स्मृतिबनतून - 'मी फूल ठेवुनी गेले'

 'मी फूल ठेवुनी गेले'





मराठी सुगम संगीताच्या (Light Music) अवकाशाचं वर्णन 'लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया' असच करावं लागेल. गीतकार, रचनाकार आणि गायकांनी आपलं सर्वस्व पणाला लावून अनेक अजरामर गीतं घडवली आहेत. अनेक गीतां मध्ये शब्द, सूर, चाल यांचा समसमा संयोग झालेला प्रत्ययास येतो. त्यांचा चोखंदळपणे रसास्वाद घेतला तर आपण अक्षरशः श्रवणानंदात लीन होऊन जातो. मन एका आगळ्याच अनुभूतीच्या अनुभवाने तृप्त होतं.



कविवर्य मंगेश पाडगावकर(Mangesh Padgaonkar) यांच्या एका परिचित भावगीताशी आकाशवाणीच्या(All India Radio) दिवसात माझी अधिक सलगी झाली, चीरपरिचय झाला. तुमचा परिचय कदाचित असेल नसेल म्हणून सविस्तर ओळख करून देण्याचा हा प्रयत्न. 

सशक्त प्रतिकं योजून मानवी भावनांचा अविष्कार साधण्यात मंगेश पाडगावकर यांचा हातखंडा. 'तुझ्याच साठी होते केवळ फुलले'  या गीता मध्ये तर तीच्या प्रांजळ अव्यक्त भावना व्यक्त करण्यासाठी मंगेश आणि मंगेशकर यांना साक्षात विश्वनाथानीच साथ केल्यामुळे ती रचना, रसिक मन कायमचं काबीज न करती तरच नवल. 


प्रीत भावनेत शब्दा वाचून शब्दांच्या पलीकडले कळवू शकणाऱ्या अबोलपणाला तोड नाही आणि म्हणुनच केवळ फुल अर्पण करूनही ह्या मूक नायिकेच्या भावना आपल्या काळजाला थेट बिलगतात कारण नायका कडून उपेक्षा पदरी पडल्या नंतरही प्रीती विचलित होत नाही, अढळ रहाते आणि ती, ते फुल त्याच्याच वाटेवर ठेवून निघून जाते.

 जे तुझ्याच साठी 

    होते केवळ फुलले 

वाटेत तुझ्या मी 

  फूल ठेवूनी गेले 


वैभवाच्या राजपथावर नावलौकिक आणि जयजयकारा सारख्या लब्ध करणाऱ्या काहीशा कैफात त्याच्या कडून तीच्या अलौकिक भावनांची अपसुक पणे उपेक्षा झाल्याने ती एकाकी होते. त्याच्या कडून दुर्लक्षित झाल्याच्या जाणिवेने तिला साहजिकच अश्रू अनावर होतात. 


रथ ऐश्वर्याचा 

       या वाटेने गेला 

जयघोष तुझा मग 

       सर्व जगाने केला 

मी दूर एकटी 

        माझे डोळे ओले 

वाटेत तुझ्या मी फूल ठेवुनी गेले


कुसुमे जशी आपल्या रूप, रंग, गंधा बद्दल कधीही वाचाळ होत नाहीत. त्याप्रमाणेच ही प्रीत भावना प्राजक्ता सारखी सुकुमार, प्रांजळ आणि सलज्ज असल्याने तिचा ही बोलबाला न करता ती हृदय मंदिरीच जागवलेली असते. पुजलेली असते. अधरांवर येण्याचा अधिरपणा ती चुकूनही करत नाही. 


त्या फुला सारखी 

       अबोल माझी प्रीत

ती अबोल पूजा 

      या माझ्या हृदयात 

नच ओठावरती 

      नाव तुझे कधि आले 

वाटेत तुझ्या मी फूल ठेवुनी गेले


तिच्या हृदयातली ही अबोल अव्यक्त प्रीत त्याला आकळतच नाही. त्यामुळे ती कष्टी जरूर होते. मात्र आपल्या प्रितीच्या सच्चेपणाचं जणूकाही प्रमाण देत ती, त्याच्या वर कुठलाही बोल येऊ नये याची काळजीही घेते. प्रितीची तऱ्हाच निराळी असते. इथे प्रेम करणारा माणूस स्वतः दुःख, अवहेलना सहन करेल पण प्रियाला कल्पनेतही दुःखी कष्टी बघू शकत नाही. राजा मेहेदी अली खान(Raja Mehedi Ali Khan) यांची नायिका तर नायका कडे काय मागणी करते? " इन आँखो में न अब मुझको कोई आँसू नजर आए, सदा हसती रहें आंखे सदा ये होठ मुसकाये, मुझे तेरी सभी आहें सभी दर्द-ओ-अलम दे दो अगर मुझ से मुहब्बत है", इथेही ती अतिशय समजूतदारपणे त्याच्या कडून कळत नकळत झालेल्या उपेक्षेचे एकप्रकारे समर्थन करते. म्हणते, अरे जिथे त्या सर्वज्ञानी, दीनदयाळ परमेश्वराला ही माझ्या जीवाचा तगमगीचं नीटस आकलन झालं नाही तिथे तुला कस बरं हे कळणार? आणि मग दुरूनच मनातल्या मनात तळमळत अलक्षित असलेली ती, त्याच्या वाटेत ठेवलेल्या पुष्प कोषात आपलं हृदय ठेवून निघून जाते. कदाचित त्याच्या पर्यंत पुष्पगंधाच्या सोबतीने आपल्या अंतरीच्या भावना ही पोहचतील ह्या अपेक्षेने.


तुज कसे कळावे? देवा 

             नाही कळले 

मी दूर अलक्षित 

       तुजसाठी तळमळले 

त्या फुलात माझे 

       हृदय ठेवूनी गेले 

वाटेत तुझ्या मी फूल ठेवुनी गेले


उपेक्षित नायिकेच्या मनीची व्यथा, तिची तळमळ आणि प्रांजळपणा अतिशय सहज शब्द रचनेतून मंगेश पाडगांवकरांनी अविष्कृत केला आहे. आपल्या हळव्या, तप्त सुरांनी उषा मंगेशकर(Usha Mangeshkar) यांनी तो तितकाच सुरेल फुलवला आहे. आणि 'शब्द शब्द जपून ठेवत', 'हृदयात दाटलेला पण हृदयातच राहिलेला', हा 'गंध फुलांचा', संगीतकार विश्वनाथ मोरे यांनी अप्रतिम रचनेद्वारे आपल्या पर्यंत पोहोचवला आहे. शब्द, सूर, चाल यांचा समसमा संयोग म्हणतात तो यालाच.


YouTube जे तुझ्याच साठी होते केवळ फुलले





नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com

8851540881




टिप्पण्या

  1. सुगम संगीतातलं एक उत्तम गीत आपण लिहून जगाला नव्याने ओळख करून दिलेत आपली लेखणी वाचनीय आहे

    उत्तर द्याहटवा
  2. खूप सुंदर रसग्रहण. वा कया बात है. मस्त.

    उत्तर द्याहटवा
  3. खुपच सुंदर. मनाला भिडणारे शब्द व सूर 👑👍🙂

    उत्तर द्याहटवा
  4. अबोल अगम्य भावना सुगम संगीतातुन सहज बोलकी केली पाडगावकरांनी!राज मेहदींच्या शब्दांची झालरच मिळाली!छान जमला अाहे लेख!एक विनंति अाहे,शांता शेळके यांचे उषाताईंनी गायलेले भास एक स्वप्नातला हेगीत अाहे...त्यावर काही लिहिल्यास वाचायला अावडेल.

    उत्तर द्याहटवा
  5. नेहमीप्रमाणे अर्थपूर्ण लेख।फोटो सुंदर, गाणं अप्रतिम.

    उत्तर द्याहटवा
  6. एका भावस्पर्शी गाण्याची तितकीच मधुर आठवण.असा अलक्षीत पण अनमोल ठेवा आकाशवाणीवरच ऐकायला मिळतो.तुम्ही तो जपलाय आणि रसिकांपुढे अलवारपणे ठेवला.खूप खूप धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक