स्मृतीबनातून - मनभावन यमन

 मनभावन यमन


रात्री दहा साडे दहाचा सुमार. दूरवरून हेमंतदांचे(Hemantda) भावूक सुर कानावर तरळले 'छुपाsलो यूँ sदिल में प्यार मेरा, के जैसे मंदिर में लौ दिये की'. बहुदा खाली वेंगुर्ला बंदरात कोणी कोळी बांधव विविधभारती(Vividhbharati) वर छायागीत(Chhayageet) ऐकत असावा. पाठोपाठ 'तुम गगन के चंद्रमा और मै धरा की धुल हुं' आणि पुढे जिंदगी भर नही भुलेगी वो बरसात की रात चिंब भिजवू लागली. आता हा योगायोग होता की निवेदिकेची सौंदर्यदृष्टी हे काही नक्की सांगता येत नाही. 


संगीताशी थोडीशी सलगी असल्याने या गाण्यांच्या सुरावटीत मला काहीसं साम्य आढळलं. वाटलं ही दोन्ही गीतं रागदारी संगीताच्या एकाच रागावर तर बांधलेली नाहीत? हा विचार डोक्यात घेऊनच रात्री निद्राधीन झालो. अंतर्मनात दिये की लौ, गगन के चंद्रमा, बरसात की रात रिमझिम झरतच राहिली.

सकाळी चहापाना नंतर जरा तरतरी येते तोच, काल रात्रीची गाणी फेर धरू लागली. मी संगीताचा विद्यार्थी नसलो तरी चाहता आहे. थोड्या अभ्यासा नंतर लक्षात आलं की आपला आडाखा बरोबर होता. ही दोन्ही गीतं यमन रागावर(Raag Yaman) आधारित होती. लहान मूल कसं, नवं खेळणं हाती आल्यावर हरखुन जातं, मीही होरा बरोबर ठरल्यामुळे नादावुन गेलो आणि एका पाठोपाठ एक, जिया ले गयो जी, चंदन सा बदन, भुली हुई यादें मुझे इतना ना सताओ, आसुं भारी हैं ये जीवन की राहें कोई उनसे कहदो हमे भुल जायें, अभी ना जाओ छोडकर, बीती ना बिताई रैना, जा रे बदरा बैरी जा, जिया ले गयो जी मोरा सांवरीया, जब दीप जले आना, सागर किनारे दिल ये पुकारे, घर से निकल ते ही कुछ दूर चलते ही, आये हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके, कोई जो मिला तो एसा लागतं हैं(breathless), प्यार जिंदगी प्यार हार खुशी(Pop dance) अशी साठ च्या दशकापासून तर नव्वद च दशक, दोन हजार  साला पर्यंत ची अनेक गाणी मनात रुंजी घालून गेली.


मराठी गाणी आठवू लागलो तर; कारे दुरावा कारे अबोला, जीवलगा कधी रे येशील तू, जिथे सागरा धरणी मिळते, जीवनातली घडी अशीच राहू दे, धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना, तोच चंद्रमा नभात, मी मज हरपून बसले, आकाशी झेप घे रे पाखरा, मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश, भय इथले संपत नाही, ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता आणि अगदी पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा; अशी यमनावर आधारित कित्येक गाणी हाकेला ओ दिल्या प्रमाणे धावत आली.

माझ्या लक्षात असं आलं की विशेषतः हिंदी आणि मराठी संगीतकारांनी, चित्रपट गीतांसाठी यमन रागाचा विशेष अनुराग केला आहे. याचं नेमकं काय कारण? एकप्रकारची उत्सुकता लागली. मग पंडित राम मराठे(Pandit Ram Marathe) यांचे चिरंजीव मुकुंद(Mukund) आणि पंडित जितेंद्र अभिषेकी(Pandit Jitendra Abhisheki) यांचे शिष्य रघुनाथ फडके(Raghunath Phadke) यांच्याशी बोलताना याचा खुलासा झाला. साधारणतः शास्त्रीय गायनाची(classical music) संथा आणि मनन हे यमनाने सुरू होतं आणि प्रथम तुज गिरविता जीव नादावला असं काहीसं होत असावं. हा राग भैरवी(Bhairavi) प्रमाणेच संपूर्ण जातीचा आहे, म्हणजेच यात सर्व स्वर लागतात. आता जेव्हढे स्वर जास्त तेव्हढाच संगीत रचनेला(composition) अधिक वाव मिळतो. प्रसंगानुरूप वातावरण निर्मिती ही होते. विविध पुष्पांनी नटलेल्या यमनाच्या ह्या पुष्करणीतून विचरण केल्यावर असं लक्षात येतं की हा यमन म्हणजे समर्पण, हा यमन म्हणजे भक्तिभाव, हा यमन म्हणजे आरती, प्रार्थना. हा यमन ज्याला जसा भावतो तसे वळण तो घेऊ शकतो आणि म्हणूनच संगीतकार, गायक तसच रसिकांचा हा यमन, मनभावन होऊन गेला.


