प्रासंगिक - डीडी - ही तर अक्षयनाती

 डीडी - ही तर अक्षयनाती 


शैशवातच मातृछत्र हरवलेलं. वडील तमाशात तबलजी. आर्थिक स्थिती अशी की, एकवेळचं जेवण मिळणं दुरापास्त. केर-वारा, धुणी-भांडी, असं पडेल ते काम करून तळहातावरच जीवन जगणाऱ्या दत्ताच स्वप्न होतं अभियंता बनण्याचं. तल्लख बुद्धी उपजतच लाभलेली. इंग्लंडच्या मॅकॅनो कंपनीनं घेतलेल्या इलेक्ट्रिक सर्किट बनविण्याच्या स्पर्धेत अवघ्या सातव्या वर्षी ५० पौंडांचं प्रथम पारितोषिक पटकावलेलं. परिस्थितीमुळे शिक्षण कधीच थांबलेलं. मात्र नियतीच्या शाळेत आणि परीक्षेत दत्तानं नाव काढलं. अभियंता होऊन  मानव निर्मित यंत्रांच्या जगात रममाण होण्याची महत्वाकांक्षा असलेला हा तरुण ईश्वर निर्मित स्वर यंत्रांचा पारखी ठरला. गायन विश्वात आपली अमिट छाप उमटविणाऱ्या एक दोन नव्हे तर, सप्तसूरांना हेरून त्यांना पहिली संधी देऊन दत्ता डावजेकर यांनी समस्त संगीत रसिकांवर अनंत ऋण करून ठेवलं आहे. 



एका पोरसवदा मुलीची ऑडिशन(Audition) घेण्यास  डीडी यांना सांगण्यात आलं(याच लघुनामाने ते ओळखले जात)उत्तम नीरक्षीर विवेक असलेल्या त्यांनी, क्षणाचाही विलंब न लावता मास्टर विनायक यांच्याकडे तिची आग्रही शिफारस केली. ती मुलगी होती लता मंगेशकर. दीदींचं हिंदीतील पहिलं गाणं 'पा लागू कर जोरी'  चित्रपट 'आपकी सेवा में'  आणि मराठीतील पहिलं गाणं 'चला चला नवबाला' चित्रपट  'माझं बाळ'. या दोन्ही चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन डीडीं केलं आहे.



केवळ लता मंगेशकरच नव्हे तर डॉक्टर वसंतराव देशपांडे, आशा भोसले, माणिक वर्मा, उषा मंगेशकर, सुधा मल्होत्रा, अनुराधा पौडवाल ह्या भविष्यात दिग्गज ठरलेल्या सप्तस्वरांना प्रथम 'चाल' दिली, ती काळाच्या पुढं असलेल्या दत्ता डावजेकर या संगीतकारनं. सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक पंडीत वसंतराव देशपांडे यांना  डीडीं नी 'झांजीबार झांजीबार' या गीताने पहिला ब्रेक दिला.


'गोमू माहेरला जाते रे नांखवा' हे सर्वकालिन लोकप्रिय ठरलेलं गीत गाण्यासाठी पंडित जितेंद्र अभिषेकी यांना डीडीनींच प्रोत्साहित केलं होतं. माणिक वर्मा यांची एचएमव्ही नी काढलेली पहिली ध्वनिमुद्रिका ही डीडी यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली निघाली होती. इतकंच नाही तर हिंदी चित्रपटांचा खलनायकी अभिनेता प्रेमनाथ कडूनही, डीडींनी गीत गाऊन घेतलं. चित्रपट होता 'गोवळकोंडा का कैदी'. सूरां प्रमाणेच तंत्राशी ही सलगी असल्यामुळे काही इलेक्ट्रॉनिक वाद्यांच्या निर्मितीतही त्यांनी हात आजमावला. भारतातला पहिला इलेक्ट्रॉनिक सिंथेसायझर, ही त्यांचीच देण.


सुरेशबाबु माने आणि अनिल विश्वास यांना गुरुस्थानी मानत असले तरी डीडी यांनी संगीताचं शिक्षण असं घेतलं नव्हतं. तमाशा आणि उर्दू नाटकांत तबला वाजवणाऱ्या वडिलांची सतत सोबत लाभलेल्या डावजेकरांचा तबला पेटी वर हात बसला. दिलरुबा, जलतरंग, ग्लॉक्स, क्ले व्हायोलिन, पियानो, सिंथेसायझर ही वाद्येही ते सफाईदारपणे वाजवत. ते चालीही बांधू लागले. डीडींच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्वरलिपी लेखनातलं प्रावीण्य. या कौशल्यामुळे त्यांना एस एन त्रिपाठी, चित्रगुप्त, सी. रामचंद्र, रोशन, मास्टर कृष्णराव अशा दर्जेदार संगीतकारां बरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या अनेक गीतांचं संगीत संयोजन करून ती अजरामर करण्यात डीडींच मोठं योगदान आहे. सी रामचंद्र यांच्या 'अनारकली'  चित्रपटातल्या सुप्रसिद्ध 'जाग दर्द-ए-इश्क जाग' या गीताचं संपूर्ण संगीत दिग्दर्शन डीडींचं आहे. तसच मास्टर कृष्णराव यांच्या 'किचक वध'  चित्रपटातलं अत्यंत गाजलेलं, भूप रागात बांधलेलं 'धुंद मधुमती रात रे' नितांत मधुर प्रणय गीताचं ही संगीत, डीडीं नी केल्याची आणि त्याच्या तालमी साठी, त्यांच्या गिरगावातल्या घरी लता दीदी आल्याची आठवण त्यांची कन्या आणि गायिका डॉक्टर अपर्णा मयेकर यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितली होती.


डीडींनी सुमारे ६० चित्रपट तसच डझनभर नाटकांना संगीत दिलं. मात्र 'पाहू रे किती वाट' चित्रपटाची गाणी ही डावजेकरांना विशेष प्रिय होती. याच चित्रपटासाठी ग दि माडगूळकर यांनी लिहिलेलं आणि त्यांनी संगीत केलेलं 'भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी' हे स्फूर्तीगीत तत्कालीन सर्व विक्रम मोडीत अमाप लोकप्रिय झालं होत.



ऐकण्यासाठी क्लिक करा - सैनिक हो तुमच्या साठी


 मूळ लिहिलेलं गीत हे काहीसं क्लिष्ट वाटल्यामुळे दिग्दर्शक राजा ठाकूर यांच्या पसंतीस उतरलं नव्हतं पण गदिमांना हे सांगणार कोण? हे आव्हान डीडींनी स्वीकारलं. त्यांनी माडगूळकरांना परत प्रसंग सांगितला. प्रथम माडगूळकर जरी रागावले तरी अवघ्या पंधरा वीस मिनिटांत सहा अंतरे असलेलं गीत लिहून दिलं. या गीताचे शब्द, सूर, रचना, प्रसंग हे सगळं इतकं प्रभावी झालं की आशा भोंसले यांना ध्वनिमुद्रणाच्या वेळी अश्रूपात अनावर झाला होता आणि आजही प्रत्येक संवेदनशील श्रोत्याला तोच अनुभव येतो. सर्वोत्तम संगीताचा पुरस्कार मिळालेल्या 'पाठलाग' चित्रपटाचं शीर्षक गीत(Title Song) त्यांच्या प्रतिभेची, प्रयोगशीलतेची, सर्जनशीलतेची साक्ष देतं. गूढ कथावस्तू असलेल्या चित्रपटासाठी शीर्षक गीत साजेस हवं. बजेट मात्र तूटपुंज. तेव्हा हा अडसर न मानता केवळ एक गिटार, एक इलेक्ट्रिक ऑर्गन (Electric Organ) आणि ट्रम्पेट (Trumpet) ही तीन वाद्य, गदिमांचे चपखल शब्द आणि आशा भोसले यांच्या सूरेल गळ्याचा साथीनं त्यांनी 'या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती' हे चंद्रकंस रागावर आधारित अस्वस्थ करणारं नितांत गूढरम्य सुंदर गीत रचलं. ओतप्रोत भावना, तरल प्रणय, तळमळ, एकाकीपणाच्या छटा या रागातून प्रभावीपणे व्यक्त होतात. 



ऐकण्यासाठी क्लिक करा - या डोळ्यांची दोन पाखरे


‘रंगल्या रात्री अशा’ (१९६२), ‘पाठलाग’ (१९६४), ‘संथ वाहते कृष्णामाई’ (१९६७) आणि ‘धरतीची लेकरं’ (१९७०) या त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांना महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट संगीताचा पुरस्कार, तर ‘यशोदा’ (१९७४) या चित्रपटाला शास्त्रीय संगीताचा सूरसिंगार पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र राज्य सरकारनं १९९५ साली त्यांना ‘लता मंगेशकर’ पुरस्कारनं सन्मानित केलं. 



डीडी केवळ संगीतकार नव्हते. त्यांचं कला जीवन हरहुन्नरीपणा तसच अष्टपैलूत्वानी नटलेलं होतं. त्यांच्या कलाविश्व गायन, वादन, नर्तन(टॅप डान्स), गीत लेखन, चित्र रेखाटन, संशोधन अशा सप्तकातल्या वावरानं संपन्न होत.  मळलेल्या वाटे वरून वाट'चाल' न करता आपली प्रत्येक रचना नवं नवल श्रवणोत्सव घडवणारी असावी असा त्यांचा कटाक्ष होता. त्यांचा हा ध्यासच त्यांना संगीत विश्वात ध्रुवपद देता झाला.


ऐकण्यासाठी क्लिक करा - दत्ता 

डावजेकर


नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com 

8851540881

नवी दिल्ली

टिप्पण्या

  1. अप्रतिम लेख. दत्ता डावजेकर यांची त्रोटक माहिती ज्ञात होतीच. मात्र या लेखामुळे संपूर्ण जीवनपटच कळला. सैनिक हो तुमच्यासाठी हे गाणे, ऐ मेरे वतन के लोगो गाण्याचा चान्स हिरावला गेल्यामुळे आशाजींसाठी मुद्दाम मराठीत का होईना पण बनवण्यात आले असे म्हटले जाते, यात तथ्य आहे का?

    उत्तर द्याहटवा
  2. आदरणीय संगीतकार D D बद्दल तुम्ही लिहिलेला लेख आणि गाणी अप्रतीम. माणसं स्वकष्टाने कीतीमोठी होतात ना. डी डी हे त्याचं उत्तम उदाहरणआहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक