स्मृतिबनातून -परमात्माईची अंगाई
परमात्माईची अंगाई
लहानपणा पासून कित्येकदा कानावर पडलेलं हे अंगाई गीतं. उत्तम चाली रीती आणि समर्पक गायन सौष्ठव यामुळे संगीताची अगदी साधारणशी जाण असलेल्याही कुणाच्या हृदयाचा ठाव घेईल, असंच आहे. आज वयाच्या पंचम दशकात पुन्हा एकदा, अगदी अवचितपणे ते सामोरं आलं. यावेळी नुसतं कान देऊन नाही तर मन देऊन ही ते ऐकलं गेलं असावं आणि म्हणूनच पूर्वी कधीही न जाणवलेल्या आशयाशी परिचय झाला.
लतादीदी आणि राहुल देशपांडे या दोन्ही स्वराधिश…नाही..नाही स्वराधिन किंवा स्वरालिन म्हणुया, कारण स्वराधीषत्वाचा दावा या पृथ्वीतलावरच काय त्रिखंडात देखील कुणी करणार नाही असं मला वाटतं. गुणीजनांच्या प्रतिभेवर भाळून, आपण रसिकजन जरी अश्या उपाध्या देत असलो तरी सच्चा गायक, कितीही मोठा कलाकार असला तरी स्वतःला मनोमन स्वराधिन, स्वरालिनच मानत असतो. या दोन्ही गायकांनी सादर केलेला हा गीताविष्कार एका पाठोपाठ एक पुनःपुन्हा ऐकला आणि एकेका शब्दातून, शब्दार्थाच्या पलीकडले निराळेच भावार्थ मनात उचंबळून आले.
मराठीतल्या अनेक कविता, गीत रचना, वरकरणी जो एक अर्थ रसिकां पर्यंत पोहचवतात त्यापेक्षा त्यांचा मतितार्थ वेगवेगळा निघू शकतो. अशा अर्थगर्भित, आशयघन रचनांसाठी कविवर्य भा. रा. तांबे यांचा लौकिक आहे. त्यांच्या 'नववधू प्रिया मी बावरते', 'निजल्या तान्ह्या वरी माऊली' या कविता उदाहरणार्थ सांगता येतील.
नववधू प्रिया मी लता मंगेशकर
निजल्या तान्ह्या वरी माऊली लता मंगेशकर
सकृतदर्शनी नववधू च्या भावनांचे वाटणारं हे वर्णन खरंतर जीवनासक्ती आणि परमात्मा प्राप्तीच्या मार्गातल्या अडथळ्यांचं वर्णन आहे. त्याच्या अभिव्यक्ती साठी नववधू हे प्रतिक योजलं आहे. 'निजल्या तान्ह्या वरी माऊली' कविताही, सुरवातीला दोन कडव्यां पर्यंत, कुणाही सामान्य आईचं आपल्या लहानग्या विषयीचं वात्सल्य, ममत्व, काळजी, कौतुक अश्या मानवी भावनांचं चित्रण वाटत असतानाच, अखेरच्या कडव्यात झालेल्या त्रिभुवन जननीच्या उल्लेखा नंतर सगळेच संदर्भ पार बदलून जातात.
श्रीनिवास खळे यांच्या सारख्या कमालीच्या संवेदनशील संगीतकाराच्या प्रतिभेतून साकारलेली 'नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे' ही हळुवार धीरगंभीर रचना, मंगेश पाडगावकर यांनी निसर्गातली प्रतिकं घेऊन बाळबोध शब्द योजून केलेली ही अप्रतिम कविता आणि या दोघांच्या सर्जनतेचा यथायोग्य सन्मान करत मिंड, मुरकी, आंदोलन आदी संगीतालंकारांनी सजवून वत्सल भावनांनी ओतप्रोत, लतादीदी यांचं शांत सुरेल गायन अशा त्रिगुणी समागमातून, या नितांत सुंदर अजोड अंगाई गीताची निर्मिती झाली आहे. मराठीत 'गुणी बाळ असा जागासी का रे वाया' या सारखा उत्कृष्ट पाळणा, 'निंबोणीच्या झाडामागे', 'बाळा जो जो रे' सारखी उत्तम अंगाई गीतं बरीच आहेत. मात्र 'नीज माझ्या नंदलाला' ही अंगाई जागरूकपणे, समजून, उमजून ऐकली तर, निश्चित असं जाणवू लागतं की ही काही सामान्य अंगाई नाही तर, कैवल्यनिद्रेच्या आधी परमात्माईनं, नंदलाल म्हणजेच, या देही वसणाऱ्या आत्मबाळा साठी गायलेली ही परम अंगाई आहे.
नीज माझ्या नंदलाला लता मंगेशकर
"शांत हे आभाळ सारे, शांत तारे, शांत वारे या झर्याचा सूर आता मंद झाला, मंद झाला रे"
इहलोकी मनुष्य जीवनात सुख-दुःख, यश-अपयश, मान-सन्मान, हेवे-दावे, रुसवे-फुगवे अशा असंख्य घडामोडी नित्य घडत असतात, ढगांनी दाटलेलं आभाळच जणू. मात्र ढग उडवून देणारा जोराचा वारा जेव्हा मंदावतो तेव्हा तेच निरभ्र आभाळ मंद लुकलुकणाऱ्या तारकादलांसह शांततेची अनुभूती देतं. आपलं मनुष्यलोकीच ' जागरण '(जीवन) जेव्हा पूर्णत्वाच्या समीप येतं, उत्तम पुरुषार्थ करून त्याचा यथायोग्य उपभोग घेऊन मन हळूहळू शांती अनुभवू लागतं, अधिक काही मिळवण्याची लालसाही मंदावते, मन एकप्रकारच्या तृप्त भावनेनं पैलतिरी जाण्यासाठी पश्चिम क्षितिजाकडे स्थिरावायला लागतं, अशावेळी जीवन मंचकी पहुडलेल्या 'आत्म बाळाला' ती परम आई वत्सल शब्दांनी थोपटत, हे परम अंगाई गीत गात आहे.
"झोपल्या गोठयात गाई, साद वा पडसाद नाही
पाखरांचा गलबला ही बंद झाला, बंद झाला रे"
इथे गाई आणि पाखरांची बाळबोध पण मार्मिक प्रतिकं कवी पाडगावकरांनी योजली आहेत. सांजवेळी गोधन गोठ्याकडे परतून येतं, पाखरांचे थवे ही घरट्यात येतात. सूर्योदया पासून सूर्यास्त, आणि काही काळ नंतर ही सतत सुरू असलेली साद पडसादाची प्रक्रियाही थांबते. आपला जीवनक्रम ही असाच असतो. उत्तम चरितार्थ, पुरुषार्थ करून झालेला असल्यामुळे त्यासाठी आत्मारामाला अधिक शिणवणं आता गरजेचं राहत नाही. प्राथमिकता तर ती असूच शकत नाही. नेटका प्रपंच करून झाल्यामुळे सर्व काही यथास्थित असतं. सतत करावा लागणारा देवाणघेवाणीचा फापट पसाराही अनाठायी असल्याची समज आलेली असते. प्रपंचात सुरवातीला असणारी आसक्ती (मुलाबाळांचा गलबला) आता निमालेली असते. अशावेळी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी मुक्तीची आस निर्माण होते.
मानवी आयुष्यही आजन्म वेगवेगळ्या अवस्थां मधून मार्गक्रमणा करत असते. आदर्श निर्वाणावस्था कशी असावी याचं फार सुरेख वर्णन बाकीबाब म्हणजेच कवी बा. भ. बोरकर यांनी समर्पकपणे केलं आहे. त्याची इथे प्रकर्षानं आठवण होते.
आयुष्याची आता डॉ. सलील कुलकर्णी
आयुष्याची आता लता मंगेशकर
"आयुष्याची आता झाली उजवण येतो तो तो क्षण अमृताचा
जें जें भेटे तें तें दर्पणीचे बिंब तुझे प्रतिबिंब लाडेंगोडें
सुखोत्सवें असा जीव अनावर, पिंजऱ्याचे दार उघडावें"
आणि दुसरी म्हणजे
"संधिप्रकाशात अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी."
तिसऱ्या अंतऱ्यात मंगेश पाडगावकर यांनाही हेच सांगायचं असावं.
"सावल्यांची तीट गाली, चांदण्याला नीज आली
रातराणीच्या फुलांचा गंध आला, गंध आला रे"
नेटका प्रपंच करून झाल्यामुळे जी काही सुखप्राप्ती झालेली आहे, त्या सुखाच्या सावलीची तीट लावली आहे आणि या तृप्ततेत न्हाऊन माखून झाल्यावर नीज येऊ घातली आहे. पहिल्या तीनही अंताऱ्यात साधारणतः प्रत्येकाला अनुभवाव्या लागणाऱ्या टप्प्यांचं वर्णन आलं आहे. आयुष्याच्या उतरंडीवर आसक्ती कमी कशी होत जाते हे कवीनं निरनिराळ्या रुपकांतून मांडलं आहे. मात्र तिसऱ्या अंतऱ्यातल्या शेवटच्या दोन ओळीत जीवनासक्ती कशी कमी व्हावी हे देखील स्पष्ट झालं आहे. "रातराणीच्या फुलांचा गंध आला, गंध आला रे" म्हणजेच आता माझ काय उरलय अशा निराशेतून अनासक्ती न येता, पुष्पगंधा सारखी कृतार्थतेचा परिमळ दरवळत आली तरच जीवन साफल्य अनुभवता येईल.
"नीज रे आनंदकंदा, नीज रे माझ्या मुकुंदा
आवरी या घागर्यांचा छंदताला, छंदताला रे"
आता कैवल्यवेला आली आहे. या सच्चिदानंद रुपी जीवात्म्यानी सुखनिद्राधीन होऊन कैवल्यधामी, निजधामी परतण्याची हीच ती योग्य वेळ आहे. या अखेरच्या कडव्यात आलेल्या आनंदकंदा, मुकुंदा, छंदताला या शब्दकळेतील अनुप्रास आणि नादमाधुर्य यामुळे जसं मन मोहरुन जातं नेमकं तसच निर्वाण समयीही होण्याची शक्यता असते. अशावेळी लौकिकेच्छेच्या पैंजणरवाला (घागऱ्यांच्या छंदताला)आवर घालून नि:संग होऊन कैवल्यधामी शांतपणे निद्राधीन हो हे सांगण्यासाठीच जणू काही या परमात्माईच्या अलौकिक अंगाई गीताचं प्रयोजन असावं.
मंगेश पाडगावकर यांच्या 'नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे' या रचनेत भा. रा. तांबे, बा.भ. बोरकर यांच्या रूपकात्मक कविता, गीतांची तीच बीजं ठीक ठिकाणी असल्याचं मला जे जाणवलं ते तुम्हा सर्वां समक्ष मांडण्याचा हा एक प्रयत्न.
नितीन सप्रे
8851540881
अतिशय तरल भावना नितीनजींनी शब्दांत गुंफल्या आहेत. एका समृद्ध कविसंमेलनाचाच अनुभव मिळाला. अभिनंदन!
उत्तर द्याहटवाफार सुंदर लिहिलं आहे सर ! अप्रतिम, मन शांतवणारं आहे. !धन्यवाद!
उत्तर द्याहटवाजीवनाच तत्वज्ञान च या अंगाई गीतातून तुम्ही मांडला आहे धन्यवाद
उत्तर द्याहटवानितिन जी, तुम्ही स्वतःच्या लेखनाचा इतक्या 'नाॅन चॅलंटली ' उल्लेख केला होता की ते इतके दर्जेदार व सखोल असेल याची कल्पनाच आली नाही. अप्रतिम लिहिले आहेत.
उत्तर द्याहटवानीज माझ्या नंदलाला हे माझे अत्यंत आवडीचे गाणे. त्याचा एक नवा आणि वेगळा अन्वयार्थ तुमच्या लेखातून मिळाला आणि समृद्ध झाल्यासारखे वाटले. खूप खूप धन्यवाद.
फार सुंदर लेख नितीन... !
उत्तर द्याहटवासुंदर लेख
उत्तर द्याहटवाखूप सुंदर, ओघवतं लेखन, एकातून एक शब्द अन् त्यातून विचार ओघळतो.
उत्तर द्याहटवा