प्रासंगिक - सूर सनईत नादावला
सूर सनईत नादावला
प्रास्ताविक
भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन असो किंवा देश सार्वभौम गणराज्य होण्याचा ऐतिहासिक प्रसंग, स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव, किंवा देशभरातल्या आकाशवाणी केंद्रांच्या दैनंदिन पहिल्या सभेचा प्रारंभ, किंवा देशात दूरदर्शन प्रसारणाची नांदी, न जाणे अश्या कित्येक घटनांशी एक व्यक्ती अभिन्न पणे जोडली गेली. ह्या व्यक्तिमत्वाला जग बिस्मिल्ला म्हणून ओळखतं. बिस्मिल्ला म्हणजे सुरुवात, सामोरं जाणे, जे संपूर्ण यथार्थ झालं. ते म्हणायचे "मला बिस्मिल्ला म्हणतात आणि कुराण ही बिस्मिल्ला नी सुरु होतं. आम्हीच सर्वकाही आहोत आणि कुणीच नाही ही. मी सूरांचा भोक्ता आहे आणि या दुनिये मध्ये सूर कमी करण्याची हिम्मत कुणातही नाही."
त्यांचं खरं नाव कमरूद्दिन खाँ होतं. मात्र जन्मतःच दादाजींनी बिस्मिल्ला असं संबोधलं. चंद्रकलेगत कमरूद्दिन उर्फ बिस्मिल्ला यांची कला नित्य विकसित होत गेली. त्यांच्या बहरत गेलेल्या कलेचा आणि कला जीवनाचा हा संक्षिप्त आलेख आहे.
बिस्मिल्ला ते शहनाई नवाझ भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खाँ हा प्रवास सुरू झाला त्यांच्या वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षापासून. मामा अली बख्श यांच्या छातीशी बिलगून झोपताना, त्याच्या म्हणण्या खातर का होईना, छोटे मियां चिमखड्या बोलात काही म्हणून दाखवायचे. तेव्हा शब्दांच भान जरी सुटत असलं, तरी सूर सच्चा लागायचा. सूर साधण्याची प्रबळ इच्छा हृदयी बाळगत, कोवळ्या वयात झालेला हा संस्कार बिस्मिल्ला खाँ यांच्या साठी जणु आयुष्यभराची शिदोरी ठरला.
सूरदर्शीच नव्हे तर दूरदर्शी ही
बिहार मधलं डुमराँव गाव हे बिस्मिल्ला यांचं जन्मस्थान. मात्र लालन-पालन झालं, शिक्षण-प्रशिक्षण मिळालं ते सुरीली, रसिली नगरी बनारस मध्ये. संगीत तर जणू बनारस नगरीचा प्राण आहे. शहराच्या प्रत्येक मंदिरात, धनिकांच्या महालात नौबतखाना आढळायचा. सनई वादन तर दिवसातून चार चार वेळा होत असे. सामान्यांच्या घरातला खासा प्रसंग सनईच्या मंगल स्वरांनी प्रक्षाळित होत असे. सनईचा हा संस्कार बिस्मिल्ला यांना त्यांचे वडील, खाँ साहेब पैगंबरबक्ष, यांच्याकडून मिळाला. वयाच्या सहाव्या वर्षापासूनच विधिवत शिक्षण सुरू झालं, ते वाराणसीला मामु खाँ साहेब अलिबक्ष यांच्याकडे. बिस्मिल्ला खाँ यांच्या सुदैवानं त्यांच्या घरातली मोठी मंडळी ही निव्वळ सूरदर्शीच नाही तर दूरदर्शीही होती. त्यांच्या लक्षात आलं की गायन वादनाचा अवकाश तर आधीच अनेक महान कलाकारांनी व्यापलेला आहे. तिथे शिरकाव करण्याचा अट्टाहास करण्यापेक्षा, अंतरंगी असलेल्या संगीताच्या अभिव्यक्तीसाठी, त्यांनी अतिशय चाणाक्षपणे सनई वाद्याची निवड केली. कारण सनई या वाद्यावर त्यावेळी कुणाचीही नाममुद्रा मुद्रित झालेली नव्हती. या दूरदर्शीपणा मुळेच बिस्मिल्ला यांचं सनईशी नातं जडलं; अगदी मुरलीधराच मुरलीशी असलेल्या नात्या प्रमाणे. विलायत हुसैन आणि सादिक अली यांच्या कडूनही, बिस्मिल्ला खाँ यांनी संगीताची तालीम घेतली होती. सूरगंगा मंगला सतत प्रवाहित होती. लग्नादी मंगल कार्यात, मैफिलीतुन, छोटे बिस्मिल्ला, आपल्या गुरुं बरोबर साथीला असत. गंगामाई मध्ये सुस्नात होऊन समोरच्या मशिदीत नमाज़ अदा करायची आणि नंतर श्री बालाजी मंदिरात रियाज हाच त्यांचा दिनक्रम होऊन गेला.
कला जीवनाचा प्रारंभ
वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षीच बिस्मिल्ला यांनी सनई वादनाच्या मैफिलीचा अलाहबाद इथे अखिल भारतीय संगीत परिषदेत मंगल शुभारंभ केला. त्यांच्या सनईच्या सुरात एक वेगळीच खुमारी होती. बहुदा ते सनई वादन हवा फुंकून नाही तर प्राण फुंकून करत असावेत. लखनऊ संगीत संमेलनामध्ये आपल्या दुसऱ्याच कार्यक्रमात त्यांना सुवर्ण पदकाचा लाभ झाला. यानंतर सात वर्षांनी तेव्हाच्या कलकत्ता (कोलकाता) इथे अखिल भारतीय संगीत परिषदेत स्वर्ण पदकांची तिहाई घेऊन त्यांनी सनई बरोबरच स्वतःची सम साधून, प्रस्थापित करून, संगीत वादनाच्या क्षितिजावर सनईची सुवर्ण पहाट फुलवली. लग्न मंडपाच्या मर्यादा लांघुन विश्वमंचावर ही सनईचे स्वर गुंजन करू लागले. श्रोत्यांच्या हृदयात ती गुंजू लागली.
पुस्तकी अभ्यासात त्यांना अजिबात रुची नव्हती. मात्र संगीता वर त्यांचा अत्यंत जीव होता. संगीताचं एक प्रकारच व्यसन आणि व्यासंग, यामुळेच तर सनई सारख्या लोक वाद्याला शास्त्रीय संगीताच्या व्यासपीठावर स्वतंत्र (Solo)वाद्याचा सन्मान ते मिळवून देऊ शकले. पाहता पाहता सनई आणि बिस्मिल्ला हे पर्यायवाची शब्द होऊन गेले. अशी 'महारत' विनासयास मिळत नाही. हे 'करतब' आहे. बिस्मिल्ला म्हणतात "जब कोई करेगा तब पायेगा".
आकाशवाणीच्या लखनऊ केंद्रा वरून त्यांचा पहिला कार्यक्रम प्रसारित झाला 1938 साली. त्यावेळी त्यांचं वय होतं 22 वर्ष. त्याआधी एक दीड वर्ष 1936-37 मध्ये स्टार हिंदुस्तान या कंपनीनं काढलेल्या रागदारी सनई वादनाच्या रेकॉर्डस बिहाग, भैरवी, तोड़ी, दुर्गा, बागेश्री, जौनपुरीच्या सुरावटींनी बनारस नगरीतली घरं पावन करत होती. सुगम संगीताच्या (Light Classical) प्रांतात त्यांना विशेष रुची होती. 1941 मध्ये लखनऊ मध्ये ग्रामोफोन कंपनीनं प्रकाशित केलेल्या रेकॉर्डस मध्ये मालकंस, तोडीच्या बरोबरीने दादरा, ठुमरी यांनी ही स्थान मिळवलं होतं. उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांनी उस्ताद अमीर खाँ, अब्दुल हमीद जाफर खाँ, पंडित रवि शंकर, अमजद अली, व्ही.जी जोग या सारख्या गायक, सतारिये, सरोद तथा व्हायोलिन वादकां बरोबर सनई जुगलबंदी सादर केली आहे. सर्वाधिक जुगलबंदी सादर करण्याचा विक्रम ही बिस्मिल्ला यांच्याच नावावर आहे.
पन्नासच्या दशकात त्यांनी चित्रपट सृष्टीला ही मंगलध्वनी प्रदान केला. 'गुंज उठी शहनाई' हा चित्रपट आणि ‘दिलका खिलौना हाये टूट गया’ ह्या गीतानी त्यांचा घराघरात प्रवेश झाला. माया नगरीचं संगीत मंगलध्वनीनं सुस्नात झालं.
संगीत हीच पूजा
खाँ साहेबांची एक विशेषता होती. मैफिलीत नमनाला ते नेहमीच यमन आळवित असत. संगीता प्रति त्यांच्या हृदयात पूज्य भाव होता. ते म्हणत की, "ज्याप्रमाणे खुदा एकच आहे तद्वतच सूर आहे. संगीत, सूर, नमाज सर्व एक आहे. अल्ला पर्यंत पोहोचवणारे हे वेगवेगळे मार्ग आहेत. संगीताशी अश्या प्रकारे तद्रुप व्हा की जणू ईश्वराला साद घालत आहात. त्यानंतर जो परिणाम साधेल, तो अतुलनीय, अवर्णनीय असेल".
फिल्म्स डिव्हिजन द्वारा निर्मित लघुपटात, बिस्मिल्ला खाँ यांची मानस कन्या, गायिका सोमा घोष यांनी म्हटलं आहे की, "खाँ साहेबांच व्यक्तित्व एकदम अनोखं होतं. संगीत साधनेनी त्यांना ईश्वर पदाची प्राप्ती झाली होती".
उस्तादजींनी हे सिद्ध करून दाखवलं की जो कुणी मनःपूर्वक स्वरोपासना करेल, तो मनुष्ययोनी पलीकडे निघून जाईल. संगीता प्रती संपूर्ण समर्पण भावना आणि सहज अध्यात्मिक दृष्टी यामुळेच ते बिस्मिल्ला झाले".
एकदा कुठल्यातरी संगीत सभे नंतर मान्यवर कलाकारां मध्ये चर्चा सुरू होती. तेवढयात बिस्मिल्ला खाँ यांनी विचारलं की हिंदू धर्मात सर्वात अहम असं तुम्ही काय मानता? उत्तर आलं संगीत. आणि इस्लाम मध्ये तर संगीताला हराम, निषिद्ध मानलं जातं. यावर खाँ साहेब म्हणाले की, संगीत हराम मानलं गेलं आहे तरीही फैय्याज खाँ, अब्दुल करीम खाँ साहेब यांच्या सारखे दिग्गज प्रतिभाशाली होऊन गेले, आता अंदाज बांधा की जर संगीत हराम मानलं नसतं, उचित असतं तर मग आम्ही (मुस्लिम) कुठे असतो?
व्यक्तिमत्त्वाचे पैलू
बासरी वादक पंडित अरविंद गजेंद्र गडकर यांनी बिस्मिल्ला यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा एक किस्सा त्यांच्या पुस्तकात लिहिला आहे. गजेंद्र गडकर त्यावेळी आकाशवाणी धारवाड इथे संगीत विभागाचे प्रमुख होते. एका कार्यक्रमा निमित्त बिस्मिल्ला यांचं धारवाडला जाणं झालं. आकाशवाणी केंद्राचा परिसर अतिशय रम्य होता. बिस्मिल्ला यांना तो इतका आवडला की त्यांनी हॉटेल ऐवजी तिथेच मुक्काम ठोकला. तिथेच एका नळावर उघड्यावरच आंघोळ केली. श्री काशी विश्वेश्वरा समोर सनई वाजवायची असल्यानं बनारस मध्ये कधीच मटण खात नसल्याचं सांगत त्यांनी तिथे मटणाचा डब्बा मागवला. नमाज झाल्यानंतर एका झाडाच्या सावलीत विश्रांती घेतली. त्या दिवशी त्यांचं सनई वादन आणि विशेषतः सादर केलेला मालकंस चिरस्मरणीय ठरला. रुद्राला प्रसन्न करण्यासाठी हा राग गायला जातो असं डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्याकडून एका मैफिलीत ऐकल्याच स्मरतं आहे. संगीत हे खाँ साहेबांच सर्वस्व होतं. पैशाला त्यांच्या लेखी फार महत्व नव्हतं. ते म्हणत असतं की खर्च केला की पैसा संपून जातो. सूरांच मात्र तसं नाही. सूर खर्ची घातल्यानं वर्धिष्णू होतात. स्वतः बरोबरच समाजात ही अधिक समृद्धता येते. या पार्श्वभूमीवर भारतरत्न पुरस्काराने गौरविल्या नंतर, आपल्या लौकिक जीवनाच्या अंतिम टप्प्यावर एका मुलाखतीत त्यांनी पैश्या संबंधी जे वक्तव्य केलं होतं त्यामागे काय प्रेरणा असावी असा प्रश्न नेहमीच पडतो.
श्रद्धा सुमनांजली
नव्वदीच्या दशका पासून ते हा लेख लिहून पूर्ण करे पर्यंतच्या माध्यमातल्या माझ्या सेवे दरम्यान एक काहीसा विचित्र योगायोग मी अनुभवत आलो आहे. या कालखंडात जितक्या म्हणून मोठ्या व्यक्ती निधन पावल्या त्या माझ्या ड्युटीत तरी किंवा त्यांच्यावर श्रद्धांजली पर कार्यक्रमाची जबाबदारी तरी बहुतेक वेळा मी निभावली आहे.थोडक्यात मी बरेचदा किरवंताच्या भूमिकेत असे. खाँ साहेब ही याला अपवाद ठरले नाहीत. 21 ऑगस्ट 2006 रोजी प्रदीर्घ आजारा नंतर बिस्मिल्ला खाँ कालवश झाले. इहलोकी जन्म घेणाऱ्या प्रत्येक सजीवा साठी मृत्यू ही सामान्य घटना आहे. मात्र जीवन काळात साधने अंती प्राप्त झालेली कला, कौशल्य, सिद्धी यामुळे कलाकारांचा मृत्यू ही असामान्य घटना ठरते. ते केवळ निधन, कालवश होणं नसतं. म्हणूनच खाँ साहेब यांच्या निधनाची ठळक बातमी लिहिताना भावना अशी व्यक्त झाली…"सनई च्या सुरेल मैफलिनं भैरवी आळवली...सनईचे अनभिषिक्त सम्राट उस्ताद बिस्मिल्ला खाँ कालवश.."
पण खरं पाहता खाँ साहेबां सारखे संगीत साधक तर अमर असतात. आम्हा सामन्यांची जीवनं सूर गंगेनी मंगल करण्यासाठी ते गंधर्व लोकांतून अधून मधून मृत्युलोकी येत जात राहतात.
नितीन सप्रे
महत्त्वपूर्ण अप्रतिम लेख !..आवडला.
उत्तर द्याहटवासुंदर श्रद्धांजलीपर लेख.
उत्तर द्याहटवासनई च्या सुरेल मैफलिनं भैरवी आळवली.. सनई चे अनभिषिक्त सम्राट उस्ताद बिस्मिल्ला खाँ कालवश
उत्तर द्याहटवाछानच सर
सुरमयी लेख आवडला
उत्तर द्याहटवावाहवा, सनई सारखे मंगल वाद्य अजरामर करणारे उस्ताद भारतरत्न बिस्मिल्ला खान ग्रेट आर्टिस्ट होते।
उत्तर द्याहटवातुम्ही छान शब्दात त्यांचा परिचय करून दिला आहे
धन्यवाद.
फारच सुंदर अप्रतिम लेख झाला आहे
हटवाछान लेख
उत्तर द्याहटवामंगलप्रभाती ऐकु येणार्या सनईसारखा मंगल लेख!
उत्तर द्याहटवाGreat
उत्तर द्याहटवासंस्मरणीय भारतरत्न...!
उत्तर द्याहटवालेख उत्तम लिहीलाय. एवढा मोठा माणूस असून त्यांना कसलाही अहंकार नव्हता. एकदम साधे होते.
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर लेख! खां साहेबांच्या मंगल सूर आळवणाऱ्या सनईची आणि त्यांच्या संगीत साधनेची तुमच्या खास शैलीत ओळख करून दिली.या महान कलाकाराला विनम्र अभिवादन 🙏🏽
उत्तर द्याहटवाफरच छान लेख 🙏
उत्तर द्याहटवाएका महान कलाकाराची उत्तम माहिती! धन्यवाद
उत्तर द्याहटवाखूप सुंदर लिहिलंस मित्रा.
उत्तर द्याहटवा