स्मृतीबनातून - हृदयस्थ
हृदयस्थ
कुटुंबातलं शेंडेफळ. सभा, समारंभ, कार्यक्रम, मैफिलीत श्रीफळानं सन्मानित होणारं, भावंडांच्या हृदयस्थ असणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे हृदयनाथ! हृदयनाथ यांच सांगितिक काम हे प्रामुख्यानं स्वांत सुखाय अशा स्वरूपाचं आहे. कलाकाराला ही पोट असतं यात दुमत असायचं काही कारणच नाही, पण म्हणून कोणताही पूर्णवेळ कलाकार कलेकडे संपूर्ण धंदेवाईक दृष्टिकोनातून पाहू लागला आणि बिनदिक्कत तडजोडी स्वीकारु लागला तर मात्र कला सपक होणं अपरिहार्य असतं. अर्थात ही बाब सर्वच क्षेत्रांना लागू आहे. कलेच्या प्रांतात ती प्रकर्षानं टाळली पाहिजे असं वाटण्याचं कारण, अन्य क्षेत्रात शिक्षण प्रशिक्षणानी योग्यता प्राप्त करता येते, मात्र कलेच्या सिद्धतेसाठी ईश्वरीय अधिष्ठान अधिक महत्त्वपूर्ण ठरतं. रसिकांच्या सुदैवानं हृदयनाथ यांच्या सांगितिक कारकीर्दीत याचं पुरेपूर भान राखलं गेल्याच जाणवतं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या सुदैवानं मनात आणि गळ्यात स्वरांचा गांगौघ लाभलेल्या कुटुंबात त्यांना जन्म मिळाला, त्यामुळे त्यांची कारकीर्द राजहंसाच्या जलविहारा सारखी डौलदार झाली, बदकाचं पोहणं होण्यापासून बचावली. सहा दशकांची अभिजात कारकीर्द गाजवलेल्या ह्या चोखंदळ गायक संगीतकाराला, लौकिक अर्थानं यशश्रीनं वरमाळ घालायला बराच काळ घेतला. ती गळ्यात पडली ती डोलकर दर्याचा राजा झाल्यानंतरच. त्या आधी सुमारे एक दशक आपली शैली लोकांच्या काना मनावर ठसवित सुजाण रसिक घडाविण्याचं महत कार्य या कलासक्त हृदयानं केलं आहे.
शारीरिक व्यंगामुळं हृदयनाथ यांना अगदी बाल वयापासूनच समवयस्कांबरोबर संगती करता आली नाही. मात्र ही परिस्थितीच त्यांच्यासाठी एकप्रकारची संधी ठरली. नियतीनं मनात काय निहित करून ठेवलं असेल हे कोणीच सांगू शकत नाही. हृदयनाथ यांच बालपण हे फारच विपरीत परिस्थीत गेलं. मास्टर दीनानाथ यांच्या सारखा पिता लाभला मात्र वयाच्या चौथ्या वर्षी पितृछत्र हरपून परिस्थितीच्या झळांचा सामना करावा लागला. हे पुरेसं नव्हतं म्हणून की काय बोन टिबी सारख्या आजारामुळं शैशवातच एक पाय कायमचा अधू झाला. अनेक कवितांसाठी उत्तमोत्तम चाल रचणारा हा संगीतकार वयाच्या दहाव्या वर्षानंतर स्वतःचा पायांनी चाल करता झाला त्यामुळे साहजिकच सवंगड्यां बरोबरचा खेळ चुकला, शाळा जेमतेमच साधली. वाचताही येत नसे. खानदेशातल्या थाळनेर सारख्या लहानशा मागास गावात मग करायच काय? मात्र इथे नियतीनं हाथ दिला आणि मास्टर दीनानाथांच्या संग्रही असलेल्या भावबंधन, राजसंन्यास, पुण्याप्रभव, सन्यस्त खड्ग या सारख्या नाटकांचं वाचन करून माईंनी छोट्या हृदयावर श्रवण संस्कार घडवला. राम गणेश गडकरी यांच्या विनोदी आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ओजस्वी भाषा शैलीनंच त्याची उष्टावण झाली आणि पुढे मैत्र जुळत गेलं ते आचार्य अत्रे, बाबासाहेब पुरंदरे, भाऊसाहेब खांडेकर यांच्या सारख्या गुरुतुल्य व्यक्तिमत्वांशी.
वयाच्या अवघ्या सातव्या आठव्या वर्षी गणेशोत्सवाच्या मेळ्यात गायनानी सिंचलेला, रुजलेला, फुललेला हा शब्द-स्वरांचा वेल, मराठी सारस्वतातल्या माऊली, समर्थां सारख्या अलौकिक आणि कवी भूषण, भा. रा. तांबे, गोविंदाग्रज, स्वातंत्र्यवीर सावरकर, आरती प्रभू, सुरेश भट, शांता शेळके, ग्रेस, सूर्यकांत खांडेकर, ना. धो. महानोर यांच्या शब्दांना, सुरांच्या पालखीत बसवित, स्वत: गगनावेरी गेला. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत असं जे काही, ज्या कुणाकडून मिळेल ते ते बिनदिक्कत वेचत हा साहित्य, संगीताचा बागायतदार आपला सांगितिक मळा फुलवत गेला, दरवळत ठेवता झाला.
त्यांच्या संगीतावर मास्टर दीनानाथ ह्यांचा प्रभाव असणं साहजिकच आहे. परंतु 'ये हवां ये रात ये चांदनी', 'वो तो चले गये ए दिल यांदों की उनकी प्यार कर' सारखी गाणी देणारे सज्जाद हुसैन, 'जिंदगी कैसी है पहेली हाये', 'ओ सजना बरखा बहार आई' सारखी गीतं देणारे सलील चौधरी आणि 'अभी ना जाओ छोड कर', 'आपकी याद आती रही रातभर' सारख्या काही अविस्मरणीय गीतांचे संगीतकार जयदेव यांचा प्रभाव असल्याचं ते स्वतःच प्रांजळपणे सांगतात. अर्थात त्यांनी गंडाबद्ध शागिर्दी केली ती किराणा घराण्याचे दिग्गज गायक उस्ताद अमीर खां साहेब यांची. त्यांनी एक आणाही न घेता भरपूर शिकवलं. मात्र बऱ्याच गोष्टी ज्या घ्यायला हव्या होत्या त्या घेता न आल्याची, गेले 'घ्यायचे' राहून तुझे नक्षत्रांचे देणे, अशी सकारात्मक खंत ही ते व्यक्त करतात. घरी येणाऱ्या मोठमोठ्या गवयांची गायकी, लता दीदींचा रियाझ ऐकून ऐकूनही त्यांची स्वतःची गान समज वृध्दींगत होत गेली. पंडितजींनी व्हॉयलीन वर ही हात आजमावला होता मात्र अमीर खां साहेबांच्या सांगण्यावरून त्यांनी पुढे गाण्याकडेच लक्ष केंद्रित केलं.
आपण फार मोठे गायक अथवा संगीतकार नसल्याची भावना त्यांनी कित्येकदा जाहीरपणे मांडली आहे. अर्थात स्वतःचा सांगितिक कामगिरी बद्दल हृदयनाथ यांचा हा आत्यंतिक विनय आहे.
मराठी जन आणि महाराष्ट्र हृदयनाथ मंगेशकर यांच्या सदैव ऋणात राहतील, ते मराठी साहित्य सागरातून वर उल्लेखिलेल्या कवी आणि कवयित्री यांच्या कवितांचे गाणे करण्यासाठी. तिन्हीसांजा सखे मिळाल्या, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, त्या फुलांच्या गंधकोषी, आनंदवनभुवनी, शिव कल्याण राजा, गुणीबाळ असा जागसी का रे वाया, मावळत्या दिनाकरा, ज्ञानेश्वर आणि त्या बरोबरच मीराबाई, गालिब असा मौल्यवान नजराणा त्यांनी रसिकांना बहाल केला आहे. मराठी साहित्यातल्या अभिजात शब्द रचनांना आपल्या स्वर रचनांच्या मखरात बसवून मराठीतल्या दिग्गज कवींना घराघरात पोहचवून सामान्य जनांची प्रतिभेशी ओळख करून देण्याचं फार महत कार्य त्यांनी केलं आहे. हल्लीच्या सर्वव्यापी प्रदूषणाच्या काळात त्याचं गीत–संगीत साहित्य, कला, संस्कृतीच्या अवकाशातल्या प्रदूषणावर काही प्रमाणात तरी उतारा ठरतं.
काही गायक, गायिका यांना हृदयनाथ त्यांच्या चाली या अवघड वाटतात मात्र स्वतः ते आपल्या रचनाकारी बद्दल असं संगत आले आहेत की ते कधीही कुठल्याही रचनेसाठी फार कारागिरी करत नाही. 'बाप रखुमा देवी वरी सहज नीटु झाला' असं जे ज्ञानेश्वरीत म्हटलं आहे, त्याप्रमाणे जी चाल सहज नीट होते तीच स्वीकारली जाते. आरती प्रभू, माणिक गोडघाटे उर्फ ग्रेस या सारख्या कवींच्या काही दुर्बोध आणि गीत रचनेसाठी अवघड समजल्या जाणाऱ्या रचना त्यांनी संगीत देऊन लोकप्रिय केल्या. कवी ग्रेस यांच्या काव्यात गेयता नाही हे हृदयनाथ आणि ग्रेस दोघांनाही मान्य नाही. ग्रेस तर म्हणत असत की त्यांचा प्रत्येक शब्द हा सोलिव आहे. म्हणजेच गाण्यात तो कुठे खटकू नये असा आहे. भा रा तांबे ही असेच शब्द वापरत असं हृदयनाथ म्हणतात. मुळात शब्द ही संवेदना आहे तर सूर ही प्रत्यक्ष संवेदना आहे. शब्दाला मर्यादा आहे. माध्यमाचा आधार घ्यावा लागतो. सूरांना तसा तो घ्यावा लागतं नाही. 'जे ये हृदयी ते हृदयी घातले' (ज्ञानेश्वर) असं मत ते मांडतात. सकृतदर्शनी कवितेचा जो अर्थ वाचकाला लागतो तो तसाच असतो असं नाही. कवीला काही वेगळाच अर्थ अभिप्रेत असू शकतो. भा. रा. तांबे, आरती प्रभू, ग्रेस यांच्या कविता याच उत्तम उदाहरण ठरू शकतील. हृदयनाथ यांच्या संगीत रचानां मागे असा सारासार विचार असतो.
आज वयानं पंच्यांशी वर्ष पार केली असताना, कला प्रवासातले सहप्रवासी इहलोकीची यात्रा पूर्ण करून अनंताचे प्रवासी झाले असतानाची आपली मनोवस्था विषद करताना त्यांना रिचर्ड बर्टन यांच 'मोठं वय मिळणं म्हणजे स्वाजनांच्या थडग्याला ठेचाळत ठेचाळत पाय रक्ताळून घेणं' या आशयाच्या वाक्याची आठवण होते आणि या गायक संगीतकाराच्या ओठावर कवी माधव ज्युलियन यांनी लिहिलेल्या जी एन जोशी यांनी गायलेल्या गीताचे शब्द येतात….
'एकत्र गुंफून जीवित-धागे
प्रीतीचें नर्तन नाचलों मागें'
सखे एकटा उभा मी येथें, एकटा उभा मी येथें. पण त्यांच्या गायन, संगीताचे सर्व चोखंदळ सखे सतत त्यांच्या सभोवती आहेत, आणि त्यांना सदा हृदयस्थ ठेवून असतील.
नितीन सप्रे,
नवी दिल्ली



बापरे।या बाप माणसाबद्दल तुम्ही खूप आतून लिहिलं आहे।त्यांना मानाचा मुजरा. तुम्हाला खूप खूप धन्यवाद.👌👌👍👍💐
उत्तर द्याहटवानितीन खरच सुंदर लिहिलं आहेस.
हटवाThe great Music composer ,his compositions are really challenging for singers.Good info.
उत्तर द्याहटवानितीन जी, आपण बाळासाहेबांचं हे अवलोकन जे आपल्या लेखनातून मांडलत ते अक्षरशः हृदयस्थ असंच... खूपच नजाकतीनं...गुलाबाची एक एक पाकळी अलगद उमलवत जावी असं ... आपल्या लेखणीला मनापासून सलाम!!💐
उत्तर द्याहटवाहृदयस्थ हृदयस्पर्शी
उत्तर द्याहटवाअप्रतिम सुंदर लेखन
उत्तर द्याहटवाउत्तम लिहिलंय.
उत्तर द्याहटवाहृदयनाथ, अतिशय आवडते संगीतकार व गायक. अतिशय अभ्यासू. त्यांच्या सांगितीक ज्ञाना ईतकेच त्यांचे वाचन, अभ्यास यांनी साहित्यिक क्षेत्रातील ज्ञान त्यांना आहे. क्षमतेपेक्षा त्यांनी फारच कमी संगीत दिले, असे नेहमी वाटते.
उत्तर द्याहटवातुम्ही लिहिलेले हे *हृदय" स्पर्शी लिखाण भावले..
उत्तर द्याहटवाअतिशय समर्पक लेखन, कोणाही मराठी - हिंदी गीतं जाणणाऱ्या, आवडणाऱ्या रसिका साठी मेजवानी !
उत्तर द्याहटवा