प्रासंगिक - ' राजा ' माणूस


' राजा ' माणूस







‘तेरे बिन सावन कैसा बीता’ आणि ‘मैं देखू जिस ओर सखी रे’ ही ‘जब याद किसी की आती है’ आणि ‘अनिता’ चित्रपटातील गाजलेली गीतं रसिकांच्या आजही स्मरणात आहेत. गीतकाराला मात्र ही रसिक मान्यता अनुभवता आली नाही, कारण हे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच राजा मेहदी अली  खान, 29 जुलै, 1966 रोजी हे जग सोडून गेले होते. हे दोन्ही चित्रपट त्यांच्या मृत्युनंतर 1967 मध्ये प्रदर्शित झाले. एका पेक्षा एक सरस, रोमँटिक, अर्थवाही, काही गुह्य आणि लोकप्रिय गीतांद्वारे त्यांनी बॉलीवूड मध्ये अजोड कामगिरी करून ठेवली.


झेलम(पाकिस्तान) इथे जन्मलेला हा मुलगा शायरीच्या वेडापायी जमीन जुमल्यावर पाणी सोडून देतो आणि लेखक म्हणून आकाशवाणी दिल्लीत आपली कारकीर्द सुरू करतो. ईथे त्यांचा परिचय उर्दुचे प्रसिद्ध लेखक सादत हसन मंटो यांच्याशी होतो ते मेहदी यांना मुंबईला आणतात. अशोक कुमार यांच्या मदतीनं 1946 च्या सुमारास त्यांना एक चित्रपट सुरवातीला  मिळाला ज्यात त्यांनी अभिनयही केला. पुढे 1947 साली फाळणी च्या वेळी त्यांनी आणि त्यांच्या पत्नी ताहिरा यांनी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला. धनदौलत सोडून आलेल्या आणि शब्द दौलतीच्या प्रेमात असलेल्या या राजाला, फिल्मिस्तान चे एस. मुखर्जी यांनी 'दो भाई' या चित्रपटात ब्रेक दिला. पदार्पणातच सचिनदा यांनी संगीत दिलेली ‘मेरा सुंदर सपना बीत गया’ आणि ‘याद करोगे एक दिन हमको याद करोगे’ या दोन गाण्यांमुळे राजा मेहदी अली खान नावाचं सुंदर स्वप्न कायमस्वरुपी साकारलं गेलं. तेव्हा पासून, ते 'एक दिन' नव्हे तर दररोज 'याद' केले जाऊ लागले. ‘मदहोश’ चित्रपटातील मदन मोहन यांचं संगीत आणि तलत मेहमूदचा स्वर लाभलेल्या ‘मेरी याद में तुम न आँसू बहाना’ या गीताचं गारूड तर रसिक मनावर आजही कायम आहे. मदन मोहन आणि मेहदी यांचे सूर विशेष जुळले आणि चित्रपटगीत रसिकांना अवीट, कालातीत गीतांची पर्वणी लाभली. मात्र मदन मोहन प्रमाणेच राजा मेहदी यांची यथायोग्य दखल घेण्यात कुठेतरी कमतरता राहून गेली. अर्थात त्यामुळे हा राजा माणूस हतोत्साही झाला नाही आणि नियतीनं नेमून दिलेल्या अवघ्या 38 वर्षांत, लग जा गले के फिर वही, अगर मुझ से मुहब्बत हैं, आप की नजरोने समझा प्यार के काबिल मुझे, नयना बरसे रिमझिम, नैनो मे बदरा छाए, जो हमने दास्तान अपनी सुनाई आप क्यों रोये, तेरे बीन सावन कैसे बिता, तू जहाँ जहाँ चलेगा मेरा साया साथ होगा, आप युंही अगर हमसे मिलते रहे, आखरी गीत मोहब्बत का, आप के पहलू में आकर रो दिये, तुम बिन जीवन कैसे बिता पुछो मेरे दिल से, झुमका गिरा रे बरेली के बाजार में,... या सारख्या उत्तमोत्तम गीतांचा खजिना रसिकांसाठी खुला करून गेला.


सचिन देव बर्मन, एस. मोहिंदर, इकबाल कुरेशी यासारख्या संगीतकारां बरोबर  त्यांनी काम केलं. सी. रामचंद्र, ओ.पी.नय्यर या संगीतकारां साठीही गीत रचना केली. चार दशकांहून ही कमी जीवनरेखा लाभलेल्या या असामान्य गीतकाराने गेल्या सात दशकांहून अधिक काळ आणि येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी प्रगल्भ गीताविष्कार सृजीत करून ठेवला आहे. 


राजा मेहदी अली खान यांच्या गीतमालेतील अनेक उत्तमोत्तम रचानांपैकी अत्युच्च समर्पण भावनेने ओतप्रोत असलेल्या एका अप्रतिम प्रेम गीताशी माझं मैत्र जुळल ते आकाशवाणी भोपाळ मध्ये... आकाशवाणीच्या  ड्युटी रूम मधेच. 1987-88 साली एक दिवशी ड्युटी रूम मध्ये ड्युटी ऑफिसर बरोबर बसलो असताना  विविध भारतीवर 'छायागीत' मध्ये  लागलेल्या 'आपकी परछाइयां' चित्रपटातल्या एका गाण्याचा मुखडा आकर्षित करून गेला.


"अगर मुझ से मुहब्बत है मुझे सब अपने ग़म दे दो

इन आँखों का हर इक आँसू मुझे मेरी क़सम दे दो

अगर मुझ से मुहब्बत है"……………..


राजा मेहदी आली खान यांचे अतिशय बाळबोध शब्द, मदन मोहनजींची संगीत रचना,  राग दरबारीचे सुर आणि लतादीदींच्या गळ्यातून लीलया निघणारे 'गम' 'आँसू' व 'सनम' या शब्दांचे वळणदार आर्जवी उच्चार. मन मुग्ध तर झालेच आणि विचार आला की वास्तवात अशी जगावेगळी मागणी कुणी एखादी 'ती' त्याच्याकडे  करू शकेल? 


विचारात गुंग असतानाच मुखड्यात तिने व्यक्त केलेल्या मागणी कडे संशयाने बघितल्याबद्दल आता काहीशी अपराधीपणाची भावना जाणवू लागली कारण  निर्व्याज प्रेमाला नव्या उंचीवर नेत ती म्हणते….


" तुम्हारे ग़म को अपना ग़म बना लूँ तो क़रार आए

तुम्हारा दर्द सीने में छुपा लूँ तो क़रार आए

वो हर शय जो तुम्हें दुख दे मुझे मेरे सनम दे दो

अगर मुझ से मुहब्बत है………...


आता तर तिचा निर्धार अधिकच सुस्पष्ट होतो आणि दुःखात सहभागी करून घेण्याचा आगळावेगळा लकडाच  ती त्याच्या मागे लावते.


"शरीक-ए-ज़िंदगी को क्यूँ शरीक-ए-ग़म नहीं करते

दुखों को बाँट कर क्यूँ इन दुखों को कम नहीं करते

तड़प इस दिल की थोड़ी सी मुझे मेरे सनम दे दो

अगर मुझ से मुहब्बत है".....……….


अर्थकारणातली पार्टनर इन प्रॉफिट (Partner in Profit) ही संकल्पना आपल्याला माहीत असते पण इथे प्रेमाच्या ‘आर्तकारणात’ पार्टनर इन लॉस (Partner in loss) या नव्या संकल्पनेचा उदय बघायला मिळतो. एव्हाना तिच्या मागणी बाबत साशंकतेचे धुके संपूर्णतः विरलेले असते. ती आता अधिकारीक वाणीने त्याला बजावते


"इन आँखो में न अब मुझको कोई आँसू नजर आए, सदा हसती रहें आंखे सदा ये होठ मुसकाये, मुझे तेरी सभी आहें सभी दर्द-ओ-अलम दे दो अगर मुझ से मुहब्बत है"............................

क्लिक करा-अगर मुझसे मुहब्बत हैं


म्हणतात न की, 'जो न देखे रवी वो देखे कवी ' प्रेयसीचा समर्पणभावाची किती उत्कट कल्पना मेहदी यांच्या शब्दातून उतरली आहे. राजा मेहदी अली खान यांच्या कल्पनेतली ही नायिका कल्पनेत ही मनाला इतकी भुरळ पाडते, सुखावह वाटते, मग जर प्रत्यक्षात अवतरली तर काय बहार येईल? तेव्हा ही प्रेमला कल्पनेतच न रमता  प्रत्यक्षात अनुभूतीस येवो आणि सुयोग्य अशा नायकाशी तिची भेट होवो हीच सदिच्छा. 


(*सुधारित पुनःप्रकाशन 29 जुलै, 2022)

  

नितीन सप्रे


nitinnsapre@gmail.com


8851540881









टिप्पण्या

  1. मा. सप्रे सर, खूपच छान... भरपूर माहिती पूर्ण लिहिला आहे... त्यामुळे खान साहेबांविषयी माहिती मिळाली. 💐👍👍👌👌
    श्री. सप्रे सर, ठाण्यातील व्यास क्रिएशन्स ही नामवंत संस्था दरवर्षी दर्जेदार दिवाळी अंक प्रसिद्ध करतात. यावर्षी मी भारतीय रेल्वेबद्दल लेख पाठवला आहे.
    राजा मेहदी अली खान यांच्यावर आपण लिहिलेला लेख या अंकात प्रसिध्द केला तर , असंख्य वाचकांना तो नक्कीच आवडेल, असे मला वाटते . आपले काय मत आहे ???

    उत्तर द्याहटवा
  2. आणखी एक तरल लेख... त्या काळातल्या अर्थपूर्ण गाण्यांचा गोडवा आणि सौंदर्य अधोरेखित करणारं रसग्रहण.. आवडलंच...

    उत्तर द्याहटवा
  3. आपण राजा मेहंदी अली खान यांच्यावरचा लेख अतिशय अप्रतिम लिहिला आहे. त्यांची गीतकार म्हणून कारकीर्द आपण सहजपणे श्रोत्यांसमोर मांडली आहे

    उत्तर द्याहटवा
  4. 56 वर्षानंतर सुद्धा उत्कटतेने रसिकांना त्यांची आठवण येते यातच त्यांचा मोठेपणा दिसून येतो. आपण हे आमच्या समोर आणल्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन

    उत्तर द्याहटवा
  5. आपल्या लेखामुळे सुंदर जुन्या गाण्यांचा नजराणा सापडला. सुंदर साहित्य.

    उत्तर द्याहटवा
  6. अप्रतिम लेख व एका गीतकाराची माहिती. यांनी लिहिलेले प्रत्येक गाणं संस्मरणीय आहे.

    उत्तर द्याहटवा
  7. व्वा, फारच सुंदर लेख. वाचून आनंद झाला 😊🙏

    उत्तर द्याहटवा
  8. उत्तम माहिती पूर्ण लेख. धन्यवाद. 🙏

    उत्तर द्याहटवा
  9. खूप छान. अनेक गाण्यांची मेजवानी यां निमिते मिळाली.... धन्यवाद

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक