प्रासंगिक - शूरा मी वंदिले

 शूरा मी वंदिले


दुर्दैवी दिवस


आठ डिसेंबर 2021...पहाटे 4.30 वाजता न्यूजरूम मध्ये पोहोचलो, तेव्हा घरी जाण्यापूर्वी देशभक्तांना विचलित करणारी बातमी द्यावी लागेल याची शक्यता दुरान्वयानेही वाटली नव्हती. उलटपक्षी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते दिल्या गेलेल्या प्रेसिडेंट स्टँडर्ड प्रदान समारोहाच मुंबई हून लाईव्ह प्रक्षेपण बघून तर देशाची वाढती सामरिक ताकद जाणवल्यानं खरतर गौरवान्वित वाटत होतं. मात्र बातम्यांच्या जगात कोणता क्षण कुठली बातमी घेऊन येईल हे कुणीच सांगू शकत नाही. या वास्तवाचा त्या दिवशी पुनःप्रत्यय आला. दुपारी एकच्या सुमारास प्रथम, सेना दलाचं  हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याची बातमी आली. पाठोपाठ त्यात सिडीएस जनरल रावत प्रवास करत असल्याची माहिती मिळाली आणि संध्याकाळ होता होता संपूर्ण देशाला शोकाकुल करत भारतीय सेनेचे वीर योद्धे तसच देशाचे प्रथम चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, जनरल बिपिन रावत यांच्या अपमृत्यूच्या बातमीची वायुसेनेनं पुष्टी केली.



देशभरात शोक लहर पसरली. भारताच्या या सुपुत्राच्या अंतिम यात्रेच्या प्रसंगी नागरिकांना भावना अनावर झाल्या होत्या. रस्ता भर शवयात्रेवर लोक पुष्पांजली वाहत होते, हातात तिरंगा घेऊन शववाहिनीच्या मागे धावत होते आणि जनरल बिपिन रावत अमर रहे असा उदघोष  करत होते. अगदी श्रीनगरच्या लाल चौका पासून तर मुंबईच्या लोकल पर्यंत ठिकठिकाणी लोक भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करत होते. सेना दलाच्या एखाद्या अधिकाऱ्याच्या अंतिम यात्रेला एव्हढा मोठा जनसमुदाय कदाचित प्रथमच रस्त्यावर लोटला होता. जनरल रावत यांची अंतयात्रा ही त्यांच्या जीवनयात्रे प्रमाणेच अभूतपूर्व ठरली. अग्निला साक्षी ठेवून सप्तपदी पासून पत्नी मधुलिकाची केलेली सोबत अगदी मुखाग्नी पर्यंत कायम राहिली. किर्तिका आणि तारिणी या दोन्ही सुकन्यांवर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला होता. आपल्या जन्मदात्यांना एकसाथ अग्नि सुपूर्द करण्याचा अत्यंत हृदयद्रावक प्रसंग त्या दोघींवर बेतला होता. कालाय तस्मै नमः !



लष्करी आयुष म्हटलं म्हणजे मृत्यूच्या हातात हात देऊन फिरण्या सारखच आहे. मात्र एखाद्या उच्च, प्रशिक्षित आणि बिनीच्या लढवैय्याला अश्या प्रकारे अपघातात गमवावं लागण या परिस दुर्दैव नाही. या आधी ही 3 फेब्रुवारी 2015 ला नागालँडच्या दिमापुर मध्ये तत्कालीन लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांना घेऊन जात असलेलं सेनादलाचं चीता हेलिकॉप्टर थोड्याच उंचीवर नियंत्रणा बाहेर गेल्यामुळे दुर्घटनाग्रस्त झालं होतं. मात्र त्यावेळी ते सुखरूप बचावले. त्यानंतर सहा वर्षांनी मात्र जनरल रावत आणि देशाच्या नशिबात काही वेगळंच लिहिलं होत. 8 डिसेंबर 2021 ला नियतीनं जनरल रावत यांची साथ नाकारली. गुरुवारी तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यात कुन्नूर इथे सेनादलाच्या Mi-17V5 हेलिकॉप्टर दुर्घटनेत जनरल रावत यांची जीवनयात्रा अवरुद्ध झाली. वायुसेनेनी ट्विट करून सांगितलं, अतिशय खेद वाटतो की सीडीएस जनरल बिपिन रावत, श्रीमती मधुलिका रावत आणि अन्य 11 जण एका दुर्भाग्यपूर्ण दुर्घटनेत मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेत 

लांस नायक विवेक कुमार, पीएसओ

नायक गुरुसेवक सिंह, पीएसओ 

लांस नायक बी साई तेजा, पीएसओ 

नायक जितेंद्र कुमार, पीएसओ 

लेफ्टिनेंट कर्नल हरजिंदर सिंह, एसओ टू सीडीएस ब्रिगेडियर एल एस लीडर, डीए टू सीडीएस हवालदार सतपाल, पीएसओ हे देखील मुत्युमुखी पडले.



2014-2019 या वर्षांतील वायुसेना विमान अपघातांचे तपशील


 

विमान/हेलिकॉप्टरचा प्रकार

आर्थिक वर्ष  ताफा


फायटर

हेलिकॉप्टर

ट्रेनर

वाहतूक

 

2014-15

07

01

02

01

 

2015-16

04

01

01

-

 

2016-17

06

02

01

01

 

2017-18

02

-

03

-

 

2018-19

07

02

02

-

 

2019-20

-

-

-

01



IAF मधील प्रत्येक विमान अपघाताची चौकशी कोर्ट ऑफ इन्क्वायरी (कर्नल) द्वारे अपघाताचे कारण शोधण्यासाठी केली जाते आणि पूर्ण झालेल्या कोर्ट ऑफ इन्क्वायरीच्या शिफारशी लागू केल्या जातात. कोर्ट ऑफ इन्क्वायरी पूर्ण झाल्यानंतरच नुकसानीचे प्रमाण निश्चित होते.

एका विश्वासार्ह वेबसाईटच्या आकडेवारीनुसार, २०१६ पासून गेल्या पाच वर्षांत जवळपास साठ विमान अपघात झाले आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांमध्ये एरोस्पेस सेफ्टी ऑर्गनायझेशनला चालना देणे, अपघात आणि घटनांचा डेटाबेस राखणे, प्रशिक्षण पद्धती सुधारणे, सिम्युलेटरचा वापर वाढवणे, पक्षी धोक्याचे सुधारित व्यवस्थापन इत्यादींचा समावेश आहे.



जनरल रावत यांची कामगिरी


दुर्गम पहाडी क्षेत्र असो, निबीड जंगल असो, काश्मीर मधले आतंकवादी असोत किंवा ईशान्य भारतातील घुसखोरी असो जनरल बिपिन रावत एक असे जांबाज़ योद्धा होते की त्यांनी अश्या सर्व प्रसंगात अतुलनीय शौर्य दाखवीत उल्लेखनीय कामगिरी बजावली. ईशान्येला (North East) चीन लगत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (Line of Actual Control) बटालियनच नेतृत्व, संवेदनशील मानल्या जाणाऱ्या कश्मीर खोऱ्यात राष्ट्रीय राइफल्स आणि इंफैंट्री डिवीजनचे कमांडिंग ऑफिसर म्हणून त्यांची भूमिका या जनरल रावत यांच्या शानदार कर्तबगारीच्या निशाणी आहेत.


जून 2015 मध्ये ज्यावेळी  मणिपुर मध्ये नागा विद्रोहिंनी 18 सैनिकांची हत्या केली त्यावेळी त्यांच्या विरोधातल्या मोहिमेत खतरनाक समजल्या जाणाऱ्या स्पेशल फोर्सेज चे पारा कमांडोंनी कामगिरी फत्ते केली आणि या तुकडी ची कमान सांभाळली ती जनरल रावत यांनी. पाक व्याप्त काश्मीर (POK) मध्ये सप्टेंबर 2016 ला झालेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या  रणनीतिक तय्यारीतही जनरल रावत यांची प्रमुख भूमिका होती.


देशसीमेच्या पलीकडेही जनरल रावत यांची शौर्यगाथा तळपती आहे. अफ्रिकेच्या कांगो या हिंसाग्रस्त भागात शांति सैनिक म्हणून 2008 मध्ये इंडियन ब्रिगेड ची आघाडी ही त्यांच्या नेतृत्व क्षमतेचं एक उदाहरण आहे. भारतीय सैन्य शक्ति अधिक प्रभावी, असरदार  करण्याच्या उद्देशाने चीफ-ऑफ-डिफेंस स्टाफ म्हणजेच सीडीएस या नव्यानं निर्माण केलेल्या पदावर जनरल रावत यांना 31 डिसेंबर 2019 रोजी नियुक्त केलं गेलं. ते देशाचे पहिले तीनही सैन्यदल प्रमुख ठरले. भविष्यातल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तिन्ही सेनादलांना अधिक सक्षम करणे, सेना दलाच्या आधुनिकीकरणाला नवी दिशा देणे याची जबाबदारी त्यांच्यावर होती. या कामगिरीचे स्पष्ट संकेत मिळूही लागले होते. संरक्षण क्षेत्रातील वाढती आत्मनिर्भरता ही त्याचाच परिणाम आहे. 


जनरल रावत अल्प जीवन परिचय


देशहिता साठी कार्य करण्याची भावना जनरल रावत यांच्या रक्तातच भिनली होती. त्यांचे वडील ही लष्करात लेफ्टिनेंट जनरल होते. उत्तराखंड मधील पौड़ी गढ़वाल हे जनरल रावत यांचं जन्म गाव. 16 मार्च 1958 जन्मलेल्या बिपिन रावत यांचं प्रारंभिक शिक्षण शिमला इथे झालं. त्यानंतर 1978  मध्ये इंडियन मिलिट्री एकेडमी, देहरादून इथून त्यांनी अत्युच्च प्रतिभेचे प्रदर्शन करून स्नातक पदवी मिळविली. त्यांना स्वोर्ड ऑफ ऑनर नी सम्मानित केलं गेलं. 1978 च्या डिसेंबर महिन्यात बिपिन रावत यांना लष्करात कमीशन मिळून ते 11 गोरखा राइफल्सच्या पाचव्या बटालियन मध्ये नियुक्त झाले. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत दहा वर्षे त्यांनी सरहद्दीवर होणाऱ्या घुसपेठीचा आणि हत्यारबंद संघर्षोंचा जोमाने मुकाबला केला. यात दुर्गम अश्या पहाडी प्रदेशातल्या नियुक्तीचा ही समावेश आहे. 1987 मध्ये अरुणाचल प्रदेशच्या  सुमडोरोंग-चू भागात कर्नल म्हणून तैनात असलेल्या जनरल रावत यांनी हल्लेखोर चिनी फौजेशी दोन हात करून माघारी धाडणाऱ्या बटालियनचे ही नेतृत्व केले.

अभ्यासू प्रवृत्तीच्या जनरल रावत यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि लष्करी नेतृत्वावर अनेक लेख लिहिले. विविध जर्नल्स आणि प्रकाशनांमध्ये ते प्रकाशित ही  झाले. त्यांनी मॅनेजमेंट आणि कॉम्प्युटर स्टडीजमध्ये दोन डिप्लोमा देखील घेतले होते. 'मिलिटरी मीडिया स्ट्रॅटेजिक स्टडीज' या विषयावरील संशोधनासाठी जनरल रावत यांना मेरठच्या चौधरी चरणसिंग विद्यापीठाने, 'डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी' (पीएच.डी.) प्रदान केली होती. 

जनरल रावत हे सेनादलाचे सर्वाधिक डेकोरेटेड अधिकाऱ्यांपैकी एक होते. आपल्या चार दशकांच्या सेवेसाठी, परम विशिष्ट सेवा मेडल, अति विशिष्ट सेवा मेडल, उत्तम युद्ध सेवा मेडल, विशिष्ट सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल, सेना मेडल आणि त्याच बरोबर थळ सेना अध्यक्षांच्या विशेष प्रशस्ती ने त्यांना सम्मानित करण्यात आलं. 1986 मध्ये मधुलिका रावत यांच्याशी त्यांचा विवाह झाला. शेवटच्या श्वासापर्यंत देशाची सुरक्षा सुनिश्चित करणारा निधड्या छातीचा निडर योद्धा म्हणून कृतज्ञ राष्ट्र जनरल रावत यांचं निरंतर स्मरण करेल.



,

नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com

8851540881

टिप्पण्या

  1. जनरल रावत,त्यांची पत्नी आणि अन्य11 णांना आदरांजली.
    छान शब्दबद्ध केले.

    उत्तर द्याहटवा
  2. अत्यंत माहितीपूर्ण आणि वाचनीय लेख . अभिनंदन, नितीनजी.

    उत्तर द्याहटवा
  3. माहितीपूर्ण लेख. बारकावे सुरेख टिपले आहेत. व्यक्तिचित्रण आणि घटनाक्रम एकात एक छान गुंफले आहेत .

    उत्तर द्याहटवा
  4. निडर योद्धा चा माहिती पूर्ण लेख.पूर्ण नतं मस्तक

    उत्तर द्याहटवा
  5. Military Media Strategic Studies वरील संशोधनासाठी मेरठ विद्यापीठानी Doctor of Philosophyने गौरविले, हे खचितच एका दुर्लक्षित विषयावरचे अभ्यासू चिंतन व लेखन पुढील पिढीसाठी अमूल्य भेट होय. CDS बिपीन रावत वरील आपले लिखित तेवढच गौरवस्पद !

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती