स्मृतीबनातून-कांतांची अक्षयगाणी

 कांतांची अक्षयगाणी


अनेकदा क्रांती ही प्रितीसाठी मारक ठरते तर बरेचदा प्रितीमुळे क्रांती दुबळी होते. काही जणांना मात्र क्रांती आणि प्रीती या दोन्हीही एकाचवेळी धारण करता येतात. क्रांती आणि प्रीती या सवती प्रमाणं नाही तर सखी शेजारीणी प्रमाणे हातात हात गुंफुन त्यांच्याकडे नांदतात. प्रखर, ओजस्वी शब्दांच्या मशालीनं क्रांतीच स्फुल्लिंग चेतवित असताना, सोज्वळ, भावमधुर शब्दांनी प्रणय फुलाविण्याचं कसब ही मराठी सारस्वतात ज्या काही थोड्यांना लाभलं त्यात वा रा कांत यांचा प्रामुख्यानं समावेश होतो.

वा रा कांत यांचा जन्म आणि प्रारंभिक शिक्षण मराठवाड्यात नांदेड इथं झालं. पुढील शिक्षणासाठी ते हैद्राबाद इथं गेले पण इंटर नंतर शिक्षणाशी फारकत घेऊन उपजिविकेसाठी नोकरी धारावी लागली. सुमारे एक तप त्यांनी निझाम सरकारच्या हैद्राबाद तसच औरंगाबाद रेडिओ केंद्रात आणि पंधरा वर्ष आकाशवाणीच्या विभिन्न केंद्रात मराठी विभाग प्रमुख म्हणून सेवा केली. त्यांची इंग्रजी, हिंदी तसच उर्दु भाषेवर चांगली पकड होती. त्यामुळे काही उर्दु साहित्य त्यांनी भाषांतर करून मराठीत आणलं. त्यांनी केलेली प्रदीर्घ सहा दशकीय सर्जनशील साहित्य सेवा मराठी साहित्य विश्व भरजरी करून गेली. मराठी साहित्य रसिकांना ते कवी, गीतकार म्हणून परिचित आहेत.

प्रसारमाध्यमात प्रदीर्घ सेवा करूनही प्रसिद्धीच्या मोह पाशात ते कधी फार गुरफटले नाहीत.


सांगितिक उपवनात, उत्तमोत्तम गीतकार आणि संगीतकारांच्या संवेदनशील प्रतिभेच्या अविष्कारातून, प्रामुख्यानं महाराष्ट्रात, साठच्या दशकात, भावगीताचं रोपटं रुजलं आणि फोफावलं. याच कालखंडातल्या वा. रा. कांत यांच्या अजरामर, प्रेमल, भावतरल गीतांनी मराठी भावसंगीत रसिकांच्या जीवनात कायम दरवळणारा सुवास पसरवला. रागदारी संगीतात प्रत्येक रागाला जसे वादी संवादी सूर असतात तसे आतुरता आणि अस्वस्थता हे कांतांच्या कवितेचे वादी संवादी भाव असावेत.

  

सखी शेजारिणी विषयी अनेकांच्या मनी असलेल्या हळुवार भावना कोणी कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी नेहमीच, आणि बरेचदा अडचणीच्या ठिकाणी त्या नेमक्या उघड होतात. कांतांनी मात्र मोठ्या धिटाईनं या सखी शेजारिणीला हसत राहण्याची उघडपणे विनंती केली. ही धिटाई कदाचित क्रांतीमुळे प्रीतीत उतरली असावी. ते लिहितात


"सहज मधुर तू हसता वळूनी


स्मित-किरणीं धरिं क्षितिज तोलुनी


विषाद मनिंचा जाय उजळुनी


तू वीज खिन्न घनिं लवत रहा"


तिच्या स्मितात त्यांना क्षितिज तोलण्याचे सामर्थ्य जाणवते जे दुःखी मनाला उजळवून टाकते. म्हणूनच खिन्न घानांमध्ये वीज होऊन चमकत राहण्याची तिला केलेली विनंती, वसंत प्रभूंच्या पहाडी स्वरसाथीनं आणि अरुण दातेंच्या रेशमी सूरात सदैव आपल्या स्मरणात राहणार आहे. 

सखी शेजारिणी तू हसत रहा


वास्तव मात्र विस्तावा प्रमाणे असू शकते. आज आणि काल यात बरीच तफावत असते याचं भान कवी अन्य एका गीतातून देतात


"पाकळयांचे शब्द होती, तू हळू निश्वासता

वाजती गात्री सतारी, नेत्रपाती झाकता" 


हे खरं असलं तरी


"त्या फुलांचे, त्या स्वरांचे,

गीत तू मागू नको

आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको"


कारण


"रोखूनी पलकांत पाणी, घाव सारे साहीले

अन सुखाच्या आसवांचे, मीठ डोळा साचले"


दुःखाचे घाव सहन करताना डोळ्यात पाणी रोखून होतो मात्र सुखाश्रूचं मीठ डोळ्यात आहे. यामुळे ते घाव अधिकच असहाय्य करत आहेत.

तेव्हा…


"या घडीला मोतियाचा घास तू मागू नको

आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको"

"काय बोलू श्वासभारे चांदणे डहूळेल का ?

उमलण्याचे सुख फिरुनी, या फुला सोसेल का ?

नीत नवी मरणे मराया, जन्म तू मागू नको

आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको" 


कांतांच्या कल्पनेच्या कळा देव-फडके द्वयीनं चीरस्मरणीय करून ठेवल्या.

आज राणी पूर्वीची ती प्रीत


वा रा कांत यांच्या मोजक्याच कवितांची गाणी झाली. त्यांच्या अशाच एका कवितेचं गाणं देवांनी यशवंत केलं.



"त्या तरुतळी विसरले गीत

हृदय रिकामे घेऊन फिरतो

इथे तिथे टेकीत

पदर ढळे, कचपाश भुरभूरे

नव्या उभारीत ऊर थरथरे

अधरी अमृत उतू जाय

परि पदरी हृदय व्यथित

उभी उभी ती तरुतळी शिणली

भ्रमणी मम तनू थकली गळली

एक गीत, परी चरण विखुरले

व्दिधा हृदय संगीत"


अश्या अलवार, प्रणय विरहिणी भावनेनं ओतप्रोत, चित्रदर्शी कवितेला यशवंत देवांनी चाल बांधली. साथ केली ती, प्रणय भावना, विरह, एकाकीपणा अधोरेखित करणाऱ्या चंद्रकंसाच्या सुरावटीनं आणि शब्दांच्या बरोबरीनं शब्दार्थ, भावार्थ ही गाणाऱ्या सुधीर फडके यांनी. 

त्या तरू तळी विसरले गीत 


एकोहं, अनन्य शास्त्रीय संगीत गायक डॉक्टर वसंतराव देशपांडे यांना संगीतातीलही घराणेशाही, जातीभेद अमान्य होते. एकदा ते श्रीनिवास खळे यांना म्हणाले होते की, "अण्णा आमच्या साठीही एखादं गीत करा." त्यावर खळे त्यांना म्हणाले की, "ती माझ्यासाठी एक परीक्षाच असेल." महाराष्ट्राच्या सुदैवानं अण्णांनी परीक्षा देण्याचं मनावर घेतलं आणि वसंतरावांनी संपूर्ण न्याय केला.


वामनाचे शब्द श्रीनिवास चालीनं ओठातल्या ओठात न राहता वसंताच्या गळ्यातून अवतीर्ण झाले तेव्हा अंबरी बगळ्यांची माळ फुलून आली. 


"गर्द हिरवे पाचपाणी रक्तकमळे कुंकुमाची

खेळताना बिंबलेली शुभ्र जोडी सारसांची

आठवे ? म्हंटलेस ना तू ? हे हवेसे विश्व माझे"


किती चित्रदर्शी, घरंदाज शब्द रचना! संवेदना जागृत असलेल्या कुणालाही अलगदपणे अश्या एखाद्या कमल पुष्पांनी आरक्त झालेल्या तळ्यापाशी ती घेऊन जाते. तळ्यातली आणि मनातलीही, सरसांची जोडी दाखवते आणि ते सारे हवे हवेसे वाटायला लावते. शेवटचा अंतऱ्या तर कवी विशुद्ध, अशारीरिक प्रेमाकडे घेऊन जातात. 


"मी म्हणू कैसे फुला रे, आज तू नाहीस येथे

वेल दारी सायलीची रोज अजुनी बार देते"


तिचं असणं तर सुखावह असतच पण केवळ स्मरण ही मन भारावून टाकतं.


"लाख पुष्पे तोडिल्याविण ये भरोनी पात्र माझे" 


अर्थात ह्या सर्व भावना फुलविण्यात स्वर ताल सूर यांची साथ महत्वाची. जोग, गावती, जनसंमोहिनीची सुरावट आणि शब्दां सहित आशयाची संपूर्ण समज पोहचवणारी गायकी यांचीही, अशी अनुभूती देण्यात मोलाची साथ आहे.

राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द


वा रा कांत यांच्या समग्र काव्याबद्दल व्यक्त होण्या इतका माझा अधिकार नाही. मात्र त्यांच्या भावगीतां पुरता विचार केला तर त्या प्रत्येक काव्यात विलक्षण चित्रदर्शिता दिसून येते. आणि म्हणूनच शब्दांतून व्यक्त होणाऱ्या भावना मनाला अधिकच कातर करतात. बगळ्यांची माळही याला अपवाद कशी असणार?



"बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात

भेट आपुली स्मरशी काय तू मनात ?"


या गीतरचने साठी श्रीनिवास खळे यांनी निवड केली ती राग पहाडीची. मिलनाच्या वाटेतील अडथळे, विरहार्त वेदना पण तरीही मिलनोत्सुकता या सर्व छटा व्यक्त करण्यासाठी चित्रसृष्टीत राग पहाडी आघाडी वर आहे. सोने पे सुहागा उक्ती प्रमाणे डॉक्टर वसंतरावांनी दैवदत्त फिरत लाभलेल्या गळ्यानं आपल्या नैसर्गिक किंचित अनुनासिक स्वरात, शब्दोच्चारण, गमक आणि संयत आलापीनं हे गीत विलक्षण विलोभनीय केलं आहे.

बगळ्यांची माळ फुले


थोडक्यात या सर्व भावगीतांचा बाबतीत कांत यांची साहित्य प्रतिभा; देव, खळे यांच्या सारखे संवेदनशील संगीतकार; दाते, फडके आणि डॉक्टर वसंतराव यांच्या सारखे सुयोग्य गायक असा षटकोनी योग जुळून आल्यामुळे मराठी भावगीत विश्व अधिक लोकप्रिय आणि समृद्ध होण्यासाठी हातभार लागला असं म्हणता येईल.



नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com 



टिप्पण्या

  1. अप्रतिम. त्यांच्या भावगीतांचे रसग्रहण तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीने केले आहे. मालाड पश्चिमेला एका चौकाला त्यांचे नाव दिले आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. वा नितीनजी,
    कांत हे उत्तम भाव कविता लिहिणारे कवी.तुम्ही त्यांचे आणि सोबतीला गायकांचेही गुणगान केले आहे.लेख आवडला.
    धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक