स्मृतिबनातून - "क्यूँ आंधी में दीप जलाया"


"क्यूँ आंधी में दीप जलाया "




जानेवारी चा महिना संपत आलेला. जुन्या वर्षाच्या शेवटाला आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला हवेत असलेला बोचरा गारवा निवळून, तनामनाला तजेला देणारं वातावरण होतं. उत्तराखंडचे प्रवेशद्वार म्हणता येईल अश्या काठगोदामचा मैदानी भाग पार करून हिमालयाचे दर्शन घडवणाऱ्या वळणदार पहाडी रस्त्याला आमची गाडी लागली होती. संगीताच्या सोबतीनं प्रवास ही माझ्यासाठी नेहमीच आनंद पर्वणी असते. त्यातच योगायोगाने एनिव्हिओला अनुभवायला मिळाला.(जी ए कुलकर्णीच्या कथेतला शब्द. द्राक्षाचा रस ज्या क्षणी मद्य होतो तो जादुई क्षण) 'मनमौजीत'लं साधनावर चित्रित झालेलं, ' मैं तो तुम संग नैन मिला के हार गयी सजना,' हे गाणं कानात सुरू झालं.

(click to listen)

लता दीदींच्या अनेक उत्कृष्ट गीतां पैकी हे एक गीत. मुखड्यातल्या 'नैन ' वर मुरकी, आंदोलन घेत, हृदयावर धारदार सुरी चालावी, असा दिलखेचक लागलेला शुद्ध धैवत ऐकला की आपण आपोआप या गाण्याच्या प्रेमातच पडतो. गाण्याची पारायणंही अपरिहार्य होऊन बसतात. ( संगीताशी प्रीती असली तरी रीती साठी बरेचदा शास्त्रीं ची मदत घ्यावी लागते.) मेलडी किंग मदन मोहन, कोणतं ही गीत गळ्यातून लीलया उमलवणाऱ्या लता दीदी, सरल शब्दात आशयगर्भित रचना करण्यात हातखंडा असलेले, गीतकार राजेंद्र कृष्ण आणि गीत पडद्यावर जगणारी सुस्वरूपा,अभिनय सिद्ध साधना, असा चौरंगी योग इथे जुळून आला आहे. 

संगीतकार मदन मोहन यांची ही रचना गोरख कल्याणातील असल्याचं जाणकारांचं मत आहे. मला त्यात पहाडीची सुरावटही ऐकू आली. हिमालयाच्या सानिध्यात असल्यामुळे की काय कोण जाणे? काही ठिकाणी शिवरंजनी च्या वाळणानं जात असल्याचं जाणवलं. तसही मदन मोहन हा संगीतकार गाण्याच्या वेगवेगळ्या कडव्यात वेगवेगळ्या रागांचा आधार घेऊन श्रोत्यांच्या मनात रचने प्रती अनुराग उत्पन्न करून बहार आणीत असे. अर्थात माझा हा विचार तानसेनी नव्हे तर कानसेनी म्हणावा लागेल.


हलक्या फुलक्या प्रवृत्तीच्या पहाडी रागाचं वैशिष्टय म्हणजे प्रेम फुलवणाऱ्या भावनांच्या प्रकटीकरणा बरोबरच प्रेमातले अडथळे, विरह भावनाही, या रागाच्या माध्यमातून व्यक्त केल्या जाऊ शकतात. नौशाद, एस. डी. बर्मन, शिव-हरी(शिवकुमार शर्मा आणि हरिप्रसाद चौरसिया), ओ. पी. नय्यर, पंचमदा, अशा अन्य अनेक संगीतकारांनी आपल्या रचनांसाठी हा राग बऱ्या8चदा निवडला आहे. गीत प्रभावी होण्यासाठी मदन मोहन यांनी या रागांचा आधार घेतला असावा. विडंबना पहा की उत्तमोत्तम रचनेच्या या रचयित्याच्या हाती फिल्म फेअर ची कमनीय बाहुली मात्र कधी आली नाही. हे गीत साठच्या दशकातलं आहे. त्याकाळी चालीला शब्द देण्या पेक्षा शब्दांना चाल देण्याचा प्रघात अधिक होता. त्यामुळे गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी प्रसंगानुरूप शब्द रचना करून मदन मोहन यांच्याकडे 'चाल' सोपवली असावी. या गीतात एकही शब्द अलंकृत नाही. निव्वळ भाषा जाणणाऱ्या एखाद्या अशिक्षितालाही विनासायास अर्थ उमजेल अश्या सोप्या शब्दांची योजना केली आहे.



"ना मिलतीं ये बैरन अँखियां

चैन न जाता दिल भी न रोता

काश किसी से प्यार न होता"....

ऐकता क्षणीच काळजाला भिडेल अशी रचना करणं महा कठीण असतं. या गीतात अगदी मुखड्या पासून, पहिल्या, दुसऱ्या अंतऱ्यासह, शेवटा पर्यंत हे साधलं आहे. शेवटच्या अंतऱ्यातल्या शेवटच्या ओळीत गीतकारा  कडून गीताचा सार अभिव्यक्त करणारी हताश भावना, लता दीदींनी 'नैन' वर केलेल्या कलाकुसरीची जणू काही प्रेरणा होती.


मैं तो तुम संग, नैन मिला के (slow)

हार गई सजना, हो, हार गई सजना

मैं तो तुम संग, नैन मिला के

हार गई सजना, हो, हार गई सजना


क्यूँ झूठे से प्रीत लगाई 

क्यूँ छलिये को मीत बनाया

क्यूँ आंधी में दीप जलाया

मैं तो तुम संग ...


सपने में जो बाग़ लगाए

नींद खुली तो वीराने थे

हम भी कितने दीवाने थे

मैं तो तुम संग ...


ना मिलतीं ये बैरन अँखियां

चैन न जाता दिल भी न रोता

काश किसी से प्यार न होता

मैं तो तुम संग …



लता दीदींच्या आणि अन्यांच्याही संगीत कारकिर्दीच्या वर्णना साठी केवळ 'लता' हेच शब्द समर्पक आहेत असं मला अलीकडे वाटायला लागलं आहे. मास्टर दीनानाथ म्हणत असत की रसिकांना मोहित करायला ख्याल गायकाला पुरेसा अवधी मिळतो मात्र सुगम संगीत, फिल्म संगीत गायकाला पहिल्या सुरा पासूनच हे साध्य करावं लागतं. वडिलांचं हे मत या गाण्यासह प्रत्येक गाण्यात लता मंगेशकरांनी प्रमाणित केलं आहे. त्यांचा कंठ लाभलेली सर्व गीतं मुरकी, आंदोलन, खटका, झमझमा, मिंड, गमक यापैकी योग्य सांगितिक अलंकारांनी सालंकृत होऊनच आपल्यापुढे अवतीर्ण होतात. साठी उलटून गेलेल्या या सारख्या गीतांशी आजच्या तरुणाई कडूनही होणारा प्रेमालाप म्हणजे या गीतांच्या लावण्याला मिळालेली पावतीच आहे. नाही का?



गीताच्या शब्दांतून, रचनेतून आणि सुरातून पाझरणारी वेदना तितक्याच सशक्त अभिनयानं, साधना पडद्यावर समर्थपणे जगली आहे. सौंदर्य आणि अभिनय प्रतिभेचा एकत्रित मोहक आविष्कार म्हणजे साधना! या गीतात 'उदास' भावनाही किती लोभसवाणी झाली आहे ! साधना कट तर तिच्यामुळेच प्रसिध्दीस पावला हे सर्वांना परिचयाच आहे पण आजच्या तरुणाईत प्रचलित असलेला चुडीदार, तिनेच पहिल्यांदा साठच्या दशकात परिधान केला होता. असं सांगतात की शर्मिला टागोर, हेमा मालिनी, मुमताज सिने सृष्टीत अवतरीत होई पर्यंत साधना सर्वाधिक महागडी नटी होती. प्रेक्षक, श्रोते आकर्षित करण्यासाठी नको त्या तडजोडी स्विकारूनही मर्यादित यशच मिळवणाऱ्या कलाकारांना अशा कलाकारां कडून निश्चितच बोध घेता येईल, ती संवेदना मात्र असली पाहिजे! 


प्रेमात पडलेल्या, भावनातिरेक अनुभवणाऱ्या, प्रेयसीची प्रियकरा प्रती असलेली अत्याधिक आकर्षणाची भावना अनुपम रित्या रसिकां पर्यंत पोहोचवण्याची किमया आपल्या चहूमुखी प्रतिभेनं राजेंद्र कृष्ण, मदन मोहन, साधना, लता यांनी साधली आहे.


नितीन सप्रे

8851540881

nitinnsapre@gmail.com








टिप्पण्या

  1. मैं तो तुम संग नैन मिलाके मध्ये चौरंगी योग जुळून आला आहे तर तुमच्या लेखणीमुळे तो पंचरंगी जुळला आहे. खूप छान.

    उत्तर द्याहटवा
  2. छान आणि समर्पक लिहिलंय !👍आवडलं !🌹

    उत्तर द्याहटवा
  3. तुमच्या सांगितिक प्रवासात मी फक्त फिरस्ता आहे.. या प्रवासात मला नेहमीच नवनवीन अनुभव येतो..आता पुढे गेल्यावर काय असा विचार केला की ,जे नवीन समोर येत ते वाचून अद्भूत असते. "एनिव्हिओला" अनुभवायला मिळते..

    उत्तर द्याहटवा
  4. लता मंगेशकर यांचे गायन याबरोबरच तुमच्यामुळे मदन मोहन चे संगीत आणि कवीचे काव्य यांचे रसग्रहण करायला लागलो . थोडं फार शिकतो आहे. मनापासून आभारी आहे.

    उत्तर द्याहटवा
  5. नितिंजींच्या लेखणीतून अर्थ गर्भित शब्द अलगद ओळीवर उतरतात, आपण काही वाचतोय की अनुभवतोय असा संभ्रम निर्माण होतो.

    उत्तर द्याहटवा
  6. वा भाई नितीनजी
    कमालच केलीत तुम्ही माझ्या अत्यंत आवडत्या गीताबद्दल इतकं सविस्तर आणि सुंदर लिहिलय।
    सगळे ग्रेट लोक एकत्र आले की असं गाणं तयार होतं।

    उत्तर द्याहटवा
  7. तुमच्यामुळे गाणं समजायला मदत होते असे वाटते की तुम्ही गाण्यावरच लिहत रहावे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक