प्रासंगिक - त्रिपुरारी स्वर पौर्णिमा
त्रिपुरारी स्वरपौर्णिमा
भारतीय संस्कृतीत #IndianCulture संगीताला भरजरी उत्तुंग परंपरा आहे. शास्त्रीय संगीत, उप शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, भाव संगीत, वाद्य संगीत आणि लोक संगीत अशा बहुविध प्रकारांनी संगीताचं दालन समृद्ध केलं आहे. शास्त्रीय संगीतात शास्त्राला, उप शास्त्रीय संगीतात लालित्याला, भाव संगीतात शब्दार्थाला, वाद्य संगीतात नादाला तर लोकसंगीतात भावनेला #Emotions अधिक महत्व आहे. लोकसंगीतात #Folk Music प्राधान्य क्रमात भावना, शास्त्र शुध्दतेच्या आधी मानली जाते. लोकसंगीताची नाळ हृदयस्थ भावनेशी जोडलेली असते. लोकसंगीत म्हणजे निसर्ग संगीत. प्रकृतीला निकट असल्यानं त्यात मृद गंधाचा दरवळ आहे. पहाटेच्या वेळी हरिततृणांवरचे, पुष्पदलांवरचे मोतिया दवबिंदू #Honey dew पाहताना जसं हरखून जातो तशीच अनुभूती लोकसंगीतावर आधारित रचना आणि गायनातून श्रोत्यांना मिळते. लोकसंगीताच हे मर्मस्थळ ज्या काही संगीतकारांना उमगलं, त्यात त्रिपुरा राज घराण्याशी संबद्ध असलेले, राजस रचनांचे रचयीते आणि चोखंदळ गायक सचिन देव बर्मन #SachinDebBarman यांचं नाव नि:संदेह अग्रक्रमानं घ्यावं लागेल.
सचिनदा गीत निर्मिती बाबत टोकाचे चिकित्सक होते. तलत मेहमूद #Talat Mahamood यांचं 'जलते हैं जिसके लिये' हे गीत याचं उत्तम उदाहरण आहे. अनेक रिर्हसल्स करूनही अखेर पर्यंत बर्मनदा यांना8 अभिप्रेत असलेला 'टेक' तलत देऊ शकले नव्हते अशी अख्यायिका आहे. अखेरीस निर्मात्याच्या मध्यस्ती नंतर, पूर्ण पसंतीस न उतरलेलं हे गीत केवळ नाईलाजानं तडजोड म्हणून सचिन देव बर्मन या संगीतकाराने स्वीकारलं. हे गाणं तलत यांच्या सर्वोत्कृष्ट, लोकप्रिय गाण्यां पैकी एक आहे हे आपण सारेच जाणतो. सचिनदांच्या मनाजोगता टेक झाला असता तर? आता फक्त आपण कल्पनाविलास करू शकतो. सृजनाचा असा असाध्य ध्यास, निर्मितीचा असा उच्च मापदंड, सचिनदा बाळगुन असत आणि म्हणुनच अनेक दर्जेदार, सुमधुर गीतांचा नजराणा ते रसिकांना देऊ शकले.
संगीतकार सचिनदांच्या खुबी म्हणजे एकाच चित्रपटात नायक/नायिकेसाठी त्यांनी प्रथमच एकाहून अधिक पार्श्वगायकांचा आवाज वापरण्याचा यशस्वी प्रयोग केला. एकाच सिनेमात देवानंद साठी वेगवगळी गाणी त्यांनी किशोरदा, रफी साहेबच नाही तर अगदी हेमंतदा, तलत मियां कडून गाऊन घेतली.
हिंदी चित्रसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या गायक किशोर कुमारचे, संगीतकार सचिन देव बर्मन, जन्मदातेच होत. किशोर कुमार यांनी सचिनदांच्या संगीत निर्देशनात गायलेली बहुतेक सर्व गाणी रसिकप्रिय झाली. किशोर कुमारवर सचिनदांनी पुत्रवत प्रेम केलं. किशोर कुमारही त्यांचा आदर करीत असे, त्यांना गुरुस्थानी मानत असे. सचिनदांच्या अखेरच्या दिवसात
'मिली' चित्रपटासाठी, 'बडी सुनी सूनी हैं जिंदगी जिंदगी' या गाण्याच्या रिहर्सल प्रसंगी सचिनदा काहीसे भावूक झाले होते. रिहर्सल संपवून किशोर कुमार निघाल्या नंतर काही वेळातच सचिनदांना हृदयविकाराचा #Heart attack झटका आला. रुग्णालयात दाखल होणं गरजेचं होत मात्र सचिनदांनी साफ नकार दिला. कारण या गाण्याचं दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग ठरलं होतं. त्यांना राजी करण्याचे सर्व उपाय थकल्या नंतर आर डी बर्मन यांनी किशोर कुमार यांना मदत मागितली आणि किशोर कुमार यांनी आपला गळा खराब असल्याचा बहाणा करत, फोन करून, मुद्दाम खरखरीत आवाजात बोलत, आपण उद्या रेकॉर्डिंग करू शकणार नाही तेव्हा तुम्ही उपचार घ्या व बरे झाल्यावर रेकॉर्डिंग करू असं सांगितल्यामुळे बर्मनदा रुग्णालयात दाखल झाले. नियतीच्या मनात मात्र काही वेगळच होत. या अखेरच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगला बर्मनदा उपस्थित राहण्याचा योग नव्हता. या कलासक्त संगीतकाराने अखेरीस किशोर कुमार यांना गाणं रेकॉर्ड करायला सांगितलं आणि म्हणाले मी तुझ्या समोर आहे असं समजून तू गा, तुला माझी उपस्थिती जाणवेल. गाणं चांगल झालं पाहिजे रे... किशोर कुमार यांनी आपलं सर्वस्व पणाला लावून हे गीत रेकॉर्ड केलं पंचमदा यांनी हॉस्पिटल मध्ये सचिनदांना ते ऐकवलं. रेकॉर्डिंग ऐकल्या नंतर ते म्हणाले की किशोर फार छान गायला आहे, इतका छान की मी उपस्थित असतो तरी कदाचित ते असं उतरलं नसतं. स्वतःच घडवलेल्या लाडक्या गायकाच्या या गीताची पारायण करत करतच भूलोकीचा हा गंधर्व, गंधर्वलोकी प्रयाण करता झाला….गीतकार योगेश यांच्या या गीताचे शब्द ही किती अजोड आहेत….बड़ी सूनी सूनी है ज़िंदगी ये ज़िंदगी
मैं खुद से हूँ यहाँ अजनबी अजनबी
बड़ी...
कभी एक पल भी, कहीं ये उदासी
दिल मेरा भूले
कभी मुस्कुराकर दबे पाँव आकर
दुख मुझे छूले
न कर मुझसे ग़म मेरे, दिल्लगी ये दिल्लगी
बड़ी... सुनी सुनी हैं जिंदगी ये जिंदगी….
एक उत्कृष्ट संगीतकार म्हणून ते जितके विख्यात आहेत तितक्याच त्यांनी गायलेल्या त्यांच्या रचनाही. सचिनदांनी मोजकीच चित्रपट गीतं गायली पण ती सगळी अजरामर झाली, याचं कारण त्यांना लाभलेला धीरगंभीर पारलौकिक गळा, अंगी असलेली गायनकळा आणि लोकसंगीताचा लळा. या त्रिभुवन मात्रे मुळेच सचिनदांची पार्श्वगायनाची कीर्ती दिगंतास पोहोचली.
विलक्षण आवाजाचे ते धनी होते. हिमालयाला जर मानवी आवाज असता तर तो सचिनदांच्या आवाजा सारखा असता अशी एक कल्पना मनात नेहमीच तरळून जाते. त्यांनी चित्रपटांसाठी गायलेली गीतं लोकसंगीतावर विशेषतः बंगालच्या बाऊल संगीतावर आधारित आहेत. पार्श्वगायक सचिनदांची आणखी एक खुबी म्हणजे त्यांनी आपला आवाज कधीही कोणत्याही नायकाला दिला नाही. त्यांनी गायलेली आणि गाजलेली बहुतेक गीतं ही चित्रपटांची कथाच स्वरमयी करणारी आहेत. उदाहरण बघायचे झाले तर ' आराधना ' मधलं 'सफल होगी तेरी आराधना', 'सुजाता' मधलं 'सुन मेरे बंधू रे, सुन मेरे मितवा' किंवा गाईड मधले 'वहां कौन है तेरा, मुसाफिर जायेगा कहां' ही गीतं चटकन समोर येतात. ही गाणी म्हणजे त्या त्या चित्रपटांची स्वरलिपित लिहिली कथाच असल्याचं जाणवतं. आठ दिन (१९४६), सुजाता (१९५९), बंदिनी (१९६५), गाईड (१९६५), प्रेम पुजारी (१९६९), आराधना (१९६९), तलाश (१९६९), अमर प्रेम (१९७१), जिंदगी जिंदगी (१९७२) या चित्रपटांसाठी त्यांनी गायलेली गाणी कालातीत आहेत. वाद्यवृंदाची अचूक निवड, प्रसंगानुरूप पार्श्वगायक/गायिकेची निवड आणि स्वतःच्या गीतांसाठी बंगाली लोकसंगीताची महिरप या मुळे त्यांची गाणी लोकप्रिय झाली आणि दर्दी रसिकांना तर ती विशेष भावतात.
एखादं गीत ऐकता क्षणीच कानावाटे मनात उतरतं आणि तिथेच कायमचं घर करून राहतं. अर्थात असं भाग्य काही दुर्मिळ कलाकृतींनाच लाभतं. सचिनदांच्या रचना आणि गीतं मात्र याला अपवाद आहेत. कारण जे अपवादाने घडतं ते त्यांच्या बऱ्याच गीतांच्या बाबतीत नेमाने घडलेलं दिसत. म्हणूनच ती विशेष सौभग्यशाली म्हटली पाहिजेत.
आराधना चित्रपटाच्या त्यांनी गायलेल्या
'सफल होगी तेरी आराधना, काहे को रोये' या त्यांच्या रचनेचा, अन्य अव्वल रचनाही हेवा करत असाव्यात असं नेहमी वाटतं. हे गीत ऐकताना, पाहताना स्पष्ट जाणवत की शब्द, सूर, चाल आणि अभिनय यांच्या मध्ये श्रेष्ठत्वपदा साठी जणू अहमहमिका सुरू आहे. वंदनाचा (आराधना चित्रपटातील नायिका) जीवन संघर्ष चितारण्या साठी गीतकार आनंद बक्षी यांनी जसे चपखल शब्द योजले आहेत तद्वतच बर्मनदा यांनी संगीत दिलं आहे. 'बनेगी आशा इक दिन तेरी ये निराशा, काहे को रोये, चाहे जो होये सफ़ल होगी तेरी आराधना' या शब्दावली साठी, निराशेची निशा संपून उत्कर्षाची उषा सुरू होईल हा आशावाद जागवणारी नितांत अर्थवाही चाल संगीतकार एस.डी.बर्मन यांनी रचली आणि गायक सचिनदांनी शब्द, सुराना संपूर्ण न्याय देत आपल्या धीरगंभीर खुल्या आवाजात बाऊल संगीताच्या धर्तीवर निव्वळ गळ्यानं नाही तर हृदया पासून ती गायली आहे.
'बनेगी आशा इक दिन तेरी ये निराशा
काहे को रोये, चाहे जो होये
सफ़ल होगी तेरी आराधना
काहे को रोये ...
आँखे तेरी काहे नादान
छलक गयी गागर समान
समा जाये इस में तूफ़ान
जिया तेरा सागर समान
जाने क्यों तूने यूँ
असुवन से नैन भिगोये
काहे को रोये ...
कहीं पे है सुख की छाया
कहीं पे है दुखों का धूप
बुरा भला जैसा भी है
यही तो है बगिया का रूप
फूलों से, कांटों से
माली ने हार पिरोये
काहे को रोये ...
दिया टूटे तो है माटी
जले तो ये ज्योति बने
आँसू बहे तो है पानी
रुके तो ये मोती बने
ये मोती आँखों की
पूँजी है ये न खोये
काहे को रोये' ..
दैव - दुर्विलासाच्या फेऱ्यात अडकलेल्या वंदनाच 'सफल होगी तेरी आराधना' असं सशक्त वत्सल सांत्वन आणि दुर्दम्य आशिर्वचन, याला तोड नाही. गीतकार, संगीतकार आणि गायक यांच्या शब्द, सुर आणि भावना शर्मिला टागोर अक्षरशः जगली आहे. वंदनाची विदीर्ण मनोवस्था शर्मिला टागोर यांनी आपल्या वास्तवदर्शी सहज अभिनयाने इतकी प्रभावी साकारली आहे की कुठल्याही संवेदनशील व्यक्तीला 'आँसू बहे तो है पानी रुके तो ये मोती बने' हे मनोमन पटलं तरी हे गीत ऐकत, पाहत असताना 'ये मोती आँखों की पूँजी है ये ना खोये' याचे भान राखणं निव्वळ अशक्य होतं आणि त्याच्या डोळ्यातून आसवांचे मोती टपटप ओघळू लागतात, अशी परिणामकारकता ह्या विलक्षण भावनिक गीत-गायन-अभिनयानं साधली आहे. कुणीतरी म्हटलंय न की कविता… विषेशतः उत्कृष्ट कविता ही फार धोकादायक असू शकते. कारण एखादा प्रत्यक्षात न जगलेला प्रसंग, अनुभव हा जणूकाही आपणच जगतो आहोत, अनुभवत आहोत असा आभास निर्माण करण्याची क्षमता त्या रचनेत असते. या गीताच्या बाबतीत हे अक्षरशः खरं आहे.
संगीतकार, गायक सचिन देव बर्मन यांच्या सांगीतिक कारकिर्दीवर नजर टाकली तर असं म्हणावं लागेल की भौगोलिक प्रदेशाचे राज्यपद निर्विकारपणे त्यागणारा हा नरेश रसिकांना स्वराभिषेक घडवून अलौकिक स्वरलोकीचा सुरेश झाला.
सचिनदांच्या सूरमयी स्मृतींना शत शत नमन.
नितीन सप्रे,
नवी दिल्ली
nitinnsapre@ gmail.com
8851540881
खूप सुंदर लिहिले आहे।सचिन दा समोर आहेत असे वाटले।ही सर्व गाणी पुन्हा पुन्हा मे ऐकत असतो। सप्रे यांचा अभ्यास चांगला आहे।सप्रे यांचे मनापासून अभिनंदन।श्रीराम नानल, सातारा।सप्रे याचंबरोबर बोलू शकलो यांचं खूप आनंद झाला।
उत्तर द्याहटवाखूप छान वाटले , कारण स्व.सचिन देव बर्मन अतिशय उत्कृष्ट संगीतकार होते आजही त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी अजरामर आहेत .... खरंच. काहे को रोये ... चाहें जो होये ....सफल होगी तेरी आराधना ...
उत्तर द्याहटवाफारच सुंदर लिहिले आहे. सचिन देव यांची माहिती असली तरी हा लेख नवीन माहिती देतो. आणि वाचताना सचिन देव आपल्यामध्ये नाहीत याची चुटपुट लागली.
उत्तर द्याहटवाApratim .Very informative.
उत्तर द्याहटवाबर्मन दा माझे आवडते गायक!माझ्या बऱ्याच मित्रांना माहिती आहे की मैफिलित🥃मी सैगल,बर्मनदा आणि हेमंत जी ची गाणी गातो😊आणि दोस्त सहन करतात😁असो बर्मन दा ग्रेट कंपोजर ,नितिन really , reading ur post is pleasure,माहिती नसलेले किस्से वाचताना मजा येते,ग्रेट I m waiting for ur next post.
उत्तर द्याहटवाखुपच अभ्यासपुर्ण लिहीले आहे सर... यातुन खुप काही अनुभवायला व शिकायलाही मीळते. सुमधुर शब्दांची व गोड गीतांची शिदोरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही..
उत्तर द्याहटवाधन्यवाद सरजी
सचिनदांचं संगीत आणि त्यांच्या आवाजाचं गारूड आजही कायम आहे. संगीत रचनांमधे नवनवीन प्रयोग ते करीत असत. वाद्ये कोणतीही असोत, पौर्वात्य, पाश्चात्य किंवा अन्य कोणतीही, त्यांना ती वर्ज्य नव्हती. एवढे वैशिष्ट्यपूर्ण संगीत की आजही गाण्यांच्या दोन अंतर्यांमधील तुकड्यांसह गाणी स्मरणात राहतात. तुमचे लेख नेहमीच अभ्यासपूर्ण असतात, म्हणूनच त्यांची प्रतीक्षा असते. धन्यवाद.
उत्तर द्याहटवा