प्रासंगिक - प्राजक्त सुमन

प्राजक्त सुमन एखाद्या मोठ्या वृक्षाच्या छायेत अन्य वृक्षांच बीज रुजत नाही. सृष्टी नियमच आहे. मात्र प्रत्येक नियमाला अपवाद ही असतो. पार्श्वगायनाच्या क्षेत्रात सुमनताई या अश्याच अपवाद ठरल्या. नूरजहाँ, सुरैय्या, शमशाद बेगम, लता, आशा या सारख्या डेरेदार वृक्ष असलेल्या नंदनवनात, चिरकाल, तजेलदार निर्मळ सुवास देणाऱ्या बकुळ सुमनांचं हे झाड, केवळ रुजलंच नाही तर बहरून आलं. एव्हरेस्ट शिखर सर करणाराच फक्त उत्तम गिर्यारोहक असतो असं नाही. कारण तुलनेनं थोड्या कमी उंचीची शिखरं काबीज करायलाही तशीच गुणवत्ता असावी लागते. व्यावसायिक उंची अथवा गाण्यांची संख्या या निकषांचं एव्हरेस्ट जरी सुमनताईंनी गाठलं नसलं तरी, सुकल्या नंतरही ज्याचा सुवास दरवळत राहतो आणि जी माळली ही जाते अश्या बकुळ फुलांची त्या माळ ठरल्या. रसिक आणि त्यांच्या प्रेमाच्या चर्चा, त्यांच्याच 'आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर' या गाण्या प्रमाणे आजही सातत्यानं गुणग्राहकांच्या मुखी आहेत. आता तर पद्मभूषण रुपी राजमुद्रा विलसत असल्यानं, पुरस्कार हेच गुणवत्तेचं प्रमाण मानणाऱ्यांनाही हा सुमनहार गळ्यात अभिमानानं मिरवता येणार ...