प्रासंगिक - फुटबॉल - झुंड प्रवर्तन
फुटबॉल - झुंड प्रवर्तन
झुंड का बघायचा?
झुंड (Zhund)नजरअंदाज करता कामा नये. का? कारण झुंडचा भवताल हा प्रेरणेने व्यापला आहे. एकमेकां कडून मिळालेल्या प्रेरणेची ही मोहक शृंखला आहे. कदाचित ईश्वरी प्रेरणेचा संसर्ग आहे. कर्मयोग आहे आणि म्हणुच झुंड टाळता येत नाही, कवटाळावी अशी आहे. एक भक्कम सामाजिक वक्तव्य (Social Commentry) आहे.
सर्वसाधारणतः उच्चभ्रू समाजाला झोपडपट्टीचा विटाळ असतो. एका पावसाळी दुपारी झोपडपट्टीतील मुलांना तुटक्या बादलीचा फुटबॉल खेळताना पाहून, त्यांच्यासाठी काही करण्याची ऊर्मी एका निवृत्तीला आलेल्या खेळ शिक्षकाच्या मनात दाटली. हीच स्लम सॉकर (Slum Soccer)ची प्रेरणा ठरली. या स्वप्नदर्शी शिक्षकाच नाव आहे प्राध्यापक विजय बारसे. त्यांच काम झोपडपट्टीतील मुलांना गुन्हेगारी पासून दूर राहण्याची प्रेरणा देऊन गेलं. ह्या परिवर्तना पासून प्रेरणा मिळाली, नेहमीच हटके विषयाच्या शोधात असलेल्या युवा दिग्दर्शक नागराज मंजुळेला आणि अवतरला झुंड.
'आहे रे' आणि 'नाही रे'
झुंडच कथानक सुरू होतं नागपूरच्या गड्डी गुदाम झोपडपट्टी पासून आणि बेतलं आहे, 'आहे रे' आणि 'नाही रे' या समाजातील दोन वर्गांच्या जीवनावर. समाज परिवर्तनासाठी आज भरकस प्रयास होत असले तरी त्यांच्यात एक भिंत आहे, ती उंच आहे हे वास्तव नाकारता येत नाही.
भिंतीच्या अलीकडे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना फुटबॉल खेळण्याच्या साऱ्या सुविधा उपलब्ध आहेत तर पलीकडे वंचितांचा संच आहे. त्यांच्या वाट्याला आलेल्या जीवनशैलीत गुन्हेगारी, जुव्वा, नशाखोरी यांचा बोलबाला आहे. 'मोठ्ठा भाई' बनाण्याचं ध्येय आहे. हे परिस्थितीजन्य आहे. कारण सुरवातीला पैशाची लालुच दाखवून त्यांना फुटबॉल खेळायला प्रवृत्त करणारे प्राध्यापक बारसे(Prof. Vijay Barse) त्यांच्यात हळूहळू अमुलाग्र बदल घडवून आणतात. बेलगाम झुंड भिंत लांघुन संघात (Team) परिवर्तित होते. आज सत्तरी पार केलेल्या या खेळ शिक्षकाचा 20 वर्ष नेटानं केलेलेला कर्मयोग फलद्रूप होतो.
मनोरंजक आणि वैचारिक
एक मराठमोळा गावाकडचा दिग्दर्शक झुंड घेऊन बॉलीवूड नामक माया नगरीत प्रवेशतो तोच मुळी अभिनयाचा सर्वेसर्वा, महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनय म्हणजे काय हे जराही माहित नसलेले झोपडपट्टीतले बच्चे, यांचा एकाचवेळी आशीर्वाद मिळवीत. अतिमान्य अमिताभ आणि अतिसामान्य मुलं तसच वास्तववादी पटकथा लेखन आणि दिग्दर्शन, हे झुंडीच्या यशाचं गमक आहे. महानायकामुळे हा चित्रपट वेगळ्याच उंचीवर गेला असं म्हणणं कदाचित अर्धसत्य ठरेल. अमिताभच्या नावाचा नक्कीच फायदा मिळाला, मात्र त्यापेक्षा त्याला ज्या प्रकारे दिग्दर्शित (Project) केलं आहे त्या मुळे अधिक फायदा झाला असं वाटतं. अमिताभच्या सहभागामुळे झुंड कमर्शिअल बॉलिवूड सिनेमा होण्याचा मोठा धोका संभवत होता. पण दिग्दर्शकाने स्वत्व न सोडता तो नीटसपणे टाळला आहे.
नागराज मंजुळे(Nagraj Manjule) दिग्दर्शित या आधीच्या गाजलेल्या सैराट, फॅन्ड्री, पिस्तुल्या आदी चित्रपटांबद्दल जे काही वाचलं, ऐकलं किंवा बघितलं आहे त्यावरून सुजाण प्रेक्षकांच्या मनावर हे चांगलच बिंबल आहे की हा दिग्दर्शक केवळ मनोरंजन करीत नाही तर तो विचार करायला सुद्धा प्रवृत्त करतो. त्याचा स्वतःचा म्हणून काही सूत्र (Formula) आहे. मराठीतून हिंदी प्रांतात जात असताना सुद्धा मोठी दिलेरी दाखवत त्याने आपल्या फॉर्म्युल्याला तिलांजली दिली नाही हे वाखाण्याजोगे आहे. महानायकाचा चित्रपटातील वावर हा सामान्यपणे असामान्य आहे. जोडीला अभिनय, कॅमेरा यांच्याशी साधी तोंड ओळख नसलेली मुलही अमिताभ इतकीच सहज वावरतात आही चमकदार कामगिरी नोंदवतात.
चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे ही बाब नागराजनं ठळकपणे अधोरेखित केली आहे. झुंड पाहताना हे सतत जाणवत रहातं. जमिनीशी नातं सांगणाऱ्या विषयावर, थेट जमिनीवरच्या लोकांना घेऊन, जमिनी भाषा वापरून, जमिनी आशय सांगणाऱ्या चित्रपटांची निर्मिती हे दिग्दर्शक नागराजचं एक वैशिष्टय आहे. त्यामुळे त्याच्या चित्रपटांना चुलीवरच्या स्वयंपाकाचा स्वाद येतो. सैराट, फॅन्ड्री, ह्या आधीच्या मराठी चित्रपटांना हीच स्वादिष्ट फोडणी आहे. झुंड ही त्याची बॉलीवूड मधल्या महानायकाला घेऊन पदार्पणाची फिल्म ही, याला अपवाद ठरली नाही हे विशेष.
जन्मकथा
झुंड ज्यांच्यावर आधारलेला आहे ते वास्तवातले नायक प्राध्यापक बारसे यांच्याशी नागराज ची भेट ही फिल्मीच होती. रात्री साडे दहाच्या सुमारास नागपुरातल्या गड्डी गुडाम परिसरातल्या बारसे यांच्या घराचा दरवाजा खटखटतो. दरवाजा उघडाच असतो. आत येते ती चार पांच जणांची झुंड. स्वतः बारसे है फारसे चित्रपट प्रेमी नसल्याने फॅन्ड्री(Fandry), सैराट(Sairaat)आदी परवलीच्या शब्दांनी ओळख पटणे कठीणच जाते. अखेरीस झिंग झिंग झिंगाट(Zing zing zingaat) कामी येतं, नागराज ची ओळख पटते आणि मिशन उद्दिष्ट्य (Mission Statement) अबाधित ठेवल्या जाईल या आश्वासनावर झुंडला बारसेंचा होकार मिळतो. वास्तवातले कलाकार, स्थळं (Location), भाषा इतकच नव्हे तर अनेक चित्रपटातून विजय नावाने अभिनय केल्यानंतर पहिल्यांदाच खराखुरा विजय साकारणारा, मुंबई, पुणे किंवा अन्य ठिकाणं न वापरता पूर्णतः नागपुरात चित्रीकरण झालेला झुंड पडद्यावर अवतरतो.
झुंडीतल्या चोऱ्यामाऱ्या करणाऱ्या, इतर अनेक गुन्हेगारीत व्यग्र असलेल्या झोपडपट्टीतील मुलांना यागायोगानेच प्राध्यापक विजय बारसे यांच्या सारखा सुशिक्षित, संवेदनशील मार्गदर्शक लाभतो. या मुलांना फुटबॉलच व्यसन लावून अन्य व्यासनां पासून दूर ठेवण्यासाठी बारसे जे काही करतात त्याचं चित्रण दिग्दर्शक इतक्या निवांत करतो की, जणूकाही मैफिलीत तबियतित स्वरविस्तार करून मोठा ख्याल गाणाऱ्या एखाद्या पंडितजी अथवा उस्तादाची आठवण यावी. अर्थात दृतलयीत छोटा ख्यालच ऐकायला आलेल्या श्रोत्यांचं अशावेळी जे काही होतं तेच अनेक प्रेक्षकांचं ही इथे होतं. नाही म्हणायला आकाश ठोसर रंगवीत असलेली नकारात्मक भूमिका काहीशी अस्पष्ट वाटली.
संवाद भेट
दिल्लीत आयोजित करण्यात आलेला झुंड चा विशेष खेळ दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि कलाकारांच्या संगतीत पाहण्याचा योग जुळून आला आणि सर्वांशी संवाद ही साधता आला. अर्थात याच श्रेय शुक्राचार्य जाधव, संतोष अजमेरा, सतीश जाधव आणि टीमला आहे. जेवतांना अनौपचारिक गप्पा मारताना त्याच्या दिग्दर्शन प्रक्रिये विषयी अधिक जाणून घेता आलं. नागराज सहज सांगून जातो की "अभिनय चांगला वठला तर ते श्रेय अभिनेता/अभिनेत्री आणि दिग्दर्शक अश्या दोघात ही वाटलं जाऊ शकतं पण त्यांनी माती खाल्ली तर मात्र ती जबाबदारी संपूर्णतः दिग्दर्शकाची असते." झुंडच्या नवख्या कलाकारांच्या अभिनयाला दाद देतानाच चित्रपट निर्मितीच तंत्र दिग्दर्शक कसं हाताळतो याला ही खूप महत्व असल्याचं तो विषद करतो. समाजमध्यामातून होणाऱ्या टीकेला फारशी भिक घालत नसल्याचं निर्भिकपणे नागराज सांगतो. कौतुकानं हुरुळन जात नाही आणि टीकेला भीत नाही अशी स्पष्टोक्ती करत तो जातीयवादाचा आरोप निकाली लावतो.
झुंड प्रेक्षकांना पर्यायाने समाजाला काय देतो? थोडक्यात सांगायचं झालं तर दोन महत्वाचे संदेश देतो. एक तर निव्वळ कसब असून उपयोग नाही त्याला वळण मिळालं पाहिजे. झोपडपट्टीतल्या मुलांच्या पायात कसब तर होतच, बारसे रुपी मार्गदर्शकाने त्याला वळण लावताच झुंड ची यशस्वी फुटबॉल टीम घडली आणि दुसरा महत्वाचा संदेश म्हणजे 'हर बार जीतना जरूरी नहीं है.'
नितीन सप्रे
8851540881
nitinnsapre@gmail.com
फार सुंदर उतरलाय लेख नितिन !!
उत्तर द्याहटवासटिक आणि सुबक समीक्षण , अभिनंदन सर
उत्तर द्याहटवा