रांची - एक आनंदानुभव
रांची - एक आनंदानुभव
बरेचदा काही स्थळांबद्दल,काही व्यक्तींबद्दल अकारण आपली दृष्टी पूर्वग्रह दूषित असते. काही वेळा एखाद्या व्यक्ती विषयी अथवा जागे विषयी आपल्या मनात नकारात्मक संकल्पना असतात आणि त्या खोट्या ठरल्या तर आश्चर्याचा सुखद धक्का अनुभवायला मिळतो. काही गावां विषयी अशाच काही नकारात्मक संकल्पना उगाचच माझ्याही मनात होत्या मात्र सुदैवाने त्या खोट्या ठरून मला आनंददायी अनुभव देऊन गेल्या.
सहज फिरायला म्हणून तर सोडाच कामा निमित्त देखील कधी झारखंडच्या राजधानी रांची (Ranchi)शहराचा दौरा करावा लागण्याची शक्यता माझ्या दृष्टिपथात नव्हती. आमच्या खानदानातील कुणी कधी रांचीला गेल्याचे मला स्मरत नाही आणि कुणी कधी जाईल अशी शक्यता ही नसतांना अगदी अचानक तसा योग आला.
झारखंड(Jharkhand) हे आदिवासी बहुल राज्य, मागासलेले त्यातून नक्षलग्रस्त वगैरे धारणा मनात राखून मी रांचीत अवतरलो होतो मात्र रेल्वे स्टेशन वरून मुक्कामाच्या ठिकाणी करमटोलीला पोहोचेपर्यंत अद्ययावत ब्रँड च्या मोठ मोठ्या शोरूम्स, आधुनिक दुकाने, मॉल्स, हॉटेल्स, दक्षिण भारतीय खाद्यपदार्थां पासून चायनीज इटरीज यांनी सोबत केली. मुक्काम प्रेस क्लब(Press Club) मध्येच होता. रांची प्रेस क्लब ची वास्तू ही कॉन्फरन्स हॉल, वाचनालय, जिम, कॅन्टीन आणि दहा पंधरा निवासी खोल्यानी सुसज्जित अशी चार मजली इमारत असेल याची स्वप्नातही मी कल्पना केली नसती. त्यातच समोर रस्ता ओलांडताच छोटा तलाव आणि भोवती बगीचा तसच मागच्या बाजूला हॉकी स्टेडियम आणि फुटबॉल मैदान.
या सगळ्यात भर म्हणजे रस्त्याचं नाव बुटी रोड( हे मराठी ' बुटी ' च का याचा शोध घ्यावा लागेल) माझी तर 'सुकांत चंद्रानना पातली' अशी अवस्था झाली.
दुसरा दिवस ड्राय डे ठरेल असं वाटत असतानाच अवचितपणे तो 'बॅचलर्स ट्रॅव्हल डे' ठरला. मानसशास्त्रात एम. फिल. करण्याचा मानस असलेली, माझी मुलगी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सैक्याट्री च्या परीक्षेच्या निमित्ताने रांची मध्ये पोहोचली होती. मुळचा नागपूरचा पण सध्या NTPC, रांची मध्ये कार्यरत असलेला, आणि बायको आणि मुलगी बाहेरगावी गेल्याने नव्याने बॅचलर्सशिप चा आनंद घेत असलेला, माझ्या बायकोचा मित्र आणि मुलीला आवश्यक वाटत नसतांनाही माझ्या बायकोच्या आग्रहास्तव मुलीला सोबत म्हणून दिल्लीहून गेलेले आस्मादिक ही सध्या बॅचलर. अशी आगळी वेगळी बॅचलर्स त्रिमूर्ती टीम झाली होती. यजमानत्व अत्यंत आनंदाने प्रशांतने स्वतःहून स्वीकारलेले.
रांची पासून साधारण 30 कि मी अंतरावर रामगड जिल्ह्यात परतातू गाव वसलं आहे. रांची ते परतातू हा नयनरम्य नागमोडी घाट रस्ता आहे.
परतातू धरण हे या विद्युत केंद्राला पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने बांधले आहे. या ठिकाणी असलेले जुने वीज केंद्र पाडून आता 800 मेगावॉट चे तीन नवे आधुनिक संच उभारले जात आहेत. NTPC च्या ह्या नव्या वीज केंद्रामुळे परीसराच्या विकासाला चालना मिळाली आहे. अर्थात हे औष्णिक वीज केंद्र असल्याने राखेचा आणि पर्यायाने पर्यावरण प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो हे लक्षात घेऊन NTPC ने उचित खबरदारी घेतली आहे.
निसर्ग आणि मानव यांच्या संयुक्त भागीदारीने पाणी आणि वीज पुरवठा साध्य होण्याबरोबरच हा परिसर रांची आणि आसपासच्या परिसरातील लोकांच्या विरंगुळ्यासाठी एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ बनला आहे.
धरणामुळे विस्थापित झालेल्या गावातल्या काही लोकांना नोकरी मिळाली परंतु अन्य काही जणांसाठी या ठिकाणी नौकानयन सुरू करून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुदैवाने या परिसराचे आकर्षण स्थालांतरित पक्षांनाही वाटल्याने त्यांनीही धरणात मुक्कामी येऊन या परिसराच्या सौंदर्यात जिवंत भर टाकली आहे. जलविहार करतांना त्यांची सोबत पर्यटकांसाठी नव नवल नयनोत्सवी ठरते.
रांची शहरात जो काही थोडाफार फेरफटका मारला त्यावरून असं जाणवलं की शहरी आणि ग्रामीण सभ्यता इथे एकाचवेळी नांदत आहेत. शहरी सुखसोयी असल्या तरी ग्रामीण जीवनातला ओलावा इथे आटलेला नाही. गळ्यात शबनम बॅग अडकवून पत्ता शोधीत फिरत असताना एक सरकारी शिक्षक स्वतःहून चौकशी करून, मुद्दाम वाकडी वाट करत मला इच्छित स्थळी त्याच्या दुचाकीवर उगाच नाही सोडून आला.
तीन दिवसांच्या मुक्कामात सकाळी पायी फिरायला गेलो तेव्हा असं बघितलं की ठराविक परिसर सकाळी फिरायला, धावायला जाणाऱ्या व्यक्तीं व्यतिरिक्त इतर सर्व वाहनांसाठी बॅरिकेड्स लावून बंद करण्यात येतो. साधीशीच बाब पण व्यायामाप्रती प्रशासनाची संवेदनशीलता त्यातून दिसून आली. सर्वच शहरांनी अनुसरण करावी अशी गोष्ट वाटली मला ही. अलीकडेच ठाणे शहरात ही अशी व्यवस्था सुरू केल्याची सुखद वार्ता मला मिळाली.
सकाच्या फेरफटक्यानंतर बाकी विशेष व्यावधानं नसल्यानं प्रेस क्लब समोरच्याच बागेत सकाळच्या कोवळ्या उन्हाचा लाभ घेतला. बाहेर पडताच एका हातगाडीवर बिहारचं स्वादिष्ट आणि पोषक व्यंजन लिट्टी चोखा चा रसास्वाद घेतला. या बिहारी बाबुनं करमटोली चौकात बऱ्यापैकी स्वच्छता राखत ताजा लिट्टी चोखा विकून 53 लाखाचा बंगला बांधला असल्याची माहिती, मला काही कारण नसताना, आग्रहानं चहापान देत, हातगाडीवर नव्यानेच ओळख झालेल्या माझ्या वकील मित्राने दिली. याच गाडीवाल्यानं मुंबईला नेण्यासाठी पाच सहा प्लेट लिट्टी चोखा, कुठलीही सवलत मगतली नसताना ती देत, निगुतीने बांधून दिला. पुस्तकी व्यावसिकता न आचरता, या निखळ ग्राम्य संस्कारांच्या शिदोरीवर त्याने त्याच्या छोटेखानी व्यवसायात यश मिळवून पुस्तकी पंडितांना उदाहरणच घालून दिलं आहे असं मला वाटतं.
दूरदर्शन, आकाशवाणीतील माझ्या सहकाऱ्यांनी, भेटलेल्या लोकांनी आणि परतातू निवासी प्रशांत यांनी माझा पहिलाच रांची अनुभव असा समृद्ध करून दिला की त्याचा स्मृतिगांध सदैव मनाच्या कोपऱ्यात दरवळत राहील.
(छायाचित्र: विकास खरे/प्रशांत पाटील)नितीन सप्रे
8851540881
चांगला अनुभव. रांची म्हटले की महेंद्रसिंग धोनी समोर येतो. एकेकाळी मागासलेला भाग असेच ऐकायला मिळायचे. तुमचा अनुभव वाचून पहायला जावेसे वाटते
उत्तर द्याहटवाSuper👌👌
उत्तर द्याहटवा