प्रासंगिक - प्राजक्त सुमन

 प्राजक्त सुमन


एखाद्या मोठ्या वृक्षाच्या छायेत अन्य वृक्षांच बीज रुजत नाही. सृष्टी नियमच आहे. मात्र प्रत्येक नियमाला अपवाद ही असतो. पार्श्वगायनाच्या क्षेत्रात सुमनताई या अश्याच अपवाद ठरल्या. नूरजहाँ, सुरैय्या, शमशाद बेगम, लता, आशा या सारख्या डेरेदार वृक्ष असलेल्या नंदनवनात, चिरकाल, तजेलदार निर्मळ सुवास देणाऱ्या बकुळ सुमनांचं हे झाड, केवळ रुजलंच नाही तर बहरून आलं. एव्हरेस्ट शिखर सर करणाराच फक्त उत्तम गिर्यारोहक असतो असं नाही. कारण तुलनेनं थोड्या कमी उंचीची शिखरं काबीज करायलाही तशीच गुणवत्ता असावी लागते. व्यावसायिक उंची अथवा गाण्यांची संख्या या निकषांचं एव्हरेस्ट जरी सुमनताईंनी गाठलं नसलं तरी, सुकल्या नंतरही ज्याचा सुवास दरवळत राहतो आणि जी माळली ही जाते अश्या बकुळ फुलांची त्या माळ ठरल्या. रसिक आणि त्यांच्या प्रेमाच्या चर्चा, त्यांच्याच 'आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर' या गाण्या प्रमाणे आजही सातत्यानं गुणग्राहकांच्या मुखी आहेत. आता तर पद्मभूषण रुपी राजमुद्रा विलसत असल्यानं, पुरस्कार हेच गुणवत्तेचं प्रमाण मानणाऱ्यांनाही हा सुमनहार गळ्यात अभिमानानं मिरवता येणार आहे. 


सुमन ताईंच्या आणि लता दीदींच्या आवाजात विलक्षण साम्य आहे. अस्सल बरोबरचं हे साधर्म्य कमअस्सल कलाकारासाठी तर वरदान ठरू शकतं. मात्र तेवढयाच ताकदीच्या दुसऱ्या एखाद्या अव्वल कलाकारासाठी ते अस्मितेच्या संकटा सारखं घातक ठरतं. सुमन ताईंच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. त्यांच्या उगवतीच्या समयी लता रुपी स्वरपौर्णिमा भर यौवनात होती. त्यामुळे सुमन ताईंच्या निर्विवाद गुणवत्तेचं चीज करण्यास मायानगरी तोकडी पडली. न्याय्य ते त्यांना देण्यास अवकाशच कमी पडलं. त्यांची स्वतःची अशी शैली असूनही आवाजातल्या साधर्म्यमुळे अनेकदा संगीतकार त्यांना लता मंगेशकर यांच्या सारखं गायला प्रवृत्त करत. त्यामुळे स्वशैली असूनही, हुबेहूब लता सारखी गाणारी, लताची क्लोन, प्रती लता वगैरे विशेषणं (?)त्यांना चिकटू लागली. बरं त्यातही लता उपलब्ध असेल तर प्रती लताला गाणी का द्यायची असा विचार ही संगीतकार, निर्माते करीत.असे सगळे विसंवादी सूर हे सुमन रागाचे वादी-संवादी स्वर झाले होते. एकूण परिस्थिती त्यांच्या साठी फारच कठीण होती. कारण लताजींना तर स्वतःचच गाणं गायचं असायचं मात्र सुमनजींना लता सारखं गाण्याचं दडपण बाळगत गाणं गावं लागत असे. हेमंत कुमार यांनी संगीत दिलेल्या 'चांद' या चित्रपटासाठी शैलेंद्र यांच्या लेखणीतून झरलेलं 'कभी आज कभी कल कभी परसो ऐसे ही बीते बरसों' हे, समदर्शी सुमन लतेच एकमेव युगुल गीत ऐकताना या एक'सूर'त्वाची प्रचिती येते. 



ऐकण्यासाठी लिंक क्लिक करावी.

कभी आज कभी कल कभी परसों  


हे नृत्यगीत हेलन आणि शीला वाज यांच्यावर चित्रित झालं आहे. कुणी कुणाला आवाज दिला आहे हे ओळखणे निव्वळ अशक्य आहे किंवा आता फक्त सुमन ताईनाच शक्य आहे. शीला-लता आणि  हेलन-सुमन असं यमक मी तरी जुळवलं आहे. व्यासंगी याचा योग्य निर्णय करू शकतील.


'पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना, कुण्डे कुण्डे नवं पयः, जातौ जातौ नवाचाराः, नवा वाणी मुखे मुखे॥' या सुभाषिताला अनुसरून या दोन्ही समगुणी गायिकां मधल्या संबंधांवर निरनिराळी भाष्य झाली. आयुष्यात सदैव चांगल्या गोष्टी स्मरणात ठेऊन वाईट ते विसरून जायला हवं अशी पुस्ती जोडत स्वतः सुमनताईं मात्र, त्यांच्या पहिल्याच गाण्याच्या वेळी (मंगु चित्रपट) लता दीदींच्या उपस्थिती आणि त्यांच्या बरोबर झालेल्या सुसंवादाच्या, 'आठवणीच्या चिंचा गाभुळ' (तुला ते आठवेल का सारे) चाखायला देतात. आपल्या घरा शेजारी आलेल्या लता दीदींना भेटण्या साठी शाळकरी सुमननी, केलेली अपयशी धावपळ अशी सुफळ संपूर्ण झाल्याचं त्या सांगतात. 


लहानपणा पासूनच त्यांच्यात संगीता बद्दल रुची निर्माण झाली.'सखी री नाही आए सजनवा मोर', 'जवा हे मोहब्बत हसीं ये जमाना लुटाया है दिल ने खुशी का खजाना'  ही नूरजहाँ यांची, सुरैय्या यांचं 'तेरे नैनो ने जादू किया मेरा छोटासा जिया परदेसिया' जोहराबाईंचं 'अखिंया मिला के जिया भरमाके चले नही जाना' तर 'ना उम्मिद होके भी दुनिया मे जिये जाते हैं', 'जो मुझे भुलाए चले गये, मुझे याद उनकी सताती क्यूँ' या लता दीदींच्या गाण्यांनी छोट्या सुमनच्या मनात घर केलं होतं. आपल्या बालसखी बरोबर घराच्या गच्चीवर सततच त्यांच्या मैफिली घडत असत. योगायोग पहा प्रथम हिंदी आणि नंतर मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पणातली गाणी तर रेकॉर्ड झाली मात्र चित्रपट आलेच नाहीत. त्यांच्या आवडीच्या लता दीदींच्या एका गाण्यांचे 'ना उम्मिद होके भी दुनिया मे जिये जाते हैं' हे शब्द यथार्थ झाले. जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये शिकत असताना दुसऱ्या वर्षी त्यांना टरपेंटाईनची एलर्जी  असल्याचं लक्षात आलं. त्याच सुमारास 1954 साली पार्श्वगायनाची संधीही चालून आली. मंगू या चित्रपटातल्या 'कोई पुकारे धीरे से आए' या गीतानं त्यांच्या संगीत कारकीर्दीचा श्रीगणेशा झाला. आजतागायत रसिकांचा त्यांच्या गाण्यांसाठी पुकारा सुरू आहे. रेखाचित्राचं स्वरचित्रात झालेलं हे रूपांतरण संगीताच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरलं. 


सुमन कल्याणपूर या पूर्वाश्रमीच्या सुमन हेमाडी. सीता-शंकरराव हेमाडी हे त्यांचे मातपिता. मंगलोरच्या हेम्माडी इथलं हे सारस्वत ब्राह्मण कुटुंब. सेंट्रल बँकेत उच्च पदावर असणाऱ्या शंकरराव यांची ढाका इथे बदली होण्यापूर्वी 1937 साली 28 जानेवारीला तत्कालीन कलकत्ता इथे सुमन ताईंचा जन्म झाला. पुढे ढाका इथे काही काळ राहिल्यानंतर त्यांच्या वडिलांनी मुंबईत बदली करून घेतली. हेमाडी कुटुंब अतिशय सुसंस्कृत, कलाप्रेमी, संगीतप्रेमी त्यातच मो.ग.रांगणेकर हे त्यांचे सख्खे शेजारी. त्यामुळे सुमन ताईंच्या मनावर लहानपणा पासूनच ज्योत्स्नाबाईंच्या गाण्याचे संस्कार कोरले गेले. भावसंगीतातले बारकावे, नक्षीकाम केशवराव भोळे यांनी त्यांना समजावून सांगितलं. पुढे यशवंत देव, मास्टर नवरंग, तावडेबुआ, रेहमान यांच्याही मार्गदर्शनाचा सुमन ताईंना लाभ झाला.लग्नानंतर व्यवसायी पती रामानंद यांनी घरगुती कामात वाटा उचलून पत्नी सुमनला गायन व्यासंग सुरू ठेवण्यास सक्रिय प्रोत्साहन दिलं. यशस्वी स्त्री मागे पुरुष असल्याचं हे आणखी एक उदाहरण.(वाणी जयराम यांच्या पतीनं ही त्यांना शास्त्रीय गायन शिकण्यास प्रोत्साहित केलं होतं)



केशवा माधवाच्या नामातल्या गोडव्या इतका गोडवा सुमन ताईंच्या गाण्यातून अनुभवायला मिळतो. परमेश्वरानं जणू नीरक्षीर विवेकानं मधुमक्षिकेचा स्वर वगळून मधुरस तेवढा त्यांच्या कंठात, व्यक्तित्त्वात भरून दिला. 'शब्द शब्द जपून' ऐकत, कानी पडणाऱ्या त्यांच्या स्वरांनी श्रुती धन्य होतात. गमक(आस), मिंड, मुरकी, खटका, फिरत अश्या विविध संगीतलंकाराचा साज कुणीही गायक आपल्या गाण्याला आपापल्या कुवतीनुसार चढवतच असतो. सुमनताईंच तर प्रत्येक गाणं मार्दव साज श्रृंगारात अवतरतं, पण विशेष म्हणजे त्यांचं सहज साधं बोलणं ही तितकच सुरेल आणि सालंकृत असतं. सुदैवानं मला हे प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. अगदी लहानपणी नकळत आकाशवाणी वर लागणाऱ्या त्यांच्या गीतांनी आणि पुढे थोडी समज आल्यावर कळतपणे, माझं व्यक्तिमत्त्व समृद्ध करण्यात बरच मोठं योगदान दिलं आहे. त्यामुळेच सुमारे सतरा अठरा वर्षांपूर्वी, स्वेच्छेनं, बरीच मिन्नतवारी, विनंती करून, मी त्यांना मुलाखतीसाठी राजी केलं होतं. वीस वर्षांहून अधिक काळानंतर त्या प्रथमच माध्यमां समोर आल्या होत्या. ही मुलाखत घेत असताना त्यांच्या वागण्या बोलण्यातला निर्मळ साधेपणा, ऋजुता, शब्द-स्वर माधुर्य सतत अनुभवायला मिळालं. दूरदर्शनच्या कॅमेरानं ते छान टिपलंही. 



सुमन ताईंचा एक अन्य मुलाखत ऐकल्या नंतर मला विशेषत्वानं जाणवलं ते हे की त्यांनी गानविश्वात ससा-कासव अशी स्पर्धा मनात देखील कधी केली नसावी. त्यांच गाणं हे चरितार्थी नसल्यानं परिष्कृत राहिलं. आणि कदाचित यामुळेच अन्य व्यावसायिक कलाकारांच्या तुलनेत त्या किंचित अधिक उजव्या ठरल्या. गीत समोर आलं की त्यात ओतप्रोत भाव मिसळून, शब्दार्थ, भावार्थ नीट समजून ते कसं सर्वांग सुंदर होईल या कडेच त्यांचा कटाक्ष असे. विशेषतः त्यांच्या मराठी भावगीतं, भक्तीगीतांतून पदोपदी याची अनुभूती येते. 

सुमन कल्याणपूर यांची सांगितिक कारकिर्द मुख्यत्वे तिरंगी आहे. एक तर हिंदी पार्श्वगायन,  नंतर मराठी वगळता अन्य भाषेतील पार्श्वगायन आणि सुगम संगीत,  आणि कदाचित सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे मराठी पार्श्वगायन आणि सुगम संगीत. हिंदी पार्श्वगायन हे त्यांच्या कडे केवळ गुणवत्तेच्या जोरावर कुणालाही काम न मागता विनासायास चालत आलं; मात्र ते राजकारणानं ग्रासलं गेलं. अर्थात तरीही, 'आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जूबान पर', *मेरा प्यार भी तू है ये बहार भी तू है', 'तुमने पुकारा और हम चले आये', 'गरजत बरसत सावन आयो रे', 'ठेहरिये होष मे आऊ तो चले जाइयेगा',  'न तुम हमें जानो न हम तुम्हें जाने', 'अजहुं न आए बलमा', 'बाद मुद्दत के ये घड़ी आई' 'ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे', 'इतना है तुमसे प्यार मुझे मेरे राजदार', 'ये दुनिया के बदलते रिश्ते', 'जिंदगी इम्तिहान लेती है', या सारख्या असंख्य अक्षर गीतांचा ठेवा रसिकांना सुपूर्द करतांना 'रहे ना रहे हम मेहेका करेंगे' असा दिलासा देऊ करत 80 च्या दशकात हिंदी चित्रपट सृष्टीला त्यांनी निरोप दिला.



बंगाली, गुजराती, पंजाबी, कन्नड, असमिया, मैथिली, राजस्थानी, ओडिया अशा अन्य भाषांत ही त्यांनी गायलेली कितीतरी गीतं गाजली. गुजरात, पंजाब राज्य सरकार कडून सलग पुरस्कृतही करण्यात आलं. पण मला तरी त्यांचं मराठीतलं स्वरकाम हे  विशेषत्वानं भावतं. मराठी संगीत विश्वात त्यांच्या पदार्पणाच वर्णन 'उघडले एक चंदनी दार' असं अगदी समर्पकपणे करता येईल. मराठी प्रांतात, भावगीतं, भक्तिगीतं, चित्रपटगीतांच्या रूपानं त्यांनी अपार स्वर दौलत उधळली आहे. मराठी रसिकांनी ही त्यांच्यावर निस्सीम प्रेम करत त्यांचा आदरपूर्वक सन्मान केला आहे. 'पहिलीच भेट झाली', असावे घर ते अपुले छान', 'आला ग सुगंध मातीचा', 'एकदाच यावे सखया तुझे गीत कानी', 'वाऱ्यावरती घेतं लकेरी', 'नाविका रे वारा वाहे रे', 'झिमझिम झरती श्रावण धारा', 'दिन रात तुला मी किती स्मरू', 'नकळत सारे घडले', 'पिवळी पिवळी हळद', 'रे क्षणांच्या संगतीने', 'विसरशील तू सारे' या सारखी अभिजात भावगीतं, 'देवगृही या भक्त जनांना गौरी नंदन पावला', 'चल उठ रे मुकुंदा', 'एक एक विरतो तारा', 'कृष्ण गाथा एक गाणे', 'मधुवंतीच्या सूरा सूरातून', 'मृदुल करांनी छेडीत तारा', 'हरी भजनी रंगली राधिका', 'ही नव्हे चांदणी ही तर मीरा गाते', 'सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले' ही निवडक भक्तिगीतं तसच 'दीपका मांडीले तुला सोनियाचे ताट' 'या लाडक्या मुलांनो' ही गीतं किंवा 'एक एक पाऊल उचली चाल निश्चयाने',  'सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला', 'अरे संसार संसार', 'निंबोणीच्या झाडामागे', 'गेला सोडूनी मजसी कान्हा', 'कशी गवळण राधा बावरली', 'जिथे सागरा धरणी मिळते', 'कशी करू स्वागता', 'बघत राहू दे तुझ्याकडे', 'आनंद मनी माईना','आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही', 'समाधी घेऊन जाई ज्ञानदेव' या काही चित्रगीतांच्या आठवणीही कानामनाला भारावलेपणाची अनुभूती देतात. लेख वाचून होताच, कदाचित वाचता वाचताच प्रत्येक जण ही गाणी पुन्हा पुन्हा ऐकणं हे अगदी स्वाभाविक प्रक्रियेनं होईल याची मला खात्री आहे. लिहिता लिहिता मीही तेच केलं.


अखेरीस हरदास जसा मूळ पदावर येतो तद्वतच असं लक्षात येतं की सुमन ताईंचा आवाज नुसताच गोड नाही तर त्यात भाव प्रकट करण्याची नैसर्गिक क्षमता आहे. अर्जुनाला जसा माश्याचा फक्त डोळाच दिसत होता त्याप्रमाणेच, गातांना त्या इतक्या तन्मय होतात की त्यांना फक्त शब्दस्वरावली व्यतिरिक्त इतर कशाचं भान उरत नसावं. म्हणूनच त्यांची, विशेषतः मराठी भावगीतं, भक्तीगीतं अजोड परिणामकारक झाली आहेत. त्यांच्या गायकीच्या प्राजक्त सुमनगंधाची मोहिनी निश्चितच पद्मभूषणावह असून विश्वामित्र बाण्याच्याही एखाद्याचं अरसिकत्व भंग करेल अशी लाघवी आहे. 



नितीन सप्रे

nitinnsapre@gmail.com

8851540881

टिप्पण्या

  1. नितीनजी वा!
    सुमनताई त्यांच्याबद्दल तुम्ही भरभरून लिहिलेलं आहे. त्यांच्या गाण्याइतकच शब्दांचे सुंदर नक्षीकाम तुम्ही तुमच्या लेखात केलेलं दिसतं त्यासाठी तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत . त्यांच्या गाण्याची यादी तुम्ही या लेखात दिल्यामुळे रसिकांना ती गाणी ऐकणं सोपं जाईल आकाशवाणीतल्या माझ्या नोकरीमुळे मी कितीतरी वेळेला त्यांची गाणी ऐकलेली आहेत. नाविकारे वारा वाहे रे हे त्यांचं गाणं माझंअतिशय आवडतं गाणं आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. सुमनताईंच्या कारकीर्दीला तुम्ही नेमकं शब्दात पकडलं आहे. बेदीच्या काळात शिवलकरवर आणि लतादीदींच्या काळात सुमनताईंवर जो अन्याय झाला त्याला 'नशीब' याशिवाय दुसरं काहीही कारण देता येत नाही.

    उत्तर द्याहटवा
  3. नमने वाहुनी सुमने उधळलीत!गाणे चरितार्थी नसल्याने परिष्कृत राहिले....वा!

    उत्तर द्याहटवा
  4. सुमनताई ह्यांची गाणी जितकी मनभावनआहेत तितकाच तुमचा त्यांच्यावरील हा लेख मला मनभावन वाटला.

    उत्तर द्याहटवा
  5. फार सुंदर!सार्थ शब्द भावनांनी गुंफलेली सुमन स्तुती!!सुमनताईंचं मनापासून अभिनंदन आणि वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन 💐

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक