स्मृतीबनातून - 'हात तू देशील का?'

'हात तू देशील का?


कुणी काहीही म्हटलं तरी, साधारणतः प्रथम दर्शनी एखाद्याचं किंवा एखादीचं कायिक सौंदर्यच कुणाच्याही नजरेत भरतं. मन भाळून जातं. बहुतेक वेळा हीच शेवटची पायरी असते. पण काही थोडे धैर्यवान तिथेच न थांबता पुढे जातात. निकट जाऊन सर्वार्थानी सर्वांगांचा शोध घेतात. सगळेच नाही पण काही यशस्वीही होतात. यानंतर जे काही हाती येतं त्यानी मन विलक्षण प्रफुल्लित होतं. प्रमोदित होतं. कारण ते भौतिकतेच्या पलिकडचं असतं. निव्वळ स्थुलतेच्या सीमारेषेत जखडून न ठेवता, ती अनुभूती चैतन्याच्या क्षितिजरेषे पर्यंत घेऊन जाते. एखाद्या गीता, संगीता, चित्रा, शिल्पा सारख्या कलाकृतींच्या बाबतीतही असच होत असावं. 


आकाशवाणी, दूरदर्शन मधल्या सेवेदरम्यान अनेक गीतांनी वरचेवर भेटत राहून कानांना वळण लावलं. त्यातील सौंदर्य वरवर न न्याहळता, ते सर्वार्थानं सर्वांग सुंदरतेनं निरखण्याची थोडीफार दृष्टी लाभली. अर्थवाही चाल, सुरेल गायन यामुळे प्रथमश्रवणीच त्यांच्या अपसुक नादी लागलो आणि प्रत्येक नव्या भेटीत त्यांची सुस्वरुपता अधिक आकळत गेली. स्वरलतेनं गायलेल्या मंगेश पांडगावकरांच्या अशा एका रूपकात्मक कवितेशी अथवा गीताशी तुमचीही पुनर्भेट  घडवून आणण्यासाठी हा लेखन प्रपंच. या गाण्याच्या पारायणानी सहस्त्रक तर नक्कीच गाठलं आहे. श्रवणीयता, करमणूक याच्या थोडं पुढे जाऊन पाडगावकरांच्या शब्दकळे कडे थोडे अधिक गांभीर्यानं बघितलं आणि चिंतन केलं तर त्यांनी या काव्य रचनेत आयुष्या साठी योजलेलं 'गीत' हे रूपक तात्काळ ध्यानात येतं. जन्म उगमा पासून ते मृत्यू सागराला मिळे पर्यंत मानवी जीवन गंगा प्रवाहित असते. या दरम्यान काही प्रदूषित प्रवाह मिसळून जाणे हे ही अपरिहार्यच. कितीही जपलं तरी काही प्रमाद हे होणारच. अश्या वेळी
"रघुवर तुमको मेरी लाज । सदा सदा मैं शरण तिहारी, तुम हो गरीब निवाज़ ॥"
अशी स्थिती सर्वांचीच होऊन जाते. कवी मंगेश पाडगावकरांची प्रतिभाही, 'गीत' हे रूपक घेऊन परमेश्वरा समोर आयुष्याचा लेखाजोखा देत "संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे" अशी आर्त प्रार्थना त्याच्याकडे करत आहे.  

"तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले..जाहल्या काही चुका अन् सूर काही राहिले".. इथे 'गीत' म्हणजे शब्द रचना नसून प्रारब्ध रचना आहे. त्या सर्वव्यापी रचनाकाराने रचलेलं तुमचं, माझं आपल्या सर्वांचं 'जीवनगाणं' आहे. आणि शब्द रचनाकार (कवी) सृष्टीच्या रचयित्याला आपल्या जीवन सांगतेच्या टप्प्यावर सांगतो आहे की 

"तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले"..

प्रारब्धकर्मा नुसार तू जे जीवन माझ्या पदरी घातलं ते मी आवडीने जगत आलो आहे. आता ते सांगतेच्या मार्गावर आहे.

 "जाहल्या काही चुका, अन् सूर काही राहिले"...

जगत असताना थोड्याफार चुका जरूर झाल्या पण त्या मुख्यत्वे अनवधानाने झालेल्या आहेत. मात्र तू दिलेलं आयुष्य मी आवडीनं जगतो आहे. हे एक प्रामाणिक कथन आहे की, परमेश्वरा मानवी जन्मगीत गाताना जरूर काही चुका झाल्या पण जीवन आवडीने स्वीकारले आहे आणि आता 'सूर काही राहिले'.... थोडं फार आयुष्य उरलं आहे..


"चांदण्यांच्या मोहराने रात्र केव्हा दाटली"..

जीवनातल्या चांदण रात्री अर्थात सुखद क्षणांनी अनेकदा मोहरुन गेलो. त्यांचा भरपूर उपभोग घेत असतानाच…

"काजळी काळ्या ढगांनी हाक केव्हा घातली"...

काळया ढगांची काजळी म्हणजेच दुःखद घटनांचाही सामना केला.

"मी स्वरांच्या लोचनांनी

 विश्व सारे पाहिले"...

अवघ्या आयुष्याकडे मी तू दिलेल्या माझ्या गीताच्या स्वर लोचनांच्या माध्यमातून बघत आलो.  


"सौख्य माझे, दुःख माझे, सर्व माझ्या भावना

मोर स्वप्नांचे निळे अन् विंधणाऱ्या वेदना

मी असे गीतांतुनी सर्वस्व माझे वाहिले"


जीवनयापन करत असताना मी जगलेलो सुखदायी क्षण, भोगलेली दुःख, माझं एकूण भावविश्व, माझी सुंदर मयुरपंखी स्वप्न आणि वाट्याला आलेल्या तीक्ष्ण टोकदार वेदना हे जे सर्व काही मी जगलो तेच माझे सर्वस्व आहे, जे मी आता, तुला अर्पण करतो आहे. 


"संपता पूजा स्वरांची हात तू देशील का?

दाटुनी काळोख येता तू घरी नेशील का?

पूर्णतेसाठीच या मी सर्व काही साहिले"


जीवनदात्याला आपल्या मनीचे भाव तर सांगून झाले. जे झालं ते होऊन गेलं अशा स्थितीत आयुष्याची भैरवी सुरू झाली असताना अंतरी काही शंकाही दाटून येत आहेत. कवी त्या शंका परमात्म्याला विचारतो आहे. संपता पूजा स्वरांची म्हणजेच आयुष्याच्या समारोप प्रसंगी, तू माझा हात धरून ठेवशील ना? आणि काळोख दाटून आल्यावर म्हणजेच मृत्युनंतर, एखाद्या जीवलगा प्रमाणे मला तू आपल्या घरी नेशील ना? कारण "चालविसी हाती धरोनिया" या विश्वासानं, तु देऊ केलेल्या आयुष्याच्या सांगते पर्यंत पूर्णत्व प्राप्ती साठी मी हे सर्वकाही सोसत आलो आहे.



मराठी असल्या बाबत मनी धन्यता बाळगत, सार्थ अभिमान मिरवावा असं जे जे काही आहे त्यात या गीताचा आणि ते साकारणाऱ्या त्रिमूर्तीचा नक्कीच समावेश होतो. 

मुळात पाडगावकरांनी मनुष्य जीवनासाठी योजलेले 'गीत' हे रूपक तसचं 'चांदण्यांच्या मोहराने', 'काजळी काळया ढगांनी', 'मोर स्वप्नांचे निळे' आणि 'विंधणाऱ्या वेदना' या सारख्या संकल्पना कवितेचा आशय सालंकृत करतात. मराठी भावसंगीताच अवकाश, नितळ शब्दकळेच्या अनेक देखण्या कवितांनी, पाडगावकरांनी आशयमान केलं आहे. त्यांची कविता सुस्वरुपा होऊनच अवतरते. अशी दळदार शब्द रचना श्रीनिवासाच्या हाती लागल्यावर स्वरांची खळी उमटून रचना अधिकच लावण्यवती होणार यात काही शंकाच नाही. यमन कल्याणाच्या हातात हात गुंफून रुपकाच्या तालावर जाहल्या काही चुका निबद्ध करताना श्रीनिवास खळे यांनी अचूक किमया साधली आहे. असं ऐकलं की या गीताच्या ध्वनिमुद्रण ठरलं तेव्हा खळे आजारपणामुळे मुंबईतल्या जे.जे. रुग्णालयात उपचार घेत होते. पण रेकॉर्डिंगला हजर राहण्याच्या तळमळीमुळे त्यांनी सलाईन वगैरे स्वत:च काढून टाकलं आणि अक्षरशः हॉस्पिटलमधून पळून येऊन स्टुडिओमध्ये ते हजर झाले. आशयघन शब्द आणि अर्थवाही चाल जुळून आल्यानंतर ती भावपूर्णतेने गळ्यातून प्रवाहित करून स्वरलतेनं आर्त सूरात भगवंता चरणी आपलं सर्वस्व वाहिलं आणि भावसंगीताच्या चोखंदळ रसिकांसह सर्वांनाच जणू अमृतानुभव बहाल केला. 'पूर्णतेसाठीच या मी सर्व काही साहिले' अशी कैफियत भक्तांनी भगवंताकडे मांडून, 'ये हृदयी चे ते हृदयी' घातल्या नंतर आता त्यांना हात देऊन पूर्णता देण्या पलीकडे अन्य काही पर्याय त्याच्या पुढे मुळी शिल्लक तरी राहतो का?



जाहल्या काही चुका

जाहल्या काही चुका अन् सूर काही राहिले

जाहल्या काही चुका अन् सूर काही राहिले

तू दिलेले गीत माझे

तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले

जाहल्या काही चुका


चांदण्यांच्या मोहराने रात्र केव्हा दाटली

चांदण्यांच्या मोहराने रात्र केव्हा दाटली

काजळी काळ्या ढगांनी

काजळी काळ्या ढगांनी हाक केव्हा घातली

मी स्वरांच्या लोचनांनी

मी स्वरांच्या लोचनांनी विश्व सारे पाहिले

तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले

जाहल्या काही चुका


सौख्य माझे, दुःख माझे, सर्व माझ्या भावना

सौख्य माझे, दुःख माझे, सर्व माझ्या भावना

मोर स्वप्नांचे निळे

मोर स्वप्नांचे निळे अन् विंधणाऱ्या वेदना

मी असे गीतांतुनी

मी असे गीतांतुनी सर्वस्व माझे वाहिले

तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले

जाहल्या काही चुका


संपता पूजा स्वरांची हात तू देशील का?

संपता पूजा स्वरांची हात तू देशील का?

दाटुनी काळोख येता

दाटुनी काळोख येता तू घरी नेशील का?

पूर्णतेसाठीच या

पूर्णतेसाठीच या मी सर्व काही साहिले


तू दिलेले गीत माझे

तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले


ऐकण्या साठी क्लिक कर - जाहल्या काही चुका

(पेंटिंग सौजन्य - स्वाती पाटणकर)

नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com 

नवी दिल्ली

8851540881







टिप्पण्या

  1. मंगेश पाडगावकरांच्या कविता म्हणजे जगण्याचं बळ देणाऱ्या कविता

    उत्तर द्याहटवा
  2. खूप मस्त लिहिलंय. या गीतातील तरल भावना आपल्याला काही काळ निःशब्द करतात. हे वाक्य मला खु खूप आवडले "अशी दळदार शब्द रचना श्रीनिवासाच्या हाती लागल्यावर स्वरांची खळी उमटून रचना अधिकच लावण्यवती होणार यात काही शंकाच नाही" खूप खूप धन्यवाद !

    उत्तर द्याहटवा
  3. आयुष्याला गीताची उपमा, शब्द अन् शब्द उलगडत जन्माच्या उगमापासून मृत्यूच्या सागरापर्यंत साथ देणारी भावना मनाच्या तळाशी पोहचली. धन्यवाद.!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक