स्मृतीबानातून - खय्याम : ठेहरिये होश में आऊ तो चले जाईएगा……….

 



खय्याम : ठेहरिये होश में आऊ तो चले जाईएगा……….



हिंदी चित्रपट संगीत जगता साठी पन्नास आणि साठ ची दशकं सुवर्णमयी होती. रोमांस आणि भावनांनी ओतप्रोत संगीत आणि एखाद्या रम्य सरोवरात वाऱ्याच्या मंद झुळकां मुळे  उठणाऱ्या सौम्य लहरीं सारख्या वाद्यमेळ्या सह गीताचे सौंदर्य वाढविण्यासाठी सुपरिचित

मोहंमद झहूर खय्याम हाश्मी

म्हणजेच  खय्याम यांनी पांच दशकां हुन अधिक काळ संगीत दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आपली अमीट छाप उमटवली. कवितेला सहज गातं करण्याची अनोखी कला त्यांना लाभली होती. 

लहानपणा  पासूनच खय्याम यांना शिक्षणात विशेष रुची नव्हती मात्र त्यांचा संगीता कडे ओढा होता. दिल्लीत काकां कडे पळून आलेल्या खय्याम यांना काकांनी शाळेत दाखल तर केलं मात्र चित्रपट सृष्टीचं त्याला असलेलं आकर्षण पाहता काकांनी त्याला संगीत शिकण्याची मुभा दिली. 

पंडित अमरनाथ हे खय्याम यांचे गुरू. अभिनयाच्या संधीच्या शोधार्थ ते लाहोरला गेले. तिथे त्यांनी पंजाबी संगीत दिग्दर्शक बाबा चिस्ती यांचे कडे संगीत साधना सुरू केली. एके दिवशी चिस्ती  यांनी संगीत दिलेल्या रचनेचा मुखडा खय्याम यांनी गायला तेव्हा चिस्तीं यांनी खुश होऊन त्यांना सहायक म्हणून स्वीकारलं. त्यांनी सहा महिने ते काम केलं. दुसऱ्या महायुद्धाच्या(WW II )वेळी खय्याम काही काळ लष्करातही दाखल झाले होते. 

खय्याम यांनी आपल्या सांगितिक कारकिर्दीत सुमन कल्याणपूर, सुलक्षणा पंडित, येसुदास आदी गायकांकडून गीतं गाऊन घेतली. चित्रपट निर्मात्यांचा दबावही त्यांनी कधी फारसा सहन केला नाही. आशा भोसले मात्र त्यांच्या साठी विशेष गायिका होत्या. आशाजींनी त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी (1953) पार्श्वगायन केले ते थेट 2012 पर्यंत त्यांनी खय्याम यांच्याकडे गायन केले. आशा भोसले आणि मुकेश यांनी गायलेली वो सुबह कभी तो आयेगी, चीन-ओ-अरब आणि आसमा पे है खुदा ही चित्रपट गीतं आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. 'शोला और' शबनम या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनामुळे संगीत दिग्दर्शक म्हणून चित्रपट सृष्टीत  त्यांचे स्थान 

पक्क झालं.

 


त्यांनी अनेक लोकप्रिय गीतं दिली. मात्र, चांदनी रात है(दिल-ए-नादान), बहारो मेरा जीवन भी सवारो(आखरी खत), आखों में हमने(थोडीसी बेवाफाई), मोहब्बत बडे काम(त्रिशूल), ठेहरिये होश में आलू(मोहब्बत इसको कहते हैं), वो सुबह कभी तो(फिर सुबह होगी) दिल चीज क्या है(उमराव जान), कभी कभी मेरे दिल मे (कभी कभी) या काही गाण्यांमुळे आपण अजरामर झालो आहोत अशी खय्याम यांची भावना होती आणि ती रास्तही आहे.

राजेश खन्ना यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि आर.डी. बर्मन यांना राजेश खन्ना यांची प्रथम पसंती असे. मात्र मजनू चित्रपटाच्या वेळी खय्याम यांच्या बरोबर काम केल्यानंतर राजेश खन्ना यांनी, थोडीसी बेवाफाई, दिल-ए-नादान आणि दर्द या यशस्वी आणि संगीता साठी नावाजलेल्या चित्रपटांसाठी खय्याम यांना घेण्याबाबत दिग्दर्शक, निर्मात्यांना खय्याम यांचे नाव सुचवले होते. तलत मेहेमूद, आशाताई आणि किशोर कुमार यांना खय्याम यांची विशेष पसंती होती. अर्थात मोहम्मद रफी, लता दीदी आणि मुकेश यांनीही खय्याम यांच्या संगीत दिग्दर्शनात गीतं गायली आहेत. राजेश खन्ना व राखी ही खय्याम यांची  आवडती जोडी होती.

त्यांनी दाग, मिर्झा गालिब, वली साहेब, अली सरदार जाफरी, साहिर लुधियानवी, मजरूह सुल्तानपुरी, निजा फाजली, नक्स लायलपुरी, अहमद वसी,जान निसार अख्तर अश्या समकालीन(contemporary) तसच पूर्वसुरी(legend) दिग्गज कवी/गीतकारां बरोबर काम केलं. गीतकारांच्या निवडी संदर्भात ते फार चोखंदळ होते. संगीत दिग्दर्शनाच काम स्वीकारण्याच्या बाबतीतही ते अत्यंतिक चिकित्सक होते. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या रचनांपेक्षा नाकारलेल्या प्रस्तावांच पारडं अधिक भारी होतं. कदाचित म्हणुनच त्यांच्या संगीत रचनांमध्ये गायक आणि संगीताच्या बरोबरीने कवितेला/गीताला स्थान मिळालेलं दिसतं. ते कवी/गीतकाराला पूर्ण स्वातंत्र्य देत. यामुळेच त्यांच्या रचना अधिक काव्यात्मक, अर्थवाही, गेय आणि प्रासादिक वाटतात.


खय्याम यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार मिळाले. उत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी कभी कभी(1977), उमराव जान(1982) तसंच जीवन गौरव पुरस्कार(2010) त्यांना प्रदान करण्यात आले. उमराव जान साठी उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Award)त्यांना प्राप्त झाला. सृजनात्मक (Crietive) आणि प्रायोगिक (Experimental) संगीतासाठी त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने(Sangeet Natak Academy Award) गौरविण्यात आले. 2011 साली मानाचा असा पद्मभूषण पुरस्कार त्यांना भारत सरकार कडून प्रदान करण्यात आला. 1988-89 मध्ये त्यांना मध्य प्रदेश सरकारचा प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कार (Lata Mangeshkar Award) बहाल करण्यात आला.  या पुरस्कार समारंभासाठी खय्याम कुटुंबीय इंदूरला आले होते. मी ही त्यावेळी आकाशवाणीच्या सेवेत होतो आणि योगायोगाने कार्यालयीन कामासाठी इंदूर दौऱ्यावर होतो. त्यामुळे मला आकाशवाणी इंदूरच्या स्टुडिओत संगीतकार खय्याम, त्यांची पत्नी गायिका जगजीत कौर (Jagjeet Kaur)आणि मुलगा प्रदीप यांच्या समवेत अनौपचारिक बातचीत करण्याची संधी मिळाली. त्यांच्याशी हिंदी चित्रपट संगीता संबंधित अनेक पैलूंवर मनसोक्त गप्पा झाल्या. त्यांच्या मुलाचा एक चित्रपट त्या सुमाराला येऊ घातला होता.




पुढे दुर्दैवानं त्याचं हृदय विकारामुळे अकाली निधन झालं. खय्याम परिवारासाठी हा फार मोठा आघात होता. मात्र या घटनेला ते धैर्याने सामोरे गेले. जगजीत कौर यांनी त्या नंतर सर्व संपत्तीचा ट्रस्ट करून गरजू प्रतिभावान कलाकारांना मदत करण्याचा प्रस्ताव खय्याम यांच्या समोर ठेवला आणि त्यांच्या 90 व्या वाढदिवशी दागदागिने, राहतं घर आणि जमा पुंजी मिळून सुमारे 10 करोड रुपयांची संपत्ती या ट्रस्टला देण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

इंदूर आकाशवाणी स्टुडिओतल्या त्या अनौपचारिक भेटी दरम्यान लोकांना आपला रंज-ओ-गम काही क्षण तरी विसरायला लावणारी, आज 40 वर्षांनंतर ही तरोताजा असणारी प्रख्यात गझल 'तुम अपना रंज-ओ-गम, जगजीत कौर यांच्याकडून खुद्द खय्याम यांच्या उपस्थितीत ऐकायला मिळाल्यानं   त्या गप्पांच्या मैफिलीनी जी काही आगळीच पर्वणी साधली ती व्यक्त करायला माझी शब्द संपदा तोकडी असल्याची प्रकर्षानं जाणीव होत आहे. तेव्हा शब्देंविण संवादु हाच आधार.

सुमारे दोन वर्षांपूर्वी स्वर्गीय खय्याम यांच्या स्मृती जागवणारा लेख लिहिला होता. या 19 ऑगस्ट रोजी पुन्हा एकवार त्यांच्या सुरेल आठवणी जगविणारा शब्द प्रपंच नव्याने करावा

असं मनात आलं, पण कोणा कसे कळावे की खय्याम साहेबांच्या सहधर्मचारिणी; ही संज्ञा त्यांच्या साठी अत्यंत योग्य होती, कारण सुरेल गायिके ची आपली स्वतंत्र छबी आपल्या संगीतकार पतीच्या सुरील्या, रसिल्या संगीत विश्वात एकरूप करणाऱ्या जगजीत कौर पण आपणाला सोडून जातील अस कधी मनातही आलं नव्हतं. 15 ऑगस्ट च्या सकाळी जगजीत कौर, यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. रंज-ओ-ग़म आता आम्ही कधीच विसरू शकणार नाही.





तुम अपना रंज - ओ - गम (क्लिक करा)


नितीन सप्रे

8851540881

nitinnsapre@gmail.com

टिप्पण्या

  1. सुंदर व नेमक्या शब्दांत व्यक्त केलेल्या भावना. एका दिग्गज संगीतकार व त्याच्या सहधर्मचारिणीचे यथार्थ वर्णन! अभिनंदन!!

    उत्तर द्याहटवा
  2. सुंदर लेख,ख़य्याम जी बद्दल नवीन गोष्टी माहिती झाल्या,आपली लेखन शैली आवडते.जस्ट एक दुरुस्ती :ठहरिये होश में ...फ़िल्म मोहब्बत इसको कहते हैं।.

    उत्तर द्याहटवा
  3. Khaiyyam was the rarest figure in the Hindi film music world to retain his independent stand and integrity with the lyrics, without any compromise with the big guns, to render soothing and sublime music to keen listeners identifying and appreciating a composition solely for its profound merits.

    उत्तर द्याहटवा
  4. खय्याम यांची गाणी ऐकणं म्हणजे पर्वणीच असते. उमराव जानची सगळी गाणी उच्च कोटींची झालित कितीही वेळा ऐका आपण म्हणावं या गाण्यासाठीआप हमारी जान लिजीए।
    नितीनजी तुमच्या लेखणीला खय्यांमच्या

    उत्तर द्याहटवा
  5. जणू संयत असा संगीत स्पर्श झालाय
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  6. सुंदर लेख. तुम्हीच म्हटल्याप्रमाणे खरच शब्द अपुरे आहेत असं व्यक्तिमत्त्व. जगजित कौर यांची दानशूरता आणि त्यांच्या निर्णयाला खय्याम यांची साथ....सार मनाला भावून गेलं

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती