स्मृतिबनातून - किमयागिरी - स्वर,शब्द,सुर

 

किमयागिरी - स्वर,शब्द,सुर



मराठीतल्या एका सर्वतोपरी लावण्यपूर्ण भावगीताशी तुमची पुनर्भेट (Reunion)घडवून आपल्या सर्वांचीच यंदाची दीपावली (Deepawali) लखलखत्या स्वरज्योतींनी उजळवून टाकण्याचा मानस होता. मात्र लेख पूर्ण करता करता आलेल्या बातमीमुळे या उजळलेल्या ज्योतींना आता आसवांची सर्द किनार मिळाली आहे. या नितांत सुरेल कृतीचा कर्ताच आपल्या गाणाऱ्या व्होयोलिन सह अनंताच्या यात्रेचा पांथस्थ झाला. दूर निघून गेला. हे गानशिल्प साकारणाऱ्या त्रिगुणात्मक त्रिमुर्तीतला अखेरचा प्रतिभावान प्रभाकर रविवारी मावळला…..

काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सॲप चाळत असताना संगीतकार, गायक सुधीर फडके(#Sudhir Phadke) यांच्या जयंती निमित्त शेखर जोशी या माझ्या पत्रकार मित्राची पोस्ट समोर आली. एका आर्त भावगीताची जन्म कहाणी तो सांगत होता. बसच्या प्रवासा दरम्यान संगीतकाराला चाल सुचते. त्या चालीचं नोटेशन तो तिकिटाच्या मागे लिहून ठेवतो आणि घरी गेल्यावर संगीतरचना पूर्ण करतो. आता या चालीला शब्दांची साथ लाभली तर उत्तम भावगीताचं सृजन शक्य असल्याचं वाटत आणि डोळ्यापुढे पहिलं नाव ज्या गीतकाराचं येत त्याला तो ते नोटेशन आंतरदेशीय पत्रानं कळवतो. आठवड्या भरातच स्वरांना शब्दांची वसनं लाभतात. स्वररचनेला शब्दरचनेची साथ  लाभते. ती शब्दकळा जेव्हा साजूक गळ्यातून अवतरते तेव्हा एक अविस्मरणीय भावगीत मूर्त रूप घेतं आणि ते गीत ऐकताना रसिकाच्या गालांवर आसु ओघळू लागतात. चाणाक्ष वाचक निमिषात गुणगुणू लागतो….' स्वर आssले दुरुनी…'


ऐकण्यासाठी इथे क्लिक करा - स्वर आले दुरुनी



बस प्रवासात चाल सुचलेले संगीतकार होते पंडित प्रभाकर जोग, गीतकार होते यशवंत देव आणि गायक होते भरजरी साजूक गळ्याचे सुधीर फडके. एखाद्या रचनेसाठी असे त्रिदेव एकत्रित आले तर अश्या किमयागारां कडून अपसुकच किमया साधली जाते. विशेष म्हणजे ही कलाकृती साधण्यासाठी, वेगवेगळ्या भूमिका साकारत तीन संगीतकारांची झालेली भद्र युती खरोखरच श्रुती धन्य करते. अश्या रचनेच्या मोहपाशातून एखाद्या वैरागी पुरुषाची ही सुटका जरा कठीणच.

'स्वर आले दुरुनी जुळल्या सगळ्या त्या आठवणी'


लांब वरून कानी आलेले सुर त्या सगळ्या तरल आठवणींचा मयूरपंख फुलवून जातात.


'निर्जीव उसासे वाऱ्यांचे, आकाश फिकटल्या तऱ्यांचे

कुजबुजही नव्हती वेलींची, हितगुजही नव्हते पर्णांचे ऐशा थकलेल्या उद्यानी स्वर आले दुरुनी'…


आठवणी जरी गोजिऱ्या असल्या तरी मनस्थिती साजिरी नाही. मनाचा गाभाऱ्यात कुंदपणा दाटून आलेला आहे. जणूकाही बाहेरच्या निसर्गाचं प्रतिबिंब मनात पडलं आहे. अश्या परिस्थितीत दूरवरून कानावर स्वर पडतात आणि….


'विरहार्त मनाचे स्मित सरले, गालांवर आसू ओघळले

होता हृदयाची दो शकले जखमेतुन क्रंदन पाझरले

घाली फुंकर हलकेच कुणी. स्वर आले दुरुनी'...


विरहाने व्याकुळ झाल्यामुळे  चेहऱ्यावरच्या स्मितरेषा अदृश्य झाल्या आहेत. गालांवरून अश्रू ओघळू लागले आहेत. हृदयभंगाच्या जखमेतून वेदनेच्या कळा येत आहेत. मात्र अश्या विदीर्ण स्थितीत दूरवरून आलेल्या स्वरांनी हळुवार फुंकर घातली आहे.


'पडसाद कसा आला न कळे, अवसेत कधी का तम उजळे

संजीवन मिळता आशेचे निमिषात पुन्हा जग सावरले

किमया असली का केलि कुणी. स्वर आले दुरुनी'


विरह व्याकुळ मनस्थिती काही सौम्य होईल याची किंचितही लक्षणं दिसत नसतांना कुठून कसा प्रतिसाद मिळाला? अमावस्येच्या रात्रीच्या गर्द काळोखात प्रकाशाची एखादी तिरीप अनुभवायची कल्पना तरी करता येईल का? मात्र आशेवर जग चालतं असं म्हणतात ते खरं असावं. आशेचा विलक्षण गुणधर्म अत्यंत मार्मिकपणे मांडणारं सुभाषित आहे ना...


'आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्यशृंखला ।

यया बद्धाःप्रधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवत् ॥'


अर्थात आशा ही अशी आगळीच बेडी आहे, की जिच्या बंधनात अडकलेला मनुष्य मनुष्य घोडदौड करतो मात्र मुक्त केलं तर तो स्थितीजन्य अवस्थेत जखडला जातो.

या दूरवरून आलेल्या सुरांनी हळुवार फुंकर घालून दिलेल्या प्रतिसादामुळे पापणी लवायला लागेल इतक्या कमी वेळात मनस्थिती पार पालटून टाकण्याची किमया साधली आहे.


अशी विलक्षण रचना करणाऱ्या या त्रिदेवां पैकी कुणा एकाला शरण जाता येत नाही. कारण आद्य चाल आहे, गीत नंतर. प्रभाकर जोगांनी(#Prabhakar Jog) ती इतकी साधी पण तितकीच दिलखेचक अशी बांधली आहे. संपूर्ण गाण्यात पावरी(Flute) आणि व्हायोलिनच्या(Violin 🎻) सुरांची मनमोहक साथ मिळाली आहे. विशेषतः व्हायोलिन चे सुर तर बाबूजींच्या सुरांना असे काही लगडलेले आहेत की कान तृप्त होतात. या चालीला शब्द प्रतिमा देणाऱ्या देवांनी, चपखल शब्द योजले आहेत. विरह व्याकुळ मनाला उद्यानाची उपमा देऊन निसर्गातले दाखले देत, मनस्थितीचं अप्रतिम चित्र रेखाटलं आहे. दुसऱ्या कडव्यात देव विरहार्त शब्द लिहितात, विरहात लिहीत नाहीत. वास्तविक दोन्ही शब्द अर्थवाही असून मीटर मध्ये बसतात. पण विरह भौतिक, शारीरिकता(physical) दर्शवितो तर विरहार्त हा शब्द विरहाने व्याकुळ झालेल्या मनाकडे (psychological condition) घेऊन जातो. दुसरं म्हणजे विरहार्त शब्द हा विरहाची तीव्रता प्रगट करतो. शात्रशाखेच्या या पदवीधर कवीनं भाषेचा आणि शब्दांचा केलेला शास्त्रशुद्ध उपयोग शब्द, भाषा प्रेमींना 'ती'च्या भेटी इतकाच आनंद देऊन जातो. बाबूजीं सारख्या गायक संगीतकारानी हे सुधिरतेन नीट टिपलं आहे. पहिल्या कडव्याच्या पहिल्याच ' निर्जीव ' शब्दात त्यांनी असा काही जीव ओतला आहे की ऐकतांना शब्दचित्र डोळ्या समोर उभं राहतं. 'जखमेतून क्रंदन पाझरले' गातांनाही तसच अर्थवाही उच्चारण, अनुभवता येतं. जखमेतल्या 'मे' ला लांबवून त्यांनी तीची खोली समर्पकपणे दाखवून दिली आहे आणि त्यानंतर हलकेच घातलेली फुंकर ही जाणवते. शब्दांचे उच्चार आणि स्वर, शब्द प्रतीमेच्या व्यक्तिमत्त्वाला अनुरूप असतील तर जो काही निखार येतो तो लाजवाब असतो. किमयागार कलाकारांनाच ते साध्य होतं. आठवणींची जुळवाजुळव करण्यासाठी स्वरांना आपल्या सारख्या रसिकांच्या सुपूर्द करून हे भावपूर्ण गीत साकारणारे तीनही किमयागार कितीतरी दूर निघून गेले आहेत आपल्या हृदयी विरहार्तता कायमची ठेवून.


नितीन सप्रे

नवी दिल्ली

nitinnsapre@gmail.com

8851540881





टिप्पण्या

  1. नितीनजी, खूपच सुंदर लेख आहे. तुमचे लेखन व विश्लेषण केवळ समर्पकच नव्हे तर प्रत्ययकारी आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय सुंदर लेख! हे गीत मराठी रसिकांच्या मनात कोरलं गेलेलं आहे. त्या गीताची पुनर्भेट तुम्ही नव्याने घडवून आणलीत. धन्यवाद!!

    उत्तर द्याहटवा
  3. साहित्य वर्णन अर्थपूर्ण रीतीने वाचकांपर्यंत पोचविण्यासाठी सदर साहित्याच्या भाव विश्वामध्ये झोकून द्यावे लागते तेंव्हा अर्थपूर्ण उकल होते, नितीनजी आपण या साहित्याचा इतिहास अर्थपूर्ण रीतीने मांडला, तो भावला, आपले खूप खूप अभिनंदन.

    उत्तर द्याहटवा
  4. लेख अप्रतिम नेहमी प्रमाणे.गाण ते आजरामर स्वर चं

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक