प्रासंगिक - ईशअंशी गीतयोगी
ईशअंशी गीतयोगी
स्वनामधन्यता ज्या काही विरळ व्यक्तिमत्त्वांच्या भाग्याला येते त्यात गजानन दिगंबर कुलकर्णी हे नाव प्रकर्षाने अग्रस्थानी आढळते. सांगली जिल्ह्यातल्या शेटेफळ हे जन्म गाव पण बालपण गेलं ते औंध संस्थानातल्या पाच सहाशे लोकवस्तीच्या माडगूळ या गावी. हा कलंदर कलाकार. आपल्या नावात, गावाच नावही गुंफतो आणि ते अजरामर करतो. आपली ओळख सांगताना माडगूळकर लिहून जातात…..
'ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे
माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे...'
अन्य कुणाच्या तोंडी खचितच दर्पोक्ती पूर्ण वाटेल अशी संकल्पना महाराष्ट्राच्या या आधुनिक वाल्मिकीच्या तोंडी मात्र सहज शोभून दिसली. यथार्थ वाटली. त्यांच्या प्रतिभेचा फुलोराच एव्हढा अचाट करणारा होता की जणूकाही पुष्पवाटिकेत, रंगगंध युक्त सर्व प्रकारची फुलं, एकाच झाडाच्या निरनिराळ्या शाखांना उमलावित. अंकांच गणित न जमलेल्या गदिमांना शब्दांच्या गणितानं असा काही हात दिला की ते रसिकांच्या हृदयात कायम स्वरुपी अंकित झाले.
माडगूळकर चतुरस्र प्रतिभेचे धनी होते. लेखक, कवी, गीतकार, अभिनेते, नेते(विधान परिषदेचे नामनियुक्त सदस्य) अशा विविधांगी भूमिकेत त्यांनी आपला ठसा उमटवला होता. काव्य/गीत लेखनाचाच नुसता विचार केला तरी त्यांचा सर्वस्पर्शी आवाका आपले डोळे दिपवून टाकतो.
माडगूळकरांच्या गीतांवर संत, पंत, तंत, शाहिरी, शृंगार असे सर्वच संस्कार झालेले प्रत्ययास येतात. गीत रचनेच्या विश्वात त्यांच्या प्रतिभेचा बहुआयामी आविष्कार आवाक करणारा आहे. त्यांच्या गीत रचना या जणूकाही नवरसांच्या अभिषेकाने न्हाऊन, भाषालंकारांनी सुशोभित होत असत. निरनिराळ्या रसांची अनुभूती देणाऱ्या अनेक अव्वल रचना त्यांच्या लेखणीतून सहज झरल्या आहेत. नाच रे मोरा सारखे बालगीत शिशु वर्गापुरत मर्यादित न रहाता सर्वांच होऊन जातं. अभंग म्हणून फक्त संत रचानांना मान्यता असली तरी 'इंद्रायणी काठी' सारखी रचना अभंगाशी साधर्म्य सांगणारी आहे. पित्याच्या हळव्या भावनांचं सशक्त प्रकटीकरण करणारं, 'सासुऱ्यासी चालली लाडकी शकुंतला', मानवी जीवनातील विरोधाभास चित्रित करणारे 'उद्धावा अजब तुझे सरकार', नर्म शृंगाराचा धुमार जागवणाऱ्या, 'आज कुणीतरी यावे', 'प्रथम तुज पाहता जीव वेडावला', 'धुंद मधूमती रात रे नाथ रे' सारख्या अभिजात खानदानी रचना, मानवी जीवनाचे वास्तव सांगणारी, 'कुणी कुणाचे नाही राजा', 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' अश्या अजोड गीतांनी त्यांनी रसिक हृदयं काबीज केली. आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित झालेल्या गदिमांच्या गीत रामायणाचे वर्णन तर, अद्भुत शब्दार्थाचे परिमाण, असे करावे लागेल. विस्तारभया कडे थोडी डोळेझाक करून गदिमांच्या आणखी काही गीतांचा उल्लेख या ठिकाणी करणे आवश्यक आहे.
'आई आणि बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला', 'आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही' यासारखी निर्व्याज गीते, 'आनंद सांगू किती', 'कानडा राजा पंढरीचा', 'जळते मी हा जळे दिवा', 'एकवार पंखावरूनी फिरो तुझा हात', 'एक धागा सुखाचा', 'कुणी कुणाचे नाही राजा', 'एका तळ्यात होती बदके सुरेख', 'का रे दुरावा का रे अबोला', 'प्रथम तुज पाहता', 'घन घन माला नभी दाटल्या', 'करू देत शृंगार', 'घननीळा लडीवाळा झुलवू नको हिंदोळा', 'वाकडा नथीचा आकडा', 'बुगडी माझी सांडली ग', 'खेड्या मधले घर कौलारू,' 'गोमू माहेरला जाते हो नाखवा', 'जो जो जो बाळा', 'जिंकू किंवा मरू,' 'वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम', 'झांझिबार झांझिबार', 'ते माझे घर,' 'दिलवरा दिल माझे ओळखा', 'धुंद येथ मी स्वैर झोकितो मद्याचे प्याले' अश्या वैविध्यपूर्ण गीत रचना त्यांनी लीलया हाताळल्या. रामगुलाम नमाभिधानाने शिर्डीच्या साईबाबांची काकड आरती ही त्यांनी रचली. असा बालगंधर्व आता न होणे, बिनभिंतीची उघडी शाळा, काय वाढले पानावरती, अशी ही साताऱ्याची तऱ्हा या सारख्या कविता गदिमांच्या प्रतिभेचा परीघ लक्षात आणून देतात.
तीन दशकांहून अधिक काळ मराठी चित्रपट सृष्टीचे अनभिषिक्त सम्राट म्हणून वावरलेले माडगूळकर परिस्थितीच्या रेट्यामुळे पोटार्थी म्हणून या क्षेत्रात आले होते ही बाब पचवणे कुणालाही जडच जाईल मात्र हेच, सत्य हे त्रिवार आहे. केवळ मराठी चित्रपटसृष्टीत नाही तर हिंदी चित्र विश्वात देखील गदिमांच्या लेखणीचा प्रभाव पाहायला मिळाला. ‘दो आँखे बारा हाथ’, ‘नवरंग’, ‘गुंज उठी शहनाई’, ‘तुफान और दिया’, ‘आदमी सडक का’ या चित्रपटांसह सुमारे २५ हिंदी चित्रपट त्यांच्या कथांवर बेतलेले आहेत. ‘प्यासा’, ‘अवतार’ तसच ‘ब्लॅक’ हे गाजलेले चित्रपटही गदिमांच्या मूळ कथांवर आधारित आहेत. नाही म्हणायला नाट्य लेखनाच्या क्षेत्रात विशेष असं यश त्यांच्या वाट्याला आलं नाही.
साहित्य, चित्र सृष्टीच्या मैदानातील त्यांची खेळी, ही एकट्याच्या भरवशावर, संघाला विजयश्री मिळवून देऊ शकणाऱ्या एखाद्या अष्टपैलू खेळाडू सारखी होती. गदिमा हे नि:संदेह भाषाप्रभू होते. 'सा मां पातु सरस्वती' ह्या आपणा सर्वांच्या प्रार्थनेचं फळ मां भगवतीनं बहुदा त्यांच्या एकट्याचाच झोळीत घातलं जणूकाही. असं ऐकलं आहे की गदिमा लिहित असतांना त्यांचा डावा हात हलत असे. कदाचित त्यांच्या गीत कल्पनेत सामावून जाण्यासाठी आसुसलेल्या शब्दांपैकी नेमक्या शब्दांची निवड व्हावी यासाठी हे प्रयोजन असावं. गदिमांच्या गीतांचे निव्वळ मुखडेच नाही तर अंतरेही विलक्षण अर्थवाही आणि कलासक्त आहेत. त्यांच्या कलाकृतीं मधील वानगीदाखल या काही उदाहरणांवरून त्याची सहज प्रचिती येईल.
प्रेयसी - प्रियकराचे भावविश्व निरनिराळ्या गीतांमधून व्यक्त करतांना माडगूळकरांची प्रतिभा विशेष बहरलेली आहे.
'सोडोनिया घर नाती गोती
निघून जावे तया संगती, कुठे ते ही ना ठावे'
इथे नवथर नायिका, सर्व बंधने झुगारून, नायकाच्या भेटीच्या कल्पनेने इतकी हरखून गेली की घर - दार, नाती - गोती ह्या सर्वांचा त्याग करून त्याच्या संगे निघून जावे पण कुठे हेही तिला ठाव नाही.
'जललहरी या धीट धावती, हरित तटाचे ओठ चुंबिती
येई प्रियकरा, येई मंदिरा, अली रमले कमलांत रे,
नाथ रे
ये रे ये का मग दूर उभा, ही घटिकाही निसटुनी जायची
फुलतील लाखो तारा, परि ही रात कधी कधी ना यायची
चषक सुधेचा ओठी लावुनि, कटी भवती धरी हात रे, नाथ रे'
इथे तर मराठी भाषेने गदिमांना प्रियकर म्हणून स्वीकारल्याचे भासते. मद्य आणि मदालसेच्या उपस्थितीतही ' र ' आणि ' ल ' चा रंगतदार आणि लज्जतदार अनुप्रास माडगूळकरांनी लीलया साधला आहे. तसेच शृंगारिक अभिव्यक्तीत अभिजातता राखली आहे.
'तूच घडविसी, तूच फोडिसी, कुरवाळिसी तू तूच ताडीसी
न कळे यातुन काय जोडीसी
देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार'
गदिमांची लेखणी परमेशाची लीला समर्थपणे मांडते.
आई बापाच्या काळजाचे, भावनेचे चित्रण, दोन वेगवेगळ्या गीतातून गदिमा इतक्या संवेदनशीलपणे करतात की डोळ्यांच्या कडा ओलावल्या शिवाय राहत नाही.
'दहा दिशांनी येईल आता, अंधाराला पूर
अशा अवेळी असू नका रे आई पासून दूर
चुकचुक करिते पाल उगाच, चिंता मज लागल्या
या चिमण्यांनो..
'भावमुक्त मी मुनी मला न शोक आवरे
जन्मदास सोसवे दुःख हे कसे बरे
कन्यका न कनककोष मी धन्यास अर्पिला
चालली शकुंतला लाडकी शकुंतला….
मानवी जीवनातली वास्तवता दोन निरनिराळ्या गीतांमधून मांडताना माडगूळकरांची शब्द योजना अवर्णनीय आहे.
'मुकी अंगडी बालपणाची, रंगीत वसने तारुण्याची
जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे !'
'या वस्त्राते विणतो कोण ? एक सारखी नसती दोन
कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकर्याचे !'
'लळा जिव्हाळा शब्दच खोटे, माश्या मासा खाई
कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही
रक्त हि जेथे सूड साधते तेथे कसली माया
कोण कुणाची बहीण भाऊ, पती, पुत्र वा जायाओ
सांगायाची नाती सगळी जो तो अपुले पाही'
आकाशवाणी पुणे केंद्रावरून १९५५-५६ साली प्रसारित झालेले गीत रामायण तर अण्णांच्या साहित्य मुशाफिरी चे अत्युच्च प्रकटीकरण म्हणावे लागेल. यातील ५६ गीतांमध्ये ' ज्योतीने तेजाची आरती ' ' प्रत्यक्षाहुन प्रतिमा उत्कट ' यासारखी रूपकं आणि जीवन विषयक तत्वज्ञान मांडण्यासाठी माडगूळकरांनी अत्यंत चपखल शब्द योजिले आहेत.
' अंत उन्नतीचा पतनी होइ या जगांत
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
वियोगार्थ मीलन होतें, नेम हा जगाचा'
'जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात?
दुःखमुक्त जगला कारे कुणी जीवनात?
वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा'
आपल्या गद्य - पद्य साहित्य कृतींनी मराठी सारस्वताचे दालन या महाकवी ने संपन्न केले. अविस्मरणीय गीतरचना, अभिजात काव्य, कथा कादंबऱ्या, नाटक यासारख्या हिऱ्यामाणकांचा नजराणा रसिकांना पेश करून हा ' ईशअंशी गीतयोगी ' १४ डिसेंबर, १९७७ ला लौकिकाची पंचवटी सोडून अलौकिक निज धामासाठी प्रयाण करता झाला. या महाकवीला श्रद्धांजली वाहताना बाळ कोल्हटकरांनी अतिशय समर्पक भावशब्द योजना केली होती....
"शब्दांनाही गहिंवर आला ,दाटुन आला कंठी।पंचवटीचे काव्य चालले आता वैकुंठी।।
' जरामरणातून' कुणालाही सुटका नसली तरी गदिमा यांच्या सारखे थोर प्रतिभावान रसिकांसाठी वैकुंठीचा राणा होऊन जातात. ' वैकुंठी हा गेला वैष्णव, उरली मागे पाहा पताका.' गदिमांना सादर शब्दांजली.
नितीन सप्रे
खुपच सुंदर लेख. गदिमा हे व्यक्तिमत्त्वच जगावेगळे होते. ज्यांच्या बद्दल त्याच त्याच विषयावर अनेकदा वाचले, ऐकले तरी परत ऐकताना तोच ताजेपणा जाणवतो. हा तजेला कमी होणारच नाही.
उत्तर द्याहटवाअप्रतिम...
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर .प्रत्यक्ष गदिमांंच चित्र उभे राहिले
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर लेख.
उत्तर द्याहटवागदिमांच्या लेखणीतून जे काही रसिकांना काव्य , कथा साहित्य अजरामर आहे ,किचकवध, दोन आंखे बारा हात, गीत रामायण आजही ऐकावं असं आहे... त्यांना भावपूर्ण आदरांजली...
उत्तर द्याहटवाIt would be a truism to state that for person all at sea unable to fathom and navigate through the currents of numbers, the Late Ga Di Madgulkar was an undisputed 'wrangler' in the deep oceans of 'words', a 'wizard' effortlessly, in automatic gear, steering his thoughts in cruise control mode, to convey a message exquisitely and elegantly in sync with the backdrop of highways and off-roaders as well. Paradoxically, despite his unrivalled and complete command of super expressive 24-carat lexicon, the crown of an accomplished dramatist eluded him. As if to compensate this shortcoming, Ga Di Ma more than amply displayed his dexterity in both leg spin and off spin confounding the reader-batsman at the crease, who responded with gushing acknowledgement the utter sterling calibre of output, of which Geet Ramayan exemplified the pinnacle of his literary scoreboard, gifting unalloyed and pure display of magical pyro techniques in the literary skies. Indeed, the famed Gajanan from Maudgull measured up to the famed Sangli Ganapati mandir, what with his amazing versatility in delivering fresh from the farm to the kitchen cum reading table such nourishing, organic delights whose tastes of happiness would linger for generations to come. Needless to add, Nitinji, your commentary on Ga Di Ma partners profoundly well with the undisputed masterly opening batsman that Ga Di Ma was in the history books that enlarged the geography of his admirers with none of the LOC(Line of Control) in the headlines we read every now and then. 👌👍🙏
उत्तर द्याहटवातुमची लेखणी अत्यंत प्रासादिक आणि ओघवती आहे. गदिमां वरील हा लेख वाचताना मन भरून आले. खूप खूप धन्यवाद!
हटवा🙏🙏
ग दि मा आणि त्यांच्या अमर कलाकृती यांचा शब्द वेध अप्रतीम
उत्तर द्याहटवाग दि मा यांच्या साहित्यिक कारकिर्दीचा तसच त्यांच्या कविता गाणी यांचा सखोल ,अभ्यासपूर्ण लेख
उत्तर द्याहटवाधन्यवाद.
फार सुंदर शीर्षक आणि गदिमांच्या काव्य प्रतिभेची अनेक उदाहरणे देताना तुमच्याही शब्दसंपदेचा फुलोरा आनंद देणारा वाटला.गदिमा नावाच्या महाकवीला विनम्र अभिवादन! 🙏🌹
उत्तर द्याहटवा