स्मृतीबनातून - जीवनानुभव - सार्थक दर्शन
जीवनानुभव - सार्थक दर्शन
साहित्य, संगीत, कला या विधांकडे निव्वळ मनोरंजनाच्या दृष्टीनं पाहाणं म्हणजे लघुदृष्टी असल्या सारखं आहे. चांगलं साहित्य, चांगलं संगीत हे नेहमीच मनोरंजन तर करतच पण काही वेळा त्यात अगदी सहज भावानं, जीवन विषयक फार मोठं तत्वज्ञान सामान्यातल्या सामान्य माणसालाही उलगडवून दाखवण्याची क्षमता ही दिसून येते.
हिंदी चित्रपट सृष्टीपुरता मर्यादित विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, बऱ्याच उत्कृष्ट चित्रपटांतून, चित्रपट गीतांतून मानवी जीवनाचं, मानवी संबंधांच यथार्थ रूप स्पष्ट करणारा फार मोठा आशय, फार मोठा संदेश हा सामान्य माणसाला अगदी सहज सोप्या रीतीनं कथन केला गेला आहे. अशाच एका गीताशी आज पुनर्भेट घडवून आणत आहे.
मनोज कुमारच्या अत्यंत गाजलेल्या उपकार या चित्रपटातल्या ह्या अविस्मरणीय गीताची जन्मकथा ही विलक्षण आहे. आनंदजी यांच्या एका परदेशस्थ मित्राची प्रेमिका भारतात होती. तो तिच्याशी विवाह करण्यासाठी भारतात येणार होता आणि त्याचा प्रस्ताव तिच्या पर्यंत पोहोचवण्याची कामगिरी आनंदजी यांच्यावर होती. मात्र ती कुणा दुसऱ्या व्यक्ती बरोबर विवाहबद्ध होत असल्याचं समजल्यावर ही गोष्ट मित्राला कशी सांगावी या चिंतेत ते होते. एक दिवस प्रवासा दरम्यान गीतकार इंदीवर यांना हा किस्सा सांगता सांगता ते म्हणाले, "कसमे, वादे, प्यार यह सब बेकार हैं".इंदीवर यांना या शब्दात गीत आढळलं आणि त्यांनी मुखडा लिहिला…
"कसमें वादे प्यार वफा सब
बातें हैं बातों का क्या
कोई किसी का नहीं ये झूठे
नाते हैं नातों का क्या"
आजारपणात रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आनंदजींनी जेव्हा हा मुखडा ऐकला तेव्हा काहीसे भावनिक होऊन ते म्हणाले कसं आहे बघा, "जिस बेटे की इंसान पालना करता हैं वो ही उसे चिताग्नी देता है" प्रतिभावान इंदीवर यांना अंतरा सुचला त्यांनी लिहिलं…
"तेरा अपना खून ही आखिर
तुझको आग लगायेगा"
आणि गीत पूर्ण केलं. पुढे 'उपकार'च्या संगीत निर्देशना साठी करारबद्ध झाल्यावर त्यांनी हे गीत मनोज कुमारला ऐकवलं आणि ते चित्रपटात घेण्यात आलं.
साठच्या दशकात आलेल्या मनोज कुमारच्या 'उपकार' या चित्रपटाचे आणि लेखन, अभिनय, संगीताशी संबंधित कलाकारांचे उपकार मानावेत तेव्हढे थोडे आहेत. या चित्रपटा मागे प्रेरणा स्रोत होता तो अत्यंत गरीब, अभावग्रस्त परिस्थितीशी सामना करत भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या अतिशय मृदू पण प्रसंगी तितकाच कर्तव्य कठोर असलेल्या लाल बहादुर शास्त्री यांचा. शहीद चित्रपट पाहिल्या नंतर मनोज कुमारचं अभिनंदन करत, शास्त्रीजींनी त्यांच्या 'जय जवान जय किसान' या गाजलेल्या घोषणेवर आधारित चित्रपट काढावा अशी इच्छा त्याच्याकडे व्यक्त केली.
मनोज कुमारनं ती शिरोधार्य मानून देशभक्तीनं ओतप्रोत अश्या या संगीतप्रधान चित्रपटाची निर्मिती केली. दोन भावांच्या भाव भावनेवर या चित्रपटाची कहाणी बेतली आहे. गावात राहून शेतीत काबाडकष्ट करणारा मोठा भाऊ भारत(मनोज कुमार) हा स्वतःच्या शिक्षणाला तिलांजली देत लहान भाऊ पुरनला(प्रेम चोप्रा) शहरात शिकायला पाठवतो. शिक्षण पूर्ण करून गावी परतताच पुरन जमीन जुमाल्याच्या वाटणीची मागणी करतो. मोठा भाऊ भारत, कष्टी होतो आणि भारत - पाकिस्तान लढाईवर निघून जातो. अशी चित्रपटाची कथावस्तू आहे. मनोज कुमार, प्रेम चोप्रा यांच्या व्यतिरिक्त प्राण या चित्रपटात प्रथमच चरित्र नायकाच्या भूमिकेत दिसतो.
हा चित्रपट बघितला तर एक बाब आपल्या सहज लक्षात येईल. मानवी जीवनातले स्वार्थ, पैसा, एकाकीपण, अहंकार हे दुर्गुण आणि त्याचबरोबर निस्वार्थीपणा यासारखे निरनिराळे पैलू या चित्रपटाच्या कथेतून आपल्यासमोर येतात. चित्रपटाला अमाप लोकप्रियता लाभली आणि त्याला सहा फिल्मफेअर पुरस्कारांनी गौरविल्या गेलं. जीवन संघर्षातील स्वार्थ आणि निस्वार्थ असे दोन टोकाचे प्रवाह दोन भावांच्या कहाणीतून अत्यंत सुंदरपणे या चित्रपटातून आलेखित होतात.
उपकार मध्ये मिळालेल्या विकलांग, हल्लीच्या भाषेत दिव्यांग, 'मलंग चाचा' या भूमिकेमुळे प्राणला चिकटलेला खलनायकी शिक्काही पुसला गेला. मनोज कुमार ला प्राणच्या अभिनय क्षमतेची पूर्ण जाण होती. त्याला साचेबद्ध भूमिकां मध्ये अडकवणं म्हणजे त्याच्यावर अन्याय करण्या सारखं आहे असं मनोज कुमारचं पक्क मत होतं. 'उपकार' करताना अनायसे संधी मिळाली आणि त्याने या चित्रपटाचं सर्वोत्कृष्ट गाणं प्राण वर चित्रित करण्याचा निर्णय, सर्वांच्या विरोधात जाऊन घेतला. संगीत दिग्दर्शकांनीही गाण्याचे शब्द खलनायक प्रतिमा असलेल्या प्राणच्या तोंडी शोभणार नाहीत तेव्हा गीत पार्श्वभूमीवर चित्रित करण्याचा सल्ला दिला होता. गीत गाण्यासाठी त्यांना किशोर कुमार हवा होता. त्यांनी त्याला विचारलही मात्र नायकासाठी गाणाऱ्या किशोर कुमारनं खलनायकाला आवाज देण्यास नकार दिला. स्वतः प्राणनं केलेली विनंतीही किशोरन धुडकावली. मनोज कुमार मात्र ठाम राहिला. मग मन्ना डे यांचं नाव समोर आल आणि प्राण वर पाहिलं वहिलं गीत चित्रित झालं…
'कसमें वादे प्यार वफा सब
बातें हैं बातों का क्या'
कसमें वादे प्यार वफा सब
बातें हैं बातों का क्या
कोई किसी का नहीं ये झूठे
नाते हैं नातों का क्या
कसमें वादे प्यार वफा सब
बातें हैं बातों का क्या
कसमें वादे प्यार वफा सब
बातें हैं बातों का क्या
कोई किसी का नहीं ये झूठे
नाते हैं नातों का क्या
कसमें वादे प्यार वफा सब
बातें हैं बातों का क्या
होगा मसीहा….
होगा मसीहा सामने तेरे
फिर भी न तू बच पायेगा
तेरा अपना खून ही आखिर
तुझको आग लगायेगा
आसमान में….
आसमान में उड़ने वाले
मिट्टी में मिल जायेगा
कसमें वादे प्यार वफा सब
बातें हैं बातों का क्या..
सुख में तेरे साथ चलेंगे
दुख में सब मुख मोड़ेंगे
दुनिया वाले….
दुनिया वाले तेरे बनकर
तेरा ही दिल तोड़ेंगे
देते हैं….
देते हैं भगवान को धोखा
इन्सां को क्या छोड़ेंगे
कसमें वादे प्यार वफा सब
बातें हैं बातों का क्या
कोई किसी का नहीं ये झूठे
नाते हैं नातों का क्या
कसमें वादे प्यार वफा सब
बातें हैं बातों का क्या..
काम अगर ये….
काम अगर ये हिन्दू का है
मंदिर किसने लूटा है
मुस्लिम का है काम अगर ये
खुदा का घर क्यूँ टूटा है
जिस मजहब में….
जिस मजहब में जायज़ है ये
वो मजहब तो झूठा है
कसमें वादे प्यार वफा सब
बातें हैं बातों का क्या..
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हे गाणं लोकप्रियतेचे रोज नवे उच्चांक गाठू लागलं. साठच्या दशकातलं हे गाणं गेली साठ वर्ष रसिक विसरले नाहीत आणि येणारी साठ वर्ष तरी विसरणार नाहीत. साहजिकपणे असं अविस्मरणीय दार्शनिक गीत नाकारल्याचा पश्चात्ताप किशोर कुमारला झाला. हे गाणं नाकारून मी मोठी चूक केल्याची भावना त्याने मनोज कुमारला भेटून व्यक्त ही केली. अर्थात त्याचवेळी मन्ना डे यांनी हे गीत उत्तम गायलं असल्याचं सांगत मनाचा मोठेपणाही दाखवला.
हे गीत मन्ना डे यांनी आपल्या गळ्याचा, आवाजाचा आणि गायन कौशल्याचा उत्कृष्ट कमाल उपयोग करत आत्यंतिक भावपूर्ण 'सा'कारलं आहे. संधी ही पुन:पून्हा दार ठोठावत नाही असं म्हटलं जातं. आपल्यावर प्रथमच गाणं चित्रित होण्याच्या संधीच सोनं करण्यासाठी, भूमिकेत प्राण ओतून, आर्त वास्तवदर्शी अभिनय करणारा प्राण पडद्यावर बघायला मिळतो. मानवी जीवनाचं कठोर वास्तव गीतकार इंदीवर यांनी, सोप्या पण परखड शब्दात, असं काही मांडलं आहे की ऐकणाऱ्या प्रत्येकाला ती आपली स्वतःची कैफियत वाटते.
भावाभावां मधला बेबनाव आणि वाटणीची पार्श्वभूमी असलेल्या ह्या गीताकडे निव्वळ एक गाणं म्हणून बघणं चुकीचं ठरेल. हे गीत प्रत्येक माणसाच्या जीवनातली वास्तविकता, भावना, नातीगोती, प्रेम या साऱ्या माया विश्र्वाचा आविष्कार आहे. थोडक्यात खोट्या जगाच्या खऱ्या रुपाचं सार्थक दर्शन घडवणारा, संपूर्ण जीवनानुभव आहे. हेच ह्या कालातीत गीताच्या यशस्वीतेचं मर्म आहे.
नितीन सप्रे
nitinnsapre@gmail.com
8851540881
08112022
सुरेख झालाय हा लेख
उत्तर द्याहटवाThe birth story of the song is amazing!
उत्तर द्याहटवाकिशोर कुमार यांचा मोठेपणा, मन्ना डे यांचे संपूर्ण कौशल्याने गीत 'सा' कारणं, अभिनयात 'प्राण' ओतून संधीचं सोनं करणं, हे सगळं वाचताना आपण इतके समरस होतो की पुढे पुढे वाचण्याची खूप घाई होते.
खरंच 👌
हटवाएखाद्या सुंदर चित्रा प्रमाणेच अभिप्राय छान चितारला, आकारला आहे... ‘मन्ना‘पासून धन्यवाद🙏
हटवाखूपच महत्वाची माहिती मिळाली. ओघवत्या शैलीतील एक अप्रतिम लेख वाचायला मिळाला. धन्यवाद, नितीनजी 🏆💐👍🏻
हटवागाण्या मागची कथा ऐकून गाणं जास्त आवडत झालं. या कथा आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्द्ल धन्यवाद
उत्तर द्याहटवालेख फारच भारी लिहीलाय हो. मला फार आवडला. प्राणचे काम मला फार आवडले होते.
उत्तर द्याहटवा