स्मृतीबनातून-एका गीता(नज़्म) मागचं कवित्व

एका गीता (नज़्म) मागचं कवित्व


सुखाची अभिलाषा ही निश्चितच मानवी जीवनाची प्रेरणा आहे. तर दु:ख आणि वेदना हे मानवी जीवनाचे प्रखर वास्तव आहे. सुखाच्या शोधात मार्गस्थ झलेलेल्या  प्रवाशाला, कधी न कधी दुःखाला, वेदनेला सामोरे जावेच लागते आणि जर मामला ‘दिल्लगी’ चा असेल तर मग होणाऱ्या जखमेच्या खोलीची तुलना सागर तळाशीच होऊ शकते.

आकाशवाणीच्या विविध भारती केंद्रावर प्रसारित होणारे छायागीत, बेला के फूल, हे चित्रपट संगीताचे कार्यक्रम ऐकणे हा पूर्वी माझ्या कामाचा एक भाग होता, आता हे एक आरामदायी छंदकाम आहे. बऱ्याच वर्षांनंतर अलीकडेच, 'दिल्लगी चा दर्द'  विषद करणारी, एक निरतिशय भावोत्कट गझल पुन्हा एकवार कानावर आली. एस.एच. बिहारी यांच्या लेखणीतून झरलेल्या या गीताचा (नज़्म) एक एक शब्द एखाद्या बाणा प्रमाणे आपल्या हृदयाचा वेध घेतो. विकल मन असाह्यतेने झुरू लागते. ओ.पी.नय्यर सारख्या बहुआयामी संगीत दिग्दर्शकाच्या हाती जेव्हा अशी एखादी पद्यावली (#Geet, #Najma) येते आणि जेव्हा ती आशा भोसले सारख्या स्वर मलिकेच्या सिद्ध गळ्यातून प्रवाहित होते तेव्हा स्वर्ग दोन बोटे ही उरत नाही. ही धराच स्वर्गमय भासमान होते. इंद्रपुरीची गंधर्व सभा ही, या मर्त्यलोकीची दाद मिळवण्यासाठी आसुसते. बिहारी यांच्या या नज़्म चा प्रत्येक शब्द आणि आशाचा एक एक सुर अश्रुपाता शिवाय ऐकताच येत नाही. विरहातिरेकानी मन व्याकूळ होते.


चैन से हमको कभी

आपने जीने ना दिया

ज़हर भी चाहा अगर

पीना तो पिने ना दिया

चैन से हमको कभी


वियोगाच्या भावनेने नायिकेच अंतरंग विकल झालं आहे. मनात कुठेतरी फसवले गेल्याची सल ही अगदी ताजी आहे. अशा स्थितीत ती म्हणते आहे या प्रेम भावनेमुळे, सततच्या ओढीपोटी, शांत, निवांत जगताच आलं नाही. किमान मृत्युला कवटाळून शांतता मिळवावी तर विष देखील पिऊ दिलं नाही.


चाँद के रथ में

रात की दुल्हन जब जब आएगी

याद हमारी आपके

दिल को तरसा जाएगी

प्यार के जलते जखमों से जो

दिल में उजाला हैं

अब तो बिछड के और भी ज्यादा

बढनेवाला हैं

आपने जो है दिया

वो तो किसीने ना दिया

ज़हर भी चाहा अगर

पीना तो पिने ना दिया

चैन से हमको कभी


आपल्या प्रेमाचा हवाला देत ती म्हणते की जेव्हा जेव्हा नव्या नवरी प्रमाणे सजलेली चांदण रात येईल तेव्हा तेव्हा माझ्या आठवणींनी तुझ हृदय व्याकूळ होईल. प्रेमाच्या तेवत राहणाऱ्या जखमांमुळे हृदयात जो प्रकाश पसरला आहे तो आता विलग झाल्यावर तर अधिकच प्रखर होईल. तू जे काही दिलं आहेस ते इतर कुणी काही दिलेल्या पेक्षा आगळच आहे.


आपका गम जो इस दिल में

दिन रात अगर होगा

सोचके ये दम घुटता है

फिर कैसे गुज़र होगा

काश ना होती अपनी

जुदाई मौत ही आ जाती

कोई बहाने चैन

हमारी रूह तो पा जाती

इक पल हँसना कभी

दिल की लगी ने ना दिया

ज़हर भी चाहा अगर

पीना तो पिने ना दिया

चैन से हमको कभी.


ती चिंताक्रांत आहे. वियोगाचं दु:ख रात्रंदिवस असंच मनात राहिलं तर जगायचं कसं? याच विचारांनी घुसमट होते आहे. आयुष्य जगत असताना विलग होण्यापेक्षा जर मृत्यू आम्हाला विलग करता, तर निदान आमच्या आत्म्याला तरी शांती लाभली असती. प्रेमावेगात निव्वळ तळमळच वाट्याला आली. आनंदाचा एकही क्षण लाभला नाही.


मीलना प्रमाणेच विरह, छल या भावनांची उत्कट अभिव्यक्ती हे खमाज रागाचं वैशिष्ट्य आहे. ओ पी नय्यर यांनी अत्यंत विचक्षणपणे ह्या गझले साठी नेमकेपणाने त्याचीच निवड केली. ही नज़्म राग खमाज वर बेतली आहे. ओ पी हा असा संगीतकार होता जो संगीत रचना करतेवेळी केवळ शब्द, शब्दार्थच नाही तर भावना ही विचारात घेत असे. अश्या कलासक्त मनाने निर्मिलेल्या रचनेला आशेचा सुर लाभणे म्हणजे समासमा संयोगच म्हणायचा.



'प्राण जाये पर वचन ना जाये' या चित्रपटासाठी एस एच बिहारी यांच्या कडून लिहून घेतलेली ही नज़्म चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच, 'आप ने जो हैं दिया वो तो किसी ने ना दिया' अशी पावती देत रसिकमनात घर करून गेली. ही गझल म्हणजे जणू काही शब्द, संगीत आणि  गायन यांची परिसीमाच आहे. या गझलेसाठी आशा भोसले यांना सन 1975 चा सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका म्हणून फिल्म फेअर पुरस्कार मिळाला यात काहीच आश्चर्य नाही.



पण हाय रे दैवा ! सर्वांच्या मनात घर केलेली आणि सर्वतोमुखी झालेली ही उत्कट विरहिणी तिच्या दोन प्रमुख रचनकारांच्या आयुष्याची कहाणीच कथन करणारी ठरणार आहे हे कुणाच्या स्वप्नीही आलं नाही.

ओ पी आणि आशा यांच्यात 1963 ते 1972 पर्यंत व्यावसायिक आणि व्यक्तिगत जी सुरेल जवळीक होती ती लय ताल सोडू लागली होती. इतकी की रेखा वर चित्रित झालेली ही गझल चित्रपटात वर्ज्य झाली. आशा भोसले यांनी तर पुरस्कार समारंभा कडे पाठ फिरवली. ओ पी आणि एस एच बिहारी  समारंभाला गेले. ओ पी नी आशाच्या अनुपस्थितीत पुरस्कार स्वीकारलाही, मात्र घरी परतते वेळी कार मधूनच तो खाडीत फेकून दिला. सृजनाच्या पातळीवर आणि लोकप्रियतेच्या बाबतीत आकाशाची उंची गाठलेल्या या गझलेच्या नशिबी मानवी नाते संबंधांच्या दुराव्यामुळे सागरतळ पाहणं नशिबी आलं.  साठच्या दशकात एकाहून एक सरस सुरेल गीतं साकारणाऱ्या या जोडीच हे अखेरचं काव्य ठरलं.   




ऐकण्यासाठी क्लिक करा - चैन से हमको कभी


नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com

८८५१५४०८८१

टिप्पण्या

  1. उत्तम स्फुट! माझ्या हृदयाजवळचे गीत. मी अशा व्यक्तीही जवळून पाहिल्या आहेत त्यातील स्त्रीच्या मनातील भाव अशा प्रकारचे असावेत. धन्यवाद!!

    उत्तर द्याहटवा
  2. व्वा, खुपच छान माहिती. एवढ्या सुंदर गझल मागच्या ईतक्या वेदना असतील हे माहिती नव्हते.

    उत्तर द्याहटवा
  3. छान सर, अनोखी माहिती. शब्द लिहिणारे किंवा या शब्दांना चाली देऊन गीत अजरामर करणाऱ्यांचे पाय देखील मातीचेच असतात.

    उत्तर द्याहटवा
  4. काय दर्द आहे या काव्यात।दिल जिनके तटूटे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक