प्रासंगिक - बनारसी अद्वैत

 बनारसी अद्वैत


बनारस घराणं

बनारस शहराचं महत्व हे केवळ अध्यात्मिक राजधानी म्हणूनच नाही तर भारतीय कला व संस्कृतीचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून ही आहे. ज्ञात माहितीनुसार, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे बनारस घराणे प्राचीनतम आहे. घराण्याचे कुलदीपक घराण्याची मात्तबरी वाढवत असतात. अनेक दिग्गजांनी बनारस घराण्याची कीर्ती दिगंतास नेली.  

आज या सर्व गोष्टींचा उहापोह करण्याचं कारण, या घराण्याच्या किर्तीमान गायक द्वयी पैकी पंडित राजन मिश्रा यांनी इहलोकी रंगात असलेल्या मैफिलीत अचानक भैरवीचे सूर आळवले. शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीताच्या गांगौघा मध्ये पंडित राजन-साजन मिश्रा एखाद्या हंसांच्या जोडी सारखे होते. रविवार २५ एप्रिल २०२१ रोजी पंडित राजन मिश्रा यांच्या निधनामुळे हे बनारसी अद्वैत भंग पावलं. हंसो का जोडा बिछड गया. संगीताच्या चाहत्यांवर खरोखरच जुल्म झाला.

सहगान अद्वैत

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात जुगलबंदीची परंपरा आहे. ज्यामध्ये दोन भिन्न भिन्न कलाकार स्वत: ची कला सादर करतात किंवा एकमेकांची कल्पना पुढे नेतात. परंतु मेंदूच्या कोपऱ्यात कुठेतरी हलकी का होईना, यात कुठेतरी एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याची सुप्त इच्छा असते. पंडित राजन साजन मिश्रा हे पन्नास वर्षे एकत्र गात होते, पण त्यांच्या सादरीकरणात  जुगलबंदीच्या ह्या भावाचा अभाव कायमच प्रकर्षानं दिसत आला. त्यांच्या प्रस्तुतीकरणाला सहगायनाची बैठक होती जुगलबंदीची नाही आणि हा संस्कार त्यांना गुरूंकडून  मिळाला होता. 

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा दरम्यान गोव्यात मला या पंडित द्वयींशी प्रत्यक्ष भेटीची सुसंधी लाभली. पंडित साजन जी यांना असे म्हणताना ऐकले आहे की, संगीतात स्पर्धेला थारा नसतो ती एक निखळ आनंदाची अनुभूती  देण्या घेण्याची कला आहे. ज्यात परस्परांच्या गायनाचा वादनाचा समादर राखत श्रवणानंद घेतल्याने आनंदाचे डोही आनंद तरंग उठतात. प्रत्येकाच्या अंतरंगी वास करत असलेल्या परमात्म्याला रिझवण्यासाठी संगीताचे प्रयोजन आहे.

'रसिला पान और सुरिला गान' हीच तर बनारस ची खरी ओळख आहे. या घराण्याचे शागीर्द पंडित राजन मिश्रा यांनी बनारस घराण्याच वैशिष्ट्य कथन करताना कुठल्याशा मुलाखतीत अस म्हटलं होतं की बनारस मध्ये संगीताच्या श्रवणाची नाही तर सेवनाची परंपरा आहे. ते अभिमानपूर्वक सांगत की धृपद धमार सहित  ख्याल, चैती, टप्पा, ठुमरी, कजरी अश्या सर्व गायन शैलींचा समावेश असलेल बनारस हे एकमेव घराण आहे. धृपद धमार च्या मींड, गमक आणि गांभीर्या बरोबरच ठुमरीच्या लावण्याचा ही साक्षात्कार घडवणे हे बनारस घराण्याच प्रमुख बलस्थान आहे.

सुरेल भवताल

आजोबा पंडित बडे रामदासजी यांचे गंडा बद्ध शागिर्द राजन साजन यांना त्याचे वडील पंडित हनुमान प्रसाद मिश्रा आणि काका गोपाळ मिश्रा यांच्या कडून संगीत तालीम  लाभली. बनारसचा कबीर चौरा मोहल्ला हे पंडित राजन साजन यांचे जन्मस्थान आहे. इंग्रजीत अशी म्हण आहे 'Born with a silver spoon in one's mouth' त्याच धर्तीवर, हे  दोन भाऊ सूर, ताल आणि नाद कानात घेऊनच जन्माला आले आणि मोठे झाले. पंडित किशन महाराज, पंडित समता प्रसाद, सितारा देवी जी, गिरिजा देवी जी, गोपी किशन जी असे कितीतरी थोर कलाकारही या कबीर चौरा भागात वास्तव्यास होते. देशात कला संस्कृतीच्या क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांचे सुमारे डझन भर मानकरी हे याच  भागातील आहेत आणि म्हणूनच ही गल्ली पुढे पद्म गल्ली म्हणून ही ओळखली जाऊ लागली.

अश्या प्रकारे भवताल सूर, लय, ताल आणि आणि नाद यांनी भारलेले होते. याच परिसरातील कबीर मंदिरात भक्तिभावाने गायली जाणारी भजनं आणि सभोवती होणारी संगीत साधना बालपणी त्यांच्यासाठी प्रेरणास्रोत ठरली. तथापि, त्यांच्या गायकी वर गुरु पिता हनुमान प्रसाद यांचा प्रभाव होता. राजन जी म्हणत असत की वडील त्यांना सहसा आठ नऊ तास सलग रियाझ करू देत नसत. दोन अडीच तासांच्या तीन ते चार सत्रात स्वरसाधनेचे ते पक्षधर होते.

पंडित राजन साजन जी यांचे हे सौभाग्य होते की त्यांना कधीही घराण्याच्या संकीर्ण शृंखलां मध्ये जखडले गेले नाही. पंडित राजन जी सांगत की त्यांचे गुरू, वडील पंडित हनुमान प्रसाद जी संगीताला परमेश्वराची पुष्पवाटिका मानत. ते म्हणायचे, " बागेत जेवढे गुलाबाचे महत्त्व तेवढेच जुई, चमेलीचे देखील आहे. जे जे चांगले आहे ते स्वीकारत रहा आणि वाईटाकडे दुर्लक्ष करा." पंडित राजन साजन जी यांनी हे सूत्र मंत्रागत जपले आणि संगीत आराधना सुरू ठेवली. "त्यांचे संगीत आपल्याला बनारसच्या मूर्त माती पासून रागांच्या अमूर्त भव्यते कडे घेऊन जाते." त्यांच्या कलाप्रवाहाच असं  अत्यंत मार्मिक वर्णन माझ्या वाचनात आले. 

अंतिम अभिलाषा

पंडित राजन जी असं म्हणायचे की, तानसेन न सही पण कानसेन बनण्यासाठी मिटलेले नयन आणि मनमोकळ हृदय हे अत्यंत  प्रभावी सूत्र आहे. करिअरच्या सुरुवातीच्या बऱ्याच भौतिक आकांक्षा होत्या, पण आता या टप्प्यावर त्या निमाल्या असून आता त्या क्षणाची अभिलाषा आहे जेव्हा आपल्याच गाण्याने आपल्याच नेत्रातून अश्रू प्रवाहित होतील. 

ते आपल्या श्रोत्यांना प्रार्थना करायला सांगत की जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत गाणे चालू राहावं आणि ज्या क्षणी गाणे थांबेल त्या क्षणी या शरीराचा ही विलय व्हावा. कुणास ठाऊक, आम्हा श्रोतांच्या प्रार्थनेत काही त्रुटी राहिली की त्यांनी स्वतःच 

"धन्य भाग सेवा का अवसर पाया

चरण कमल की धूल बना में

मोक्ष द्वार तक आया"

हे भजन स्वर्गीय मैफिलीत आळवण्याचे मनावर घेतले होते. पंडित राजन साजन मिश्रा हे सुवर्णमहोत्सवी अद्वैत पंडित राजन जी यांच्या अचानक निघून जाण्याने भंग पावले. मिश्रा कुटुंब शोक व्याकूळ आहे.


पंडित साजन जी यांनी आपल्या आयुष्यातील एका अटळ सत्याला सामोरे जात असताना खाजगी व्हॉईस मेसेज द्वारे आपल्या भावना इथे व्यक्त केल्या ... "आमचे गुरु स्वरूप अग्रज पंडित राजन जी यांच्या रुपात आम्ही नक्कीच एक हिरा गमावला आहे. परंतु त्यांच्या सुरेल आवाजा द्वारे जोपर्यंत आकाशात सूर्य तळपत आहे तोपर्यंत या हिऱ्याची चमक आपल्या सोबत राहील. मला तर आजही असच वाटत की ते कोठेही गेले नाहीत, ते माझ्या अंतर्यामीच आहेत, आमच्या संपूर्ण कुटुंबा समवेत आहेत." पंडित राजन मिश्रा यांना श्रद्धांजली अर्पण करत असतांनाच, मोठ्या भावाला सावली प्रमाणे साथ देणाऱ्या पंडित साजन मिश्रा यांना बनारस घराण्याची गानगंगा पुढेही प्रवाहित ठेवण्यासाठी ईश्वर बळ देवो आणि बनारस संगीताचा हा अनमोल वारसा वृद्धिंगत होवो हीच प्रभू चरणी प्रार्थना.


नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com

8851440881

टिप्पण्या

  1. अत्यंत सोप्या पद्धतीने पंडितजींना आदरांजली वाहिली तसेच त्यांच्या जीवनपट सुंदर आणि अलगद पणे उलगडला या बद्दल नितीन जी आपले.खूप खूप आभार आणि धन्यवाद

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक