स्मृतिबनातून - ' श्वाना घरचे समर्थ '

 ' श्वाना घरचे समर्थ '


तो घरी आला तो काहीश्या प्रतिकूल परिस्थितीतच. आई - बाप, भावंडांना सोडून आलेला तो  भेदरलेल्या मनस्थितीत होता. साहजिकच होतं, या आधी दोन घरे सोडून झाली होती आणि तेही  जन्मानंतर दोन महिन्याच्या आतच. बरं हे तिसरं जगही, त्याच्या आगमनावरून, दोन समान गटात विभागलेलं. मुलाची तीव्र इच्छा असल्याचे सांगून माझ्याकडून होकार सदृश संमती मिळावी यासाठी रदबदली करणारी त्याची  आई आणि माझ्या दृष्टीने या समस्येचा मुळ पुरूष मुलगा; यांचा एक अभेद्य गट. संख्याबळाच्या निकषा वर तोडीसतोड वाटणारा, पण मुळातच दुय्यम, दुबळा असलेला; मुलगी आणि मी असा दुसरा गट. त्यातच स्त्रीसुलभ प्रवृत्तीने म्हणा माझ्या गटातील महिला सदस्याने लवकरच अनपेक्षितरित्या गटांतर केलं आणि माझ्यावर गंडांतर आलं. अर्थात मी एकाकी पडलो तरी एकनिष्ठता, तत्वनिष्ठता वगैरे गुण (?) दाखवत एकांड्या शिलेदारा प्रमाणे त्यांच्या विरोधात किल्ला लढवत राहिलो.

त्याची परिस्थिती ही केविलवाणी होती. नवीन जागा. नवे संबंधी. आपले सहानुभूतीदार नेमके कोण याची त्याला अजून उमजच यायची होती. पहिल्या रात्री, कुणावर भरवसा ठेवावा ही चिंता त्याला सतत सतावत असावी. त्यामुळे जेवणही समाधानकारक झालेलं नव्हतं. तसाही तो ' खाईन तर तुपाशी' पंथीय होता हे पुढे आमच्या लक्षात आलं. पुढ्यातली पोळी पळवणाऱ्या ज्या श्र्वानामागे संत नामदेव तुपाची बुधली घेऊन पळाले होते, लिओ त्याच्या कुळातला असावा. पुरेसे तूप लावलेले आहे याची खात्री पटल्यानंतरच तो पोळी भक्षण करतो. ते थंडीचे दिवस होते आणि कधी नव्हे तो त्यावर्षी मुंबईच्या हवेत बऱ्यापैकी गारवा होता. दिवसही असा की सतरा सालचा सूर्य मावळलेला आणि आता तो एकदम अठरा सालीच उगवणार होता. नव्या जागेशी समझोता करत झोपेचा प्रयत्न करावा तर नववर्षाच्या स्वागतासाठी फटाके वाजत असल्याने दरवेळी आवाज झाला की तो दचकून जागा होत असे. शेवटी 'दूनियमे आयें है तो जीनाही पडेगा, जीवन भी अगर जहर है तो पीनाही पाडेगा ' अश्या काहीश्या मानसिकतेत त्या रात्री त्याने घरातल्या कर्त्या स्त्रीच्या पायाशी आसरा घेण्याचा निर्णय घेतला. क्रिकेट मध्ये म्हणतात नं ' कॅचेस विन द मॅचेस'(Catches win the matches) त्याच धर्तीवर घरातल्या ह्या पहिल्या नेमक्या महत्वाच्या ' कॅचने ' त्याने मॅच जिंकली. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, अशी एक म्हण मराठीत प्रचलित आहे. मात्र ही म्हण मानव पुत्रा बाबतच नाही तर श्र्वान पुत्रा बाबतही खरी असेल असं वाटलं नव्हतं. पत्नी आणि मुलाच्या गळ्यातला तर लिओ (Leo)पहिल्या पासूनच ताईत होताच पण त्यांच्या आघाडीत मगावून सामील झालेल्या माझ्या  मुलीचं तर त्याच्या वाचून पान हलेनास झालं. तिने तर त्याचा वाढदिवस त्याच्या चार पाच मित्रांना बोलावून आणि त्यांच्यासाठी विशेष केक(Cake) स्वतः करून साजरा केला होता.


मानव आणि श्वान असा द्वैतभाव एव्हाना फक्त माझ्या मनीच उरला होता. त्यांच्या जाणिवेत अद्वैत होत. अल्पमतात जाऊनही मी मात्र आपला बाणा टिकवून होतो. त्याच्या एकूण वावरा वर मी बारीक लक्ष ठेऊन होतो. घरातल्या सुखसोयींचा  वापर त्याला अनिर्बंध पणे करता येणार नाही यासाठी यथाशक्ती प्रयत्न करत होतो. त्याच्या गृहप्रवेशामुळे सोसायटीतील अन्य सदस्य आपत्ती दर्शवितील आणि माझं इप्सित अनायसेच साध्य होईल अशी खात्री वाटत होती. पण म्हणता म्हणता त्यानं बहुतेकांना आपलंसं करून घेतलं. प्राणी जसे माणसाळतात तसे त्याला घाबरून असलेले लोकही हळूहळू श्वानाळले. त्याने काय जादू केली कोण जाणे काही दिवसातच त्याला खानपानाची निमंत्रण येऊ लागली. विशेषतः सामिष भोजनाची. आता आमच्या घरा व्यतिरिक्त तो अन्य एकदोन घरात फेरफटका मारून येऊ लागला. अहो खर सांगतो पदाधिकारी वगैरे असून, सोसायटीपयोगी कामं करून सुद्धा गेल्या दहा वर्षात मला कुणीही अद्याप निमंत्रित केलेले नाही. तसा तो यत्नवादी असावा. माझ्याशी ही अधून मधून सलगी करण्याचा प्रयत्न त्याने सुरूच ठेवला. मी घरातल्या त्याच्या वास्तव्याला विशेष अनुकूल नाही हे तो जाणून होता. शक्यतो माझ्या अटी माझ्या देखत तरी पाळत होता आणि दुसरीकडे एखाद्या विस्तारवादी सम्राटाने सुनियोजित पद्धतीने भूभाग बळकावावा तसा सोसायटीतील मुलांना आणि अन्य विरोधी सदस्यांना हळूहळू आपल्या बाजूने फितवित होता. घरातही आपल्या सर्व गरजा पूर्ण करून घेत असतानाच शिस्तीत वागून, कुठलीही नासधूस न करता तसेच कार्य, प्रवास आणि महत्वाच्या प्रसंगी उत्तम सहकार्य करून माझ्या विरोधाची निरर्थकता सिद्ध करू पाहत होता. बाहेर जायचं म्हंटल्यावर आपला पट्टा, दुधाची पिशवी, काठी अश्या गोष्टी मागितल्यावर आणून देऊ लागला. अन्य कोणाची ही आपल्या बाबत काही तक्रार येणार नाही याची संपूर्ण दक्षता ठेवून होता.



मुळातच लिओ हा लब्राडोरे (Labrador) आहे. ही मंडळी आज्ञाधारक, निष्ठावान आणि खेळकर प्रवृत्तीची म्हणून नाव कमावलेली आहेत.  मुख्य म्हणजे त्याचे काळेभोर निरागस करुण डोळे. आपल्या भावना तो त्याच्या अतिशय बोलक्या डोळ्यांनी आमच्या पर्यंत पोहोचवित असतो. आता तर तो घरात कुटुंब सदस्याच्या नात्यानेच वावरू लागला आहे.

कुटुंबातील बहुतेक सर्वांशी नाते संबंध, त्याने इतके घट्ट केले की त्याच्या काही अप्रिय गोष्टींवर ते तर डोळेझाक करतातच पण मी ही नकळत हळूहळू कानाडोळा करू लागलो आहे. दिवसागणिक त्याने त्याच्या विषयी सर्वांच्याच मनात कमीअधिक प्रमाणात लळा निर्माण केला आहे. अलीकडेच माझ्या लक्षात आलं की बहुतांश वेळी जरी तो सभ्यतेने वागत असला तरी आता तो सोफा, सेटी, बेड यांचा वापर अगदी माझ्या समोर देखील बिनदिक्कत करू लागला आहे

ते ही मुद्दाम, खेवसेपणानी आणि गंमत म्हणजे मलाही त्याच्या ह्या लीला पूर्वी इतक्या खुपेनाश्या झाल्या आहेत.

एकूणच गेल्या तीन वर्षात त्याने घरात आपला चांगलाच

जम बसवला आहे.

गाडी बाबत ही तोच प्रकार. गाडीतून फेरफटका म्हटलं की त्याच्या कानात वाराच शिरतो. गाडी आमची राहिली नसून त्याची झाली आहे. तो परभाषिक असला तरी आम्ही बोललेल त्याला सर्व कळतं असं आम्हाला वाटू लागलं आहे. आसपासच्या परिसरात आता त्याचे बरेच मित्र झाले आहेत तसच अनेक मंडळी आता लिओ मूळे आम्हाला ओळखू लागली आहेत आणि कधीतरी चहा पाणी ही विचारू लागली आहेत. पहिल्या दिवशी भेदरलेल्या अवस्थेत प्रवेशता झालेल्या लिओनी आता घरातल्या सर्वच गोष्टींवर गेल्या तीन वर्षात आपली नाममुद्रा ठसठशीतपणे उमटवली आहे. इतकी की समर्था घरचे श्वान अशी त्याची ओळख होण्या ऐवजी आमची ओळख श्र्वाना घरचे समर्थ अशी होऊ घातली आहे
 

नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
8851540881


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक