकेश यांचा आर्त स्वर असा त्रिगुणात्मक समसमा संयोग, 'संगीत सम्राट तानसेन' चित्रपटातल्या या गीतात अनुभवायला मिळतो.


झूमती चली हवा, याद आ गया कोई 

बुझती बुझती आग को, फिर जला गया कोई 

झूमती चली हवा’ ...

रात्रीची वेळ, मदमस्त हवा मुक्त वाहते आहे

आणि ती हवा हृदयी बाळगलेल्या कुणाच्या आठवणींची आग नाईलाजाने विस्मृतीच्या भिंतीआड ढकलून मंदावत होती ती पुन्हा चेतावते आहे.


खो गई हैं मंज़िलें, मिट गये हैं रास्ते 

गर्दिशें ही गर्दिशें, अब हैं मेरे वास्ते 

अब हैं मेरे वास्ते 

और ऐसे में मुझे, फिर बुला गया कोई 

झूमती चली हवा’ ...

आता तर तिच्यापर्यंत पोहोचण्याचे सर्व रस्तेच बंद झाले आहेत. आता चक्रव्यूहात फिरत राहणं नशिबी आहे अशी स्वतःची समजूत घालत असतानाच ही हवा पुन्हा साद घालते आहे.


चुप हैं चाँद चाँदनी, चुप ये आसमान है 

मीठी मीठी नींद में, सो रहा जहान है 

सो रहा जहान है 

आज आधी रात को, क्यों जगा गया कोई 

झूमती चली हवा’...

चंद्र, चांदणं आकाश हे सार काही निःशब्द आहे. सारं जग छान साखर झोपेत आहे अशावेळी मध्यरात्री अचानक कुणाच्या आठवणीं अवचितपणे जागवल्या आहेत.


एक हूक सी उठी, मैं सिहर के रह गया

दिल को अपने थाम के आह भर के रह गया

चाँदनी की ओट से मुस्कुरा गया कोई

झूमती चली हवा’…

एकाएक जागृत झालेल्या आठवणींमुळे मी स्तब्ध झालो आहे. हृदय घट्ट करून उसासे टाकतो आहे आणि त्याचवेळी चंदेरी प्रकाशाच्या पडद्या आडून कुणीतरी हसून पाहत आहे.


जग आशेवर चालतं असं म्हटलं जातं. अंधकारमय निराशेच्या गर्तेतही आशेचा कोंब खानदानी तरलतेंनी फुलवण्याचं कसब गीतकार शैलेंद्रला किती उत्तम साधलं आहे.

कला प्रांत हा अमर्याद संभावनांचा असतो हे मान्य. मात्र तरीही अशा कातर, तरल शब्दां मधली वेदना भावना मुकेशच्या गळ्यातून बाहेर येते तेव्हा ती अगदी खरीखुरी, निष्कपट प्रामाणिक जाणवते.आपली होऊन जाते. आणि म्हणूनच मुकेश वगळता अन्य कुणी गायक या गीताला न्याय देऊ शकला नसता अशी भावना मनात चमकून जातेच. 

मुकेश - झुमती चली हवा


नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com

8851540881










टिप्पण्या

  1. आहा... हा लेख म्हणजे मुकेश प्रेमींसाठी पर्वणीच... सुरेख शब्दांकन..

    उत्तर द्याहटवा
  2. स्व. मुकेश यांनी श्रवण सुख दिले. आपल्या आठवणींनी वाचन सुख दिले. खूप छान.

    उत्तर द्याहटवा
  3. स्व. मुकेश यांनी श्रवण सुख दिले. आपल्या आठवणींनी वाचन सुख दिले. खूप छान.

    उत्तर द्याहटवा
  4. व्वा अप्रतिम सर मुकेशजींचा जिवन प्रवास वर्णन अवर्णनिय शब्द बध्द केलेत सर

    लगे रहो सर 🌹 👍🏻

    उत्तर द्याहटवा
  5. बहुत ही बढ़िया आर्टिकल, सर

    मुकेश ने गुजराती फिल्म्स में भी बहुत ही अच्छे गाने गाए हैं।

    उत्तर द्याहटवा
  6. Like the forlorn, ruminating and sober and sombre timbre of the voice of the singer Mukesh, Nitin Sapre has most successfully conveyed all that Mukesh's singing reflected and with intense choice of the construction of sentences that tugs at the heartstrings of Hindi film songs discerning listners.तू कहे अगर, तू कहे अगर जीवनभर, मैं गीत सुनाता जाआऊं ....

    उत्तर द्याहटवा
  7. मुकेश हे आवडते गायक. खुप छान आठवणी जागवल्या. धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  8. नितीनजी,
    तुमची लेखणी विविध विषयांवर सहजपणे फिरत असते स्वर्गीय मुकेश हे माझे आवडते गायक आहेत. मुकेश यांनी दर्दभरी गाणी खूप मनापासून गायली आहेत.
    या लेखा बद्दल तुमचे आभार.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक