वैचारिक - हे जन हाती धरी दयाळा

 हे जन हाती धरी दयाळा

मातृभाषेचा अभिमान हा असायलाच हवा.  बहुतेक सर्वच जण तो बाळगतातही. पण भाषेचा अभिमान बाळगायचा म्हणजे नक्की काय करायचं? या बाबतीत मात्र सर्वसाधारणतः मनात, आचारात, विचारात अनेकदा अस्पष्टता आढळते. भाषेचा अभिमान हा मुख्यत्वे त्या भाषेतील साहित्य, संस्कृती, इतिहास, शब्दसंपदा, विचार दर्शन या सर्व बाबींवर ठरत असतो. या अनुषंगानं विचार केला तर मराठी संत परंपरेतून मांडलं गेलेलं विश्र्वरुप विचार दर्शन हे निश्चितच विशेष अभिमान बाळगण्या योग्य आहे.

ऋग्वेदातला एक प्रचलित श्लोक, "आत्मनो मोक्षार्थं जगद्धिताय च", मानवी जीवनाचे दोन महत्वपूर्ण उद्देश्य अधोरेखित करतो. एक मोक्षप्राप्ती आणि दुसरं विश्व कल्याण. स्वतः ज्ञानप्राप्ती साधून, श्रीमद्भागवतगीतेचे तत्वज्ञान सर्व साधारण लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून संत ज्ञानेश्वरांनी, ती तत्कालीन प्रचलित मराठीत लिहिली. ज्ञान यज्ञानं तोष पावून प्रसाद द्यावा अशी मागणी त्यांनी विश्वात्मक देवा कडे केली. हा प्रसाद मागताना, त्यांनी स्वतः साठी तर नाहीच पण देश, काळ, संप्रदाय या तश्या विशाल, पण तरीही संकीर्ण अश्या सीमारेषा ओलांडून, विश्र्वकल्याणाचं पसायदान मागितलं आहे. सातशेहून अधिक वर्षांपूर्वी माउलींनी मांडलेला हा विचार मराठी भाषेत, महाराष्ट्रात रुजल्याची प्रचिती मराठीचे समर्थ सपूत वेळोवेळी 'कल्याण करी रामराया', 'सर्वात्मका सर्वेश्वरा' सारख्या वैश्विक विचारधनाच्या माध्यमातून देत आले आहेत. 


इथे आपण उहापोह करणार आहोत समर्थ रामदास स्वामी विरचित करुणाकर ईश्वरा कडे केलेल्या "कल्याण करी रामराया" प्रार्थनेचा. समर्थांची ही प्रार्थनाही, माऊलींच्या पसायदाना प्रमाणेच, वैयक्तिक अभ्युदयासाठी नव्हे तर अखिल मानवतेसाठी ती केल्याची प्रचिती मिळते. 



ऐकण्यासाठी क्लिक करा - कल्याणकरी रामराया


परकीय आक्रमण, अत्याचार यामुळे काहीश्या निस्तेज झालेल्या समाजात स्फुल्लिंग चेताविण्याच्या उद्देशान समर्थ रामदास स्वामींनी संपूर्ण भारत यात्रा करून ठीक ठिकाणी मारुती मंदिरं स्थापन केली हे आपणा सर्वांना माहीत आहे. तत्कालीन समाजाची अवस्था पाहून समर्थांच्या मनात अतीव करूण उत्पन्न झाली आणि त्यावेळी त्यांनी समाज कल्याण, समाज उत्थानासाठी रामराया कडे प्रार्थना केली ती म्हणजे 'कल्याण करी रामराया'; अशी मांडणी आपल्या वाचनात, ऐकण्यात आहे. ही प्रार्थना ऐकता क्षणीच, मकरंदाच्या लालसेने अविरत अस्वस्थपणे भिरभिरणाऱ्या भ्रमरा प्रमाणे विचरण करणाऱ्या मनाला काहीशी निवांतता लाभते. मन भारावून जातं. अशा त्या भारावलेल्या मानसिक अवस्थेत 'आता विश्वात्मके देवे' ते 'सर्वात्मका सर्वेश्र्वरा', म्हणजेच इंद्रायणी काठावरची ज्ञानोबा माऊली ते गोदातीरीची कसुमी मानवता कुसुमाग्रज यांनी, अवघे विश्व तरावे यासाठी माय मराठीतून सदैव केलेला व्यापक विचार, मनात लख्ख तरळून गेला आणि या लखलखित प्रकाशातच समर्थांच्या प्रार्थनेच्या, रामदासी पसायदानाच्या व्यापक गर्भितार्थाने मन उजळून निघालं.


जीव जन्माला आल्या पासून ते निजनिकेतनी पोहोचे पर्यंत हा भवसागर पार करण्यासाठी अविरत धडपड सुरू असते. अश्या प्रयत्नरत जनांच्या कल्याणाचं साकडं समर्थांनी रामरायाला घातलं असल्याचा भाव मनात आला. स्वतः रामदास स्वामी हे संगीताचे ही चांगले जाणकार होते. असं वाचनात आलं. त्यामुळे या प्रार्थनेला त्यांनीच भैरवीच्या सूरात गुंफून तीची परिणामकारकता अधिकच वाढवली असावी असाही विचार मनात आला. भैरवीच्या सुरावटीच्या हातात हात गुंफून कानावर अलगद येणारे प्रार्थनेचे स्वरशब्द कमालीचे आर्त जाणवतात. या अपार करूणामयी प्रार्थनेतून साधली जाणारी कारुण्यभाव निर्मिती अनन्य आहे.


"तळमळ तळमळ होतची आहे

हे जन हाति धरी  || १ ||"


माणूस जगत असताना त्याच्या कडून अविवेकामुळे, अविचारामुळे, अजाणतेपणी काही चुका होत असतात आणि जेव्हा त्याचे त्याला आकलन होते तेव्हा अंतर्मनात एकप्रकारची तळमळ उत्पन्न होते. अनेकांना हा अनुभव येत असेल. अश्या तळमळणाऱ्या लोकांना आत्मग्लानीच्या गर्तेत जाण्यापासून वाचण्यासाठी हे परमेश्वरा तू दयावंत होऊन ह्या भवसागरातून वर येण्यासाठी त्यांना तू आपला हात दे. आधार दे. अशी प्रार्थना समर्थ करत आहेत. 


"अपराधी जन चुकतची गेले

तुझा तूचि सावरी || २ ||"


कितीही टाळायचा प्रयत्न जरी केला तरी दुर्दैवाने आयुष्याच्या कालखंडात आपल्या कडून अपराधांची पुनरावृत्ती ही होतेच. अपराध घडल्यावर अनेकदा लौकिक निकटवर्तीयां कडूनही झिडकारल्या गेल्याचा अनुभव ही दुर्मिळ नाही. अशावेळी तुझ्या शिवाय तुझ्या भक्तांना कोण सांभाळून घेणार? देवा तूच त्यांचा कैवारी व्हावंसं अशी विनवणी समर्थ रामरायाकडे करत आहेत. 


"कठीण त्यावरी कठीण जाले

आतां न दिसे उरी || ३ ||"


मनुष्य जन्म मिळाल्यानंतर त्याचा योग्य तो विनियोग करून घेता आला पाहिजे. परमेश्वर नित्य स्मरणात असेल तर मरणातही दारुणता रहात नाही. मात्र या मायावी पसाऱ्यात, ईश्वरप्राप्तीच्या मूळ ध्येयापासून अनेकदा माणूस इतका दूर जातो की त्याला ईश्वराचंच विस्मरण होत. 


"कोठे जावे काय करावे

आरंभिली बोहरी || ४ ||"


अशा परिस्थितीत मग मार्गच हरवून जातो. 

काय करावे काहीच सुचत नाही. जणू जीवन रुपी नाव भवसागरात वादळात सापडल्यागत होतं. सर्वनाशाची नांदीच जणूकाही. मनोराज्यात अराजक माजतं. 


"दास म्हणे आम्ही केले पावलो

दयेसी नाहीं सरी || ५ ||"


अश्या वेढ्यात सापडल्यावर हताशा, हतबलता अपरिहार्यच. परंतु आपल्या भक्तीनं, साधनेनं, ईश्वराच्या दयेची, मायेची अनुभूती प्राप्त केलेले समर्थ, ईश्वराच्या करुणामयी असण्याचा अत्यंत आश्वासक शब्दात इथे दाखला देतात. तो अपरंपार दयेचा सागर आहे. ईश्वराची कास सोडली नाही तर हा भवसागर तरुन जाणं सहज शक्य होईल. हा निव्वळ आशावाद नाही. विश्वात्मक देवाकडे पसायदान मागितल्यावर अखेरीस 

"येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।"

हे विश्वेश्वराचं ज्ञानदेवांना मिळालेलं आशिर्वचन, आणि त्या नंतरच्या काळात समर्थांच्या प्रार्थनेतील "दास म्हणे आम्ही केले पावलो, दयेसी नाहीं सरी" 

हे आश्वस्त करणारे समर्थ शब्द, परमेश्वरी करुणेवर दृढ विश्वास बाळगण्यास आपणाला निश्चित प्रवृत्त करतील. 


नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com

9869375422








 





टिप्पण्या

  1. नितीन जी,
    नेहमी प्रमाणे अर्थपूर्ण लेखन केलय तुम्ही.कल्याणकारी रामराया जरातरी आम्हाला कळायला मदतच झाली. जय श्रीराम. 🙏🙏🌹🌹

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक