प्रासंगिक - उड्डाण परी- कॅप्टन जोया

 उड्डाण परी- कॅप्टन जोया


रेकॉर्ड ब्रेक


एअर इंडिया फ्लाइट AI 176.. सॅन फ्रान्सिस्को ते बंगलोर..16000 किमी..जगातील सर्वात लांब हवाई मार्ग..सतरा तासांहून अधिक अविरत उड्डाण... उत्तर ध्रुवावर चौतीस हजार फूट उंचीवरून.. चार सदस्यीय चालक दल(crew)...विशेष बाब म्हणजे संपूर्ण महिला चालक दल...चारही सदस्य भारतीय सुकन्या...आणि नेत्री होती हवाई शलाका कॅप्टन जोया अग्रवाल आणि तिच्या सहकारी होत्या कॅप्टन पापागारी थांमाई, कॅप्टन आकांक्षा सोनावरे आणि कॅप्टन शिवानी मनहास.



स्वप्न आणि स्वप्नपूर्ती


एक  लहान मुलगी, वय केवळ आठ वर्ष. आपल्याच घराच्या गच्चीतून लुकलुकणाऱ्या  तारकांकडे अनिमिष नेत्रांनी तासनतास टक लावून बघत असे आणि जेव्हा एखादं विमान आकाशात ढग चिरून जातांना पाहात असे तेव्हा तिचे छोट्या तेजस्वी डोळ्यात स्वप्न साकारत असे. काय होतं ते स्वप्न? साधारणतः आपल्यालाही विमान प्रवास करता यावा, आपल्यालाही पक्षांप्रमाणे उडता यावं अशी काहीशी स्वप्न या वयात पडणं स्वाभाविक आहे. मात्र ही मुलगी असाधारण म्हटली पाहिजे कारण हिला विमानात बसण्याच नाही तर  विमान उडवण्याचंच स्वप्न पडत असे. स्वप्न पूर्ण होण्यासाठी आधी ती पहिली पाहिजे. तेव्हा ते स्वप्नवतच होतं. मात्र निद्रावस्थेत नाही तर जगृतावस्थेत बघितलेलं स्वप्न. बालपणीच ते स्वप्न सत्यात बदलून, जोया आज जणु काही भारत मातेच्या डोळ्यातील एक चमकता तारा बनली आहे.



जोयाच स्वप्न हे स्वप्नच ठरलं नाही. ते धरेवरच न राहता गगनात झेपावलं. ती वैमानिक झाली. स्वप्नानं मूर्त रूप धारण केलं. मात्र स्वप्नपूर्तीचा मार्ग सोपा नव्हता. जोया ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी. त्यामुळे कुटुंबात मुली बरोबरच मुलाची भूमिकाही तिच्याच वाट्याला होती. तीचं घर हे रूढी परंपरेवर विश्वास असलेलं. त्यामुळे जोयाची स्वप्ने असंभव श्रेणीत जरी येत नसली तरी अडचणीही नक्कीच होत्या. आईच्या मनात योग्य वेळी आपल्या राजकुमारी साठी एखादा राजकुमार बघून तिला चतुर्भुज करण्याचं स्वप्न होतं. आईचे मन तिच्यासाठी कोण्या राजकुमाराचे स्वप्न पाहत होते आणि जोया लेकुरवाळी, गृहकृत्यदक्ष होऊन स्थिरस्थावर व्हावी अशी तिची मध्यमवर्गीय महत्वाकांक्षा होती. जोया ने जेव्हा तिच्या मनात वसलेली महत्वाकांक्षा घरी जाहीर केली तेव्हा तर तिची आईला चक्क रडू आलं. आपल्या पोटी सामान्य मुलगी जन्माला न येता अशी विक्षिप्त  मुलगी का जन्माला यावी? हे तिचं दुःख होतं. मात्र जोया आपल्या निर्णया वर ठाम राहिली. तिच्या ध्येयापासून मागे हटली नाही. सर्व अडचणींशी झुंज देत, ती तिच्या मार्गावर पुढे जात राहिली आणि ९ - ११ जानेवारी २०२१ या तीन दिवसात चार महिलांच्या चालक दलानं, सन फ्रान्सिस्को हून निघालेली फलाईट बंगळुरूला पोहोचवली. एअर इंडियाच्या ऐतिहासिक उड्डाणाचे यशस्वी नेतृत्व करत, आपल्या स्वप्नाला वास्तवाच्या महिरपित कोंदवून जोयाने ते आईला भेट केलं. आईचे दुःखाश्रू अभिमाना मुळे सुखाश्रूत परिवर्तित झाले. 

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दिल्लीत एका पुरस्कार सोहळ्यात जोयाची भेट झाली. तिच्याशी बोलताना असं वाटलं की तीच्या आई - वडिलांनी ठेवलेलं नाव तिनं सार्थक केल आहे. जोया म्हणजे तेजस्वी, जीवनाने परिपूर्ण, सुंदर आणि सहृदय.




ध्येयासक्ती आणि ध्येयपूर्ती


आज जमिनी पासून थेट गगना पर्यंत वाहवा मिळवणाऱ्या जोयाला आकाशाशी नातं जडवण्या साठी खूप संघर्ष करावा लागला. यशस्वी आस्मानी परी होण्याआधी जोयाला खडतर वाटचाल करावी लागली पण आकाशाला यशस्वीपणे स्पर्श करू शकण्याचे रहस्य बहुधा तिच्या व्यक्तिमत्त्वात दडलेलं आहे. कारण ध्येयासक्ती उद्देश्या प्रती प्रचंड तळमळ, संपूर्ण समर्पण, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन हे गुण कोणतेही स्वप्न सत्यात उतरवण्यास सक्षम आहेत. जोया याच उत्तम उदाहरण आहे. 


सामान्यातील असामान्य


एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील या मुलीला ग्रहमंडळातल्या तारकादलांनी लब्ध केलं. बालपणी तिला खेळण्यांमध्येही बाहुली नव्हे तर दुर्बीण हवी असायची. भोवतालच्या मुलामुलीं सारखं नसणं हे त्या वेळी तिच्या आई-वडिलांना चिंताग्रस्त करीत असे. पण लहानपणापासूनच तीचं अवकाश निराळं होतं. परंपरेच्या चौकटीत स्वतःला जखडून घेणं हा तिचा प्रकृतीधर्म नव्हता. सामाजिक रेट्यामुळे आपल्या स्वपनांना  तिलांजली देणं तिला रूचणारं नव्हतं.

उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ध्येयपूर्तीसाठी जोयानं  तीन वर्ष कठोर परिश्रम केले. एकाचवेळी दोन पूर्णवेळ अभ्यासक्रमात तिनं स्वतःला गुंतवून घेतलं. सकाळी सहा ते दुपारी साडे तीन वाजेपर्यंत ती दिल्लीतील सेंट स्टीफन कॉलेजमधील तिच्या अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करायची आणि नंतर रात्री साडेनऊ वाजे पर्यंत विमानन क्षेत्रातल्या प्रशिक्षणात मग्न असायची. तीची मेहनत आणि चिकाटी पाहून आई-वडिलांनीही तिचं असामान्यत्व स्वीकारलं आणि  तिच्या प्रशिक्षण आणि विमानान क्षेत्रातल्या परीक्षांसाठी कर्ज काढून पैशांची तरतूद केली. 

आकाशात भरारी मारण्याच्या जोयाच्या स्वप्नाला अखेरीस २००४ मध्ये पंख लाभले. स्वप्न पुरी होण्यासाठी आधी स्वप्न पहिली पाहिजेत आणि स्वतःला स्वप्नपूर्तीसाठी झोकून दिलं पाहिजे ह्या गोष्टीची एखाद्या बीजमंत्रा प्रमाणे प्रत्येकाने संथा घेतली पाहिजे. त्यावेळी आंतरराष्ट्रीय मार्गांवर उड्डाण करणारी एअर इंडिया ही एकमेव भारतीय विमान कंपनी होती. वैमानिकांसाठी नोकरीच्या संधीही तुलनेनं कमी होत्या. पण जोयानं प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि पायलटच्या दहा रिक्त पदांपैकी एक जागा पटकावली. तेव्हापासून ते आतापर्यंत जागतिक  विमान वाहतूक क्षेत्रात अनेक बदल झाले. महिलांसाठीही हवाई मार्ग थोडा सोपा झाला. जोया तिच्या स्वप्नील वाटेवर पुढे पुढे जात राहिली आणि २०१३ मध्ये, बोईंग-777 उडवणारी ती जगातील पहिली महिला पायलट बनली. जागतिक कोविड महामारीच्या २०२० मध्ये झालेल्या उद्रेका दरम्यान परदेशात अडकलेल्या १४००० भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेल्या वंदे भारत मिशन मध्येही जोयानं महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. वैमानिक पुरुष किंवा वैमानिक महिला असा कोणताही भेद तिला मान्य नाही. ती म्हणते की "सुरुवाती पासूनच प्रशिक्षण दिलं जातं ते वैमानिकाचं. त्यात महिला पायलट किंवा पुरुष पायलट असा भेद केला जात नाही". प्रतिकूल परिस्थिती वर मात करणारी जोयाची यशोगाथा ही नव युवतींना प्रेरणादायक ठरणारी आहे. स्वप्न रंगवून ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी युवतींना सक्षम करण्याचं काम मिशन म्हणून करण्याची जोयाची इच्छा आहे. उत्तरोत्तर नवी उंची गाठण्यात भारताची ही उडानपरी यशस्वी होवो या शुभेच्छा.



नितीन सप्रे


nitinnsapre@gmail.com


8851540881













टिप्पण्या

  1. लेख खूप छान आणि माहितीपूर्ण झाला आहे

    उत्तर द्याहटवा
  2. खुपच छान माहिती. अनेकांना स्फूर्ती मिळेल

    उत्तर द्याहटवा
  3. नेहमीप्रमाणे हे स्फुट अतिशय माहितीपूर्ण व व्यक्तीची योग्य ओळख करून देणारं. अभिनंदन! जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने याहून सुंदर काय असणार?

    उत्तर द्याहटवा
  4. यशाचं गमक नेमकं कशात असतं हे सांगणारा तसेच
    नव्या पिढीला प्रेरणादायी आणि मार्गदर्शन करणारा लेख.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक