प्रासंगिक - 'खण्डन भवबन्धन' भावार्तीचा शतकोत्तर रौप्य महोत्सव

 

'खण्डन भवबन्धन' भावार्तीचा शतकोत्तर रौप्य महोत्सव




भगवान श्रीरामकृष्ण परमहंस यांचा शिष्योत्तम, अमेरिकेतल्या शिकागो इथली सर्वधर्म परिषद गाजवलेला हिंदू संन्यासी, जगाला वेदांताचा परिचय करून देणारा तत्वज्ञानी, म्हणून अवघं जग स्वामी विवेकानंद यांना ओळखतं. अध्यात्मिक श्रेष्ठते बरोबरच स्वामीजींच्या व्यक्तिमत्त्वात विभिन्न अलौकिक लौकिक गुण वैशिष्ट्येही होती. या वैशिष्ट्यां मध्ये त्यांच्या सांगितिक प्रतिभेचा ही समावेश होतो. 11 सप्टेंबर 1893 रोजी शिकागो इथे झालेल्या सर्वधर्म परिषदेला जाण्यापूर्वी 16 ऑगस्ट 1886  ला श्रीरामकृष्ण यांच्या देहावसना नंतर श्रीरामकृष्णांच्या अध्यात्मिक शिकवणीचं अनुसरण करण्यासाठी, विवेकानंदांनी तत्कालीन कलकत्ता शहरात वराहनगर मध्ये रामकृष्ण मठाची स्थापना केली. मठ स्थापने बरोबरच त्यांनी धार्मिक विधींची परंपराही आखून दिली. 1898 साली, कलकत्ता मुक्कामी ते रामकृष्णांचे एक अन्य शिष्य, निलांबर बाबू, यांच्या घरी स्थापन केलेल्या रामकृष्ण मठाच्या अभिषेकात सहभागी झाले. तिथल्या वास्तव्यात विवेकानंदांनी 'खण्डन भवबन्धन जगवन्दन वन्दि तोमाय'  ही भावकविता लिहिली. सांगितिक ज्ञान आणि गाता गळा लाभल्यानं त्यांनी ती संगीतबद्ध करताना राग मिश्र कल्याणच्या सुरावटीत बांधली. धृपद गायकीच्या अंगानं धीरगंभीर स्वरात गायली जाणारी ही आरती म्हणजे गुरुवर्य रामकृष्ण देवांना स्वामी विवेकानंद यांनी केलेलं संबोधन आहे.  त्यांची स्तुती आहे. ते म्हणतात की गुरू महाराज, भवसागरात अडकलेल्या मानवाला मायारूपी शृंखलेतून मुक्त करू शकतात. ते निष्कलंक आहेत. दैवी ज्ञान संपन्न अवतार आहेत. श्रीगुरुंच्या दिव्यदृष्टीत त्यांना परमेश्वराचा विवेक दिसतो. जो मायेच्या मोहपाशातून सोडवू शकणारा आहे. या संसार रुपी तुरुंगात अडकलेल्या सर्वाँना मुक्त करण्यासाठी श्री गुरूंनी स्वतः मानवी जन्म घेतला. अखेरीस ते गुरूंना आपल्या हृदयी प्रकाशमान होऊन अंधकार दूर करण्याची प्रार्थना करतात. 



ही आरती जगभरातल्या श्रीरामकृष्ण मिशनच्या दैनंदिन उपासनेत सायं प्रार्थना म्हणून गायली जाते. 2023 हे वर्ष  ह्या आरतीचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष. या निमित्तानं आरतीचं पुन्हा एकवार आकलन करून घेण्यासाठी ही शब्दकारी.

'खण्डन_भव_बन्धन जग_वन्दन वन्दि तोमाय । निरञ्जन नररूपधर निर्गुण गुणमय ॥१॥'

हे प्रभो रामकृष्ण देव सारं विश्व तुम्हाला वंदन करतं. माझा ही तुम्हाला प्रणाम. या आभासमान जगातल्या सर्व बंधनां पासून मला मुक्त करा. तुम्ही निष्कलंक आणि शुद्ध आहात. भक्तांच्या कल्याणासाठी तुम्ही जरी नर रूप धारण केलं असलं तरी तुम्ही सत्व, रज, तम अशा गुणांनी विरहित म्हणजेच निर्गुण साकार आहात.

'मोचन_अघदूषण जगभूषण चिद्घनकाय । ज्ञानाञ्जन_विमल_नयन वीक्षणे मोह जाय ॥२॥'

तुम्ही परमात्मा स्वरूप आहात. माझ्या अंतरीचे, अपवित्र, मन भरकटवणारे विचार दूर करा.

तुमच्या शुद्ध, सात्विक ज्ञान चक्षुंच्या दर्शनानी या आभासी जगाचा भ्रम नाहीसा होतो.

'भास्वर भाव_सागर चिर उन्मद प्रेम_पाथार । भक्तार्जन_युगलचरण तारण_भव_पार ॥३॥'

हे प्रभो तुम्ही दैवी भावनांचा निरंतर उफाळलेला चमचमता प्रेमस्वरूप दर्या आहात. भक्तजन त्यांच्या शुद्ध भक्तीनं तुझ्या कमल चरणांशी निवास करून हा संसार सागर पार करतात.

'जृंभित_युग_ईश्वर जगदीश्वर योगसहाय । निरोधन समाहित_मन निरखि तव कृपाय ॥४॥'

प्रभो तुम्ही तुमच्या योग साधनेच्या सहाय्यानं  प्रकटलेले या युगाचे स्वामी आहात. अवघ्या जगाचे ईश्वर आहात. संयम, एकाग्रता आणि निग्रही मनानं प्राप्त झालेली तुझी कृपादृष्टी मी अनुभवत आहे.

'भञ्जन_दुःखगञ्जन करुणाघन कर्मकठोर । प्राणार्पण_जगत_तारण कृन्तन_कलिडोर ॥५॥'

रामकृष्णा, तुम्हीच  या संसार सागरातल्या दुःख रुपी लाटा कठोर अध्यात्मिक आचरणाद्वारे कृपाळू पणानं सहज मोडून काढता. 

कलियुगाचा दोर (बंधन) कापून काढून भवसागर (संसार) पार करण्यासाठी जगाच्या कल्याणासाठी, जग सक्षम करण्यासाठी तुम्ही तुमचे जीवन समर्पित केलं आहे.

'वञ्चन_कामकाञ्चन अतिनिन्दित_इन्द्रिय_राग । त्यागीश्वर हे नरवर देह पदे अनुराग ॥६॥'

रामकृष्णा, तुम्ही काम (वासना) आणि कांचनाचा (संपत्तीचा लोभ) त्याग केला आहे. कृपावंत होऊन इंद्रियांची अत्यंतिक हीन आसक्ती निवारण्यात मलाही मदत करावी. तुम्ही त्यागमूर्ती आहात. हे पुरुषोत्तमा हे सर्वोत्तम पुरुष; तुम्ही देह, पद कीर्ती याबाबत संपूर्ण अनासक्ती बाळगून आहात. 

'निर्भय गतसंशय दृढनिश्चयमानसवान । निष्कारण भकत_शरण त्यजि जातिकुलमान ॥७॥'

रामकृष्णा, तुम्ही भयमुक्त आहात. जीवनाच्या अंतिम ध्येया प्रती तुम्ही निःसंशय, निःशंक आहात. तुम्ही मनाने दृढ संकल्पी आहात. कृपया मलाही जीवनाच्या अंतिम उद्दिष्टा बद्दल दृढ संकल्प करून निर्भय होण्यास मदत करा.

तुम्ही अहेतुक पणे जातीपातीच्या विचार न करता दैवी प्रेमानं प्रेरित होऊन भक्तांना आश्रय देणारे आहात; जाती, वंश आदी दुराभिमान तुम्ही त्यागले आहेत.

'सम्पद तव श्रीपद भव गोष्पद_वारि यथाय । प्रेमार्पण समदरशन जगजन_दुःख जाय ॥८॥'

रामकृष्णा, तुमचे दैवी चरणी आसरा मिळणं हीच भक्तांसाठी मोठी धनसंपदा आहे. तुमच्या चरणी आश्रय मिळालेल्या भक्तांसाठी संसार रुपी विशाल भवसागर हा गाईच्या खुरांनी झलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्या इतका संकीर्ण जाणवतो. 

तुम्ही सर्व भक्तांवर समान कृपादृष्टी टाकत दैवी प्रेमाचा वर्षाव करता आणि त्यांच्या दुःखांच निराकरण करता. 

'नमो नमो प्रभु वाक्यमनातीत मनोवचनैकाधार

ज्योतिर ज्योति उजल हृदिकन्दर

तुमि तमोभञ्जनहार ॥९॥'

हे शब्दातीत, मनातीत परमेश्वरा तुला नमस्कार. वाणी आणि मनाच्या पलीकडे असलेल्या परमेश्वरा, नमस्कार, नमस्कार.

मन आणि वाणीचा तू आधार आहेस. पाया आहेस. हे परमेश्वरा, जो प्रकाशाचा प्रकाश आहेस; कृपया माझी हृदय गुंफा तू प्रकाशून टाक. उजळून दे. तू तमस म्हणजेच अज्ञान मूलक अंधकार दूर करणारा आहेस.

'धे धे धे लंग रंग भंग बाजे अंग संग मृदंग

गाइछे छन्द भकतवृन्द आरति तोमार ॥ जय जय आरति तोमार

हर हर आरति तोमार

शिव शिव आरति तोमार ॥१०॥'

मृदंगातून जसे धे, धे, धे असे बोल बाहेर पडतात, तद्वतच निरर्थक ऐहिक, संसार मायेचा दुबळा खेळ जणू माझ्या आतून बाहेर पडत आहे; माझे शरीर मृदंगाच्या नाद ऐकून रोमांचित होत आहे.

भक्तजन छंद तालात आरती गात आहेत. आरती द्वारे जयजयकार करत आहोत

तुमचा जयजयकार असो. विजय असो. हे दुःखहर्ता, हे शिवा आम्ही तुझी आरती गातो आहोत.

 

ऐकण्या साठी क्लिक करा-खंडन भव बंधन


नितीन सप्रे

nitinnaapre@gmail.com 



   

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रासंगिक- वसंतवैभव-कैवल्य गान

स्मृतीबनातून - देखण्या ‘बाकी’ काव्यपंक्ती

स्मृतीबनातून निरंजनी स्वर-माणिक