स्मृतीबनातून - तरूतळीची विरहिणी
तरूतळीची विरहिणी
एखादी कळी सुमनाचं रूप कधी, कशी, कुठे धारण करते हे जसं नेमकेपणानं सांगता येत नाही तसच प्रतिभेचं देखील आहे. ती कधी, कशी, कुठे फुलून येईल, बहरेल हे देखील नेमकं सांगणं फार कठीण आहे. त्यातच प्रतिभेतून, वास्तवाचा हात हाती घेऊन, कल्पनाविलास अवतरला तर त्या सृजनाची खुमारी काही औरच असते. तेव्हा विरह वेदना देखील शुष्कपर्णा प्रमाणे न राहता, नव्या कोवळ्या पालवी सारखी नाजुका होऊन जाते. कविवर्य
निजामाच्या राजवटीत चरितार्थासाठी नोकरी करणारे कवी कांत, सायकल घेऊन कामाच्या ठिकाणी जात येतं असत. रानातून जाणाऱ्या या रस्त्यावर, वाटेत एक छानस तळं होतं. या तळ्या काठी असलेल्या एका वृक्षा खाली बसून, त्या शांत वातावरणात कांत प्रतिभेची आराधना करीत. सुचलेल्या कल्पना, जवळ बाळगत असलेल्या एका वहीत ते नोंदवून ठेवत. अनेकदा त्या काव्य रूप घेत. हे सर्व सृजन धन, या वहीत जतन करून ठेवलेलं होतं.
एके दिवशी घरी परतल्यावर हा अमूल्य ठेवा, गडबडीत त्या झाडाखालीच विसरून आल्याचं त्यांच्या लक्षात येतं. मनाची घालमेल होते. अस्वस्थता येते. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीतही सर्जनशील कांतांना कविता सापडते…."त्या तरू तळी विसरले गीत"
अस्वस्थतेतच ती रात्र कशीबशी घालवून दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच त्या वहीच्या शोधार्थ ते तळ्याकाठी धाव घेतात. योगायोग बघा त्यांना दिसते त्या झाडाला टेकून बसलेली, आपल्या सख्याची वाट पाहणारी एक तरुणी आणि तिच्या हाती, रात्री तिथे राहून गेलेली वही. सहज म्हणून ती वही चाळत असते. पण बहुदा अन्य भाषिक असल्यानं तिला काही अर्थबोध होत नसावा. अश्या तऱ्हेने वही मिळाल्यामुळे आनंद साहजिकच द्विगुणित झाला असणार. या आनंदाचा परिपाक म्हणून की काय, कवीला शब्द सुचतात.." मदालसा तरुवरी रेलूनी वाट बघे सखी अधीर लोचनी"
अश्याप्रकारे वास्तवतेच्या हातात हात गुंफून, कवीकल्पना भरारी घेते आणि मग एक अप्रतिम विरहिणी प्रसूत होते.
"त्या तरुतळी विसरले गीत,
हृदय रिकामे घेउनि फिरतो, इथे तिथे टेकीत
मुक्या मना मग भार भावना
स्वरातुनी चमकते वेदना
तप्त रणे तुडवीत हिंडतो, ती छाया आठवीत"
वही हरवल्यानं रिक्त आणि मौन मनानं इथे तिथे तिचा शोध सुरू आहे. वातावरण तप्त आहे. वही सापडेल ह्या आशेचीच काय ती सावली आहे.
"विशाल तरू तरी फांदी लवली
थंडगार घनगर्द सावली
मनिंची अस्फुट स्मिते झळकती
तसे कवडसे तीत"
प्रतिभेचा विशाल वृक्षराजाची ही एक छोटी फांदी आहे. झाडाखाली असलेल्या तिच्यावर त्या गर्द पर्णराजीतून पडणाऱ्या कवडस्यात ती (वही)दिसली आणि ती सापडल्यानं मनात अस्फुट स्मितं झळकली.
"मदालसा तरुवरी रेलुनी
वाट बघे सखी अधिर लोचनी
पानजाळि सळसळे, वळे ती मथित हृदय कवळीत"
एक सुंदर तरुणी, यक्ष कन्याच जणू, अधिरपणे वाट पाहत बसली आहे. पायरव ऐकून तिने हृदयी ज्याच चिंतन सुरू आहे तो आल्याच्या जाणिवेनं झटकन वळून बघितलं.
"पदर ढळे, कचपाश भुरभुरे
नव्या उभारित ऊर थरथरे
अधरी अमृत उतू जाय
परि पदरी हृदय व्यथीत"
वाऱ्यामुळे पदर खांद्यावरून किंचित खाली आलाय, केस भुरभुर उडत आहेत, नवथर तरुणी प्रथमच हा अनुभव घेत असल्यानं, उरात नव्हळीतली धकधक आहे. आरक्त अशा अधरां मधून तर जणू काही अमृतच उतू जात आहे. पण तो अजून न आल्यानं पदराआडचं हृदय व्यथित आहे.
"उभीउभी ती तरुतळि शिणली
भ्रमणी मम तनु थकली गळली
एक गीत, परि चरण विखुरले, द्विधा हृदय-संगीत"
झाडाखाली उभी असलेली ती सख्याची वाट बघून शिणून गेली आहे. वहीच्या शोधार्थ वणवण करून मी ही थकून गेलो आहे. दोघांची ही परीस्थिती सारखीच आहे(एक गीत) पण अंतरीच्या अपेक्षा निराळ्या असल्यानं मनस्थिती वेगवेगळी आहे.
इंग्रजीत नकारात्मक अर्थाची एक म्हण आहे, 'Calamities come together' पण जश्या आपत्ती एकत्रितपणे येतात तशाच पद्धतीनं एखाद्या विशेष उत्पत्ती साठी योगायोगांची सोनसळी साखळीही निर्माण होत असावी. खोल मनातून उमटलेल्या, अत्यंतिक गहिरेपण लाभलेल्या, त्या तरू तळी विसरलेल्या गीता बाबत तरी हे नक्कीच घडलं आहे. ही भावकविता, कवी आणि संगीतकार यशवंत देव यांच्या मनात भरली. ते असं मानत, की कवीच्या भावना गीतामध्ये उतरलेल्या असतात, त्या ओळखून त्या योग्य प्रकारे स्वरसिध्द करता आल्या, तरच श्रोते ते गीत हृदयात साठवतात आणि स्मरणात ठेवतात. कांतानी शब्दबद्ध केलेल्या ह्या उत्कट भावना, स्वरबध्द करण्यासाठी, देवांनी चंद्रकंसाची निवड केली. भावनिक हिंदोळे, उत्कंठा, नर्मशृंगार आणि एकाकीपणा या मानवी भावनांची सशक्त अभिव्यक्ती करणारा हा चंद्रकंस राग. मालकंस मधल्या कोमल निषादानी शुद्ध निषादाच रूप धारण केलं की चंद्रकंस 'सा'कारतो. ह्या शुद्ध निषादामुळे, चंद्रकंसाच स्वतंत्र अस्तित्वही निर्माण होतं आणि श्रोत्यांच्या कानामनावर कायम स्वरुपी ठसाही उमटतो. देवांचीच निवड ती, चपखलच असणार!
आयुष्य जगत असताना अनेकांच्या भेटीगाठी होतात. काहींशी विशेष मैत्र जुळतं. मात्र अश्या सर्वांचं सानिध्य आपणाला सतत लाभेल असं नाही. तेव्हा आपल्या पासून दूर असलेल्या, गेलेल्या व्यक्तींच्या आठवणीत लिहिलेली, रचलेली, गायलेली ही एक सुंदर विराणीच म्हणता येईल. कविवर्य वा. रा. कान्त यांच्या दोन तीनच कवितांची यशवंत देव यांनी गाणी केली आहेत. मात्र ती ऐकताना मनात कुठंतरी खोलवर दडलेलं दुःख पृष्ठभागी येतं. गंमत अशी की हे दुःखही मनाला हवंहवंसं वाटणारं असतं.
योगायोगांच्या साखळीतला आणखी एक योगायोग म्हणजे, कवीचे हे चित्रमयी काव्य देवांच्या चालीनं अधिकच सुस्वरूप झाल्या नंतर, ते गायला लाभला सुधीर कंठ!
डोळ्यासमोर चित्र उभं करणाऱ्या कांतांच्या काव्यातले 'विसरले गीत', 'तप्त रणे तुडवीत हिंडतो', 'थंडगार घनगर्द सावली', 'अधरी अमृत उतू जाय', 'भ्रमणी मम तनु थकली गळली' अश्या वाक्यांशांचा शब्दोच्चार आणि स्वरोच्चार अत्यंतिक तन्मयतेने आणि समर्थपणे करून बाबूजींनी त्या चित्रमय काव्याला जणू सुडौल लाघवी सजीवताच बहाल केली आहे. त्यांच्या स्वरात ही विरहिणी, सुवर्णाची नव्हे तर पर्ण-फुलांची आभूषणे ल्यालेल्या वनमाला शंकुतले सारखी आपल्या समोर येते. बाबूजींच्या आर्त स्वरात भीजलेले कांतांचे शब्द ऐकताना खोल अंतर्मनात कालवाकालव होऊन भावनांचा निर्झर प्रवाहित होणं हेच या सारख्या कलाकृतींच मर्म ठरतं. कांतांच्या शब्दांतून, देवांच्या रचनेतून आणि सुधीर सुरातून पाझरणाऱ्या ह्या नितांत मोहक विरहिणीची वेदना अनुभवायलाच हवी.
क्लिक करा - त्या तरू तळी विसरले
नितीन सप्रे



खूपच छान
उत्तर द्याहटवाहृद्य मनोज्ञ प्रसंग!ह्या उर्मीचे साक्षी तलावातल्या जललहरी!अापल्या लेखातून तितक्याच उत्कटतेने प्रगट झाली अाहे.'चंद्रकंस' रागाची छटा लाभली अाहे.
उत्तर द्याहटवाआर्त मनातला मृदगंध....
हटवाआवडीचे गीतं. पण त्या मागची पार्श्वभूमी वाचली की ते गाणं अजून विशेष आवडायला लागते. आपला लेख वाचून परत एकदा गाणं ऐकावं असं वाटतं. व लगेचच ऐकणार ही आहे. मनावर वेगळा परिणाम होतो. अप्रतिम लेखा बद्दल अभिनंदन व धन्यवाद
उत्तर द्याहटवा