स्मृतिबनातून - ' श्वाना घरचे समर्थ '

' श्वाना घरचे समर्थ ' तो घरी आला तो काहीश्या प्रतिकूल परिस्थितीतच. आई - बाप, भावंडांना सोडून आलेला तो भेदरलेल्या मनस्थितीत होता. साहजिकच होतं, या आधी दोन घरे सोडून झाली होती आणि तेही जन्मानंतर दोन महिन्याच्या आतच. बरं हे तिसरं जगही, त्याच्या आगमनावरून, दोन समान गटात विभागलेलं. मुलाची तीव्र इच्छा असल्याचे सांगून माझ्याकडून होकार सदृश संमती मिळावी यासाठी रदबदली करणारी त्याची आई आणि माझ्या दृष्टीने या समस्येचा मुळ पुरूष मुलगा; यांचा एक अभेद्य गट. संख्याबळाच्या निकषा वर तोडीसतोड वाटणारा, पण मुळातच दुय्यम, दुबळा असलेला; मुलगी आणि मी असा दुसरा गट. त्यातच स्त्रीसुलभ प्रवृत्तीने म्हणा माझ्या गटातील महिला सदस्याने लवकरच अनपेक्षितरित्या गटांतर केलं आणि माझ्यावर गंडांतर आलं. अर्थात मी एकाकी पडलो तरी एकनिष्ठता, तत्वनिष्ठता वगैरे गुण (?) दाखवत एकांड्या शिलेदारा प्रमाणे त्यांच्या विरोधात किल्ला लढवत राहिलो. त्याची परिस्थिती ही केविलवाणी होती. नवीन जागा. नवे संबंधी. आपले सहानुभूतीदार नेमके कोण याची त्याला अजून उमजच यायची होती. पहिल्या रात्री, कुणावर भरवसा ठेवावा ही चिंता त्या...