स्मृतीबनातून - छोटा नव्हे वाग्येयकार गंधर्व
छोटा नव्हे वाग्येयकार गंधर्व
सकाळी दार उघडून घरातून बाहेर येताच आपल्या अंगणातल्या फुलझाडांची फुलं तोडणारी कुणी व्यक्ती दिसली तर साधारणतः ती हमखास शेलक्या विशेषणांची धनी होणार हे निश्चित. पण एखादा दिवस वेगळा उगवतो.1993 सालच्या हिवाळ्यातला तो दिवस माझ्यासाठी तरी असाधारण ठरला. त्या दिवशी सकाळी, मलाही बागेतली फुलं तोडणारी व्यक्ती दिसली. पण राग येण्या ऐवजी मनात अनुराग उत्पन्न झाला. ती सकाळ माझ्या साठी 'आजी म्या ब्रह्म पाहिले' अशीच होती. कारण फुलं तोडणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून साक्षात लोकप्रिय कृष्ण होती.
त्यावेळी मी आकाशवाणी पुणे केंद्रावर कार्यरत होतो. नुकताच चतुर्भुज झालो होतो आणि काही दिवस पुण्यातल्या कमला नेहरू पार्क जवळ प्रभात रोडच्या गल्लीत असलेल्या दीक्षितांच्या बंगल्यात रहात होतो. एक दिवस सकाळी उठून, बाहेर अंगणात येतो तर कुणीतरी वयस्क व्यक्ती पाठमोरी परस दारी असलेल्या फुलझाडां वरची फुलं तोडताना दिसली. कोण, कोठून आलात वगैरे चौकशी करणार, तेवढ्यात ती व्यक्तीचं माझ्या दिशेनी आली आणि स्वतःच्या मोठेपणाचा लवलेशही मनात न बाळगता अगदी निरागस ऋजुतेनं आपली ओळख देऊ लागली. मी अवघडून गेलो. कारण त्या व्यक्तीला ती देण्याची आवश्यकताच नव्हती. 'संगीत सौभद्रा'च्या त्या लोकप्रिय कृष्णाला मी अगदी शालेय जीवना पासून ओळखत होतो. कधी भेटलो मात्र नव्हतो. कृष्ण, धैर्यधर, आश्विन शेठ, रेवती यांना कुठला खराखुरा मराठी माणूस ओळखणार नाही? अत्यंत मधाळ आवाजात आणि किंचित लुडव्या उच्चारात गायलेली त्यांची 'कोण तुझ सम सांग मज गुरूराया', 'जरतारी लाल शाल जोडी', 'दे हाता शरणागता', 'भाळी चंद्र असे धरिला', 'बहुत दिन नच भेटलो सुंदरीला', 'नच सुंदरी करू कोपा', 'देवा तू माझी माऊली', 'नारायण नारायण नाम तुझे', 'गोविंद गोविंद मना लागलीया छंद' आदी नाट्यपदं, भक्तीगीतं कानात रूणझुणु लागली. चांगल्या संगीताप्रती माझ्या मनात रुची निर्माण करण्यात, या आणि यासारख्या अभिजात गायकीचा सिंहाचा वाटा आहे. त्या दिवशी फुलं तोडणाऱ्या सौदागर नागनाथ गोरे उर्फ छोटागंधर्व यांना पाहिल्यावर मला त्याची प्रकर्षानं जाणीव झाली. भारावलेल्या अवस्थेतच मी त्यांना चहापानासाठी घरात बोलावून पत्नीला तशी व्यवस्था करायला सांगताच अत्यंत संकोचानं त्यांनी विचारलेला, "तिला जमेल नं?" हा प्रश्न आणि नंतर चहा फक्कड झाल्याची दाद देत संगीत रंगभूमीच्या 'वन्स मोर'च्या बादशहानं अगदी मनमोकळेपणानं चहाला दिलेल्या 'वन्स मोर' (मागून घेतलेला आणखी एक कप चहा) मुळे सारं अवघडलेपण क्षणात नाहीसं झालं आणि बैठकीच्या खोलीतच सुंदर मैफिल सजली. तीस वर्षांपूर्वी त्या प्रभाती घरीच रंगलेला तो प्रयोग माझ्यासाठी अविस्मरणीय ठेवा ठरला.
'बालमोहन संगीत मंडळी' च्या 'प्राणप्रतिष्ठा' या पहिल्याच नाटकात सौदागरांना त्यांची पहिली भूमिका मिळाली तीही नायिकेची आणि संगीत रंगभूमीवर त्यांचीही प्राणप्रतिष्ठा झाली. तिसऱ्या वर्गातच औपचारिक शालेय शिक्षणाचा हात सुटला मात्र संगीत शिक्षणा बाबत ते सुदैवी ठरले. वसंतराव गोइत्रीकर, दत्तुबुवा बागलकोटकर, नरहरबुवा पाटणकर, धुळ्याचे गायनशिक्षक गणेशबुवा पाध्ये यांच्या कडून त्यांच्या गान शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. सवाई गंधर्व, कृष्णराव गोरे, कृष्णराव शेंडे, मास्टर दीनानाथ, भूर्जीखाँ ह्यांच्या कडूनही त्यांना थोडी तालीम आणि मार्गदर्शन लाभलं. मात्र गंडाबद्ध शागिर्दी केली ती ग्वाल्हेर घराण्याचे गायक सेंदेखाँ ह्यांचाकडे. अशाप्रकारे मधुकर वृत्तीनं घेतलेल्या स्वर शिक्षणामुळे त्यांचा सांगितिक दृष्टिकोन आणि गायकी अधिक प्रगल्भ होत गेली. मस्तीत गा पण मस्ती करून गाऊ नकोस हा बालगंधर्वांनी दिलेला संदेश अक्षरशः शिरसावंद्य मानुन त्यांनी आयुष्यभर त्याची पालना केली. गाण्याला, शब्दांना हळुवार कुरवाळत स्वरानंद देत, घेत ते गात असत. गाण्या बरोबरच त्यांच्या साध्या बोलण्यात, आचरणात आणि एकूण व्यक्तिमत्त्वातूनही ऋजुता पाझरत असे. आजीनं बरणीत भरून ठेवलेल्या मुरलेल्या मोरावळ्या सारखं त्यांच गाणं सकस, अवीट आणि गोड होतं.
महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी जगाच्या रंगभूमीवर त्यांचा प्रवेशही सामान्य नव्हता. जन्मतः त्यांच्या मुखी एक दात होता. त्यावेळेच्या धारणे प्रमाणे हे अशुभ मानलं गेलं मात्र हा मुलगा मोठेपणी खूप नाव कमावेल ही कुर्तकोटी शंकराचार्यांची भविष्यवाणी, स्वरराज असा लौकिक प्राप्त करून सौदागरांनी सार्थ ठरवली.
छोटा गंधर्व यांनी रंगभूमीवर वाटचाल सुरू केली ती यमन कल्याण रागातलं पद गाऊन. संगीतात 22 श्रुती आणि 7 स्वर आहेत. योगायोग म्हणजे छोटा गंधर्व यांचा पुण्याच्या विजयानंद थिएटर मध्ये पहिला प्रयोग 22 जुलैला (22.7) झाला हा योगायोग. नाट्यसंगीत हा शब्द खरं तर त्यांना मान्य नव्हता. नाट्य संगीताला शास्त्रीय संगीताची बैठक आहे. नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतात फक्त शब्दांचाच काय तो फरक आहे. त्यात कुठली उच नीचता मानता कामा नये असं त्यांचं स्पष्ट मत होतं. शास्त्रीय संगीताच्या व्याकरणाची क्लिष्टता टाळून त्यातलं सर्व सौंदर्य नाट्य संगीतात आणलं पाहिजे. जेणेकरून ते नाट्य रसिकांच्या अंत:करणाचा ठाव घेईल असं त्यांचं स्पष्ट मत होतं. वैशिष्ट्यपूर्ण स्वर लगाव, ढाक्याच्या मलमली सारखा तलम सुरीला, रसिला गळा, दमदार, दळदार तानकाम, दमसास, लाडिक हरकती, मिंडकाम ही छोटा गंधर्व यांच्या गायकीची सौंदर्यस्थळं म्हणजे गानभक्ती मार्गावरच्या स्वरासक्त वारकऱ्यांची जणू तीर्थस्थळंच होती.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या अवकाशातला त्यांचा वावरही दमदार आणि विलोभनीय ठरला. कौशी बहार, बसंती, नंदबसंत, गुणिकंस, संजोग, शंकरा यासारख्या नव्या राग संकल्पना त्यांनी मांडल्या. निसर्ग, शृंगार, ईशस्तुती, अध्यात्म अश्या विविध विषयांवर 'गुनरंग' नावानं बंदिशी रचल्या. काव्य रचून, स्वरात बांधून त्याचं गायनही करणाऱ्या अश्या व्यक्तीला वाग्येयकर संबोधलं जातं. या दृष्टीनं ते छोटा नव्हे तर वाग्येयकार गंधर्व होते.
रंगभूमीवरचा त्यांचा प्रवास रोचक होता. दूरदर्शनचा दिलेल्या एका मुलाखतीत
त्यांनीच सांगितलेल्या एका प्रसंगातून त्यांची विनम्रता आणि कुशलता यांचा प्रत्यय येतो. मुंबईतल्या किंग जॉर्ज शाळेत मानापमान चा प्रयोग होता. छोटा गंधर्व धैर्यधर तर भामिनी होत्या हिराबाई बडोदेकर.
गायकासाठी, कलाकारासाठी किंवा एखाद्या विशेष कामगिरीसाठी टाळी मिळणं ही तशी आम बाब. हल्ली तर 'यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत' अश्या आग्रहाचा अतिरेक निवेदक प्रजाती कडून सारखा सारखा होताना दिसतो. बाल सौदागरा बाबत मात्र याच्या नेमका उलट प्रसंग घडला होता. सदाशिव अनंत शुक्ला यांच्या 'स्वर्गावर स्वारी' या नाटकात बारा वर्षांच्या सौदागरांच्या मुखी शंकरराव सरनाईकांच्या गाजलेल्या भैरवी(नृपती कन्या) वर आधारित विपवरी का कांता असं एक पद होतं. चार पांच 'वन्स मोर' घेऊनही श्रोत्यांची टाळी थांबत नव्हती. अखेरीस बाल मोहन संगीत मंडळीचे मालक, दामूअण्णा जोशी यांना विनंती करावी लागली की पोर लहान आहे, थकून गेलं आहे. तेव्हा प्रयोग पुढे सुरू राहावा असं वाटत असेल तर कृपया आता टाळी देऊ नये.
स्वतःच्या मतावर ठाम, ऋजु स्वभाव, साधी रहाणी, धार्मिक वृत्ती, चातुर्मासात नाट्य प्रयोग न करणारा, आवाज खराब असेल तर नाट्य प्रयोग रद्द करण्याची व्यावसायिकता बाळगणारा, पन्नासच्या दशकात सर्वाधिक, एक हजार नाईट घेणारा, स्वतः पदं, चीजा रचून संगीतबद्ध करून त्या गाणारा, प्रसिद्धीच्या मोहमायेत न गुरफटता शिखरावर असताना निवृत्त होणारा आध्यात्मिक वृत्तीचा हा महान कलावंत छोटा गंधर्व कसा असेल? तो तर मोठा वाग्येयकार गंधर्व होता.
नारायण नारायण नाम तुझे तू माझी माऊली
नितीन सप्रे
8851540881
अविस्मरणीय क्षण तुमच्या भाग्याचा! खुपचं छान माहिती. नवे पैलू समजले.
उत्तर द्याहटवानितीन जी मस्त.
उत्तर द्याहटवानितीन जी ,
उत्तर द्याहटवास्वरराज छोटा गंधर्व यांच्यावर आपण लिहिलेला लेख अतिशय माहितीपूर्ण असाच आहे त्यांनी गायलेली अनेक नाट्यपद ऐकताना वेगळा आनंद होतो. ते आमचे स्नेही आणि सहकारी पं. विश्वनाथ ओक यांचे गुरू आहेत . त्यांच्या स्मृतीस आदरयुक्त अभिवादन.
माहितीपूर्ण लेख,मस्त.
उत्तर द्याहटवाखूप कसदार म्हणून समाधान देणारं लिखाण आहे हे. प्रसिध्दीच्या शिखरावर असताना निवृत्ती तेही स्वतःहून स्वीकारणे हे भल्या भल्यांना जमू शकले नाही, ते यांनी केले हे फारच विशेष आहे.
उत्तर द्याहटवा