प्रासंगिक - दाता भवति वा न वा
'दाता भवति वा न वा'
निराशेच्या गर्तेत आशेचा दिवा
आज काल वर्तमानपत्र किंवा अन्य माध्यमांत प्रामुख्याने हिंसाचार, दहशतवाद, भ्रष्टाचार, नैसर्गिक आपत्ती, जाळपोळ, रोगराई, संकीर्णतावाद अशा बर्याच नकारात्मक बातम्यांना सामोरे जावे लागते. वस्तुनिष्ठ विचारसरणीच्या लोकांनासुद्धा उदासपणा, हतबलता, खिन्नता अश्या भावनांचा सामना करावा लागतो. मानवाच्या अस्तित्वालाच आव्हान देऊ पाहणाऱ्या सध्याच्या कोरोना आपत्ती काळात जेव्हा आशेची किरणे दिवसेंदिवस धूसर होत असल्या सारखे चित्र आहे, तेव्हा आपल्यातीलच काही सामान्य लोकांच्या असामान्य कामगिरी मुळे मनाला उभारी येते. मानव आणि मानवीय नाते संबंधावर, नात्यावर कुठलीही आंच येणार नाही असा विश्वास जागवतो.
संपूर्ण देश कोरोना मुक्त होण्यासाठी निकराचे प्रयत्न करत आहे. रुग्ण संख्येच्या प्रमाणात संसाधने नसतांना, थोड्याफार त्रुटी आढळत असल्या तरी देखील, सरकार,सामाजिक संस्था आपल्या क्षमतेनुसार कार्यरत आहेत. अश्यावेळी काही लोकांनी स्वयं प्रेरणेने, स्वत: यथाशक्ती मदतीचा हात पुढे करून समाजात मानवतेची ज्योत तेवत ठेवली आहे.
1. ऑक्सिजन दाता
नागपूर येथील प्यारे खान यांची कहाणी याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. प्यारे खान एक परिवहन कंत्राटदार आहेत. संपूर्ण देशात ऑक्सिजनची कमतरता भासत असताना नागपुरातही ऑक्सिजनच्या अभावामुळे कोरोना रुग्णां समोर जीवन मरणाचा प्रश्न उभा ठाकला होता. त्यावेळी प्यारे खान यांनी स्वतः सुमारे 1 कोटी रुपये खर्च करून दोन ऑक्सिजन टँकर द्वारे सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन उपलब्ध करून देऊन माणुसकीचा अनोखा परिचय दिला.
नागपूर आणि विदर्भात कोरोना रूग्णांची संख्या अचानक दिवसेंदिवस वाढत होती आणि 'ऑक्सिजन बेड' च्या कमतरते मुळे रुग्ण आणि कुटुंब सचिंत होते. रमजान महिन्यात लोकसेवेहून अधिक मोठे पुण्य नाही आशा विचाराने प्यारे खान यांनी 5 ते 40 लाख रुपये खर्च केले आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, एम्स, मेयो अशा अनेक रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट पुरवला.
नागपुरात दररोज सुमारे 200 टन द्रव वैद्यकीय ऑक्सिजन आणण्याचे प्रयत्न केले गेले आणि दररोज 19 ट्रकमधून सर्व सरकारी रूग्णालयात आवश्यकतेनुसार ते वितरीत केले जायचे. नागपुरात पुरवठा केल्यानंतर विदर्भात आवश्यकतेनुसार ऑक्सिजन देण्यात आला. ऑक्सिजनचा खर्च सरकार उचलत असताना वाहनांचा रखरखाव, वाहक आणि सहवाहक यांचे वेतन आदी खर्च प्यारे खान यांनी वहन केले. ते सांगतात की हे काम पाहता संपूर्ण विदर्भातील सरकारी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्या कंपनीवर सोपविली गेली.
2. इदं न मम
ही आणखी एक कहाणी. पश्चिम महाराष्ट्राच्या साताऱ्याचे मूळ निवासी मोहनराव कुलकर्णी उपजिविकेसाठी मुंबई जवळ अंबरनाथ इथे आले, स्थायिक झाले आणि आता मुंबईत वास्तव्य करतात. वय 65 वर्षांचे आहे. चाळीस वर्षे एका खासगी कंपनीत नोकरी करून जी काही बचत झाली, फंड मिळाला त्याच्या व्याजाच्या उत्पन्नावर उदरनिर्वाह चालवतात. दोन वर्षांपूर्वी त्यांची अर्धांगिनी त्यांना कायमची सोडून गेली. सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू आहे. मोहनराव यांची कर्मभूमी अंबरनाथ येथील रहिवासीही कोरोना संकटाचा सामना करीत आहेत. अंबरनाथ नगर परिषदने रहिवाशांसाठी 700 खाटांचे कोविड केंद्र सुरू केले. ज्यामध्ये 500 ऑक्सिजन बेड आहेत. या केंद्राला संसाधनांची कमतरता भेडसावू लागल्यामुळे समाज माध्यमांद्वारे जनतेला मदतीचे आवाहन केले गेले. मुकुंदराव यांच्या ते पाहण्यात आले. त्यांच्याकडे साडेचार लाख रुपयांची तरतूद होती. त्यांनी नगर परिषदेत फोन करून रुग्णवाहिका भेट देण्याची इच्छा बोलून दाखवली. नगर परिषदेकडे रुग्णवाहिका आहेत मात्र कोविड केंद्राला व्हेंटिलेटर ची आवश्यकता असल्याने तो देण्याची विनंती नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांनी केली. व्हेंटिलेटरसाठी सहा साडे सहा लाख निधी आवश्यक होता, त्यामुळे कमी पडत असलेले दोन अडीच लाख कर्जाऊ घेऊन कोविड केंद्राच्या व्हेंटिलेटरची गरज भागवली.
स्वत: कडे भरपूर असताना त्यातला काही भाग देण्याचे औदार्य दाखवणारे तर आज ही समाजात दिसतात. पण ऋण काढून, असा सण साजरा करण्याची मोहनराव यांची ही कृती केवळ प्रशंसनीयच नाही तर अनुकरणीय देखील आहे.
3. सर्वोच्च त्याग
शतेषु जायते शूर: सहस्रेषु च पण्डितः। वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा ।।
ह्या संस्कृत सुभाषितात असे म्हणले आहे की भाग्यात असेल तरच व्यक्ती दानवीर होते अन्यथा होत ही नाही. जीवन क्षणभंगूर, नश्वर आहे हे नीटपणे ठाऊक असूनही, दानशूरता सहज सर्वांच्या पचनी पडत नाही. मृत्यूनंतर शरीर दान करण्यासाठीही जनजागृती करण्याची गरज पडते. अशा परिस्थितीत जर जीवन जगत असतानाच देहदान, प्राणदान याची तर कल्पना ही मनाला शिवणार नाही. नागपूरचे नारायणराव दाभाडकर यांनी ही दुर्मिळ कल्पना एक प्रकारे प्रत्यक्षात उतरवली.
स्वत: नारायणराव, त्यांची मुलगी आणि कुटुंबीय कोरोना ग्रस्त होते. त्यांची स्वतःची प्रकृती अधिकच बिघडली. त्या नंतर अथक प्रयत्नांनी त्यांना शहरातील इंदिरा गांधी महापालिका रुग्णालयात दाखल होता आले. त्यांची ऑक्सिजन पातळी 50/55 वर होती, म्हणून ऑक्सिजन दिला जात होता. रूग्णालयात असताना त्यांना जाणवले की बेड अभावी अनेक तरुण रुग्ण योग्य उपचारा शिवाय कोरोनाची आहुती होत आहेत. ही जाणीव त्यांना अधिकच अस्वस्थ करून गेली. त्यांना असे वाटले की आपण 85 वर्षे आयुष्याचा उपभोग घेतल आहे. आज जेव्हा ' बेड ' अभावी तरुण मंडळी प्राणास मुकत आहे तेव्हा आपला ' बेड ' कुणा अधिक गरजू रुग्णाला मिळायला हवा. त्यांनी आपले मनोगत मुलीला सांगितले आणि रुग्णालयातून प्रथम आपल्या घरी आणि नंतर निजधामी निघून गेले. एका सामान्य नागरिकाच्या प्राण दानाची ही कथा निःशब्द करून जाते.
' वो सुबह कभी तो आएगी '
या प्रातिनिधिक कहाण्या आपणाला हा दिलासा जरूर देतात की घाबरण्याचे कारण नाही. आज कोरोना काही मानवी जीवांवर घाला घालताना दिसत असला तरी मानव आणि मानवतेचा पराभव करणे कोरोनासाठी कठीणच नाही तर अशक्य आहे.
नितीन सप्रे
8851540881
nitinnsapre@gmail.com
अप्रतिम झालाय लेख !!
उत्तर द्याहटवाकोरोनाच्या काळात ह्या अशा असामान्य लोकांमुळेच सामान्य लोक कोरोनाशी झुंज देऊ शकताहेत.
मानाचा मुजरा !!