स्मृतिबनातून - शरणं अय्यप्पा स्वामी शरणं अय्यप्पा
शरणं अय्यप्पा स्वामी शरणं अय्यप्पा
रात्री सुमारे आठ ची वेळ. ठाणे शहरात एरव्ही ह्यावेळी फार गजबज असते. मात्र कोरोना संसर्गाचा प्रकोपामुळं परिस्थिती काहीशी सुसह्य होती. संध्याकाळची रपेट संपवून मी व सौ घरी परतत असतानाच परतीच्या वाटेवर वाऱ्याच्या झुळूके बरोबर अचानक भावपूर्ण सुरावट लहरत आली. नकळत पाऊलं तिचा माग घेत गेली आणि आम्ही अय्यपा मंदिरात जाऊन पोहोचलो. पारंपरिक रचनेचं सुबक छोटेखानी मंदिर. गावाची आठवण हलकेच मनात जागृत करणारं. पुढची दहा पंधरा मिनिटं, एकाच वेळी कानी, मनी आणि नयनी धन्यता लाभली. गाभाऱ्यात फक्त तेलाच्या दिव्यांची योजना. स्वामीं समोर आणि भोवताल मिळून शंभर एक दीपकळ्या नर्तन करत होत्या. गाभारा सुवर्णमय उजळून गेला होता. समोरच्या दीपमाळेवरही चिमुकल्या दीपशिखांचा तेजःपुंज आविष्कार डोळ्यांच पारणं फेडीत होता.
हळुवार ताल धरीत, संथ लयीत, अद्वितीय स्वरात, निरतिशय भावपूर्ण कर्णमधुर 'हरीवरासरम्' श्रवणानंदाची अनुभूती देत होतं. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मनात असलेल्या सागरी लाटा, सरोवरात लहरणाऱ्या लाटां मध्ये रुपांतरीत झाल्याचं जाणवलं. आसमंतातील भारलेपण इतकं विलक्षण होतं की हृदयावर ते कायमचं कोरलं गेलं.
कर्नाटक संगीतातल्या मध्यमावती रागात संगीतकार जी.देवराजन यांनी चेन्नई इथे राहणारे कंबनकुडी कुलथूर अय्यर यांची (या बाबत काही प्रवाद आहेत) 'हरीवरासानं' ही अष्ट श्लोकी, एकप्रकारचा शरण मंत्र, फारच गोड बांधला आहे. "ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस" या उक्ती नुसार अयप्पा भक्त पार्श्र्वगायक के.जे. येसुदास यांनी आपल्या अद्वितीय आवाजात, वळणदार गळ्यानं, अत्यंत भावपूर्ण गाऊन, स्वामी अय्यप्पाला ती समर्पित केली आहे. काही काही रचना परमेश्वर खास स्वतः साठी घडवून घेत असावा बहुदा. स्वामी अय्यपा मंदिरांतून रात्री मंदिर बंद होण्यापूर्वी सर्वदूर देवाला जणू काही पाळणा गायला जातो. मात्र प्रत्यक्षात ते भक्तांकडून स्वामी अय्यप्पांना आम्ही तुला शरण आलो आहोत हे सांगणारं नम्र निवेदन आहे.
असं सांगतात की स्वामी विमोचनानंद यांनी १९५५ साली सबरीमाला येथील अयप्पा स्वामी मंदिरात प्रथमच हा अष्टकम पाठ केला. मुख्य पुजारी आणि अन्य पुजारी अय्यप्पा स्वामींच्या दोहो बाजूंनी उभे राहून ही प्रार्थना करतात. प्रार्थना जसजशी पूर्ण होते गाभाऱ्यात केवळ मुख्य पुजारी असतात आणि एक एक करून स्वामींसमोर तेवणाऱ्या त्या दिपकळ्या पैकी, नाममात्र वगळता, निमावल्या जातात. आणि गर्भगृहाची दारं बंद केली जातात. सध्या वर उल्लेखिलेलं येसुदास यांच्या आवाजातील 'हरिवरासनं' गायलं जातं.
श्रीहरिहरात्मजाष्टकम्
हरिवरासनं विश्वमोहनम्
हरिदधीश्वरमाराध्यपादुकम् ।
अरिविमर्दनं नित्यनर्तनम्
हरिहरात्मजं देवमाश्रये ॥ १ ॥
जो परम सिंहासनावर विराजमान आहे, जो साऱ्या विश्वाला मंत्रमुग्ध करतो, साक्षात सूर्य देवाला ज्याचे पवित्र चरण (हरिदधीश्वर - सूर्य) पूजनीय आहे, जो सत्कर्माच्या शत्रूंच मर्दन करतो, जो नेहमी असाधारण नर्तन करतो, अश्या हरिहराच्या आत्मजा! (शिव आणि मोहिनीचा पुत्र, मोहिनी हा भगवान विष्णूंचा अवतार समजला जातो. हरि आणि हाराचा पुत्र!) - मी तुझ्या आश्रयी आलो आहे.
शरणकीर्तनं भक्तमानसम्
भरणलोलुपं नर्तनालसम् ।
अरुणभासुरं भूतनायकम्
हरिहरात्मजं देवमाश्रये ॥ २ ॥
शरण गोषम ऐकून ज्याचे मन आनंदित होते, जो चराचराचा स्वामी आहे, ज्याला नृत्य अत्यंत प्रिय आहे, ज्याचे प्रभा मंडळ भास्करा प्रमाणेच तेजोमयी आहे, जो सर्व प्राणीमात्रांचा अधिपती आहे अश्या हरिहराच्या आत्मजा! मी तुझ्या आश्रयी आलो आहे.
प्रणयसत्यकं प्राणनायकम्
प्रणतकल्पकं सुप्रभाञ्चितम् ।
प्रणवमन्दिरं कीर्तनप्रियम्
हरिहरात्मजं देवमाश्रये ॥ ३ ॥
ज्याचा आत्मा सत्य आहे. जो सर्व आत्म्यांना प्रिय आहे. ज्याने हे ब्रम्हांड निर्मिलं, जो चमकत प्रभामंडळ धारी आहे, जो तुम्ही विचारली ती ॐ च निवास स्थान असून संगीतप्रेमी आहे अश्या हरिहराच्या आत्मजा! मी तुझ्या आश्रयी आलो आहे.
तुरगवाहनं सुन्दराननम्
वरगदायुधं वेदवर्णितम् ।
गुरुकृपाकरं कीर्तनप्रियम्
हरिहरात्मजं देवमाश्रये ॥ ४ ॥
जो अश्वारूढ आणि सुमुख आहे, गदाधारी आहे, वेदांनी ज्याचे वर्णन केले आहे, जो सद्गुरुं प्रमाणे कृपासिंधु आहे, ज्याला संगीत प्रिय आहे अश्या हरिहराच्या आत्मजा! मी तुझ्या आश्रयी आलो आहे.
त्रिभुवनार्चितं देवतात्मकम्
त्रिनयनप्रभुं दिव्यदेशिकम् ।
त्रिदशपूजितं चिन्तितप्रदम्
हरिहरात्मजं देवमाश्रये ॥ ५ ॥
ज्याचे त्रिभुवनात पूजन होते, जो दैवी अस्तित्वाचा आत्मा आहे, देवही ज्याची उपासना करतात असा जो त्रिनेत्री भगवान आहे. सर्व कामनांची पूर्तता करणारा आहे अश्या हरिहराच्या आत्मजा! मी तुझ्या आश्रयी आलो आहे.
भवभयापहं भावुकावकम्
भुवनमोहनं भूतिभूषणम् ।
धवलवाहनं दिव्यवारणम्
हरिहरात्मजं देवमाश्रये ॥ ६ ॥
जो भवताप हरण करतो, जन्ममृत्यूची भीती नाहीशी करतो जो पालनकर्ता आहे, अखिल विश्वावर ज्याचे गारूड चालते, जो भस्मालंकारीत आहे, श्वेत गज ज्याचे दिव्य वाहन आहे अश्या हरिहराच्या आत्मजा! मी तुझ्या आश्रयी आलो आहे.
कलमृदुस्मितं सुन्दराननम्
कलभकोमलं गात्रमोहनम् ।
कलभकेसरीमाजिवाहनम्
हरिहरात्मजं देवमाश्रये ॥ ७ ॥
आशीर्वाद देत असताना ज्याच्या सुवदना वर कोमल मंद स्मित रुळतं, ज्याच्या दिव्य दर्शनाने धन्यता लाभते, गजा साठी जो सिंह आहे आणि जो वाघावर आरूढ आहे. अश्या हरिहराच्या आत्मजा! मी तुझ्या आश्रयी आलो आहे.
श्रितजनप्रियं चिन्तितप्रदम्
श्रुतिविभूषणं साधुजीवनम् ।
श्रुतिमनोहरं गीतलालसम्
हरिहरात्मजं देवमाश्रये ॥ ८ ॥
शरणागत भक्तजनां साठी जो दयार्द्र आहे, मनोकामना पूर्ण करणारा आहे,जो वेदालंकारीत आहे, सज्जनांचा प्राण आहे, ज्याच्या दिव्यत्वाची श्रुतींनी स्तुती केली आहे आणि जो दैवी संगीत श्रवणाने सुखावतो अश्या हरिहराच्या आत्मजा! मी तुझ्या आश्रयी आलो आहे.
॥ इति श्री हरिहरात्मजाष्टकं सम्पूर्णम् ॥
Hariharasanam yesudas origanal
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
8851540881
फार सुंदर. कशी ऐकलं नव्हतं 'हरिवरांसरम' पण आता ऐकावसं वाटतंय. फार रसाळ वर्णन केलंय तुम्ही सर.
उत्तर द्याहटवाधन्यवाद राधिका.
हटवाअप्रतिम भक्तिअष्टक आणि अत्यंत प्रभावी अनुवाद. आनंद वाटला.
उत्तर द्याहटवाधन्यवाद.
हटवासर, खूपच सुंदर झालाय लेख वेगळी माहिती मिळाली , मंदिरातील अनुभवाला देवता व संगीत यांसोबत उत्तम गुंफले आहे.
हटवाअनेक धन्यवाद
हटवाखूपच छान वाटले वाचताना. फोटो🙏🙏🙏
उत्तर द्याहटवा🙏🙏
हटवाNitinrao khupach chhan watle.
उत्तर द्याहटवाRAJESH PADHYE
हटवाDhanyawad
हटवाछान लेख. वेगळी ओळख.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाबहुत ही सुंदर लेखन। श्रीहरिहरात्मजाष्टकम् का भावानुवाद अप्रतिम है। अभिनंदन 💐
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवानितीनजी तुमच्या व्यक्तिमत्वचा हा वेगळाच पैलू आज दिसला. खूप सुंदर लेख. त्या मंदिरातच जाऊन आल्याचा अनुभव दिलात. "शंभर दीपकळ्या नर्तन करत होत्या." "गाभारा सुवर्णमय उजळून निघाला होता." सारखी वाक्ये तुमच्या ललित लेखणीची साक्ष देतात. खूपच सुंदर ललित वाचायला मिळाले. धन्यवाद!.
उत्तर द्याहटवामनस्वी धन्यवाद
उत्तर द्याहटवाखुप छान लिहिले आहेस काका .
उत्तर द्याहटवा🙏
उत्तर द्याहटवाएक नितांत सुंदर अनुभव दिलास रे...!! लेखाची सुरवात आणि शेवट दोन्ही शांत आणि पवित्र !! गाणं ऐकताना नकळत डोळे बंद झालेत आणि हात जोडल्या गेलेत.
उत्तर द्याहटवा