शास्त्रीय संगीतातील यमनाच्या चिजां, एरी आई पिया बिना, अमीर खान साहेब (Ustad Amir Khan)म्हणत ती, ऐसो सुंदर सुधरवा बालमवा; गझलेच्या(Gazal) प्रांतातल्या रांजिश ही सही दिल को दुखाने के लिये आ, आज जाने की जिद ना करो या गझला, त्यांच्या शब्दांच्या बरोबरीनेच यमनाचा साज ल्यायल्या मुळे अजरामर झाल्या.  

मराठी संगीत क्षेत्रातही सुकांत चंद्रानना पातली, नाथ हा माझा मोही खला, कशी केलीस माझी दैना रे मला तुझ्याविना करमेना, देवा घराचे ज्ञात कुणाला अशी कालातीत नाट्यपदे; तसच कबिराचे विणतो शेले, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, समाधी साधन संजीवन नाम, अधिक देखणें तरी, टाळ बोले चिपळीला अशी भक्तिगीते, यमन स्पर्शाने अधिक देखणी झाली, संजीवन झाली.


केवळ संगीतकार, रसिक यांनाच नाही तर हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वकालीन सदाबहार नायिका मधुबाला (Madhubala) हिला सुद्धा या यमनानी नादी लावलं होतं, इतकं की, तीला म्हणे स्वतःला मिस यमन म्हणून घ्यायला आवडायचं. हे वेड तिला तिच्यावर चित्रित जिंदगी भर नही भूलेगी(Jindagi bhar nahi bhoolegi vo Barasaat ki Raat) या गाण्यामुळे लागलं असं सांगतात.



मी असही ऐकलं, वाचलं आहे की एकदा एका चित्रपटात यमनावर आधारित गाणं नयिकेवर नसून दुय्यम भूमिका करणारी वर योजल होतं, तर मधुबाला नायिकेची भूमिका सोडून ती भूमिका स्वीकारायला आग्रही होती. 


"Simplicity is the ultimate sophistication" असं प्रसिद्ध चित्रकार, वास्तू शिल्पी, लियोनार्दो द विंची (Leonardo da Vinci)यांनी म्हटल आहे. यमनाच्या सुरावटींना विंची यांचं विधान चपखल बसतं. या रागाचे सरल चलन, सुबोधाता हा परिष्कार यमनाला सालंकृत करतो. कुठल्या प्रसाधनांच्या शिवाय ही, जे सौंदर्य मोहून घेते ते निव्वळ आकृष्ट करणारच नसते तर ते खरोखरीच उत्कृष्ट असते. यमन मनभावन होण्यामागे हेच मर्म आहे.


नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com

8851540881

टिप्पण्या

  1. खुपच छान - संगीतकारांनी दिलेली आनंदाची उधळण किती सुरेखपणे व्यक्त केली आहे.
    खूप आभार

    उत्तर द्याहटवा
  2. व्वा.....खूपच सुरेख विवेचन......आभार या मेजवानी साठी.

    उत्तर द्याहटवा
  3. तुझा हा पैलू आपण जेव्हा एकत्र काम करत होतो तेव्हा अजिबात जाणवला नव्हता.

    उत्तर द्याहटवा
  4. क्या बात है सर, बर्‍याच गाण्याचा उलगडा झाला.. तुमच्यामुळे आणि यमन रागामुळे.. खूप छान सर

    उत्तर द्याहटवा
  5. वा, नितीनजी
    यमनची बहार काही औरच . इतकी सुंदर गाणी एक एक करुन ऐकाविशी वाटत आहेत. सवडीने ऐकेन.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक