प्रासंगिक-अमर्त्य मदन 'मन'मोहन
संगीतातला कोहली
मदन मोहन रायबहाद्दुर चुंनीलाल कोहली अश्या भारदस्त नावाचा धनी म्हणजेच, आपणा सर्वांना सुपरिचित असलेला बॉलीवूडचा अन्योन्य, तरल संगीतकार मदन मोहन. त्यांची निव्वळ संगीतकार अशी ओळख ही खचितंच अपूर्ण ठरेल. त्यांच्या संगीत रचना या केवळ श्रवणानंद देणाऱ्या नसून संमोहनकारी आहेत. संगीतानं संमोहित करण्याची जणू सिद्धीच त्यांना हस्तगत झाली होती. म्हणूनच त्यांना केवळ संगीतकार नाही तर संमोहनकार ही म्हणावं लागेल. बहुआयामी प्रतिभेचा तो स्वामी होता. त्याच्या प्रतिभेचं वर्णन करण्यासाठी एका भाषेतील विशेषणं अपुरी पडतील. मदन मोहन यांच्या रचना आणि लता दीदींचे सूर म्हणजे तर, स्वरमाधवीच्या अज्ञात प्रदेशात अदृष्य पंखांनी मुक्त विचरण करत, अपार स्वरानंदात हरपून जाण्या सारखं आहे.
'लग जा गले के फिर वही', 'आप की नजरों ने समझा', 'बैंय्या ना धरो', 'मेरा साया साथ होगा', 'तुम जो मिल गये हो', 'हम प्यार मे जलनेवालों को', 'उनकी ये इनायत हैं की हम कुछ नही कहते', 'बदली से निकला हैं चांद', 'बैरन निंद न आए', 'तेरी आंखो के सिवा दुनिया में रखा क्या है(झिंझोटी)', मिलो ना तुमसे हम घबरायें' या सारखी एकाहून एक मोहमयी गीतं, 'जरुरत है जरुरत हैं जरुरत हैं एक श्रीमती की', या सारखं अवखळ गाणं, 'ये माना मेरी जान मुहब्बत सजा हैं', सारखी कव्वाली, 'रस्मे उल्फत को निभाए', 'हम हैं मता-ए-कूचा-ओ-बाज़ार की तरह', 'वो भूली दास्तां को फिर याद आ गयी', 'बेताब दिलं की', 'माई री मै कासे कहुं पीर अपने जिया की', 'जो हमने दास्तां अपनी सूनाई(चारुकेशी)', 'तुम बिन जीवन कैसे बिता', 'अगर मुझसे मुहब्बत हैं', 'फिर वही शाम', 'मेरी याद मे तुम ना', 'भुली हुई यांदों (यमन कल्याण)', 'जाना था हमसे दूर(पिलू धून)'....
ही यादी न संपणारी आहे….२५ जुन १९२४ ला स्वर्गावतरण करून आलेला हा गंधर्व आपणा साठी अश्या उत्कृष्ट गीतांचा अनुपम ठेवा ठेवून वयाच्या पन्नाशीत अचानक खट्टू मनानं १४ जुलै १९७५ ला पुनश्च स्वर्गारोहण करता झाला. मात्र त्याच्या रचनांची मोहिनी आजही तिळमात्र कमी झालेली नाही आणि पुढेही ही मोहमिठी कधी 'जरा'शीही सैल होईल असं वाटंत नाही.
जडण घडण
मदन मोहन यांचा जन्म बगदादचा. वडील इराक पोलीस खात्यात अकाउंट जनरल होते. पुढे ते चकवाल या त्यांच्या गावी परतले. लाहोरच्या शाळेत काही वर्ष त्यांचं शिक्षण झालं त्यावेळी त्यांसेकंड लेफ्टनंट होते. दुसऱ्या महायुध्दात ही ते सहभागी होते. युद्ध संपताच लष्कर सोडून ते आपलं पहिलं प्रेम संगीताच्याच मागे गेले:,नी शास्त्रीय संगीताचं प्राथमिक ज्ञान मिळवलं, मात्र औपचारिक शिक्षण घेतलं नव्हतं. चित्रपट क्षेत्रात जाऊ नये म्हणून त्यांच्या आजोबांनी त्यांना डेहराडूनच्या लष्करी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत त्यांना दाखल केलं. १९४२ ते १९४४ अशी दोन वर्ष ते लष्करात सेकंड लेफ्टनंट होते. दुसऱ्या महायुध्दात ही ते सहभागी होते. युद्ध संपताच लष्कर सोडून ते आपलं पहिलं प्रेम संगीताच्याच मागे गेले. त्यांनी आकाशवाणी लखनौ आणि दिल्ली इथे नोकरी केली. मात्र तिथे मन फारसं रमलं नाही. अभिनय, गायनाचा ध्यास उरी बाळगून ते मायानगरी मुंबईत दाखल झाले. रणभूमीवर बंदूकीच्या गोळ्या चालवलेल्या या सैनिकाच्या मायानगरीतल्या सुरील्या कामगिरीनं अनेकांची हृदयं नुसती घायाळ झाली असं नव्हे तर क़त्ल झाली असं म्हणावं लागेल. कामासाठी कुणा कडे याचना न करण्याचा बाणेदारपणा आणि स्वतःला रुचणारं उच्च अभिरुची असणारं संगीतच करायचं, तडजोड करायची नाही, असा गाणेदारपणा त्यांनी आजन्म बाळगला. मराठीतले पहिले शायर भाऊसाहेब पाटणकर म्हणतात, "हसतील ना कुसूमे जरी, ना जरी म्हणतील 'ये'
पाऊल ना टाकू तिथे, बाग ती अमुची नव्हे
भ्रमरा परी सौंदर्यवेडे आहो जरी ऐसे आम्ही
इश्कातही नाही कुठे भिक्षुकी केली आम्ही
खेळलो इश्कात आम्ही बेधुंद आम्ही खेळलो
लोळलो मस्तीत नाही पायी कूणाच्या लोळलो
अस्मिता इश्कात सा-या केव्हांच नाही विसरलो
आली तशीही वेळ तेव्हा इश्क सारा विसरलो’
असा माज नव्हे तर मिजाज मदन मोहन बाळगून होते.
स्वरलंकारीत कष्टिक कारकीर्द
संगीताच्या प्रेमाखातर त्यांनी अनेक हालअपेष्टा सोसल्या. भविष्यात आपल्या अप्रतिम मोहक रचनांनी असंख्य संगीत प्रेमींच्या हृदयात कायमच घर केलेल्या या घरंदाज कलाकाराला घरातूनही बाहेर करण्यात आलं. आठ आठ दिवस उपाशी राहून, रस्त्यावरच झोपून आपली संगीत सृजनता त्यांनी जागृत ठेवली. पावकाचे(अग्नी)चटके सोसून त्यामध्ये तावून सुलावून निघाल्यावरच सोन्या पासून दागिना घडतो. मदन मोहन हा असाच सुवर्णांकीत स्वरालंकार होता.
हिंदी चित्रपट सृष्टीत 'किंग ऑफ मेलडी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संगीत दिग्दर्शकाची लता दीदींना पहिली पसंती असायची. मदन मोहन साठी गाताना त्याही कांकणभर अधिक जीव ओतून गात असत असं म्हणायला हरकत नाही. मोहम्मद रफी, मुकेश, किशोरदा आणि तलत महमूद यांनीही त्यांची गीतं, गझला अप्रतिम गाऊन चिरस्मरणीय करून ठेवली आहेत. राजा मेहदी अली खान, राजेन्द्रकृष्ण आणि कैफ़ी आज़मी हे त्यांचे विशेष आवडते गीतकार. हिंदुस्तानी वाद्यवृंदाचा नेटका वापर, ठेक्याच वजन, कायम लक्षात राहतील असे प्रील्युड, इंटरल्युड, सतारीची साथ ही त्यांची मर्मस्थळं होती. पन्नास, साठ आणि सत्तरच्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रात अजोड कामगिरी करून ठेवली. असं म्हणतात की एखाद्याच्या मागे चकवा लागला की तो तिथल्या तिथेच फिरत राहतो. त्याला पुढची वाट सापडत नाही.खरं खोटं त्या कोंकण वासियांना माहीत. पण असा चकवा मदन मोहन यांच्या रचना रसिकांच्या मागे लावतात हे आपण खात्रीशीरपणे अनुभवू शकतो. त्यांची एकाहून एक सुरेल, सुरम्य गीतं ऐकणारे श्रोते चकवा लागल्यागत त्यांच्या सुरावटी भोवती घुटमळत राहतात.
हृदयीचं शल्य
'आपके पहलू मे आ कर रो दिये' आणि 'कभी ना कभी कोई ना कोई तो आयेगा' ही स्वतःची गाणी त्यांच्या विशेष जवळची होती. छोट्या समारंभातून ही गाणी ते नेहमी गात असतं आणि वाहवाही करणाऱ्या, दाद देणाऱ्या त्या मैफिलीला हे ठाऊकही नसे की आपल्या ह्रदयीचं शल्य ते अश्या प्रकारे मैफिलीत गाऊन मांडत असत. कारण असा अवलिया प्रतिभेचा संगीतकार नेहमीच अपुरस्कृत राहिला. आपली प्रतिभा पुरस्कृत करणारा 'कोई ना कोई तो आएगा' हा आशावाद फोल ठरल्यानं, पहलू मे जा कर रोना हेच त्याच्या भाग्यात लिहिलेलं असावं. पुरस्कारांच्या बाबतीत चित्रपट सृष्टीनं इतकी अवहेलना केली की पुरस्कारांचा त्यांना तिरस्कार वाटू लागला. फिल्म फेअर अवॉर्डनी त्यांना नेहमीच हुलकावणी दिली. 'वह कौन थी' फिल्म साठी निश्चितच अवॉर्ड मिळेल असं वाटत असताना, तो त्यांना मिळाला नाही. लता दीदींनी खंत व्यक्त करताच ते म्हणाले होते, "तुम्हाला खंत वाटतेय हीच गोष्ट किती मोठी आहे? याच्या पुढे अवॉर्डची मातब्बरी ती काय ?" पण हे वक्तव्य म्हणजे आपल्या भळभळत्या जखमेवर आपणच फुंकर घालून मलमपट्टी करावी लागण्या सारखं असावं. माई रे मैं कासे कंहू पिर अपने जिया की? अशीच त्यांची भावना असणार. अखेरीस त्या वर्षीची राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समिती खरी जोहरी ठरली आणि पहील्या पुरस्कारानी मदन मोहन यांच्या दारावर दस्तक दिली. त्यावर्षी सर्व राष्ट्रीय पुरस्कार दस्तक चित्रपटानी पटकावल्याची गोड बातमी त्यांच्या मुलाने दिली. स्वतः संगीतकार जयदेव पुरस्कारोत्सव साजरा करण्यासाठी शॅम्पेन घेऊन मदन मोहन यांच्या स्टुडिओत हजर झाले. अखेर पुरस्कार तर मिळाला पण खूप उशिरा. त्यामुळे ' दस्तक ' (dastak) चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनासाठी मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार घेण्यासाठी त्यांना जायचं नव्हतं. त्याच चित्रपटासाठी अभिनयाचा पुरस्कार संजीवकुमार यांना मिळाला होता आणि त्यांनी मदन मोहन यांना त्यांच्या समवेत येण्यास राजी केलं.
उपेक्षू नको गुणवंता अनंता हे मागणं मदन भैय्यांसाठी कुणी त्या रघूनायका कडे मागायचं आपण रसिकांकडून राहूनच गेलं. निदान डझनभर फिल्म फेअर मिळतील अशी बावनकशी संगीतकारी या गुणी कलाकारानी करून ठेवली आहे. संवेदनशील कलाकाराला अशी उपेक्षा जिव्हारी लागणं अगदी स्वाभाविक आहे. मदन मोहन यांनीही ही गोष्ट प्रकृतीवर दुष्परिणाम होईल एव्हडी मनाला लावून घेतली. वास्तविक या असल्या लौकिक पुरस्कारांनी एखादी कमनीय स्थूल/जड बाहुली च फार फार तर हाती येते. त्यामुळे अमरत्व प्राप्त होतं असं नाही. मदन मोहन हे तर अलौकिक पुरस्कारांचे हकदार होते. आणि ते त्यांच्याकडे आपसुक चालून आले.
अलौकिक पुरस्कार
पुरस्कारांनी त्यांना हुलकावणी दिली हे म्हणणं कदाचित अयोग्य ठरेल. फिल्म फेअर सारखा लौकिक पुरस्कार त्यांना जरूर मिळाला नाही पण त्याहून अमूल्य अलौकिक पुरस्कारांची त्यांना नेहमीच प्राप्ती झाली. असं सांगतात की ' मौसम ' या चित्रपटातल्या ‘दिल ढुंढता है’ या एकाच गाण्यासाठी मदनजींनी अनेक चाली केल्या होत्या. गिटार वादक भूपेंद्रच्या आवाजातलं वेगळेपण हेरून त्याला त्यांनी ब्रेक दिला. मदन मोहन यांचे गुरू सचिनदा ‘दिल ढुंढता है’ ची सुरावट रात्रभर ऐकुन बेचैन झाले आणि पहाटे पहाटे मदनमोहन यांच्या घरी गेले. त्यांचं कौतुक करण्यासाठी मुंबईतल्या खार ते पेडर रोड स्वतः गाडी चालवत आले. खरतर आपल्या साहाय्यकाच्या घरी जाऊन एस डी यांनी केलेलं हे कौतुक म्हणजे कृष्णानं सुदाम्याच्या घरी जाऊन सन्मान करण्या सारखंच आहे. मदन मेरे भाई, "हैं इसिमे प्यार की आब्रू', इस रचना पर मेरा सारा काम कुर्बान" अशा शब्दात नौशाद यांनी मदन मोहन प्रती आपला आदर व्यक्त केला होता. नौशाद सारख्या प्रथितयश संगीतकारा कडून अशी विलक्षण दाद मिळणं हे कुठल्याही अन्य पुरस्कारा पेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान आहे. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक उस्ताद आमिर खां हे त्यांचे प्रशंसक होते. 'भाई भाई' हा मदन मोहन यांचा बॉक्स ऑफिस वर हिट झालेला पहिला चित्रपट. यातलं 'कदर जाने ना' हे गीत प्रसिद्ध ठुमरी, गझल गायिका बेगम अख्तर यांना इतकं आवडलं की त्यांनी मदन मोहन यांच टेलिफोन करून खूप कौतुक केलं. आणि टेलिफोन वरूनच त्यांच्या कडून पुन्ह:पुन्हा ऐकलं होतं.
मदन मोहन यांच्या निधनाच्या समयी लता दीदी लंडन दौऱ्यावर होत्या. तो ट्रंक कॉल बुक करून बोलण्याचा जमाना होता. त्यामुळे ही बातमी त्यांना दोन दिवस कळलीच नाही. नंतर कुठून तरी कळल्यावर त्यांनी फोन करून लंडनहून मदन भय्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मोहम्मद रफी ही मिडील इस्ट च्या दौऱ्यावरून परतत असताना मुंबई विमानतळावरच त्यांना ही बातमी कळली. ते तिथूनच थेट स्मशानभूमीत गेले. अग्नी देण्याच्या अगदी पांच मिनिटं पाहिले तिथे पोहोचले आणि त्यांना अश्रू अनावर झाले. याच संगीतकाराच्या सुरावटीवर हा महान गायक गायला होता...
"शाम जब आँसू बहाती आ गई
शाम जब आँसू बहाती आ गई
हर तरफ़ ग़म की उदासी छा गई
दीप यादों के जलाकर रो दिये
आपके पहलू में आकर रो दिये"
राजा मेहदी अली खान यांचे शब्द असे यथार्थ व्हावेत, हा केवढा दैव-दुर्विलास! एखाद्या लहान मुला प्रमाणे रडत रडत मोहम्मद रफीनी या महान संगीतकाराचं अंत्यदर्शन घेतलं.
अजर अमर मदन
फक्त पन्नास वर्ष जगलेल्या ह्या कलाकाराची गाणी तो इहलोकातून निघून गेल्याला पन्नास वर्ष होत आली तरी रसिकांच्या कानात, मनात जिवंत आहेत. १९६५ मध्ये लक्ष्मीकांत प्यारेलाल (दोस्ती), शंकर जयकिशन (संगम) आणि मदन मोहन(वह कौन थी) यांना बेस्ट म्युझिक डायरेक्टर म्हणून नामांकित करण्यात आलं होतं. 'दोस्ती'नं बाजी मारली. फिल्म फेअर न मिळालेल्या 'वह कौन थी' चित्रपटातल्या 'लग जा गले' या रचनेला आज, यूट्यूब वर 200 मिलियन पेक्षा अधिक श्रोते (Hits) आहेत. आणि सुमारे बारा हजारा पेक्षा जास्त व्हर्शन्स ऐकायला मिळतात. भारतीय पंतप्रधानाच्या स्वागतासाठी 2023 मध्ये जमलेल्या इजिप्शियन नागरिकांमधून एक युवती 'लग जा गले' हे मदन भैयांनी संगीत केलेलं गीत निवडते यातच त्यांच्या
मौसिकी आणि जागतिक लोकप्रियतेची चुणूक बघायला मिळते. मदन मोहन हे कदाचित या धरातलावरचे एकमेव संगीतकार असतील की त्यांच्या मृत्यू नंतर तीस वर्षांनी आलेली फिल्म ' वीर झारा ' ची गाणी प्रचंड गाजली. या चित्रपटाच्या श्रेय नामावलीत संगीत निर्देशक म्हणून मदनजींचं नाव झळकलं आहे. त्यांच्या मुलानी, त्यांनीच करून ठेवलेल्या रचनांची पुनर्निर्मिती(recreate) केली होती.त्यांच्या रचना म्हणजे केवळ स्वर वाक्य अथवा स्वर रचना नाहीत तर त्या श्रोत्यांशी हितगुज करतात म्हणूनच मदनजी रसिक तुम्हाला आश्वस्त करू इच्छितात, तुमच्या रचना कालजयी आहेत. यश, अमरत्व म्हणतात ते यालाच.
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
8851540881
तरल संगीताचा बादशाह मदन मोहन, माहिती फारच वेधक ,लेख आवडला
उत्तर द्याहटवामदन मोहन हे स्वर्गीय संगीतकार आहे. त्यांच्या विषयी जी माहिती आपण विषद केली, खर तर हि यादी खुप मोठी असु शकते.
उत्तर द्याहटवामदनमोहन यांचे प्रत्येक गाणें मनाला भावनिक करतात. एक वेगळ्याच विश्वात घेऊन जातात.
त्यांचे कुठलेही गीत ऐका मनाला स्वर्गीय आनंद देऊन जाते. अशा महान संगीतकाराला मनापासून सलाम...
खूपच सुंदर व्यक्तिचित्र रेखाटले आहे. त्यांची गाणी ऐकाविसी वाटतात आणि नितीनजी आपले लेख प्रभावित करतात, नव्हे, आवर्जून वाचावेसे वाटतात.
उत्तर द्याहटवानितीनजी, तुम्ही एका थोर संगीतकाराबद्दल भरभरुन लिहिलं आहे हे स्व.मदन मोहनवर प्रेम करणाऱ्या श्रोत्यांवर उपकारच आहेत.खुप छान. त्यांची गाणी ऐकतांना आपण वेगळ्याच दुनियेत जातो.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
खूप सुंदर लेख लिहिला आहे. या महान संगीतकाराची तुम्ही आम्हाला तरल भावनांनी ओळख करून दिलीत धन्यवाद
उत्तर द्याहटवामदनमोहन,एक शापित गंधर्व. मिलिटरी,आणि संगीत अशा दोन टोकाला एकत्र आणण्याचा एक आश्चर्यकारक कार्य मदन जी नी केले आहे.त्यात ही आवाज ही एकदम झकास.पण या गंधर्वांच्या नशिबात मोठे बॅनर आले नाहीत.पण जितके आले,त्याला न्याय दिला मदनमोहन यांनी.
उत्तर द्याहटवाखुपच छान माहिती व मदनमोहन यांच्या आठवणी! फार मोठा संगीतकार. एकापेक्षा एक अप्रतिम गाणी दिली आहेत.
उत्तर द्याहटवाहिंदी चित्रपट सृष्टीत गझल प्रकार रुजवला,आणि रसिकांच्या अभिरुची ला नवीन आयाम प्राप्त करून दिला
उत्तर द्याहटवाउत्तम लिहिलंय. बाणेदारपणा ऐवजी गणेदरपणा खूप आवडले. वाचत असताना जेवढी गाणी आपण नमूद केली आहेत ती सगळी गुणगुणून पहिली बऱ्यापैकी जमले. त्या त्या गाण्याचा काळ आठवला. धन्यवाद.
उत्तर द्याहटवा