प्रासंगिक - गोदातीरीची कुसुमी मानवता

 गोदातीरीची कुसुमी मानवता



मराठीची बोलू कौतुके।

परि अमृतातेहि पैजासी जिंके।

खरंच आहे. मराठी भाषेची थोरवी किती गावी? एखाद्या भाषेची महती, थोरपण हे साधारणपणे शब्दसंपदा, तीचे अलंकार, म्हणी, वाक्प्रचार, व्याकरण, त्या भाषेतील साहित्य व्यवहार, आदी बाबीं वरून ठरवलं जातं. ही परिमाणं मराठी भाषेलाही लागू आहेतच पण मराठी भाषा वैभव हे कनकांबरी  होतं, ते या माय मराठीच्या अ अपत्यांनी केलेल्या विश्वरूप विचारांनी; हे विश्व ची माझे घर या भावनेने सर्व जनांच्या कल्याणाच्या व्यापक मांडणी मूळे. अमृतातेही पैजासी जिंके हा काही भावनातिरेक नाही तर वैश्विक कल्याणाच्या समावेशी विचारांमुळे लागू होणारे ते रास्त प्रशस्तीपत्र आहे. मराठी सारस्वताचे प्रांगण हे सदैव विश्वात्मक विचार मांडणाऱ्या शब्द तारकांनी संमार्जित, शिंपिले गेले आहे. अर्थातच यात आद्य क्रमाने माउलींचे स्मरण होते. सुमारे साडेसातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानदेवांनी विश्वात्मक देवाकडे "जो जे वांछील तो ते लाहो" असे पसायदान अखिल प्राणी जाती साठी मागितले. तेव्हा पासून तर अर्वाचीन काळात  सर्वात्मक सर्वेश्वराकडे "जे जे जगी जगते तया, माझे म्हणा करुणा करा" असे आर्जव करून कसुमाग्रजांनी ती परंपरा पुढे चालवली.


कुसुमाग्रज….एक अथांग, उत्तुंग, उत्कट  व्यक्तिमत्व. त्यांच्याच शब्दांचा आधार घ्यायचा तर "मातीमध्ये उगवून सुद्धा मेघा पर्यंत पोहोचलेलं."

पटकथा लेखक, अभिनय, पत्रकारिता, सामाजिक कार्यकर्ता अशी मुशाफिरी करत, कुसुमाग्रज  मराठी सारस्वताच्या आकाशगंगेत ध्रुव ताऱ्या प्रमाणे अढळपद प्राप्त करते झाले.


रंगनाथ शिरवाडकर यांचे चिरंजीव आपले काका  वामन शिरवाडकर यांना दत्तक जातात त्यांनी 'गजानन' नामधारी शिरवाडकरांचे नाव 'विष्णू' ठेवल्यामुळे, विष्णू वामन शिरवाडकर असे झाले. धाकटी बहीण कुसुमेचा अग्रज, कुसुमाग्रज म्हणून पुढे ते साहित्य विश्वात चिरंजीवी झाले.


आज पन्नास - पंचावन च्या आसपास असलेल्या पिढीला कुसुमाग्रज पहिल्यांदा भेटले ते प्राथमिक शाळेत बाल भारतीत. क्रांती, सामाजिक विषमता यांच्या विरुद्ध धगधगत्या कवितांचा यज्ञकुंड प्रज्वलित करणाऱ्या तात्यासाहेबांनी स्वतःच्या उमलत्या वयात,  "हळूच या पण हळूच या," "खरीचे गाणे," "उठा उठा चिऊताई," "हासरा नाचरा श्रावण आला" या सारख्या फुला मुलांच्या कवनांचा प्राजक्त सडा शिंपला होता.


लेखकाचे अनुभव, त्याचे व्यक्तिमत्त्व आणि स्वातंत्र्य या गोष्टींना कुसुमाग्रजांनी महत्त्व दिलेलं आपल्या लक्षात येत. आश्वासकता हे त्यांच्या कवितेचे व्यवच्छेदक लक्षण असावे.  त्यांच्या "विशाखा" या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविता संग्रहातल्या "दूर मनो-यात" या प्रारंभीच्या कवितेतच मानवी जीवनातील संकटं, त्याचा जीवन संघर्ष मांडतांना त्यांनी कमालीच्या चपखल रुपकांच नियोजन केले आहे. 

"वादळला हा जीवनसागर - अवसेची रात

पाण्यावर गडबडा लोळतो रुसलेला वात"


पुढे ते लिहितात….


"पिंजुनिया आयाळ गर्जती लाटा भवताली

प्रचण्ड भिंगापरी फुटते जळ आदळुनी खाली


प्रवासास गल्बते आपुली अशा काळराती

वावटळीतिल पिसाप्रमणे हेलावत जाती"


मात्र असं जरी असलं तरी निराश न होता, न थकता, न हरता हा तमोमय भवसागर तरुन जाण्यासाठी तेच आपल्या हाती पतवार (वल्ह) ही देतात.


"परन्तु अन्धारात चकाके बघा बन्दरात

स्तम्भावरचा प्रकाश हिरवा तेजस्वी शान्त!


किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी

काळोखावर खोदित बसला तेजाची लेणी


उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनो-यात

अन् लावा ह्रुदयात सख्यांनो, आशेची वात!"


विशाखा काव्य संग्रहात "कोलंबसाचे गर्वगीत", "सात" अश्या आश्वासकतेची प्रचिती देणाऱ्या कविता ही आहेत. जालियनवाला बाग, नेता, क्रांतीचा जयजयकार, टिळकांच्या पुतळ्या जवळ अशा राष्ट्रवादाचे स्फुल्लिंग चेतवणाऱ्या कविता ही कुसुमाग्रजांच्या लेखणीतून उतरल्या आहेत. १९४२ च्या चले जाव चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या "गर्जा जयजयकार क्रांतीचा" ही कविता, डमडम तुरुंगातल्या राजबंद्यांच्या अन्न सत्याग्रहाची बातमी प्रभात वृत्तपत्रात रात्रपाळीत संपादकीय कामकाज करीत असलेल्या या संपादकाच्या हाती पडते आणि कार्यालयीन कामकाज संपता संपता या कवीची लेखणी खड्गा  प्रमाणे तळपू लागते आणि क्रांतीचे स्तवन धगधगु लागते.


"पिचेल मनगट परि उरातील अभंग आवेश

तडिताघाते(वीज) कोसळेल का तारांचा संभार

कधीही तारांचा संभार"

"नाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखलेत हात

तुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यात ये तांत(आतडी)

चरणांचे तव पूजन केले म्हणुनी गुन्हेगार

देता जीवन-अर्घ्य तुला ठरलो वेडेपीर

देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार

आई वेड्यांना आधार गर्जा जय जयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार" अशी अत्यंत ओजस्वी,भारदार व्यक्तिमत्व असलेल्या शब्दांनी फुललेली कविता जन्म घेते.


जनरल डायरचे उद्दाम, रक्तरंजित, सैतानी हत्याकांड त्यांच्या "जालियनवाला बाग" कवितेतून अत्यंत धगधगीत पणे समोर येते.


"रक्ताचे नच ओघळ सुकले अजुनि क्रुसावरचे

विरले ना ध्वनि तुझ्या प्रेषिता, अजुनी शब्दांचे"


"आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातात

निःशस्त्रांच्या रक्तामांसामधे नाहतात"


"असेल ही वा सैतानाची प्रभूवरी मात

एक जखम अन् नवीन येशू, तुझ्या काळजांत !"


समाजातल्या 'आहे रे' आणि 'नाही रे' अश्या दोन गटां मधला संघर्ष, कल्पनातीत कल्पक प्रतीकांची योजना करून,'आगगाडी आणि जमीन' या कवितेतुन ते अत्यंत प्रभावीपणे मांडतात.

सामाजिक जाणीव, वर्ग संघर्ष, बेगडी धार्मिकता यावरही कसुमाग्रजांनी आपल्या ' बळी,' ' लिलाव,'  ' गाभारा ' या सारख्या कवितांमधून प्रखर भाष्य केले आहे. घरदार,वस्तू वगैरे सर्व लिलावात गमावलेल्या असहाय्य माणसाची मनःस्थिती आणि विधिनिषेध शून्य, किळसवाणी सावकारी मनोवृत्ती उघडी पाडणाऱ्या  ' लिलावात' ते म्हणतात..


"ऊर उघडे ते तिचे न्याहळोनी

थोर थैलीतिल वाजवीत नाणी

‘आणि ही रे !’ पुसतसे सावकार,

उडे हास्याचा चहुकडे विखार"


माणूस, मानवता हा कुसुमाग्रजांच्या साहित्याचा स्थाई भाव आहे. दीन दुबळ्यां विषयी त्यांना 'सहानभूती' वाटते.


"जीभ झालेली ओरडून शोष

चार दिवसांचा त्यातही उपास

नयन थिजले थरथरती हातपाय

रूप दैन्याचे उभे मूर्त काय?

कीव यावी पण त्याची कुणाला

जात उपहासुनि पसरल्या कराला

तोच येई कुणी परतुनी मजूर

बघुनी दीना त्या उधाणून ऊर-

म्हणे राहीन दिन एक मी उपाशी

परी लाभूदे दोन घास यासी."


परमेशाच्या हृदयी भक्त जनांचा वास असतो असं म्हणतात. कुसुमाग्रजां सारखा भाषाप्रभू  आपल्या अंतरंगात सर्वदा अक्षर भक्तांचीच मांदियाळी असल्याची भावना व्यक्त करतो

"तुम्ही जेव्हा

माझ्या कवितेशी बोलता

तेव्हा माझ्याशी बोलू नका,

कारण माझ्या कवितेत

मी असेन बराचसा

बहुधा,

पण माझ्या बोलण्यात मात्र

तुम्हीच असाल

पुष्कळदा."


मंदिरातल्या, मखरातल्या देवापेक्षा माणसातल्या, मानवातल्या दैवी अंशाची, त्यांच्या मनो मंदिराच्या गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा झाली होती. निहित कर्मकांड सुखनैव सुरू असताना एका महारोग्याला मंदिरात प्रवेश नाकारला जातो तेव्हा तो बाप्पालाच बाहेर येण्याची साद घालतो आणि दुसऱ्या दिवशी काकड आरतीला गाभारा रिकामा होतो अशी मांडणी करत शेवटी बेगड्या धार्मिकतेची कुसुमाग्रजांनी खिल्ली उडवली आहे. 


"पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..

परत? कदाचित येइलही तो

पण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर त्याला पुन्हा..

प्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,

आमच्या ट्रस्टींना,"


"पण तुर्त गाभार्‍याचे दर्शन घ्या.

तसे म्हटले तर, गाभार्‍याचे महत्व अंतिम असत,

कारण गाभारा सलामत तर देव पचास"


कुसुमाग्रजांची कल्पकता भव्यतेत रमणारी आहे. त्यांच्या कवितेत सूर्य, चंद्र, तारका, चांदणे, तडीता, शुक्र, मंगळ, पृथ्वी अशी मातब्बर मंडळी प्रतीकांच्या रुपात सहज वावरतात. कुसुमाग्रजांनी जश्या क्रांतीच्या, राष्ट्र प्रेमाच्या धगधगत्या कविता लिहिल्या तद्वतच तरल अश्या प्रेम कविता ही लिहिल्या. प्रीती, शृंगार या सारख्या मानवी भावनांना कुसुमाग्रजांची प्रतिभा एका वेगळ्याच उदात्त पातळीवर घेऊन जाते. उथळपणा, उच्छृंखल, लंपटपणाचा त्यात लवलेशही नाही. त्यांची कविता सप्त सूरांना चंद्र होऊन प्रियकराला चांदण्याचे कोष पोहोचवण्याचे आर्जव करते आणि तमोमय एकाकी वाटेवर हरवलेल्या मानसाला अमृताने नाहवण्या साठी आकाशाला बरसण्याची विनंती करते. किती उत्तुंग, उदात्त कल्पनाविलास! त्यांच्या प्रेम कवितेत सूर्य आणि पृथ्वी प्रियकर - प्रेयसीच्या भूमिकेत आढळतात. "काढ सखे, गळ्यातील तुझे चांदण्याचे हात क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत" असा संयत विचारी नायक जसा त्यात आढळतो तशीच "नको क्षुद्र शृंगार तो दुर्बलांचा तुझी दूरता त्याहूनी साहवे" म्हणणारी तडफदार नायिका ही दिसते.

कुसुमाग्रजांची साहित्यिक वाटचाल बघितली, त्यांनी आकारलेल्या साहित्य कृती लक्षात घेतल्या तर असं स्पष्ट जाणवते की तात्यासाहेबांनी जीवनातले ते ते सर्व रस आपल्याला रसास्वादा साठी बहाल केले. त्यांच्या निर्मितीत सर्वांग परिपूर्णता जाणवते. त्यांचे जगणे होते गाणे. त्यांच्या अजोड, दिव्य शब्दकृतींनी रसिकजन जरी भारावलेपण अनुभवत असले तरी स्वतः शिरवाडकरांचा  याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा "जमले अथवा जमले नाही खेद खंत ना उरली काही अदृष्यातील आदेशांचे ओझे फक्त वाहणे" असेच होते.


कुसुमाग्रजांच्या काव्याविष्काराचा प्रारंभ 'जीवन लहरीनी' झाला आणि मावळतीला हुरहूर लावणाऱ्या "मारव्याने" तो निमाला.


"उगवतीचे उन आता, मावळतीला चालले आहे.

मार्गक्रमण मार्गापेक्षा मरणात अधिक साचले आहे..

तक्रार नाही खंत नाही पूर्ती साठीच प्रवास असतो

केंव्हा तरी मिटण्यासाठीच काळजा मधला श्वास असतो"



कुसुमाग्रजांची काव्यधारा ही गंगौघा प्रमाणे आहे. तीचे थोरपण वादातीत आहे. ते प्रादेशिकतेच्या, राष्ट्रीयतेच्या धरणात अडवता उपयोगी नाही. त्यांची कविता अखिल मानवतेला गवसणी घालणारी आहे आणि म्हणूनच त्यांचा जन्मदिन महाराष्ट्रात मराठीभाषा दिन म्हणून साजरा होत असला तरी तो जागतिक पातळीवर साजरा केल्यानेच कुसुमाग्रजांचा उचित गौरव होईल अशी भावना सातत्याने होत रहाते.

नितीन सप्रे,
nitinnsapre@gmail.com
8851540881


टिप्पण्या

  1. व्वा ! फारच छान व अभ्यासपूर्ण लेख. कुसुमाग्रज यांचे साहित्य वाचायची प्रेरणा अनेकांना मिळेल, असा हा लेख आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम... खरे आहे, कुसुमाग्रजांचा जन्मदिवस जागतिक पातळीवर साजरा झाला पाहिजे.

    उत्तर द्याहटवा
  3. नेहमीप्रमाणे नेमक्या शब्दांतील शब्दचित्र. कनकांबरी हा माझ्यासाठी नवीन शब्द . मस्तच!!

    उत्तर द्याहटवा
  4. एका अभ्यासकाचे विनम्र, सखोल आणि व्यासंगी चिंतन !

    उत्तर द्याहटवा
  5. कुसुमाग्रज खूप सुंदर रित्या मांडले. सरसकट आढावा घेताना विलक्षण रित्या कवितेतील अम्रुत बिंदू टिपले.

    उत्तर द्याहटवा
  6. अप्रतिम... माहितीपूर्ण आणि आणखी वाचण्याची ओढ लावणारा लेख...

    उत्तर द्याहटवा
  7. जीवनातील विविध विषयांना काव्यात्मक परीस स्पर्श करून त्याचे सोने करणाऱ्या कुसुमाग्रजांचा यथोचित गौरव करणारा हा सुंदर लेख... मस्तच

    उत्तर द्याहटवा
  8. आदरणीय कविवर्य कुसुमाग्रज ,स्फुल्लिंग चेतवणारी कविता लिहिणारे कुसुमाग्रज,नाटककार वि वा शिरवाडकर यांच्या विषयी आपण लिहिलेला सर्वांग सुंदर लेख वाचताना त्यांच्या लिखाणातील सर्व भावना आपोआपच जागृत होत होत्या .खूपच छान या थोर माणसाला, या थोर कवीला विनम्र अभिवादन.💐💐

    उत्तर द्याहटवा
  9. अभ्यासपूर्ण लिखाण। कुसुमाग्रजांना विनम्र अभिवादन

    उत्तर द्याहटवा
  10. या अप्रतिम संग्राह्य माहितीपूर्ण लेखामुळे - ज्ञानपीठ पुरस्कारांनी सन्मानित कुसुमाग्रजांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व सहज उलगडते..!! श्री ज्ञानेश्वरांप्रमाणेच " सर्वात्मका सर्वेश्र्वरा " हे कुसुमाग्रजांचे " पसायदान " मला सर्वोत्कृष्ट वाटते..! आजच्या त्यांच्या जन्मदिनी त्यांना माझे " त्रिवार वंदन " ...!!!
    - रविंद्र रा. शिवदे, सातारा
    मोबाईल : 9860050726.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक